माझ्या यशामागील स्त्री प्रेरणा

माझ्या यशामागील स्त्री प्रेरणा

हा लेख ‘चपराक’च्या संपादकांनी माझ्याकडून लिहून घेतला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.
या विषयावर लेख लिहिणे अवघड आहे. कवीला आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी उघड करता येत नाहीत. काही कळ्यांची, फुलांची काळजी घ्यावीच लागते.

विषय आहे, ‘माझ्या यशामागील स्त्री प्रेरणा’!

माझ्यासमोर सवाल खडा आहे, मी यशस्वी आहे काय?

ज्या कवितेच्या क्षेत्रात मी आजतागायत उमेदीने लिहित आहे त्यात मी यशस्वी आहे का?

या लेखासाठी तुम्ही आणि मी असं गृहित धरू की, मी बर्‍यापैकी कविता लिहून बर्‍यापैकी यशस्वी झालेला कवी आहे. तरच मला या विषयावर पुढे लिहिता येईल; अन्यथा नाही.

आता या यशामागील स्त्री प्रेरणा आहे की नाही? असल्यास ती प्रेरणा प्रभावी असावी. तशी ती आहेच.

मी कविता लिहितो.
कविता म्हणजेच अनिता आहे.
कविता म्हणजेच ललिता आहे. वनिता आहे.

स्त्री ही सृष्टीची सर्वात छोटी प्रतिकृती आहे. स्त्री आणि सृष्टी या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. त्यामुळं स्त्रीत्वाचा सन्मान करावा हेच माझ्या कविता लिखाणामागचे आत्मभान आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीने ‘स्त्री’ला केवळ पूजनीय ठरवले आहे. स्त्रिला चांगले वागवलेले नाही. आपल्या आध्यात्माने स्त्रिला बदनाम केलेले आहे. आजही या गोष्टीमध्ये फार फरक पडलेला नाही. गरजेवर आधारित स्त्री सन्मानाचे उपक्रम देशपातळीवर आणि गल्लीबोळातून कधीकधी होतातच की! मित्रहो, मी लिहिलं आहे

अवमानिती स्त्रियांस त्यांची पुस्तके वाचू नका
सोडुनि जातात त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायका
त्याच्यापरी सौंदर्यद्वेष्ट्ये तुम्हीतरी होऊ नका
पाहू नका घरच्याघरी फुकटात ही शोकांतिका

होय, मी अगदी आनंदाने, तुतारी वाजवून सांगेन की, माझ्या यशामागे स्त्री प्रेरणा आहेच.

स्त्री प्रेरणा हीच माझी प्रतिभा आहे.
प्रतिभा ही आकाशातून खाली पडत नसते.
माझ्या या प्रतिभेच्या मागे कोणतीही
दैवी शक्ती नाही.

मी जिवंत माणसांवर लिहिणारा कवी आहे. जगावर लिहिणारा कवी आहे.

कवी आहे मी स्वच्छंदी
मला न कुठली तटबंदी
प्रेम जगावर करतो मी
म्हणून आहे आनंदी

आणि अजून खरं सागूं का?

प्रत्येकाला प्रेमकविता लिहावीच वाटते
सुंदर पोरी बघून चोरी करावीच वाटते

सृष्टीचे लावण्य आणि स्त्रीचे कारूण्य हे माझ्या कवितांचे विषय आहेत. त्यात मी माहीर आहे.

इतर कुणाही कवीपेक्षा माझ्याकडे हे स्त्री प्रेरणेचे संचित जास्त आहे. स्पष्टच सांगतो, माझ्याकडे मुलींचा, महिलांचा वावर जास्त आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. माझ्याकडे त्या सुरक्षित असतात. माझे घर त्यांना ‘आपलं घर’ वाटते. माहेर वाटते.

बागेमधून पोरी आणीन मी
त्यांनाच फक्त कविता शिकविण मी
माझे न काम काही काट्यांकडे
त्यांच्याकडे कशाला पाहिन मी?

