इतिहासाच्या अभ्यासामुळं माणसं वेडी होतात आणि वेडी झालेली माणसं इतिहास घडवतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानं महाराष्ट्राला गेली साडेतीनशे वर्षे गारूड घातलेलं आहे आणि हा इतिहास गेली शंभर वर्षे जगणार्या माणसाचं नाव म्हणजे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे!
शिवचरित्र हे कायम मराठी माणसाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलं आहे. गेल्या आठ दशकात महाराष्ट्रात जर आठ पिढ्या बदलल्या असतील तर प्रत्येक पिढीसमोर हे शिवचरित्र मांडण्याचं काम बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं आहे. आजही आमच्या मनात जे शिवाजी महाराज उभे राहतात ते बाबासाहेब पुरंदरे यांनी उभे केलेले शिवाजी महाराज राहतात. गड, कोट, किल्ले, दुर्ग, शिवाजी महाराज, इतिहास, पराक्रम या शब्दांचं जे आकर्षण आहे ते काही पिढ्यांमध्ये टिकवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. शिवचरित्र वाचणं, अभ्यासणं, त्यावर व्याख्यान देणं ही गोष्ट वेगळी आणि शिवचरित्र जगणं ही गोष्ट वेगळी. मूर्तिमंत शिवचरित्र बाबासाहेब पुरंदरे जगले आहेत.
शिवाजी महाराजांचे असंख्य गड, कोट, किल्ले त्यांनी पाहिले, पालथे घातले. त्यांनी मराठी सनसनावळ्या आणि इंग्रजी तारखांसह शिवचरित्र लोकांसमोर मांडलं. शिवचरित्राचा एक मोठा आलेख महाराष्ट्रासमोर उभा केला. शक्य होतं तेव्हा व्याख्यानं दिली. ‘जाणता राजा’सारखं एक महानाट्य रंगभूमिवर सादर केलं. त्याचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांचा राज्याभिषेक रंगमंचावर होत असताना आपण प्रत्यक्ष रायगडाच्या दरबारात हजर आहोत असा आभास निर्माण करण्यात आणि तो राज्याभिषेक पुन्हा नव्वदच्या दशकात असंख्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात बाबासाहेब पुरंदरे यशस्वी झाले.
मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर रामायण आणि महाभारतातील कथांबरोबर त्यांना शिवचरित्राच्या कथा सांगणं गरजेचं आहे, हे बाबासाहेबांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानांमुळं लोकांपर्यंत पोहोचलं गेलं. बाबासाहेबांनी कथा लिहिल्या, कादंबर्या लिहिल्या. शिवचरित्रावर ‘राजा शिवछत्रपती’ हे चरित्र लिहिलं. ‘जाणता राजा’चे प्रयोग केले. शिवाजीराजांच्या पूर्वी आणि महाराजानंतरच्या इतिहासाकडं बाबासाहेब फारसे गेले नाहीत. शिवचरित्र या विषयात ते पुरेसे रममाण झाले. शिवाजी महाराजांनी अनेकांना जगण्यासाठी स्फूर्ति दिली; ती स्फूर्ति घेऊन स्वतःचं जगणं समृद्ध करणारा आणि ते होतानाच असंख्य लोकांची आयुष्य समृद्ध करणारा बळवंतराव मोरेश्वर पुरंदरे हा खर्या अर्थानं शिवचरित्र जगलेला आणि शिवचरित्रावर मनापासून प्रेम केलेला गृहस्थ आहे.
