महाराष्ट्रासमोरील मोठे आव्हान

महाराष्ट्रासमोरील मोठे आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व असलं तरी त्यांच्याकडे गांभीर्यानं पहाण्याचा द़ृष्टीकोन कमी होतोय.

2019च्या निवडणुकीत हेच राज ठाकरे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हा थापाड्या माणूस आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका’ असे सांगत होते. त्यांनी लोकसभेला स्वतःचा एकही उमेदवार उभा केलेला नसताना लाखांच्या जाहीर सभा घेणं आणि ‘भाजपच्या उमेदवारांना मते देऊ नका,’ असं सांगणं हे नेमकं काय होतं?

महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद पूर्वी होता, आजही आहे आणि पुढेही राहील. आपल्याकडे 1999 पूर्वी जातीयवाद नव्हता असं म्हणणं साफ चुकीचं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर तो वाढला हेही पूर्ण सत्य नाही. जुन्या काँग्रेस पक्षात, शिवसेनेत, भाजपात सगळीकडेच जातीयवाद आहेच आहे. मुळात आपल्याकडे अनेक पक्षच जातीच्या आधारावर निर्माण झाले. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, कवाडे गट, मुस्मिल लिग अशी पक्षांची नावे जरी बघितली तरी हे पक्ष कुणाचे आहेत आणि ते कुणासाठी चालवत आहेत हे लक्षात येईल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कित्येक वर्षे ठरावीक मराठा समाजाचाच असणं काँग्रेससाठी गरजेचं होतं. ए. आर. अंतुलेंना मुख्यमंत्रीपदावरून काढल्यानंतर बाबासाहेब भोसले यांना केवळ त्यांची जात बघून मुख्यमंत्री केलं गेलं ही गोष्ट कोण नाकारणार? त्यावेळचा जातीयवाद कसा होता आणि त्याचं स्वरूप कसं होतं याची माहिती घ्यायची असेल तर राजकारणाचं वाचन असणं आवश्यक आहे.

फक्त महाराष्ट्राच्या राजकारणातला जातीयवाद संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येकानं प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची मात्र गरज आहे. जातीच्या-धर्माच्या पलीकडे जाऊन उभं राहिलो तरच नवा महाराष्ट्र घडू शकेल. राज ठाकरे काय बोलले, त्यांच्या बोलण्यात अभ्यास किती होता यापेक्षा त्यांच्या बोलण्यामुळं ज्या विषयाला आणि चर्चेला सुरूवात झाली तो विषय, ती चर्चा मात्र थांबता कामा नये. राजकीय पक्षांना माणसाच्या जातीशी-धर्माशी घेणं-देणं नसतं. ‘निवडून येण्याची क्षमता’ हाच एकमेव निकष पाहून ते उमेदवारांची निवड करतात. ज्या मतदार संघात बंजारा समाज मोठा संख्येनं आहे, आदिवासी समाज मोठ्या संख्येनं आहे, दलित-मराठा समाज मोठ्या संख्येनं आहे तिथं त्या त्या समाजाचे उमेदवार देणं भाग पडतं. जिथं ‘मामुली’ (मारवाडी, मुस्लिम, लिंगायत) माझं काय बिघडवणार? असा सवाल विलासराव देशमुखांनी केला तिथं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं हा इतिहास आहे आणि तो 1999 पूर्वीचा आहे. भाजपनंही ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) हा फॅक्टर पुढे आणलाच.

राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व, बोलणं, वागणं, नूर सगळं काही बदललं आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवाद वाढला, असं राज म्हणतात. शरद पवार यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी कितीही नाकारलं तरी पवारांकडे मराठा समाजाचे प्रभावशाली नेते म्हणूनच बघितलं जातं. दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांतही त्यांची ‘द ग्रेट मराठा लिडर’ अशीच ओळख आहे. आपली मराठा वोट बँक कशी सांभाळायची हे त्यांना बरोबर कळतं. त्यासाठी ते श्रीमंत कोकाटेंच्या पुस्तक प्रकाशनाला जाऊन काहीतरी वादग्रस्त विधान करतात. ‘जाणता राजा’ ही शिवाजी महाराजांची पदवी नाही, ‘छत्रपती’ हीच त्यांची पदवी आहे, समर्थ रामदास हे त्यांचे गुरू नव्हते असं सांगतात. मराठा समाजही आपल्या अस्मितेचं प्रतीक म्हणून शरद पवारांकडे बघतो. आजही सर्वाधिक संख्येनं मराठा समाज पवारांच्या पाठिशी उभा आहे हे का नाकारावं? पवारांवर टीका करणारे, पवारांच्या विरोधात जाणारे, त्यांना त्रास देणारे, त्यांचे पाय ओढणारे अशा सगळ्यांना मराठा समाजानं ठरवून संपवलं आहे.

गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या माणसाची गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता बघून फडणवीसांनी त्यांना संधी दिली असं राज ठाकरे यांना म्हणायचं आहे का? महादेव जाणकरांचा उपयोग भाजपच्या दृष्टीनं संपल्यानं धनगर समाजाचं कार्ड खेळण्यासाठी पडळकरांना पुढं आणणं हा भाजपचा जातीयवाद नाही का? मुंबईत विनोद तावडेंना हाताशी धरण्याचं काय कारण होतं? तिथं आशिष शेलार नावाचा दुसरा पर्याय मिळाल्यावर तावडेंना सोडून देण्यात आलंय. डॉ. भगवान कराड यांना पुढे आणताना मुंडे भगिणींची गरज भाजपला नाही, असा संदेश देण्यात येतोय. या उदाहरणावरून भाजपमध्येही जातीयवाद आहे हे स्पष्ट होत नाही का? राज ठाकरे यांना भाजपा आता सर्वगुणसंपन्न पक्ष वाटतोय. चार महिन्यांपूर्वी पवारांचं कौतुक करणार्‍या मनसैनिकांना आता पवारांना लाखोल्या घालाव्या लागत आहेत. राज यांच्या इतक्या झपाट्यानं बदलणार्‍या भूमिका पाहता सामान्य कार्यकर्त्यांची मोठी कुचंबना होत आहे. राज यांना शिवसेनेतले दोष पूर्वीपासून दिसतात. काँग्रेसचे दिसतात, भाजपचे दिसतात आणि आता राष्ट्रवादीचेही दोष दिसत आहेत.

राज ठाकरे यांनी जी चर्चा सुरू केली त्या चर्चेच्या अनुषंगानं शरद पवार यांनी आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे, राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे वाचावेत! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे वैचारिक सामर्थ्य होते. त्यांनी ब्राह्मणांचा उल्लेख ‘ब्रह्मदेवांच्या उलटीतून निर्माण झालेले’ असा केलाय. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सहवास लाभलेल्या प्रबोधनकारांच्या भूमिका आज कुणालाही पचणार्‍या नाहीत. त्यांचं लेखन, त्यांचे विचार याच्याशी आज कुणाचा काही संबंध असेल असं वाटत नाही. प्रबोधकारांच्या लेखनावर, विचारांवर जर आज कोणी बोलू लागला तर त्याला कोणताही जनाधार मिळणार नाही. मतपेटी तयार होणार नाही. याचं भान असल्यानंच त्यांच्या विचारांवर कुणीही चर्चा करत नाही.

त्यामुळं महाराष्ट्रातच नाही तर भारतभर आणि जगातल्या सगळ्या लोकशाहीवादी देशांत जातीचा-धर्माचा पगडा आहेच. राजकारणात तर तो आवर्जून विचारात घेतला जातो. त्यामुळं राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला हे पुरेसं खरं नाही. मात्र यानिमित्तानं राज ठाकरे यांनी एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडलंय. हे विचार मांडतानाच राज यांनी केवळ ‘स्त्री आणि पुरूष’ इतकाच विचार करून आरक्षण द्या, असंही म्हटलंय आणि त्यावर विचार होणं गरजेचं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर किमान राज यांनी स्वतः जातीयवाद न करता त्यांचा पक्ष मोठा करून दाखवावा. पक्ष मोठा करणं म्हणजे लाखोंच्या सभा गाजवणं नाही तर पक्षाची सत्ता मिळवणं! घराणेशाहीला विरोध करायचा आणि आपल्या मुलाला राजकारणात आणायचं असा दांभिकपणा आजवर अनेकांनी केलाय. राज ठाकरे हे दैवत आहेत असं वाटणार्‍यांनी हेही विचारात घेतलं पाहिजे की राजसाहेबही त्याला अपवाद ठरले नाहीत. ही गोष्ट राज यांनाही इतर राजकारण्यांच्या पंक्तीत नेऊन बसवते. राजकारण्यांना लागतो तो किमान धाडसीपणा राज यांनी दाखवावा. त्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व उजळून निघेल. जात आणि धर्म याच्या पुढे जाऊन राजकारण करणारा नेता भविष्यात महाराष्ट्रात निर्माण झाला पाहिजे. यानिमित्ताने का होईना राष्ट्रवादीबरोबरच महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांची मर्यादा राज ठाकरे यांनी दाखवली आहे.

राष्ट्रवादीने छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड अशा अनेक लोकांना संधी दिली. ती संधी त्यांची जात बघूनही दिली गेलेली आहे. त्यामुळे राज यांनी राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष आहे, असं म्हटलं असलं तरी तो एकच पक्ष जातीयवादी आहे असं नाही. हा जातीयवाद संपवण्याची क्षमता असलेल्या एका नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. यावेळी नाही निदान 2029 ला जरी राज ठाकरे यांनी ही पोकळी भरून काढली तर त्यात महाराष्ट्राचेच भले आहे. ते करायचे असेल तर इतरांवर टीका करण्याऐवजी त्यांनी स्वतःचे मूल्यमापन करायला हवे. ते करताना तुमच्यावर कोणी टीका केली तर तिही सहन करा. आपल्यावर टीका करणारा आपल्यावरील प्रेमाखातर चार गोष्टी सुचवतोय हे लक्षात घ्या. जसा तुम्हाला तुमचं मत मांडायचा अधिकार आहे तसाच इथल्या सामान्य माणसाला, तुमच्यावर प्रेम करणार्‍याला त्याच्या अपेक्षा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आणि अजूनही महाराष्ट्रातल्या एका मोठ्या वर्गाला तुमच्याविषयी आदर आणि प्रेम वाटतं. किंबहुना अपेक्षा व्यक्त कराव्या वाटाव्यात अशा मोजक्ता नेत्यात तुम्ही आहात. महाराष्ट्रासमोरील मोठं आव्हान तुमच्या लक्षात आलेलं आहेच. ते आव्हान स्वीकारून तुम्ही काही ठोस केलं तर त्यात तुमचं आणि महाराष्ट्राचंही भलंच होणार आहे.

– घनश्याम पाटील

7057292092

पूर्वप्रसिद्धी – दै. ‘पुण्य नगरी’, मंगळवार, दि. 24 ऑगस्ट 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “महाराष्ट्रासमोरील मोठे आव्हान”

  1. Ramkrishna Adkar

    शरद पवारांचा जातियवाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशासाठी घातक ! राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या नेत्यानं इतका ब्राह्मणांचा द्वेष करावा हे तुम्हाला दिसतंय आणि ते राज ठाकरे यांनी सांगितले तर तुम्ही का स्वीकारत नाही! खरं बोलायला घाबरु नका !

  2. जयंत कुलकर्णी

    नेहेमी प्रमाणे वाचनीय लेख!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा