आपल्या वर्तमानाला आकार देऊन भविष्याची ऊर्जस्वल स्वप्ने सजवण्यासाठी इतिहासाच्या पानात डोकावून त्यातून योग्य तो बोध घेणे गरजेचे आहे. ज्यांना इतिहास माहीत नसतो त्यांचा वर्तमान आणि भविष्य अंधकारमय होतं हा इतिहास आहे. इतिहासात झालेल्या चुकांमधून बोध घेणे, त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी प्रत्येक इतिहास घडवू पाहणार्याला इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
‘मेवाडनरेश महाराणा प्रताप’ हे पुस्तक ही गरज अत्यंत अचूकपणे पूर्ण करते. जगाच्या पाठीवरील सर्वात शक्तिशाली साम्राज्याशी, सर्वात क्रूर शासकाशी, महापराक्रमी सेनापतींशी, आपल्या मूठभर सैन्यासह पंचवीस वर्ष अविरत, अविश्रांत झुंज घेणार्या महाराणांचे चरित्र म्हणजे शौर्याचे धगधगते अग्निकुंड. शौर्य, तेज, औदार्य, सौंदर्य, विजिगीषू वृत्ती, स्वातंत्र्यप्रेम, तपस्विता या सर्व सद्गुणांनी ज्याचा आश्रय घ्यावा असे महान चरित्र म्हणजे महाराणा प्रताप.
हे चरित्र सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजावं, त्यांच्या काळजाला भिडावं इतक्या सोप्या भाषेत मांडण्याची किमया साधली आहे सुप्रसिद्ध लेखक विनोद पंचभाई यांनी. छोटी-छोटी वाक्यं, ओघवती शैली, प्रवाही भाषा, नेटके संवाद, छोटी-छोटी प्रकरणे ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये. पुस्तक हातात घेतल्यानंतर वाचून संपवल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही हे त्या महान चरित्राचे यश आहेच पण त्यापेक्षाही ती लेखकाच्या कुंचल्याची किमया आहे हेही नाकारता येणार नाही.
आजच्या दुभंगलेल्या काळाला आकार देण्याचं सामर्थ्य या महान चरित्रामध्ये आहे. आज तत्त्वांना दुय्यम मानण्याच्या काळात चारित्र्याचा आदर्श दीपस्तंभ म्हणजे महाराणा. आज मिनिटामिनिटाला दिलेला शब्द बदलण्याची फॅशन असताना आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी, ‘‘मी आई भवानी आणि भगवान एकलिंगजी यांच्या साक्षीने प्रतिज्ञा करतो की मी आयुष्यभर माझ्या जन्मभूमीच्या रक्षणासाठी लढेल आणि जोपर्यंत मेवाड प्रांताला संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करून देत नाही तोपर्यंत सोन्या-चांदीच्या भांड्यात भोजन करणार नाही. पलंगावर झोपणार नाही. पत्रावळीवर जेवेन आणि जमिनीवर झोपेन’’ अशी ‘भीष्मप्रतिज्ञा’ करणारे आणि तिचा शेवटच्या श्वासापर्यंत निर्वाह करणारे राणाप्रताप हा चारित्र्याचा अजोड आदर्श ठरतो. तो आदर्श नेमकेपणाने वाचकांच्या अंतःकरणामध्ये रुजवण्यात लेखकाला निश्चितच यश मिळालेलं आहे.
आमच्या हजारो वर्षांच्या गुलामीचे कारण म्हणजे आमच्यातली बेदिली. एक मार्मिक प्रसंग पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. हळदीघाटीच्या लढाईविषयी एका इतिहासकाराने असफ खानाला एक प्रश्न विचारला, ‘‘या लढाईमध्ये तुम्ही तुमच्या सैन्यातील राजपूत आणि महाराणा प्रताप सिंहच्या सैन्यातील राजपूत कशावरून ओळखता?’’ त्यावर असफ खानाने व्यंगात्मक हसत उत्तर दिलं होतं, ‘‘आम्हाला एवढा खोलवर विचार करण्याची गरजच नाही. तेवढा वेळ आहे कोणाला? कोणत्याही बाजूचा मारला गेला तरी मरतो राजपूतच ना!’’ ही गोष्ट आमच्या राजकर्त्यांनी ध्यानात घेतली असती तर कदाचित इंग्रजांचं राज्य आमच्यावर आलंच नसतं आणि तीच गोष्ट आजही आपण विसरतो आहोत.
महाराणांच्या मनातील स्त्री विषयीचा आदर आपण शिकण्यासारखा आहे. कुवर अमरसिंह यांनी अब्दुल रहीम खानेखानाचा पराभव करून त्याची पत्नी आणि मुलांना कैद करून महाराणा प्रतापांकडे पाठवले. त्यांचं मत असं होतं की जोपर्यंत युद्ध चालू आहे तोपर्यंत ओलिस म्हणून यांना आपल्याकडे ठेवूयात! परंतु महाराणा प्रतापांनी त्याला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. सांगितलं, ‘‘स्त्रियांच्या आडोशाने राजकारण करणं हे राजपुतांचं ब्रिद नाही.’’ आज प्रत्येक कामामध्ये स्त्रीला पुढे घालून आपला स्वार्थ साधणार्यांनी या वाक्याचे स्मरण करणे गरजेचे आहे. लेखक लिहितात, राणा प्रतापांनी लगेच आदेश दिला, आजच हा आदेश आमच्या वतीने त्वरित जारी करा, कोणत्याही स्त्रीकडे मग ती कुठल्याही जाती-धर्माची असो, तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहणे हा फार मोठा अपराध समजला जाईल. तसेच हा अपराध करणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्या अपराधाला क्षमा नाही.
महाराणांविषयी अकबर सुद्धा म्हणाला, महाराणा सामान्य माणूस नाही, तो फरिस्ता आहे. हाती लागलेल्या शत्रुच्या बायका-मुलांना सन्मानाने परत पाठविण्याचे काम फक्त तो महाराणाच करू शकतो. आपल्या परम शत्रूविषयी अकबराने व्यक्त केलेले हे मत महाराणांची उंची आभाळाला नेऊन भिडवते.
आयुष्यभर आपली प्रतिष्ठा आणि प्रतिज्ञा ज्वलंत ठेवत महाराणांनी संघर्ष केला. आयुष्याच्या शेवटी चितोड आणि मंगलगड वगळता सुमारे बत्तीस किल्ल्यांवर राजपुतांचा सूर्य चिन्हांकित केसरिया फडफडू लागला होता. कुठल्याही प्रकारची संसाधने उपलब्ध नसताना अत्यंत मोजक्या साधनांच्या साह्याने विजय कसा मिळवावा, इतिहास कसा घडवावा याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे हे चरित्र आहे. ज्यांना जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचे आहे त्यांनी नक्की या चरित्राचा अभ्यास करावा. या अतिशय सुंदर पुस्तकाबद्दल ‘चपराक प्रकाशन’ आणि लेखक विनोद पंचभाई यांचे अभिनंदन. चित्रकार संतोष घोंगडे यांनी अतिशय बोलकं मुखपृष्ठ साकारलं आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रहामध्ये असावं असं हे पुस्तक आहे.
मेवाडनरेश महाराणा प्रताप
लेखक – विनोद पंचभाई
प्रकाशक – घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठे – 114
मूल्य – 150
– रमेश मच्छिंद्र वाघ
नाशिक.
9921816183