गदिमांच्या कथा

गदिमांच्या कथा

मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी झाली. फारसे कार्यक्रम झाले नाहीत. ‘नाव गदिमांचे आणि कार्यक्रम स्वतःचे’ असे काही झाले. मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्या साहित्यावर एक चर्चासत्र घेतले. चित्रपट व्यवसायात हयात घालविलेले माडगूळकर त्यांच्या चित्रपट गीताने ओळखले जातात. गदिमा त्यांच्या बालगीतांनी, चित्रपटातील भावगीतांनी आणि विशेष म्हणजे गीतरामायणामुळे लोकांसमोर आहेत! पण या लेखात आपण कथाकार माडगूळकरांचा परिचय करून घेणार आहोत, जो महाराष्ट्राला फारच कमी आहे.

साहित्यातील समीक्षक तर त्यांचा उल्लेख करीत नाहीत. अठ्ठावन्न वर्षाच्या आयुष्यात त्यांना लौकिक यश खूप मिळाले. दोन टर्म विधान परिषदेचे आमदार, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, संगीत नाटक अकादमीचे सुवर्णपदक, पद्मश्री पुरस्कार एवढे मिळाले पण कवी म्हणून मान्यता नाही की कथालेखक म्हणून नोंद नाही. कथाकार माडगूळकरांवर अन्यायच झाला. 1938 साली त्यांचा चित्रपटप्रवेश झाला. त्या अगोदर तीन-चार वर्षे ते काँग्रेस चळवळीत होते. कुटुंबाला आधार देण्यासाठी ते कमाईला लागले. त्या आधी ते पुण्यात ‘दीनबंधू’ या वृत्तपत्रात काम करायचे. ते सुटले. मग उदबत्त्या विकल्या. शालेय वयात कलाकार होते. त्यांच्या शिक्षकाने आचार्य अत्रे यांच्याकडे पाठवले. अत्रेंनी कोल्हापूरला मास्टर विनायकांकडे पाठवले. त्यांनी एक्स्ट्रा नट म्हणून कामावर ठेवले. विनायकांची ‘हंस पिक्चर्स’ ही संस्था बुडाली. विनायक, अत्रे यांनी ‘नवयुग चित्रपट लि. संस्था’ काढली. त्यात के. नारायण काळे दिग्दर्शक होते. त्यांचे सहायक म्हणून गदिमा नोकरीला लागले. तिथे ते ‘चित्रपट’ शिकले. विनायकांकडून अभिनय, काळे यांच्याकडून पटकथा किंवा सारी चित्रकथा, आचार्य अत्रे यांच्याकडून सोपी गीतरचना असे बरेच काही शिकले. 1942 साली दोन चित्रपटांचे गीतलेखन केले. त्यातील गीते चांगलीच गाजली. गदिमा चर्चेत आले. व्ही. शांताराम यांच्या लोकशाहीर रामजोशी चित्रपटाची पटकथा-संवाद आणि गीते लिहून भूमिका केली. 1947 साली आलेल्या या चित्रपटाने गदिमा मराठी चित्रपटात ‘दादा’ झाले. ‘रामजोशी’ चित्रपटातील गाण्यांनी मराठी चित्रपटात लावणीयुग आणले. भारतीय चित्रपटांचा दादा असलेल्या व्ही. शांताराम यांच्या वर्तुळात जाऊन रामजोशी यशस्वी केला. तेव्हा गदिमा अठ्ठावीस वर्षाचे होते.

चित्रपट क्षेत्रात आल्यानंतर नऊ वर्षात ते स्टार झाले. व्ही. शांताराम यांचे ‘तुफान और दिया’ आणि ‘दो आँखे बारह हाथ’ या सुपरहिट चित्रपटांच्या हिंदी कथा लिहिल्या. हा धावता जीवनपट सांगण्याचे कारण त्यांच्या अनुभवांची श्रीमंती कळावी. चित्रपटक्षेत्रात आचार्य अत्रे आले, यशस्वी झाले पण टिकले नाहीत. पु. ल. देशपांडे आले, यशस्वी झाले पण टिकले नाहीत! पण गदिमा योगायोगाने आले, यशस्वी झाले आणि टिकले देखील. गुणवत्तेसोबत त्यांच्याकडे व्यावसायिकता होती. त्या व्यावसायिकतेने त्यांना मी वर सांगितलेले लौकिक यश मिळवून दिले. प्रतिभा आणि गुणवत्ता वापरायला चतुरता लागते. होरपळलेल्या आयुष्याने जगण्यासाठी आणि अस्तित्वासाठी ही चतुरता कमावलेली असते. आणखी एक गोष्ट कोल्हापूर मुक्कामात झाली. गदिमा काही काळ वि. स. खांडेकर यांचे लेखनिक झाले. कथाकार माडगूळकर इथून सुरु होतात. 1941-1946 ह्या काळात खांडेकरांचे लेखन बंद होते. ते मौनात होते. त्यामुळे गदिमा जर लेखनिक असतील तर 1941 पूर्वी असे म्हणता येईल. खांडेकरांना गदिमांचे लेखन आवडायचे. ‘‘तुम्ही छान लिहिता, लिहित रहा’’ असा आशीर्वाद त्यांनी दिला होता.

गदिमा यांचे दहा कथासंग्रह आहेत. लपलेला ओघ (1952), वेग व इतर कथा (1957), बोलका शंख (1960), कृष्णाची करंगळी, थोरली पाती, बांधावरच्या बाभळी, चंदनी उदबत्ती, भाताचे फुल, तुपाचा नंदादीप आणि सोने आणि माती हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

‘लपलेला ओघ’ हा पहिला कथासंग्रह पंडित अनंत कुलकर्णी, कुलकर्णी ग्रंथागार यांनी प्रकाशित केला. सुप्रसिद्ध लेखक आणि समीक्षक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांची या संग्रहाला प्रस्तावना आहे. ती मुळातून वाचण्यासारखी आहे. त्यातील गदिमांचे संदर्भ महत्त्वाचे आहेत.

राजाध्यक्ष लिहितात, ‘श्री ग. दि. माडगूळकरांना गेल्या पाच-सात वर्षात दृष्ट लागण्यासारखी कीर्ती लाभली, ती मुख्यतः कवी आणि पटकथाकार म्हणून. चित्रपटांसाठी हुकमी कविता लिहूनही त्यांची ‘पदे’ होऊ न देणारा हा जातिवंत कवी! पण त्याची आणखीही भरपूर कविता आहे. त्यातील काही बेचाळीसच्या चळवळीत हजारो तोंडात खेळत होती. या कणखर शाहिरीबरोबर त्यांनी नाजूक कविताही लिहिली. असा मूळचा पिंड कवीचा पण इतर काही आधुनिक कवींप्रमाणे माडगूळकरही लघुकथेकडे वळले. त्यांनी लघुकथा फार थोड्या लिहिल्या पण त्या अशा की ‘इतक्याच का?’ असा प्रश्न मनात उभा रहावा. अनेक अवधाने सांभाळीत पटकथा बांधणार्‍या लेखकाला लघुकथेची एकाग्रता बिकट वाटावी पण मला वाटते माडगूळकरांतील कवीने ती सुकर केली असावी.

‘लपलेला ओघ’ या कथा संग्रहाला ‘ओलावा’ नावाचे गदिमांचे मनोगत आहे. चित्रपट व्यवसायातील उत्साही सहकारी ग. रा. कामत यांनी या कथा गोळा करून प्रकाशकाकडे दिल्या. प्रकाशकांनी त्या भराभर छापून काढल्या आणि माझा नाईलाज झाला असे त्या मनोगतात म्हटले आहे. पुस्तक निघतेच आहे तर पुस्तकासारखे काही असावे असा विचार करून आम्ही प्रा. म. वि. राजाध्यक्ष यांना प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. इंग्रजी सातवी इयत्ता नापास झालेल्या लेखकाच्या पुस्तकाला इंग्रजी प्राध्यापकाची प्रस्तावना हा प्रकार ‘साहित्यिक’ जमातीला अघटित वाटेल असेही मनोगतामध्ये गदिमांनी म्हटले आहे.

या कथासंग्रहात वीज, सिनेमातला माणूस, मावशी परत आल्या, मोती, मुके प्रेम, सद्या हेकणे (देव पावला चित्रपट कथा) लावसट आणि हिमांगी या आठ कथा आहेत. वीज, मुके प्रेम आणि सद्या हेकणे या प्रेमकथा आहेत पण ते प्रेम सुंदर नसणार्‍या, परिस्थिती अनुकूल नसणार्‍या नायकांची प्रेमकथा आहे. परिस्थिती खरी असते. नायकाची इच्छाही खरी असते. अशा दोन खरेपणात दुःख देणारी प्रेमकथा येते हे खूप मोठे यश आहे. म. वि. राजाध्यक्ष प्रस्तावनेत या कथांबद्दल काय म्हणतात पाहू.

‘सिनेमातला माणूस’ आणि ‘मावशी परत आल्या पण’ यातील ‘मी’ म्हणजे स्वतः माडगूळकरच. या आठ कथातील एकही सुखान्त नाही. त्या काळच्या ‘ग्रामीण’ कथांचे शेवट सहसा गोड गोड कथांप्रमाणे प्रणयपूर्तीत (म्हणजे फक्त विवाहात) होत असे. सगळे संशय फिटत असत. ‘सिनेमातील माणूस’ असूनही माडगूळकरांनी धंद्यातील परिस्थिती, तेथे लादत असलेला गुळचटपणा या कथांबाहेर ठेवला. ‘सद्या हेकणे’ ही सिनेमाची गोष्ट असे टिपेत सांगून जणू लेखकाने तिचा नूर काहीसा कचकड्याचा आहे अशी कबुलीच दिली आहे पण चित्रपटसृष्टीचे एक सूक्ष्म देणेही त्या सर्व कथांमध्ये आहे. यातील घटना, माणसे आणि पार्श्वभूमी यांचा परस्सरमेळ साधून लेखक जणू रेखीवपणे प्रथम मनश्चित्रात पाहतो आणि मग ते कागदावर उतरवतो. म्हणून वर्णनाचा सैलपणा नाही आणि पात्रांच्या आकृती स्पष्ट आहेत. माडगूळकरांसारख्या कलावंतांना हे मूळचेच देणे असते पण चित्रपट – शिल्पाच्या अनुभवाने त्याला बारकाई आणि निश्चितता येते.

अजून एक महत्त्वाचे राजाध्यक्षांनी प्रस्तावनेत सांगितले आहे. ते म्हणतात, ‘हे पुस्तकाचे परीक्षण नाही, पण सहज डोळ्यात भरणारे आणखी दोन-तीन विशेष सांगावयास हवेत. या कथांपैकी एकही रूढअर्थाने प्रेमकथा नाही. यातील वेगळेपणा आणि संयम अर्थपूर्ण आहेत पण ‘वीज’मध्ये आपल्या नेहमीच्या कथांतील फिकट आणि शिष्टमान्य प्रेमाहून निराळा असा नैसर्गिक पण जाळणारा विकार हलक्या हाताने व गाढ सहानुभूतीने चितारला आहे. त्याची विनोदी गोष्ट कुणीही केली असती. तशाच, ‘मोती’ वगैरे वेगळ्याच ढंगाच्या कथा आणि या सर्व कथा इतक्या रसरशीतपणे लिहिलेल्या असूनही ‘शैली’ची नखरेल जाणीव कोठे खटकत नाही. गेल्या पिढीचे अर्ध्याहून अधिक साहित्य ‘शैलीने’ गारद केले आहे, हे ध्यानात घेता माडगूळकरांसारख्या नव्या लेखकाची साहित्याला वाचविण्याची ही धडपड पाहून आनंद वाटतो. अशी अनेक आशास्थाने या लपलेल्या ओघात आहेत आणि हा ओघही बुजरेपणाने लपून न राहता अधिकाधिक खळाळेल अशी आशा वाटते.

अजून एक छान निरीक्षण राजाध्यक्षांनी या प्रस्तावनेत मांडले आहे. ते म्हणतात, ‘माडगूळकर बंधूंनी आपण व आपले कुटुंब याविषयी मोकळेपणाने पण अलिप्तपणाने कथा लिहिल्या आहेत. लहानपणच्या हालअपेष्टा सांगितल्या तरी त्यात नाटकीपणा नाही. त्या खडतर दिवसांनी या कलावंतांना तीक्ष्णता दिली. सुखवस्तू कुटुंबाच्या कोंडवाड्यात मुलांची ग्रहणशक्ती अधू होण्याचा धोका असतो. त्यापासून बचावलेल्या बंधूंनी विविध अनुभव गाठी बांधले. त्यांचा ताजेपणा हरवू दिला नाही. शिक्षण फारसे झाले नाही, हेही कदाचित त्या ताजेपणाच्या पथ्यावर पडले असावे. शिक्षण, विशेषतः पदवी आणि लेखन यांचे आपले त्रैराशिक फार सोपे म्हणून अनेक वेळा खोटे ठरले आहे. पाव डझन वरिष्ठ पदव्या वाहणार्‍यांनी गचाळ लेखन केले आहे आणि शाळेशीही ज्यांनी फारशी घसट ठेवली नाही अशांनी अतिसुंदर लिहिले. आपले परपुष्ट साहित्य पाहता माडगूळकरांना इंग्रजीचा विशेष संपर्क लागला नाही हे भाग्य म्हणावे लागते. नाही तर कळत न कळत उसनवारी करण्यात त्यांची लेखणी अर्धी झिजली असती. एच. ई. बेट्स काय म्हणतो हे ठाऊक नसल्यामुळे माडगूळकरांच्या लघुकथा शंभर टक्के माडगूळकरी झाल्या आहेत.

माडगूळकरांच्या पहिल्या कथासंग्रहामुळे आपण त्यातील सर्व संदर्भ विस्ताराने घेतले आहेत. त्यांचा ‘बोलका शंख’ नावाचा कथासंग्रह आहे. त्यात घर आपलंच आहे, मद्यालयाची वाट, सगुण, ऋणानुबंध, बोलका शंख, निर्वाण, मंत्र्याचे पत्र, नागुदेव अशा आठ कथा आहेत.

‘घर आपलंच आहे’ ही 64 पानांची दीर्घकथा आहे. मुंबईत घडणारे कथानक, उत्साही यजमान, चाळीतील वर्णन, भरपूर पात्रे, त्यांचे वेगवेगळे प्रश्न त्यात येतात. गंगाधर गाडगीळाची किडलेली माणसे अशी येथे येऊन गेली होती. मद्यालयाची वाट यामध्ये अशीच एकाची कथा आहे, जो मद्यालयात भेटतो. बायकोचा आपल्या जिवाभावाच्या दोस्ताबरोबर संग पाहिला आणि हा कोलमडला. ‘जिथं जिथं भरोसा ठेवला तिथं तिथं धोका वाट्याला आला. मी काय करू? परवडत नाही तरीही एकच गोष्ट मी करीत राहतो… दारू पितो… सारं पुसलं नाही हिनं… पण पुसटतं-फिक्कं पडतं म्हणून पितो… मी दारुड्या नाही… मी दारुड्या नाही…’ हे तो सांगत राहतो. ‘सगुणा’ या कथेत एक मोलकरीण आहे. घरातील महिला दारावरच्या बाबाला जेवण द्यायला सांगते. मोलकरीण देत असते पण नंतर लक्षात येते तो बाबा नाही दुसराच माणूस असतो. सगुणाला खोदून विचारल्यावर कळते तो तिचा पहिला नवरा असतो. कुठलीही नाती स्त्रियांना टाळता येत नाहीत. प्रेम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळेच त्यांच्या अडचणी वाढतात. दुःखात भर पडते, हे सांगणारी ही कथा आहे.

ऋणानुबंधातील माणूस पुन्हा ‘सिनेमातील माणूस’ आहे. नायकाच्या मित्राला पैशाची अडचण येते. नायकाकडून सोय होत नाही. मदत करण्याची तगमग आहे पण मदत होत नाही. मित्राची अडचण दूर होते एका वेगळ्याच माणसाकडून. जो माणूस सतत येऊन मित्राचे खाणारा आणि मित्राला बुडवणारा असा नायक दिसतो तोच मित्राला वाचवतो. मानवी नात्यातील वेगळ्या ऋणानुबंधाची गोष्ट यात यते. ‘बोलका शंख’ ही लेखकाची गोष्ट आहे. स्वतःच्या लेखनाचा अभिमान आणि दुसरे लेखक तुच्छ असे जगणारा हा कारकून लेखक आहे. त्याला बोलणारा शंख सापडतो. तो शंख भविष्य सांगत असतो. त्यामुळे काही दिवस आनंदाचे जातात पण नंतर तो शंख भविष्यात घडणार्‍या वाईट गोष्टी सांगायला लागतो. त्या तर बाहेर सांगता येत नाहीत. वैतागून लेखक तो शंख फोडून टाकतो तर लेखकाची वाचा जाते पण वाचा गेल्यामुळे त्याचे कल्याणच झाले. कंपनी अधिकारी कळवळले आणि नोकरी सुरु राहिली.

बोलणे बंद झाल्यामुळे लिहायला वेळ मिळाला. सहानुभूतीमुळे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. बडबडीमुळे दुरावलेले साहित्यिक मित्र जवळ आले. त्याची दाखल घेऊ लागले. अशी मस्त ‘बोलका शंख’ नावाची कथा आहे. ‘निर्वाण’ ही वेगळ्याच विषयावरची कथा आहे. गावातील दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्याची एक वेगळीच गोष्ट यात येते. ‘मंत्र्याचे पत्र’ ही कथा शिक्षणाचा बाजार मांडणार्‍या चतुर शिक्षकाची कथा आहे. नागुदेव हे एक सुंदर व्यक्तिचित्र येते. मानलेल्या पोरीवर अत्याचार होतो आणि हा माणूस तुटून पडतो. ‘वा रे समाज!’ एक वैद्य रुग्णाच्या अवस्थेचा फायदा घेतो. औषधासाठी तोंड वेंगाडणार्‍या पोरीवर बलात्कार करतो. आईबाप तिच्या पोटचे पोर ठार मारू पाहतात आणि एक महामूर्ख तरुण त्या बाटलेल्या पोरीशी लग्न करू इच्छितो. ‘संतोष, परमसंतोष. सांभाळा तुमचा आणि तुम्ही. आम्ही चाललो, आमच्यासारख्यांना आता जागा नाही इथ…’ हे निवेदन पुरेसं बोलकं आहे.

‘बांधावरच्या बाभळी’ हा एक कथासंग्रह आहे. यात तेरा कथा आहेत. बांधावरच्या बाभळीसाठी कोर्ट केस करून कंगाल होणारा नायक ग्रामीण भागात नवा नाही. ‘तांबडी आजी’ कथेत वेगळेच व्यक्तिमत्व येते. घरात लग्नाची तारीख आहे आणि तांबडी आजी अशा काठावर की मरत नाही, जगत नाही. उलट शेवटच्या दिवसात वेडे चाळे करतेय. नाचतेय, उड्या मारतेय, भसाड्या आवाजात गाणे म्हणतेय. आयुष्यभर सोज्वळ आणि मायाळू पाहिलेल्या या आजीचे रूप नायकाला दुःखदायक होते.

या कथेचा शेवट खूपच सुंदर आहे.

नायक तिच्या मावशीला विचारतो ‘‘मावशी काय गं हे?’’

मावशी शांतपणाने म्हणाली, ‘‘काही नाही रे बाळ, आत्मा कुडीशी भांडतोय. पिकलेल्या फळातून खरं तर रस गळतो. शेवरीच्या फळातून काय गळायचं? हा सारा कापूस उडतोय, कापूस!’’

‘चालणारी गोष्ट’ नावाची एक कथा आहे. गरिबीतून आलेली मुलगी सिनेजगतात येते. तिला जग कळलेले असते. नायकाला कळत नाही. नायकाकडे काम मागायला आलेली मुलगी एका मोठ्या निर्मात्याची बायको म्हणून समोर येते. निर्माता वयस्कर आहे पण ती मॅडम झालेली असते. पैसा हीच या जगात चालणारी गोष्ट आहे बाकी झूट!

‘चंदनी उदबत्ती’
नावाचा कथासंग्रह आहे. त्यात दहा कथा आहेत. पण ‘चंदनी उदबत्ती’ या कथेतील व्यक्तिचित्र खूपच लक्षणीय आहे. स्त्रिच्या आयुष्यातील सुखदुःखाची कथा पुढे सरकत जाते. पती सहवासाला पारखी आहे. मनात वासना-विकार येतात पण त्या काळातील स्त्रियांप्रमाणे त्याला थोपवणे जमते. ती सवाष्ण असून विधवेसारखी अलिप्त जगते. तिच्या वागण्याचा परिणाम कुटुंबावर होतो. तिचे दुःख माहीत असणारे तिचा आदर करतात. तिच्या जळण्याने निर्माण झालेला सुगंध हा खरा. बाकी राख तर उद्या झाडली जाणारच आहे नं!

‘कृष्णाची करंगळी’ हा कथासंग्रह छान आहे. गांधी हत्येची पार्श्वभूमी असलेली एक कथा त्यात आहे. कुलकर्ण्याचा वाडा गावकरी पेटवून देतात. कुलकर्णी गावकर्‍यांवर केस करतात. या पार्श्वभूमीवर वाड्याची गोष्ट कळते. खूप दिवसांपूर्वी दुष्काळ पडला होता. गावकर्‍यांनी औंध संस्थानवर दरोडा टाकला. त्याची चौकशी झाली. गावाचे कुलकर्णी गावकर्‍यांच्या बाजूने उभे राहिले. त्यासाठी पंत प्रतिनिधींसमोर कुलकर्णींना जळत्या समईवर करंगळी धरायला लावली. कुलकर्णींनी करंगळी जाळून घेतली पण गावाचे रक्षण केले. त्यामुळे गावकरी आनंदले. त्यांनी वाडा बांधून दिला. तोच वाडा जाळला. खूप संदर्भ सांगणारी ही कथा आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकीरा’ कादंबरीत असाच एक कुलकर्णी आहे.

‘वेग आणि इतर कथा’ हा एक कथासंग्रह आहे. अकरा कथा त्यात आहेत. ‘गावरान शेंग’ नावाची शाळकरी मुलींच्या जीवनावरची चटका लावणारी कथा त्यात आहे. घरच्या गरिबीला मार्ग काढणारी शाळकरी पोर, तिला हेरणारी शाळेसमोर शेंगा विकणारी मावशी आणि बंगल्यापर्यंत ती पोर जाते, येताना मात्र गरिबीचे उत्तर घेऊन येते. प्रत्यक्ष काही न सांगता काय घडले ते प्रेक्षकांना कळते. वय, आसक्ती, शेवटचा दिस गोड व्हावा, उबळ या कथाही चांगल्या आहेत. थोरली पाती या कथासंग्रहात अकरा कथा आहेत. ‘बामणाचा पत्रा’ ही एक कथा म्हणून त्यात येते. शेताचा तुकडा आणि झोपडी इथे नायक होतात. ग्रामीण वर्णन आणि निवेदन कथेत गोडी आणते.

‘सोने आणि माती’ या कथासंग्रहात अकरा कथा आहेत. सिनेस्टाईल अशा कथा यात आहेत. धक्का देऊन शेवट किंवा एकदम कलाटणी यामुळे रंजकता वाढली आहे. यातील ‘या कानापासून त्या कानाकडे’ ही कथा वानराला देव मानून गावाची फजिती दाखविणारी आहे. व्यंकटेश माडगूळकरांची याच पद्धतीची पण वेगळ्या धाटणीची कथा आहे, याची आठवण येते.

ना. सी. फडके यांनी ‘लघुकथा तंत्र आणि मंत्र’ यात सांगितलेली लघुकथेची व्याख्या आठवते. ‘‘कमीत कमी पात्रं आणि कमीत कमीत प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतिने सांगितलेली व ऐकणार्‍याच्या मनावर एकच एक ठसा उमटविणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय.’’ (लघुकथा: मंत्र आणि तंत्र, पान-37)

या व्याख्येत बसणार्‍याच गदिमांच्या कथा आहेत पण ना. सी. फडके यांनी त्यांची दखल घेतली नाही. श्रीपाद जोशी यांनी ‘गदिमा वाङ्मयदर्शन’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. जोशी हे स्वातंत्र्यसैनिक होते. महात्मा गांधी यांच्या संपर्कात होते. डॉ. आंबेडकर, धर्मानंद कोसंबी यांच्या ग्रंथांचे त्यांचे अनुवाद प्रसिद्ध आहेत. जवळपास दोनशे पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. जोशींनी गदिमा यांनी एकूण नव्वद कथा लिहिल्या असे सांगितले आहे. त्याची विषयवार वर्गवारी त्यांनी दिली आहे. ग्रामीण कथा – 11, प्राणीकथा – 4, आत्मवृत्तपर – 8, लोककथा – 6, प्रेमकथा – 14, व्यक्तिचित्र – 18, ग्रामीण-नागरी – 19, चित्रकथासदृश्य – 2, चमत्कृतीजन्य – 8 अशा वर्गवारीतून त्यांचा कल कळतो. कथा लेखकांच्या आस्थेचे विषय समजून घेता येतात. मराठी वाङ्मयाचा आढावा घेणारा ‘प्रदक्षिणा’ नावाचा एक ग्रंथ आहे. 1840 ते 1960 या कालखंडातील अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा चिकित्सक ऐतिहासिक आढावा असे या ग्रंथाचे स्वरूप सांगितले आहे. त्यात मराठी कथेबद्दल ‘कथावाङ्मय’ नावाचा म. ना. अदवंत यांचा लेख आहे. शंभर पानाच्या या लेखात गदिमांचा उल्लेख आहे. व्यंकटेश माडगूळकर यांची माहिती देताना, ‘त्यांचे थोरले बंधू ग. दि. माडगूळकर यांनीही आपल्या ‘थोरल्या पाती’तून त्यांना काही प्रमाणात साथ दिली. ‘नेम्या’, ‘वसुली’ ‘गावरान शेंग’, ‘पंतांची किन्हई’ इत्यादी अनेक कथांतून तो परिसर त्यांनी साकार केला. गं. दि. माडगूळकरांची कथा पुष्कळ अंशी आत्मानुभवातून स्फुरलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कथांवर त्यांच्या व्यक्तित्वाचा असा खास ठसा उमटला आहे, असा उल्लेख त्यांनी केला आहे. (प्रदक्षिणा पान – 182). स्वतः माडगूळकरांनी एका कथेत असा उल्लेख केलेला आहे, ‘एका वर्षाच्या काळातील गोष्टी आहेत या. कोरड्या डोळ्याने आणि गलबलत्या काळजाने मी प्रत्यक्ष पाहतो आहे. घटनास्थळ देखील दूरचे नाही. खुद्द माझ्या घरात घडल्या आहेत या घटना. हकीकतीच्या वाङ्मयाचे मोल नसते म्हणतात. तरी मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. उरी राहणे अशक्य होते, त्याला तोंडावाटे वाट करून द्यावी लागते. (कथासंग्रह- सोने आणि माती, कथा अनुत्तरीत, पान – 99) इंदुमती शेवडे यांनी ‘मराठी कथा उगम आणि विकास’ हा ग्रंथ लिहिला आहे. पाचशे पानांच्या या ग्रंथात माडगूळकरांच्या संदर्भाने दोन-तीन वाक्ये आहेत.

1. एखाददुसरा कथासंग्रह लिहून वाचकांना चटका लावणारे बरेच लेखक या काळात दिसतात. आपल्या बंधूच्या कथांमधून ग्रामीण जीवनाच्या ज्या पैलूंचे दर्शन घडते त्याहून वेगळ्या पैलूंचे दर्शन घडवणारे ‘लपलेला ओघ’कर्ते गं. दि. माडगूळकर. (पान नं. 289)

2. तीन वर्षांपूर्वी ग. दि. माडगूळकरांनी नवकवितेला झोडपून काढले आहे. (पान नंबर 528)

3. माडगूळकरांच्या ‘कृष्णाची करंगळी’ या कथासंग्रहात नवकथेचा किंवा ग्रामीण कथेचा ‘साचा’ टाळून किंबहुना त्याला विरोध म्हणून की काय भक्कम कथानक असलेल्या व जुन्या शैलीत सांगितलेल्या निवेदनात्मक कथा आहेत. त्यात कारुण्याचे चित्रण आहे. (पान नं. 509)

 • खांडेकरांचा सहवास मिळाला पण माडगूळकर खांडेकरांची शैली घेत नाहीत. चमकदार वाक्ये, सुभाषितवजा पखरण आणि आदर्शवादी पात्रे इत्यादी काहीच माडगूळकरांच्या कथेत नाही. त्यात विविधता आहे. त्यांनी नवीन साहित्यावर केलेले परखड भाष्य हे एका वेगळ्या भूमिकेतून केलेले आहे. प्रयोग म्हणून काहीही लिहिणे माडगूळकरांना मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांच्या कथा नव्या पिढीसमोर यायला हव्यात. जीवनाचे दर्शन घडवताना त्यांच्या शब्दातील संकेत, संयम आणि संस्काराचे भावचित्र नव्या पिढीच्या डोक्यात बसवायला हवे. माडगूळकरांचे मराठी साहित्यावरील उपकार स्मरायला हवेत.

  – दिनकर जोशी, आंबेजोगाई
  7588421447

  साहित्य चपराक मासिक एप्रिल 2021

  चपराक

  पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
  व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
  Email - Chaprak Email ID
 • 3 Thoughts to “गदिमांच्या कथा”

  1. Nagesh S Shewalkar

   दिनकरजी, खरेच कथाकार ‘गदिमा’ ही ओळख आपण अत्यंत सुंदर रीतीने करून दिली आहे. धन्यवाद!

  2. जयंत कुलकर्णी

   आधुनिक वाल्मिकी, महाकवी, पटकथाकार, गीतकार असलेले गदिमा आणि त्यांच्या कथांचा प्रवास, ग्रामीण लहेजा यांचं सुंदर वर्णन या लेखात आहे. वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे यांच्याकडे काम करूनही लेखनाचा स्वतःचा ‘बाज’ ‘शैली’ असणारे गदिमा मनाला खूप भावले. माहितीपूर्ण लेख. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेला महत्त्वपूर्ण लेख!

  3. is there any other information related to this article if any please let me know

  तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

  हे ही अवश्य वाचा