एकदा कोरोनाशी बोलून, तो एवढा क्रूर का वागतोय हे मला त्याला विचारायचं होतं! पण तो तर नजरेला न दिसणारा अदृश्य जीव! कसं काय बोलणार त्याच्याशी? असा विचार करत असताना, मनात विचार आला, अरे परमेश्वरही अदृश्यच आहे तरी आपण त्याच्याशी बोलतो मग कोरोनाशी बोलणं का शक्य नाही? कोरोना मला दिसत नसला तरी देखील मी त्याच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी झालो.
तो तशा शांत होता. म्हणून मीच त्याला पहिला प्रश्न केला, ‘‘का रे! तू आमच्याशी एवढा क्रूर पणे का वागतोस?’’
त्यावर तो म्हणाला, ‘‘अरे मी एवढा क्रूर नाही. जरा विचार करून पहा, माझ्यापेक्षा तुम्ही माणसं किती क्रूर आहात ते!’’
मी जरा चक्रावलो, गोंधळात पडलो. ‘‘हे कसं शक्य आहे?’’ मी त्याला म्हणालो.
‘‘लाखो बळी घेणार्या तुझ्या तोंडी ही भाषा शोभत नाही.’’
त्यावर तो भडकून म्हणाला, ‘‘आज कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्याची जागतिक आकडेवारी तुमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये इतर रोगांमुळे मृत्यू झालेल्यांनाही तुम्ही गोवले आणि माझी बदनामी केलीत. तुमचे उदर भरण्यासाठी तुम्ही किती कोंबड्या, बकरी आणि इतर प्राणी मारलेत याची यादी तुला सांगणे शक्य आहे का? तुझ्यासारख्या माणसांनी मला क्रूर म्हणावं यासारखं दुसरं आश्चर्य नाही.’’
त्याचं हे बोलणं ऐकून मी विचलित झालो.
तोवर त्याने दुसरा बाँब टाकला.
‘‘निसर्गागातील ज्या झाडांनी तुम्हाला फळं दिली, सावली दिली, ऑक्सिजन दिला त्या झाडांचा काही दोष नसताना तुम्ही त्यांची वारेमाप कत्तल केलीत. प्रचंड धूर ओकणारे कारखाने उभे करून निसर्गाची हानी केलीत व स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलात. आज माझ्यामुळे तुम्हाला ऑक्सिजनची किंमत कळली. जमिनीच्या एखादा तुकड्यासाठी तुम्ही घरातील सख्ख्या भावाचा खून करायला मागेपुढे पहात नाही. स्वतःचा इगो सांभाळण्यासाठी शुल्लक कारणावरून कुणाचाही खून करायला तयार होता. मस्तीमध्ये भरधाव वेगाने गाड्या चालवून स्वतःच्या आणि निरपराध लोकांच्या मृत्युला कारणीभूत होता. राष्ट्राराष्ट्रात युद्ध करून हजारो, लाखो लोकांचे मुडदे पाडणारे तुम्ही मला क्रूर म्हणताय? आजपर्यंत मी लाखो लोकांच्या शरीरात फिरून आलो. हे सारे लोक मेले नाहीत तरीही तुम्ही मला बदनाम केलेत. हास्पिटलमध्ये माणसं मरत असताना त्यांच्या मृत्युनंतरही लाखोंची बिले वसूल करणारे डॉक्टर, औषधांचा काळाबाजार करणारे तुम्ही, मला क्रूर म्हणताय?’’
‘‘माणूसजात बेशीस्त, बेपर्वा आणि मुजोर होत चालली आहे. म्हणून तुम्हाला शिस्त लावण्यासाठी मला जन्म घ्यावा लागला. मी जराशी पाठ फिरवताच तुम्ही परत बेशीस्तपणे झुंडीने बाहेर पडलात. त्यामुळे मला परत डोकावून पहावं लागलं. अरे मला क्रूर म्हणण्यापेक्षा तुम्ही काय आहात हे तपासा.’’
‘‘अन्नधान्यापेक्षा मोठे अण्वस्त्रसाठे करण्यात सारे देश व्यग्र आहेत. महासत्ता होण्यासाठी आमच्यासारखे जीव तुम्हीच जन्माला घालून आम्हाला क्रूर ठरवताय. अण्वस्त्रधारी मोठमोठी महासत्ता राष्ट्र गेली वर्षभर आमच्या मागे लागली. आम्ही त्यांना सळो की पळो करून सोडले. त्याचे कंबरडे मोडले. ही तुमची ताकद किती अल्पजीवी आहे पाहिलंस ना?’’
‘‘आम्हाला पायबंद घालण्यासाठी व्हॅक्सिन बनवण्यापेक्षा हा हिंसक, क्रूर होत चाललेला माणूस माणुसकीने वागेल त्यासाठी एखादी व्हॅक्सिन आतापर्यंत तुम्ही विकसित करायला हवी होती. इतिहासात असं काही केल्याचे दाखले सापडत नाहीत. नरसंहार केल्याचे नुसतेच दाखले नाहीत तर त्यानंतर विजयोत्सव साजरा केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. माणूस अहंकारी, स्वार्थी नसता तर आमचा जन्मच झाला नसता. हा सारा खटाटोप माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी करतो आहे. जोपर्यंत हा स्वार्थ माणसात राहील तोपर्यंत आमच्या पिढ्या या पृथ्वीतलावर जन्म घेतच राहतील.’’
‘‘काही दिवसात मी निघून जाईल. गेले दीड वर्षे मी इथे वावरतो आहे. काही माणसांनी धडा घेतला. ते सुधारले आहेत, पण संपूर्ण मानवजात सुधारणे मलाच काय प्रत्यक्ष परमेश्वरालाही शक्य नाही. बघ समोरून तिसरी लाट येत आहे. तिला थोपवायचं असेल तर जागा हो!’’
आणि आई मला म्हणत होती, ‘‘अरे झोपेत काय बरळतोय? जागा हो! जागा हो! आणि घाबर्याघुबर्या चेहर्याने आईकडे पाहत मी जागा झालो.
अशोक भांबुरे
धनकवडी, पुणे 411 043.
9822882028
अतिशय सुंदर शब्दांत तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलंय .
Superb!