मी जिथे राहतो त्या सुंदर कोथरूड गावातला खत्रूड मित्र मला म्हणाला,
‘‘मभा, तुमच्याकडे नेहमीच मुलीबाळींचा राबता असतो. तुम्ही भाग्यवान आहात.’’

खरं म्हणजे त्याची ही प्रशस्ती शिव्यांसारखी होती. रसिकता उपाशी माणसासारखी होती. तो माणूस मला काही लायकीचा वाटला नाही. हाच मित्र मला एकदा ‘मभा म्हणजे मराठीतला उमर खय्याम आहे’ असं उपहासाने म्हणाला होता. असे सौंदर्याची अवहेलना करणारे या शहरात कमी नाहीत. जाऊ द्या, ज्यांचं स्वास्थ्य ठीक नाही त्यांच्याविषयी मी कशाला अधिक लिहू?

माझी एक गझल आहे.

माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे?
प्रत्येक पाकळीचा न्यारा रूबाब आहे
माझ्याकडे रहाया येतात फुलबागा
जाहीर सांगतो की, मीही नबाब आहे

असाच मला एक प्रश्न विचारणारा. त्याला माझा फार राग यायचा. तेव्हा मी लिहिलं होतं,

माझ्या वागण्याचा त्यांना
म्हणे राग आला आहे
काय त्यांच्या सेवेसाठी
माझा जन्म झाला आहे?

‘मभा’, आम्हाला तुमच्याविषयी मुळीच शंका नाही
तरी परंतु ऐकत असतो तुमच्याबद्दल काही
तुमच्यासंगे सध्या फिरते कोण कुठली बाई?
तिचाच नवरा अजून आम्ही कसा पाहिला नाही?
खरेच मित्रा, तुला सांगतो मलाही शंका आहे
माझ्यासंगे फिरणारी ती जळती लंका आहे

माझ्या रसिक मित्रहो,
कविता म्हणजेच ‘जळती लंका’ आहे.

ही जळता लंका कोणती सवत आपल्या घरात घेईल? पण या सवतीला घरात घेणारी देखील आहे. ती माझी बायको आहे. सौ. यमुना मच्छिंद्र चव्हाण.

हीच माझ्या यशामागील स्त्री प्रेरणा आहे.

परवा नानाभाऊ माझ्या घरी आला. हा नानाभाऊ विश्वपर्यटन करून आला होता. तो मला जगातली ‘सात आश्चर्य’ सांगत होता. या नानाभाऊला मी ‘बंडलनाना’ म्हणतो.

त्याला मी म्हणालो,

‘‘नाना, जे जगात नाही, ते आपल्या घरात आहे हे तुला माहीत नाही काय?’’

माझ्या प्रश्नाने बंडलनाना गडबडला.

‘‘नाही बुवा’’ असं एकदम म्हणाला.
तेव्हा मी त्याला सांगितलं,

‘‘सगळ्या जगात जर का काही विशेष आहे
माझी मिसेस आहे, माझी मिसेस आहे’’

तीच माझ्यासाठी विशेष आहे.
आणि तीच माझ्या यशामागील खरी स्त्री प्रेरणा आहे.

– म. भा. चव्हाण
लोककवी
भ्रमणध्वनी – 9922172976
(पूर्वप्रसिद्धी – चपराक मासिक मार्च, २००५)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “माझ्या यशामागील स्त्री प्रेरणा”

  1. जयंत कुलकर्णी

    कविवर्य म.भा. चव्हाण यांनी ‘स्त्री’ प्रेरणेवर फारच मिश्किल भाष्य केले आहे. लेख आवडला.

  2. Vinod s. Panchbhai

    खूप सुंदर…
    काव्यमय सफर..

  3. प्रा.बी.एन.चौधरी

    व्वा मिश्किल आणि रोखठोकही !

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा