पुण्याचा विस्तार वैभवशाली ठरावा

पुण्याचा विस्तार वैभवशाली ठरावा

भारताची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणेच आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत आता नव्याने तेवीस गावांचा समावेश केल्याने भौगोलिकदृष्ट्या पुणे ही सर्वात मोठी महापालिका झाली आहे. पुणे शहर कोणाचे? असा प्रश्न केला तर एकच उत्तर येते ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे. पुणे लुटून, जाळून मुरार जगदेवानं कसब्यावर गाढवाचा नांगर फिरवला, पुणं बेचिराख केलं त्या पुण्यात छत्रपती शिवरायांनी जिजाऊसाहेबांच्या समोर सोन्याचा नांगर फिरवला. तेव्हापासून पुणं हे अत्यंत सुजलाम, सुफलाम आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहे.

भविष्यात पुणं हे जगातलं सर्वात मोठं शैक्षणिक केेंद्र व्हायला हवं. वाढलेल्या पुण्यात ज्ञानकेंद्रे कशी निर्माण होतील हे बघायला हवं. सगळ्यात जुन्या शिक्षणसंस्था पुण्यात आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी अनेक वर्षे ज्ञानदानाचं काम करते. फर्ग्युसन कॉलेज तर देशातील असं एकमेव कॉलेज आहे जिथं भारताच्या एकापेक्षा अधिक पंतप्रधानांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुण्याची स्वतःची शैक्षणिक संस्कृती आहे. काँग्रेस पक्षाची स्थापना करताना गोपाळकृष्ण गोखल्यांची भूमिका ही पुण्यात ठरली. काँग्रेसला व्यापक स्वरूप कसं द्यायचं ते याच शहरात ठरलं. पुण्यानं स्वातंत्र्यपूर्व कालखंडातही देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला सदैव नवी दिशा दिलेली आहे. टिळकांचा जहाल राजकारणाचा प्रवाह आणि आगरकरांचा पहिल्या सामाजिक सुधारणांचा प्रवाहही पुण्यानं अनुभवला. 1848 ला महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. आता पुणं हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आशिया खंडातलं सगळ्यात मोठं केंद्र होईल हे बघणं गरजेचं आहे. पुणे विद्यापीठ, पुण्यातील शिक्षणसंस्था यांना मोठा अर्थपुरवठा करणं आणि त्यांना जागतिक पातळीवरच्या संंस्था बनवणं या दृष्टीनं काही भरीव प्रयत्न होताना दिसत नाहीत. भारतातले अव्वल विद्वान पुण्यात कसे आणता येतील आणि त्यांना कशापद्धतीनं कार्यरत ठेवता येईल हे बघितलं पाहिजे.

दुसर्‍या बाजीरावाच्या काळात इथं मोठी शाहिरी परंपरा सुरू झाली. पुण्याच्या संस्काराशी मिळती जुळती असलेली ग्रंथसंस्कृतीही या शहरला लाभली. इथं सवाई गंधर्वसारखे संगीत महोत्सव होतात. त्यासाठी हजारो लोक येतात. पुण्याची खाद्य संस्कृती जशी वेगळी आहे तशीच इथली वैचारिक संस्कृतीही वेगळी आहे. इथल्या येरवडा तुरूंगाचा विचार केला तरी महात्मा गांधी यांच्यापासून ते संजय दत्तपर्यंतचा प्रवास करावा लागतो. पुणं हे सर्वसमावेशक शहर आहे. इथं एका बाजूला फुल्यांची संस्था स्त्री शिक्षणाचं कार्य करते आणि दुसर्‍या बाजूला राजकीय सुधारणा आणि स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हा लोकमान्य टिळकांचा आदर्शवादही कार्यरत असतो. इथं आगरकरांचा सुधारणावाद सुरू असतो तसंच महर्षी कर्व्यांचं महिला-मुलींसाठींचं मोठं काम सुरू असतं.

स्वातंत्र्यानंतरच्या काळाचा विचार केला तर पुणे शहरावर कोणी खूप काळ राज्य करू शकत नाही. पुण्यावर कुणी पाच-पन्नास वर्षे राज्य केल्याचं दिसत नाही. याचं कारण पुण्याचा माणूस हाच मुळात सार्वभौम आहे. त्याचा स्वाभिमान, आत्माभिमान, अभिमान आणि कुणालाही न जुमानण्याची वृत्ती यामुळं कुणाचीच निरंकुश सत्ता इथं फार काळ दिसत नाही. तुम्ही पुण्यातल्या पेठात राहिलात तर तुम्हाला सण, उत्सव कधी आहेत आणि ते कसे साजरे करावेत हे कळतं. कुटुंबातील चार सदस्य चार वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करताना आणि आपापल्या नेत्याला पाडताना इथं दिसतात.

पुण्याच्या पाठीशी जसा शिवशाहीचा इतिहास आहे तसाच पेशवाईचाही इतिहास आहे. इथला शनिवारवाडा थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाची साक्ष देतो. या पराक्रमावर लुब्ध असणारे लोक इथं जसे आहेत तसेच बाजीराव आणि मस्तानीची प्रेमकथा हीही अनेकांना आकर्षक वाटते. मस्तानीला शनिवारवाड्यावर घेऊन येणारा बाजीराव पुणेकरांच्या बंडखोरीचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी चालेल. इथल्या जीवनशैलीच्या जो प्रेमात आहे त्याच्यात क्रांतीची बीजं आपोआप पेटतात. इथं सुरू झालेला आणि वाढलेला गणेशोत्सव असेल किंवा अलीकडच्या काळात बहराला आलेला दहीहंडीचा उत्सव असेल! प्रत्येकावर ‘पुणेरी ब्रॅन्ड’ म्हणून शिक्का मारला जातो.

सार्वजनिक संस्थांचं सर्वात मोठं जाळं पुण्यात आहे. निवृत्त लोकांची, मॉर्निंग वॉक करणार्‍यांची, इव्हिनिंग वॉक करणार्‍यांची, दुपारी झोपणार्‍यांची अशा कशाचीही संघटना इथं कार्यरत राहू शकते. पुणेकर कोणत्या गोष्टींचं संस्थापक जीवन सुरू करतील हे सांगता येत नाही. पुणेरी पाट्यासारखे पीएचडीचे अनेक विषय इथं तयार होतात. ‘कृपया येथे धुम्रपान करू नये, तुमचा जीव स्वस्त असेल पण आमचे पेट्रोल महाग आहे’ असं इथं तुम्हाला एखाद्या पंपावर दिसू शकतं. एखादा वकील त्याच्या कार्यालयाबाहेर बिनधास्त बोर्ड लावतो, जमलं तर बसा, नाहीतर फुटा!

इथं इतिहासावर प्रेम करणारी माणसं आहेत तशीच भविष्यावरही प्रेम करणारी मंडळी आहेत. पुण्याच्या आजूबाजूला असलेलं ऐतिहासिक वातावरण, म्हणजे सिंहगड, पुरंदर, शिवनेरी यासारखे किल्ले आपल्याला पराक्रमाची साक्ष देतात. एखाद्याला कात्रजचा घाट कसा दाखवावा किंवा कोणी आपल्या घरात येऊन राहत असेल तर त्याची बोटे कशी छाटावीत हेही पुणेकरांना चांगलं कळतं. पुणेकर माणूस हे एक वेगळंच रसायन आहे. पुण्यातले सार्वजनिक कार्यक्रम हाही आनंदाचा ठेवा आहे. पुण्यानं अनेक बदल स्वीकारले. कोणत्याही चांगल्या गोष्टीला नाही म्हणायचं नाही, ही या शहराची संस्कृती आहे. पुण्याचं आणखी एक विलोभनीय वैशिष्ट्य म्हणजे पुणेरी माणसाला जीवनावर भरभरून प्रेम करायला आवडतं.

पुण्यात पूर्वी प्रभात थिएटर होतं. इथं चित्रपट निर्मिती व्हायची. काळाच्या ओघात ही थांबलेली निर्मिती पुन्हा सुरू व्हायला हवी. मराठीच नाही तर जागतिक चित्रपटनिर्मिती पुण्यातून होऊ शकते. पूर्वी ज्ञानाच्या आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘ऑल रोडस लीड टू रोम’ असं म्हणायचे. त्यानंतर नेपोलियनच्या काळात रोमचं हे महत्त्व बदललं आणि ‘ऑल रोडस लीड टू पॅरिस’ असं म्हणायला लागले. सगळ्यात मोठी चित्रकलेची, शिल्पकलेची दालनं पॅरिसमध्ये झाली. त्याच पद्धतीनं पुण्याचा आजूबाजूचा परिसर विकसित झाला पाहिजे. सामान्य पुणेकरांनीच हे शहर ‘नॉलेज हब’ व्हावं यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत.

पुण्यात प्रत्येक गोष्ट मिळते. इथं काही नसेलच तर तो आहे समुद्र. समुद्राशिवाय पुण्यात सगळं काही आहे. ही एकच कमतरता लक्षात आली आणि पुणेकरांनी मनात आणलं तर पुढच्या दहा-वीस वर्षात ते समुद्र निर्मितीचेही काम हाती घेतील. रोज बदल हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे. भौगोलिक बदल होत असताना पुणेरी माणसानं जाणिवपूर्वक स्वतःतही बदल घडवलेत. पुण्याचा इतिहास हा कोणत्याही घराण्याच्या नावे चालत नाही. म्हणजे अलाहाबादचा इतिहास म्हटले की पंडित नेहरू डोळ्यासमोर येतात. ग्वाल्हेरचा इतिहास म्हटले की शिंदे घराणे आठवते. पोरबंदर म्हटले की गांधीजी आणि त्यांचे कुटुंबीय आठवते. पुणे हे एकमेव शहर असे आहे की या शहराचा इतिहास म्हटला की इथल्या सामान्य माणसाच्या जगण्याचा इतिहास पुढे येतो. हे शहर सामान्याला असामान्य करणारं आहे. छोट्या लोकांना मोठं करणं, मोठ्या लोकांना आणखी मोठं करणं, जे खूप मोठे लोक आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणं आणि ज्यांना स्वतःबद्दल आपण खूप मोठे आहोत असा गैरसमज आहे त्यांना जमिनीवर आणण्याचं काम पुणेकर सातत्यानं करत असतात. पुणं हे सांस्कृतिक बेट नाही. लखनौत उर्दू साहित्याची परंपरा आहे पण ते उर्दू बेट आहे. लखनौच्या बाहेर त्याचा प्रभाव पडत नाही. पुण्याचं असं बेट नाही तर इथं चांगल्या गोष्टींची भरती येऊन त्याचा महासागर होतो. साधेपणा आणि चातुर्य शिकवणारे हे शहर आहे. इथं जो टिकतो तो जगभर स्वीकारला जातो.

या जगातल्या संस्कृती रक्षणाचा ठेका आपल्याकडेच आहे आणि आपलं दुर्लक्ष झालं तर संस्कृतीच नष्ट होते अशी भीती बाळगणारा, आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आनंदी राहणारा, सातत्यानं आपल्या संस्कृतीची काळजी करणारा सामान्य पुणेकर हा महाराष्ट्राच्या भवितव्याचं प्रतीक आहे. मराठी ही भाषा कुठपर्यंत राहील? तर जोपर्यंत पुणं आहे तोपर्यंत राहील! मराठी भाषेचं भविष्य काय? तर पुण्याचं भवितव्य जसं उज्ज्वल होत राहील तसं भाषेचं भवितव्य उजळून निघेल. पुणेरी माणूस जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचला की मराठी भाषा आपोआप जागतिक होईल.

पुणे ही सर्वात मोठी महानगरपालिका झालेली असताना पुण्याच्या सध्याच्या कारभार्‍यांनी हा सगळा गौरवशाली परंपरेचा भाग लक्षात घेऊन विविध विकासयोजनांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, मोठे काम उभे करावे एवढीच अपेक्षा.
– घनश्याम पाटील
7057292092

प्रसिद्धी – दै. ‘पुण्य नगरी’, रविवार, दि. 1 ऑगस्ट 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

5 Thoughts to “पुण्याचा विस्तार वैभवशाली ठरावा”

 1. जयंत कुलकर्णी

  पुणे तेथे काय उणे … फारच सुंदर लेख. पुण्याचा ‘जाज्वल्य’ अभिमाम म्हणजे काय हे इथे राहिल्या शिवाय कळत नाही हेच खरं! सामान्याला असामान्य करणारं हे शहर ‘आपण खूप मोठे आहोत’ हा गैरसमज असणाऱ्यांना जमिनीवर आणणारेही हेच शहर! हे खूप आवडलं!

 2. Vaishali Ritesh Deshmukh

  पुणे शहराचा सर्वांगीण माहिती व विकास याचा उलगडा सदर लेखातून होतो.लेख वाचून पुणे बघण्याची उत्सुकता अजूनच वाढली.फारच छान लेख

  1. Vaishali Ritesh Deshmukh

   पुणे शहराची सर्वांगीण माहिती व विकास याचा उलगडा सदर लेखातून होतो.लेख वाचून पुणे बघण्याची उत्सुकता अजूनच वाढली.फारच छान लेख

 3. Surekha Borhade

  खरंच लेखातून कळते पुणे तिथे काय उणे.छानच!

 4. Sarita lambodar kamalapurkar

  खूप सुंदर. पुण्याचा सर्वांगाने विचार करून लेख लिहिलात

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा