प्रसंग पहिला… नेहमीचाच वर्दळीचा चौक.
“अहो काका, मी कधीचा हाॅर्न वाजवतोय… तुम्हाला थोडी साईड देता येत नाही का? मला डावीकडे वळायचं आहे!”
“अरे बाबा, थोडा धीर धर जरा… सिग्नल सुटला की एका मिनिटात रस्ता मोकळा होणारच आहे.. ”
“कुठं सिग्नल सुटायची वाट बघता काका, या चौकात कधीही पोलीस मामा नसतात… चला जाऊ द्या मला, व्हा बाजूला!”
“पोलीस मामा नाही म्हणून वाहतुकीचे नियम आपण धाब्यावर बसवायचे का? थांब जरा.”
दोघांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते. तेवढ्यात सिग्नल सुटला आणि जणू स्पर्धा सुरू झाल्यासारखी रस्त्यावर वाहने पळायला लागली.
प्रसंग दुसरा… किराणा मालाचे दुकान.
“ओ शेठ ऐका ना, मला एक लिटर दूध आणि तो ब्रेडचा पुडा तेवढा द्या… दोनच वस्तू हव्यात.” आपली बाईक रस्त्याच्या कडेला लावत एक व्यक्ती म्हणाली.
“तुम्ही बघताय ना, मी या काकूंसाठी साखर मोजून देतोय. दोन मिनिटं थांबा की.. ” दुकानदार आपल्या डोळ्यावरचा चष्मा सरकवत म्हणाला.
“थांबायला वेळ कुठंय शेठ… खूप घाईत आहे आज.. “
वरील दोन्ही प्रसंगावरून आपल्या असं लक्षात येईल, आजच्या धावपळीच्या काळात कुणाजवळही जरा सुध्दा वेळ नाही. सहज टाळता येण्यासारखे कित्येक प्रसंग दैनंदिन जीवनात रोजच आपल्या वाट्याला येत असतात. थोडा धीर धरून, सामोपचारानं कुठल्याही छोट्या छोट्या प्रसंगांना सामोरं जाणं हे बहुतेक सगळेच विसरून गेलेत की काय अशी आजची एकंदरीत परिस्थिती आहे! अशावेळी कित्येकदा वादविवाद, हमरीतुमरी होऊन त्याचं पर्यावसान शेवटी हाणामारीत होणं हेही आपल्या बघण्यात येतं! माघार घेणं हे आजकाल कमीपणाचं समजलं जातं. सगळेच एकमेकांवर कुरघोडी करण्यात आघाडीवर असतात, त्यातच ते धन्यता मानतात! ‘माझ्याशी पंगा घेतोस काय? कशी जिरवली मी त्याची..!’ असे कुत्सित भावही काही महाभागांच्या मुखकमलांवर उमटलेले दिसतात. अशा या प्रसंगात कोणी समजावण्याचा प्रयत्न करू लागला किंवा कोणी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करत असेल तर त्यालाच इजा अगर धोका होण्याचा संभव असतो.
जरा विचार करून बघा…
ही परिस्थिती आज आपल्यावर का येऊन ठेपली आहे?
आजकाल आपण बघतो… अगदी लहानांपासून तर थोरामोठ्यांपर्यंत जवळपास सगळेच छोट्या-मोठ्या प्रसंगात नकळतपणे खोटं बोलत असताना आढळतात. हा आपल्या जीवनाचा जणू एक भागच झाला आहे म्हणा ना… अगदी क्षुल्लक कारणासाठी सुध्दा खोटं बोलून वेळ मारून नेणं आपल्या अंगवळणी पडत चाललं आहे. वास्तविक पाहता याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्षच करत असतो. मात्र ही खूप गंभीर बाब आहे असं आज किती जणांना वाटतं? हा खरा प्रश्न आहे! कधीकधी तर याक्षणी बोलणं टाळता येईल हे माहिती असूनही आपण विनाकारण खोटं बोलत असतो. मग तीच आपली सवय आपल्याला सावलीसारखी चिकटून बसते! काही दिवसांनी, नंतरनंतर तर गरज नसताना सुद्धा आपण बेमालूमपणे खोटं बोलू लागतो. आता उदाहरण द्यायचे झाल्यास ते पुढील प्रमाणे देता येईल…
समजा आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला आपल्या मदतीची गरज आहे. त्याचा तुम्हाला फोन येतो… त्याला काही वेळासाठी तुमची स्कुटर घेऊन त्याच्या मुलीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. वास्तविक पाहता प्रसंगाचं गांभीर्य ओळखून तुम्ही त्याला लगेच मदत करणं अपेक्षित आहे. मात्र तुमच्या तोंडून सहजपणे अगदी नकळत वाक्य बोललं जातं … “अरे यार, माझी स्कुटर ना पंक्चर झालीय… तू त्या रव्याला फोन कर ना!”
अशाप्रकारचा बदल आपल्यामध्ये कधीपासून झाला हे आपलं आपल्यालाच कळलं नाही. हे बदललेलं लक्षण एका रात्रीत होणं शक्यच नाही! आपल्याला सावलीसारखी चिकटलेली विनाकारण खोटं बोलण्याची सवय याला कारणीभूत आहे हे आपण नाकारू शकत नाही!
“अगं बेटा पियू , काय करतेस तू गाडीजवळ?”
“पप्पा, हे बघा मी ना..तुमचं नाव लिहिलंय मस्तपैकी गाडीवर… ” हसतच पियू हातातला स्केच पेन दाखवत निरागसपणे उद् गारली.
गाडीजवळ येताच पप्पांचा पारा चढला आणि ते पियूवर ओरडले…
“कोणी सांगितलं होतं तुला हे उद्योग करायला? बेअक्कल कुठली! चल आत जाऊन अभ्यासाला बस. कळलं का… पुन्हा गाडीला हात लावलास तर याद राख!”
पप्पांचा तो अवतार बघून पियू रडतच घरात पळाली. तर आईचे शब्द तिच्या कानावर पडले… “अरे तुला कितीदा सांगितलं… माझ्या मोबाईलला हात लावायचा नाहीस. मागच्या वेळी तू पाडलास तेव्हा किती खर्च आला होता ठाऊक आहे ना?”
“अगं आई, मी साधा गेम खेळतोय ना खाली जमिनीवर बसून… ” चिनूदादा मोबाईलवरची नजर न हटवता म्हणाला.
“काही नको… आण इकडे तो… ” आईने मोबाईल चिनूकडून जवळजवळ हिसकावूनच घेतला.
आता या प्रसंगावरून थोडा गंभीरपणे विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल… दिवसेंदिवस आपल्या गरजा कधी नव्हे इतक्या वाढतच चालल्या आहेत. मग गरजेपोटी खरेदी केलेल्या या निर्जीव वस्तूंवर आपण नकळतपणे जिवापाड प्रेम करू लागतो. त्यामुळे होतं काय की, घरातील आपल्याच जिवाभावाच्या माणसांवर आपलं दुर्लक्ष होऊ लागतं! आपल्या माणसांपेक्षा घरातील त्या निर्जीव महागड्या वस्तू आपल्याला प्रिय वाटू लागतात. अगदी चुकून जरी आपल्या मुलाच्या हातून घरातील एखाद्या विशिष्ट वस्तूचं नुकसान झालं तर आपण त्याच्यावर खेकसतो…आपली चिडचिड होते! कारण कधीकधी गरज नसताना सुद्धा फक्त ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून आपण केवळ ‘शो’साठी ती विशिष्ट वस्तू खरेदी केलेली असते. त्यासाठी ऐपत नसतानाही बडेजाव मिरवण्यासाठी खिसा रिकामा केला असतो… वा रे स्टेटस सिम्बॉल!
तर इथं सांगायचा मुद्दा असा की, आजच्या आधुनिक युगात, सतत धावपळीच्या स्पर्धेत कधी नव्हे इतकी आपली माणसं दुरावत चालली आहेत. आपण आपल्या माणसांवर प्रेम करण्यापेक्षा नकळतपणे महागड्या निर्जीव वस्तू आपल्याला अधिक प्रिय वाटू लागल्या आहेत. हे कुठंतरी थांबायला हवं असंही आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं! मात्र त्यासाठी काय करायला हवं तेच नेमकं आपल्याला सुचत नाही ही वस्तुस्थिती आहे. साहजिकपणे टाळता येण्यासारख्या अशा कितीतरी अवाजवी गोष्टी आहेत, ज्यांना आपण विनाकारणच अवास्तव महत्त्व देत असतो. हे सगळं एका झटक्यासरशी बदलणार नाही हे मान्य! तरीही स्वतः मध्ये होणारा थोडा बदलही आपल्यासाठी शुभ संकेत ठरू शकतो. हा आवश्यक बदल करण्यासाठी आपणच आपल्या सवयींना थोडी मूरड घालू शकतो. निदान तसा प्रयत्न तरी करू शकतो ना…!
मग तुम्हाला रोखलं कुणी?
करा की सुरूवात आजपासूनच
अगदी आत्तापासून…!
विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे.. ५८
९९२३७९७७२५