बाबासाहेब वादाच्या भोवर्यात अडकले. त्यांच्या शिवचरित्रात सगळ्याच गोष्टी ऐतिहासिक नाहीत, असा आरोप त्यांच्यावर केला गेला. त्यांनी लिहिलेलं शिवचरित्र इतिहासाच्या जवळ जाणारं नाही असेही आरोप केले गेले. बाबासाहेब जे मांडतात तो इतिहास आहे, तो शंभर टक्के खरा आहे, असा दावा खुद्द बाबासाहेबांनीही कधी केला नाही. बाबासाहेब जे सांगत होते त्याला कल्पनेचा आधार होता. त्यांनी स्वतःला कधी इतिहासाचा अभ्यासक आणि संशोधक असंही म्हणवून घेतलं नाही. ते स्वतःला अभिमानानं ‘शिवशाहीर’ म्हणवतात. शाहीराचा श्रद्धाळूपणा त्यांच्या अंगात आहे. स्वतःला ‘शाहीर’ म्हणवून घेतल्यानंतर आणि आपण शाहीराच्या भूमिकेत गेल्यावर आपल्या चरित्रनायकाचं कौतुक करणं, त्याची स्तुती करणं, त्याच्या जीवनातले प्रसंग रंगवून सांगणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या सर्व बाबासाहेबांनी केल्या. त्यांनी आपल्या चरित्रनायकावर जेवढं प्रेम केलं तेवढं चरित्रनायकावर प्रेम करणारे फारच थोडे शाहीर बाबासाहेबांपूर्वी आणि बाबासाहेबानंतर सुद्धा महाराष्ट्रात जन्माला आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक पिढीला आव्हान देणारा विषय वाटतो. गेली सात ते आठ दशकं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आणि वेगवेगळ्या पिढ्यांना शिवाजीराजांबद्दलचं आकर्षण वाटावं असं काम बाबासाहेबांनी निष्ठेनं केलं. इतकं निष्ठेनं लोकांपर्यंत शिवचरित्र पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दुसर्या कोणी केला नाही. शिवचरित्रांवरच्या व्याख्यानांना बाबासाहेबांनी एक नवा आयाम दिला. त्यांची शिवचरित्रावरची वेळेत सुरू होणारी आणि वेळेत संपणारी व्याख्यानं ही सत्तर-ऐंशीच्या दशकात चर्चेचा विषय होती. ज्या काळात दूरचित्रवाणी किंवा अन्य करमणुकीची फारसी साधनं नव्हती त्या काळात ते एकेका प्रसंगावर तास न तास उभे राहून बोलत होते. कुडतोजी गुर्जर यांचा इखलास खान व बहलोल खानाविरूद्धचा पराक्रम आणि कवीवर्य कुसुमाग्रजांची ‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात दौडले वीर मराठे सात’ ही कविता बाबासाहेबांच्या तोंडून ऐकण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणात दोष नाहीत, असं आमचं म्हणणं नाही. त्यांनी लिहिलेलं शिवचरित्र हा शिवचरित्राबाबतचा पूर्णविराम आहे, असं म्हणण्याचंही कारण नाही. त्यांनी ज्या काळात इतिहासाचा अभ्यास केला, त्यांना जे शक्य होतं ते संशोधन केलं, त्या काळात त्यांना जी साधनं उपलब्ध झाली त्यानुसार त्यांनी लेखन केलं. नंतरच्या काळात अनेक नवी साधनं उपलब्ध झालेली आहेत. शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्यानंतर परकीय इतिहासकारांनी लिहून ठेवलेली कागदपत्रं नव्यानं उपलब्ध झालेली आहेत. या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करत वस्तुस्थिती आणि वास्तवता यावर प्रकाश टाकत नवी शिवचरित्र आली तर त्यांचं स्वागत इतर कुणापेक्षाही अधिक उत्साहानं नक्की बाबासाहेबांनीच केलं असतं आणि करत राहतील याबाबत शंका असण्याचं कारण नाही.
बाबासाहेब एक निर्व्यसनी आयुष्य जगले. ते विसाव्या आणि एकविसाव्या शतकात जगलेच नाहीत. हा माणूस सतराव्या शतकात आणि शिवकाळातच जगला. त्यांना विसावं शतक कधी संपलं आणि एकविसावं शतक कधी सुरू झालं याच्याशी कसलंही आणि कोणतंही देणंघेणं नव्हतं. हा माणूस रायगड, प्रतापगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग अशा गोष्टींतून कधी बाहेरच पडला नाही. अशा पद्धतीनं या माणसानं आयुष्यभर काम केलं म्हणून शिवचरित्र लोकांपुढे चांगल्या पद्धतीनं उभं झालं.
नरहर कुरूंदकरांनी केलेली शिवचरित्राची मांडणी वेगळी आहे. सर जदुनाथ सरकारांनी मांडलेलं शिवचरित्र वेगळं आहे. डॉ. बाळकृष्ण शिवचरित्राबद्दल बोलतात त्यावेळी त्यांना भावलेले, आवडलेले शिवाजी महाराज वेगळे आहेत आणि ग्रँड डफनं केलेली शिवचरित्राची मांडणी वेगळी आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी शिवचरित्राची केलेली मांडणीही वेगळी आहे! पण सर्वसामान्य माणसाला आकर्षण वाटावं, त्याला त्यातले बारकावे माहीत व्हावेत असं शिवचरित्र जर कोणी लोकांसमोर मांडलं असेल तर ते बाबासाहेब पुरंदरे आहेत. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका असू देत, शाहिस्तेखानाचा प्रसंग असेल किंवा अफजलखानाचा कोथळा काढणे असेल बाबासाहेबांनी शिवचरित्राला खर्याअर्थानं न्याय देण्याचं काम केलंय. इतिहास जगणार्या या माणसानं स्वतःच्या आयुष्यात अनेक विक्रम घडवलेले आहेत. त्यांचं राष्ट्रप्रेम, शिवचरित्रावरची निष्ठा, त्यांचा साधेपणा आणि निर्व्यसनीपणा या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यक्तित्त्वाला एक वेगळी उंची आणि आयाम देतात. शिवशाहीर कसा असावा? या प्रश्नाचं उत्तर ‘बळवंतराव मोरेश्वर पुरंदरे यांच्यासारखा असावा’ असं म्हणायला हरकत नाही इतपत शिवचरित्राची मांडणी करणार्या या शाहीरानं कमाल उंची संपादन केली आहे. ‘शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा’ असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजीराजांसारख्या चारित्र्यसंपन्न माणसाचं चरित्र सांगण्यासाठी उभा असलेला माणुससुद्धा तेवढाच चारित्र्यसंपन्न आणि सात्त्विक असला पाहिजे, हे त्यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं.
एका पिढीतून दुसर्या पिढीत जात असताना राजकारण्यांच्या दोन पिढ्या एकमेकांचं ऐकत नाहीत हे आपण अनेकदा बघितलं आहे. तिसर्या पिढीत नेतृत्व बदललेलं दिसतं. तोपर्यंत माणसं कंटाळेली दिसतात. आठ पिढ्या झाल्या तरी लोकांचं बाबासाहेबांच्या शिवचरित्रावर आजही प्रेम आहे. आजही नव्या पिढीला शिवचरित्राची आणि शिवाजी महाराजांची ओळख होते ती बाबासाहेबांनी या विषयावर केलेल्या व्याख्यानांमुळं, महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगावर त्यांनी केलेल्या लेखनामुळं.
बाबासाहेबांनी शिवचरित्रात रंजकता आणली. तारखा, सन, सनावळ्या यात इतिहास गुंतलेला दिसतो आणि अडकलेला दिसतो. त्यांनी तारखा, सन, सनावळ्या, वार, वेळ हे सगळं सांगितलंच पण तरीही इतिहासातला रंजकपणा, त्यातलं आकर्षण कमी होऊ दिलं नाही. हा चरित्रनायक जेवढा आकर्षक आणि उत्तुंग होता तेवढाच त्याची महती सांगणारा हा शाहीरसुद्धा मोठा आणि उत्तुंग झालेला आपल्याला या एकविसाव्या शतकात पहायला मिळाला.
एका वेगळ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र केवळ महाराष्ट्रभर पोहोचवलं असं नाही तर शिवचरित्र कसं जगायचं याचा वस्तुपाठ सामान्य मराठी माणसाला घालून दिला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांवर किती आणि कसं प्रेम करावं?’ याचं उत्तर फक्त एकाच वाक्यात देता येईल ते म्हणजे, ‘बाबासाहेब पुरंदर्यांइतकं करावं.’ आज (दि. 29) ते वयाच्या शंभरीत पदार्पण करत असताना त्यांना समस्त शिवप्रेमींतर्फे मानाचा मुजरा.
– घनश्याम पाटील
7057292092
(प्रसिद्धी – दैनिक ‘पुण्य नगरी’, गुरूवार, 29 जुलै 2021)
सुंदर लेख. बाबासाहेबांना मानाचा मुजरा
खूप सुंदर लेख. बाबासाहेबांना त्रिवार वंदन🙏🙏🙏
अतिशय सुंदर लेख. श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र महाराष्ट्रात घरा घरात पोहोचवलं. स्वराज्याची उर्मी देशाभिमान लोकांच्या मनात निर्माण केला. सर तुम्ही म्हणता त्यानुसार ते महाराजांच्या काळातच जगले! शाहिरांच्या चरणी दंडवत!
अप्रतिम लेख। बाबासाहेबांना त्रिवार वंदन
सुंदर लेख…..