आयपांढरीतली माणसं : दखलनीय व्यक्तिचित्रण!

आयपांढरीतली माणसं : दखलनीय व्यक्तिचित्रण!

नुकताच सुधाकर कवडे लिखित ‘आयपांढरीतली माणसं’ हा व्यक्तिचित्रणसंग्रह वाचण्यात आला. ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी अत्यंत लक्षवेधक असे चितारले आहे. प्राचार्य शिवाजीराव बागल यांनी ‘आयपांढरीतल्या माणसांचा’ कानोसा घेताना, ग्रंथाची पाठराखण करताना ओळख करुन दिली आहे. मलपृष्ठावर ख्यातकीर्त साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी शुभेच्छारुपी निवेदन केलेले आहे.

तसं पाहिलं तर व्यक्तिचित्रण हा साहित्य प्रकार तसा अवघडच कारण लिहिण्याच्या ओघात, भरात, भावनेच्या प्रवाहात एखादा शब्द इकडचा तिकडे झाला की मग फार मोठे वादळ उभे राहते. प्रसंगी अस्मितेचा प्रश्न उभा राहतो. तोलून मापून, शब्दांची पेरणी करून मानवी स्वभावाचा आणि त्याच्या जीवनातील नानाविध, तर्‍हेतर्‍हेच्या घटनांची मशागत करुन जीवनपट उलगडत न्यावा लागतो. अशा निकषावर सुधाकर कवडे पूर्णतः यशस्वी झाले आहेत.

या संग्रहात अकरा प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या आहेत. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिचा स्वभाव, त्याची वागणूक, त्याचे सामाजिक स्थान, त्याचा स्वभाव, त्याचा व्यवसाय, त्याच्या लकबी, त्याचे कौशल्य, त्याच्या भाषेचा विशिष्ट साज इत्यादी स्वभावगुण लेखकाने अभ्यासपूर्वक, कौशल्याने मांडले आहेत. यापूर्वी सुधाकर कवडे यांनी ‘झुंज’ या संग्रहातून सहकार क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व वसंतराव काळे यांचा जीवनपट वाचकांपुढे मांडला आहे. यावरून लेखकाची लेखणी व्यक्तिचित्रणात अधिक रमत असल्याचे लक्षात येते. त्यातूनच लेखकाची अभ्यासूवृत्ती, विविध माणसांच्या स्वभावाचे बारकाईने निरीक्षण याद्वारे प्रत्येकाच्या जीवनातील घटना आणि पात्रांची गुंफण कलात्मकतेने सादरीकरण हे कसब वाखाणण्याजोगे आहे.

रामभाव अर्थात रामभाऊ हा एक साधासुधा माणूस परंतु गावात स्वतःचा दबदबा निर्माण करण्यात उस्ताद! साखर कारखान्याच्या कामगारांचे नेतृत्व करताना स्वतःची पोळी भाजून घेताना उभारलेले अनैतिक व्यवसाय! रामभाऊ यांचं चरित्र हे तसं एका अध्यायात न बसणारं. या कथेच्या बीजात कादंबरीचा वटवृक्ष सामावलाय हे निश्चित!

तुकाबाजी या अध्यायात मानवाच्या मृत्युनंतर गंगाकिनारी पिंडाला कावळा शिवावा म्हणून कावळ्यांची आणि मयताची केलेली मनधरणी हा तुकाबाजी या चरित्राचा आत्मा. ‘वायसा प्राण तळमळला, पाव आता आम्हाला!’ अशाप्रकारची मनधरणी हा वेगळा विषय वाचकास विचारप्रवृत्त करतो. लेखकाने हा आशयही तन्मयतेने मांडला आहे.

‘मुंगळ्या’ हे एक उनाड, टवाळ असं पोर. कायम आगावू कामं करण्यात पटाईत पण वडिलांच्या मृत्युनंतर त्यानं पत्करलेलं प्रौढत्व वाचकाला कमालीच्या आश्चर्यात टाकणार असं! ‘बापाच्या व्यसनाधिनतेमुळे पितृछत्र हरपलेल्या किती जणांवर अशी उपेक्षित जीणं जगण्याची वेळ आली असेल?’ आणि यासोबत असलेले दुसरे वाक्य म्हणजे ‘शाळा शिकतोय असं सांगणारी ही पोरं कधीच शाळेत न जाता शिकतात कशी?’ ही वाक्ये जळजळीत सामाजिक वास्तव प्रकट करतात.

गावाच्या सुखदुःखात हिरीरीने, तातडीने आणि निस्वार्थपणे भाग घेणार्‍या नाना नामक एका राजकारण्याची कथा वाचताना वाचकाचा नानांबद्दलचा आदर दुणावत असताना जागोजागी सुविचार पेरण्याचे लेखकाचे कसब जाणवते. एका ठिकाणी लेखक नानांचा एक सिद्धांत उद्धृत करतात, ‘व्यसनी माणसाला कधीही त्याबद्दल बोलू नये. त्याला चिडवण्यापेक्षा त्याकडं दुर्लक्ष करावं. एखादा पित असला तरी त्यानं बंद केलीय म्हणून चर्चा करा म्हणजे तो लाजून दारु पिणे बंद करेल.’ फार मोठा आशावाद आणि सकारात्मकता दडली आहे या वाक्यात!
‘पांडावाणी’ गावातील एक दुकानदार आणि त्याकाळातील जणू एक चालतीबोलती वाहिनी! गावातील प्रत्येक घटनेची नोंद असलेला पांडा! म्हातार्‍या आईला कुणाजवळ ठेवावे हा पांडा आणि त्याच्या भावात पेटलेला वाद जेव्हा गावातील पंचासमोर जातो तेव्हा पांडा स्वतःच्या आईला उचलून निघताना म्हणतो, ‘हिला माळवदावर न्हेतू अन् दितू खाली फेकून. चित पडली तर थोरला सांभाळेल, पट पडली तर राहील माझ्याकडे अन् मरून गेली तर सरपण पंचांनी द्यावं’ हे वाक्य आज समाजात घरातील म्हातार्‍या माणसांची होणारी कुचंबणा, हेळसांड प्रकट करणारं आहे.

मोहन फिटर! हे या संग्रहातील अजून एक पुष्प! मोहन नावाचा एक तरुण दारूच्या कसा आहारी जातो आणि त्या व्यसनाधिनतेमुळे स्वतःच्या संसाराची राखरांगोळी झाल्यानंतर तो त्या मोहजालातून स्वतःची कशी सुटका करून घेतो याचे मर्मस्पर्शी वर्णन या चरित्रात वाचायला मिळते.

शाहिराची शाहिरी हा महाराष्ट्राचा जीव की प्राण! लेखकाने हेरलेल्या जालींधर शाहीराचे चरित्र लेखकाच्या लेखनीतून अलगद उतरले आहे. शाहिरीचा सारा पट उलगडताना त्यातील एक म्हणावे तर गमतीदार, म्हणावे तर वास्तव लेखक चपखलपणे मांडतात. शाहीर म्हणतो,

‘लय शिकलेली लाडी।
मला नवरा मिळाला अनाडी।
लय गुणाचा राघू माझा,
धुतोय ग साडी।’

अशी अनेक कवनं लेखकाने जालींधर शाहीर यांच्या तोंडी घालून एक वेगळेच चरित्र वाचकांसमोर मांडले आहे.

धोंडीबानाना हे एक राजकीय हाडाचे कार्यकर्ते! आपल्या साहेबांच्या प्रगतीसाठी आसुसलेले एक व्यक्ती! मोठ्या साहेबांवर अवलंबून असलेल्या या हाडाच्या कार्यकर्त्याचे, नानाचे निधन झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी स्मशानात कावळा घासाला शिवत नाही. त्याची कारणमीमांसा करताना रंगलेल्या चर्चेत कुणाला तरी वाटते, मोठं सायब पंतप्रधान झालेलं नानाला बघायचं होतं. कदाचित त्यामुळंच नानानं अडत धरली असावी… हे वाचून वाचक निःशब्द होतो.

हरिबाअप्पा एक साधसुधं व्यक्तित्व! एक कष्टाळू, प्रामाणिक आणि कृतकृत्य अशा माणसाचे तितकेच वास्तव चरित्र मांडण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. उद्धवबापू, एकत्र कुटुंबाचा नायक, प्रमुख! बापूंचा कुटुंबासाठीचा त्याग मांडताना लेखक लिहितात, ‘ज्वारीनं भरलेलं टपोरं कणीस पाहिजे असेल तर एका दाण्याला अगोदर जमिनीत गाडून घ्यावं लागतं. मग मोत्याच्या दाण्याच्या राशी निर्माण होतात. बापूंनी जमिनीत गाडून घेतलेल्या दाण्याची भूमिका निभावली होती…’ हेच एकत्र कुटुंबाचे वास्तव आहे. जेव्हा बापूला जीवघेणा लिव्हरचा आजार जडतो आणि त्यांचे लिव्हर बदलण्याची बाब पुढे येते तेव्हा बापूंच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचे लिव्हर द्यायला तयार होते. तेव्हा आपसूकच वाचकांचे डोळे पाणवतात.

निर्मळ तात्या हे या चरित्र संग्रहातील शेवटचा मोती! शीर्षकात निर्मळ हा शब्द असल्यामुळे तात्यांच्या स्वभावाबद्दल वेगळे सांगायला नको. पैलवान असलेल्या तात्यांच्या जीवनातील घटना उत्तमरीत्या मांडण्यात लेखकाची लेखणी काही राखत नाही.
एकंदरीत लेखक सुधाकर कवडे यांनी वेगवेगळ्या नायकांची चरित्रं, त्यांच्या व्यक्तिरेखा अत्यंत उत्तमप्रकारे मांडल्या आहेत. कवडे यांच्या लेखणीतून, ह्या छोटेखानी चरित्रातून एखादे दीर्घ चरित्र नक्कीच जन्माला यावे ही सदिच्छा! शुभेच्छा!

लेखक – सुधाकर कवडे
प्रकाशक – चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या – 120 किंमत – <130/-


– नागेश सू. शेवाळकर,
पुणे
9423139071

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा