माझ्या आईचं पत्र हरवलं!
———————————
‘माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ असा एक खेळ आम्ही लहानपणी खेळत होतो. टी व्ही आणि मोबाईल नसलेल्या त्या काळात मैदानी खेळांना प्राधान्य असायचं. क्वचितच आम्ही मुलं घरात असायचो! आंधळी कोशिंबीर, ऊन सावली, डोंगर का पाणी, डबा ऐसपैस, हुतुतू, आट्यापाट्या, गोट्या, भोवरा, लपाछपी, विषामृत, विटी दांडू असे इतर खेळही त्यावेळी आम्ही खेळत होतो. कदाचित आजच्या मुलांना यातील काही खेळांची नावं, ऐकून देखील माहिती नसतील. पण तुमच्या आई-बाबांना, आजी -आजोबांना विचाराल तर ते भरभरून बोलतील या खेळांवर आणि जुन्या काळातील आठवणीत रमूनही जातील! या खेळांना फारशी साधनं लागायची नाहीत. आजच्या मुलांनीही खेळून पाहायला हरकत नाही, कदाचित त्यांना आवडतीलही हे खेळ! हो, पण त्या साठी घराबाहेर पडायला हवं! आज हा खेळ हरवलाय आणि ते पत्र सुद्धा!
“मेहेरबां लिखुं हसीना लिखुं या दिलरुबा लिखुं
हैरान हूं के आपको इस खतमें क्या लिखुं
ये मेरा प्रेम पत्र पढकर के तुम नाराज ना होना
तुम मेरी जिंदगी हो के तुम मेरी बंदगी हो”
आशा कितीतरी गाण्यांमधून नायक नायिका आपलं प्रेम आपल्या प्रेयसी प्रियकरा जवळ व्यक्त करताना आपण सिनेमातून पाहिलं आहे आणि हे प्रेम पत्रातून व्यक्त करत आहेत. थोडक्यात जे प्रत्यक्ष बोलणं अवघड वाटतं, काही वेळा प्रत्यक्ष बोलणं शक्यही नसतं ते लिहून कळवणे हा पत्र लेखनाचा प्रमुख हेतू आहे. प्रेम व्यक्त करायला पूर्वी मुलं-मुली लाजत असत! म्हणून पत्राचा आधार घ्यावा लागत असे. मग हस्ते परहस्ते मित्राकडून मैत्रिणीकडून ते पत्र आपल्या प्रियकरापर्यंत पोचत असे! काही वेळा त्यातून घोळ, गैरसमज देखील निर्माण होत. पण बऱ्याच अंशी ते पत्र इच्छित स्थळी पोचत असे! साखरपुडा झालेल्या भावी वधू-वरांकरिता पत्रांचं महत्त्व अनन्यसाधारण असे. गुलाबी कागदावर लिहिलेली, फुलापानांची कलाकुसर केलेली आणि विविध प्रकारच्या शेरो-शायरींनी सजलेली ती लाजरी बुजरी प्रेमपत्र! अनेकांनी लग्ना पूर्वीची प्रेमपत्र जपून ठेवली आहेत! जणू सुगंधाची बंद कुपिच! मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलगी आवडली तर ठीक, पण नकार द्यायचा असेल तर पत्राने कळवण सोपं व्हायचं प्रत्यक्ष नकार कळवण्यापेक्षा! शिवाय आजच्या सारखे फोन ही नव्हते! फोन श्रीमंतांकडेच असायचे. गरिबांनी फोनसाठी पोस्टात रांगा लावायच्या!
ही खाजगी पत्रं. इतरही घरगुती पत्रं सगळी खाजगीच!शाळा कॉलेज मधील मुलांनी आपल्या घरी लिहिलेलं पत्र. लहान मोठ्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं एकमेकांच्या जवळ येण्यास मदत करतात. एकमेकांविषयी असणारं प्रेम, माया, जिव्हाळा वाढवतात! बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याने बायकोला किंवा बहुतांश बायकांनी नवऱ्याला लिहिलेलं पत्र.
“दूध जास्त घेऊ नये. घर उघडे टाकून जाऊ नये. वेळेवर घरी यावे. (उंडारत फिरू नये.) बाबांचा दमा बरा आहे. वगैरे वगैरे.”
– असं बायको नवऱ्याला पत्राने कळवायची.
पत्राच्या वरच्या टोकाला मधोमध शुभसुचक ‘श्री’ लिहिण्याची प्रथा होती. त्यानंतर तारीख, ठिकाण, सुरुवातीचा मायना तीर्थरूप, तिर्थस्वरूप, चिरंजीव, प्रिय.. त्याखाली कृतानेक शीर साष्टांग नमस्कार, अनेक आशीर्वाद, सनविवि या सारखी अभिवादन पर वचने. हल्ली मात्र प्रिय, डियर इ. लोकप्रिय आहेत. हल्ली सुरुवातीच्या मायन्याचेही शॉर्टफॉर्म झाले आहेत. जसे की, …
श्री. रा.रा. (श्रीमान राजमान्य राजश्री)
ती. (तीर्थरूप) आई-वडिलांसाठी
ति. स्व. (तिर्थस्वरूप) इतर ज्येष्ठांसाठी
शि. सा. न. वि. वि. (शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष)
अ. उ.आ. (अनेक उत्तम आशीर्वाद)
क.लो.अ. (कळावे लोभ असावा)
व.से.बा. शि. सा.न. (वडिलांचे सेवेशी बालकाचा शीर साष्टांग नमस्कार)
व्यावसायिक दृष्टीकोनातून पत्र व्यवहार हा लिखित स्वरूपात असणं आवश्यक मानलं जातं. न जाणो पुन्हा केव्हातरी मागे वळून पूर्वीच्या पत्राचा संदर्भ घ्यावा लागेल, म्हणून लेखी स्वरूपात! व्यावसायिक पत्र औपचारिक असतात. ओळख पत्र, शिफारस पत्र, अधिकार पत्र, पोच पत्र, नोकरीसाठी अर्ज यांचे विशिष्ट नमुने रूढ झालेले दिसून येतात.
तर खाजगी पत्र म्हणजे जणू आपण समोर बसून बोलतोय किंवा काहीतरी सांगतोय अशी पत्रं. घरात घडलेली एखादी घटना. शुभ कार्याचं नातेवाईकांना आमंत्रण. एखादी वाईट बातमी इत्यादी.
कोणी गेल्याची बातमी कळवायची असेल तर त्या पत्रावर ‘श्री’ लिहिलेले नसायचे व ते पत्र अर्धेच लिहिलेले असायचे. पत्र वाचून लगेचच ते पत्र फाडून टाकत असत.
“डाकीया डाक लाया डाकीया डाक लाया
खुषीका पैगाम कही खबर दर्दनाक लाया”
वाचकांची पत्रे, अनावृत्त पत्रे, काल्पनिक पत्रे, लेखक वाचकांची पत्रे, लेखक, कवी, कलाकार, राजकीय नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांची खाजगी पत्रे यांचा संग्रह करण्याची खूप जणांना आवड असते. आशा पत्र संग्रहांची पुस्तके ही तयार झालेली आहेत. आम्हाला अशी पत्रे जमा करण्याचा छंद होता. एखाद्या लेखक कलावंताचा संदेश, स्वाक्षरी मिळवण्यासाठी आम्ही त्यांना मुद्दाम पत्र लिहीत असू. आणि आश्चर्य म्हणजे त्याची उत्तरे दिली जात असत. काहीवेळा हे लेखक,कलावंत स्वतः उत्तर देत तर काहीवेळा त्यांचे लेखनिक किंवा स्वीय सहाय्यक हे काम करत. या पत्रांमधून आत्मीयता वाढत असे. आशा लेखक, कालावंतांकडून आलेल्या पत्रांचा संग्रह अनेक जणांकडे पाहायला मिळे.
इतिहास कालीन पत्रव्यवहार हा देखील इतिहासाच्या अभ्यासातील महत्वाचे साधन आहे. या पत्रांमुळे खुपसा इतिहास आपल्याला माहिती झाला. पत्रांमुळे आपल्याला त्या त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक परिस्थितीची माहिती होते.
परिणाम कारक पत्रलेखन करणं ही एक कला आहे. जसे काही सेकंदांच्या जाहिराती आपल्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य करतात! पत्रलेखनातील हस्ताक्षर, भाषाशैली, परिच्छेद योजना वगैरे परिणाम साधतात. पत्र हस्ताक्षरात असावं की टंकलिखित हेही विचारात घेणे आवश्यक आहे. चांगल्या व प्रभावी पत्रलेखनाच्या कल्पना कालमानानुसार बदलत गेलेल्या आढळतात. खाजगी स्वरूपाचे पत्रलेखन व्यक्तिगत असल्यामुळे पत्रलेखकाच्या व्यक्तिमत्वाची छाप त्यात उमटते. व्यावसायिक पत्रात मात्र तोचतोपणा जाणवतो!
पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र व पाकीट असे पत्र पाठवण्याचे तीन प्रकार रूढ होते. आता त्यातील पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यतः व्यावसायिक पत्रांसाठी वेगवेगळ्या प्रकारची आणि आकाराची पाकिटे अजूनही वापरली जातात. पोस्ट कार्यालयाबरोबरच आता अनेक कुरियर कंपन्या देखील पाकिटे व पार्सल पोचवण्याचे काम करतात. अगदी देशात आणि परदेशातही! पोस्ट खात्याने तयार केलेल्या पाकिटांचा स्टॅण्डर्ड साईझ वर्षानुवर्षे एकच आहे!
उपलब्ध माहितीनुसार इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शक १८३२ (इ.स.१९१०) च्या अहवालात ‘लेखन प्रशस्ती’ नावाचे एक प्रकरण (ग्रंथ) प्रकाशित केले त्यात ७८ प्रकारच्या पत्रांची विवरणासह सूची दिलेली आहे. तथापि प्रत्यक्षात त्याहून अधिक प्रकारची पत्रे सापडतात. त्या काळात राजकीय पत्रव्यवहार कित्येक प्रसंगी शत्रूच्या हातात सापडण्याचा संभव असे. म्हणून मूळ पत्रात ते पत्र कोणी कोणास पाठवले ते लिहीत नसत. त्या बाबत गुप्तता पाळली जात असे. आणि ते कळण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात! काहीप्रसंगी विशेष नामांचे संक्षेप आढळत. उदा….
पा (म्हणजे परगणे, परवानगी, पाखाडी, पाटील, पातशाही, पायली, पाहिजे)
मु (म्हणजे मुहम्मद)
वि (म्हणजे विरेश्वर, विश्वनाथ)
पत्रलेखन पद्धतीवर फार्सी भाषेत ‘इंशा इ माधोराम’, ‘इंशा इ हरकरन’, ‘इंशा इ हरमऊनी’, इत्यादी पुस्तके आहेत.
अब्राहम लिंकन यांनी हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र जगविख्यात झालं.
पंडित नेहरूंनी आपल्या लेकीला म्हणजेच इंदिराजींना अनेक पत्रे लिहिली. या पत्रांवर आधारित एक पुस्तकही प्रसिद्ध झालं. त्याचं नाव ‘लेटर्स फ्रॉम ए फादर टू हिज डॉटर’
पत्र म्हणजे अर्धी भेट असं म्हणतात. मग फोन ही पाऊण भेट म्हणता येईल. आणि व्हिडीओ कॉल ही नव्वद टक्के भेट म्हणायला काहीच हरकत नाही! प्रत्यक्ष भेटीची तर मजाच वेगळी!
जी.ए. आणि सुनीताबाई देशपांडे यांचा पत्रव्यवहार अजूनही मराठी साहित्यातील मानाचं पान आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबाजींची पत्रं ही आदर्श आचार आणि विचारांचे नमुने म्हणून दाखवता येतील!
साने गुरुजींनी आपली पुतणी सुधा हिला लिहिलेली सुंदर पत्रं. ही पत्रं पुस्तक रुपानेही प्रसिद्ध झाली आहेत. ती वाचताना इतकी ताजी, माहितीपूर्ण, निसर्गवर्णनाने सजलेली आणि माणुसकीने ठासून भरलेली आहेत असं जाणवतं.
नांदेडचे साहित्यिक देविदास फुलारी यांनी आपल्या मुलाला लिहिलेलं पत्र. हे पत्र समाजमाध्यमात खूप चर्चिलं गेलं. वडील आणि मुलगा यांच्या नात्यातील हळुवार भावबंध या पत्रातून खूप अलवारपणे व्यक्त झाले आहेत!
इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलीनं थेट माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून शेतकरी असलेल्या आपल्या वडिलांच्या अडचणी त्यांच्या समोर मांडल्या. त्या मुलीचं नाव धनश्री आश्रूबा बिक्कड. देवळाली जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ही मुलगी.
सुप्रसिद्ध साहित्यिक श्री अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रं माणसाला अंतर्मुख करतात. झी मराठी ने आपल्या ‘चला हवा येउद्या’ कार्यक्रमात त्यांच्या कलाकारांकडून ही पत्रे जनसामान्यांना वाचून दाखविली. ज्यातून त्यांना समाजाबद्दल वाटणारी कळकळ व्यक्त झाली. झी मराठीने जणू सामाजिक बांधिलकीच जपली!
असंच एक पत्र पहिलीत शिकत असलेल्या श्रेया सचिन हराळे या मुलीनं लिहिलं आणि पोस्टात टाकलं. या पत्रात या चिमुरडी ने कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या आपल्या वडिलांची कैफियत मांडली आहे! वडिलांना खूप कमी पगार आहे. त्यांना कामावरून घरी येण्यास उशीर होतो. कमी पगारामुळे त्यांना ओव्हरटाईम करावा लागतो. वेळेअभावी ते तिला शाळेत सोडवायला जाउ शकत नाहीत. वगैरे वगैरे. पत्र म्हणजे समाजमनाचा आरसा. अभिव्यक्तीचं साधन. पत्रातून खूप वैयक्तिक आणि मनात साचलेलं व्यक्त होतं. पत्र लिहिल्यामुळे, व्यक्त झाल्यामुळे मनातील मळभ दूर होतं! जीवनाचा निखळ आनंद मिळतो!
उपलब्ध माहिती अनुसार पत्रांची सुरुवात इसवीसनपूर्व ५०० (500BC) वर्षांपासून आढळते. न्युज फ्रॉम माय ल्याड (News from my lad) बाय जेम्स कॅम्पबेल १८५८-१८५९. अल्बर्ट आइन्स्टाइनचे प्रेसिडेंट रुझवेल्ट यांना पाठवलेले दिनांक २ ऑगस्ट १९३९ चे पत्र. थोडक्यात काय तर प्राचीन काळापासून पत्र लिहिली जात आहेत. त्याचं स्वरूप बदलत गेलं आहे. हल्ली पत्रं वेगवेगळ्या प्रकारच्या कागदावर लिहिली जातात किंवा टंकलिखित असतात. टेलिग्राफ, टेलेक्स, फॅक्स, इंटरनेट व इमेल या क्रमाने संवादामध्ये, संवादाच्या स्वरूपात क्रांती होत गेली. पाठवण्याची साधने बदलत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खलिता घेऊन घोडेस्वार जात असत. काही दशकांपूर्वी पोस्टमन गावोगाव चालत फिरून टपाल देत. नंतर तो पोस्टमन सायकलवर गावोगाव हिंडू लागला. खेड्यातून पोस्टमन टपाल नुसतेच वाटत नसे तर निरक्षरांना वाचूनही दाखवत असे! त्यामुळे माणसं पोस्टमनची आतुरतेनं वाट पहात! मोटारी सुरू झाल्या नंतर टपाल मोटारीने जाऊ लागलं, रेल्वेने जाऊ लागलं. इतकंच काय टपाल विमानानेही जाऊ लागलं. आता तर अनेक मजली इमारतींमुळे पोस्टमन लेटरबॉक्स मध्ये टपाल टाकून निघून जातात. काळाचा महिमा अगाध आहे. पोस्ट खाते व कुरियर कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे पोस्ट खात्यातही सुधारणांची अपेक्षा करायला काय हरकत आहे! बाकी एक मात्र मानायला हवं की पोस्टाच्या ‘राष्ट्रीय बचत योजना’ मात्र जनमानसात खूपच लोकप्रिय आहेत!
पत्र आलं की पूर्वी ते तारेला लावलं जायचं. आशा पत्रांनी भरलेल्या तारा घरोघर दिसायच्या. केव्हातरी त्या तारेतील जुनी पत्रे काढून वाचायला खूप मजा यायची. हल्ली आपण जुने फोटो काढून आठवणीत रमतो अगदी तसे! पत्रांची वाट पहाण्यातील हुरहूर ही केवळ अनुभवावण्याचीच गोष्ट होती! आईचं हरवलेलं पत्र आता सापडण्याची शक्यता फारच धूसर झाली आहे!
हजारो मैल आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या सैनिकाला डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण करत असताना ऊन, वारा, पाऊस, थंडी, बर्फ यांचा सामना करताना आपल्या प्रियजनांकडून आलेलं एखादं पत्र कशी मायेची ऊब देतं हे केवळ तो सैनिकच सांगू जाणे! असंच परदेशी जाऊन स्थायिक झालेल्या आपल्या मुलाला त्याच्या बापानं लिहिलेलं आसवात भिजलेलं हे पत्र, वियोगाची व्यथा तर सांगतच पण मुलाला अंतर्मुख ही करतं, मुलाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणारं ‘नाम’ या चित्रपटातील हे गीत. गीतकार: आनंद बक्षी, गायक: पंकज उधास, संगीत: लक्ष्मीकांत प्यारेलाल.
चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है
चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है
बडे दिनोंके बात, हम बेवतनोंको याद
वतन की मिट्टी आई है
उपर मेरा नाम लिखा है
अंदर ये पैगाम लिखा है
ओ परदेस को जानेवाले
लौटके फिर ना आनेवाले
सात समंदर पार गया तू
हमको जिंदा मार गया तू
खून के रिषते तोड गया तू
आँख मे आसू छोड गया तू
कम खाते है, कम सोते है
बहोत ज्यादा हम रोते है
चिट्ठी आई है
सुनी होगई शहर की गलिया
काटे बन गई बाग की कलियां
कहते है सावन के झुले
भूल गया तू हम नही भुले
तेरे बिन जब आई दिवाली
दीप नही दिल जले है खाली
तेरे बिन जब आई होली
पिचकारी से छुटी गोली
पीपल सुना, पनघट सुना
घर शमशान का बना नमुना
फसल कटी आई बैसाखी
तेरा आना रह गया बाकी
चिट्ठी आई है
पहले जब तू खत लिखता था
कागज मे चेहरा दिखता था
बंद हुआ ये मेल भी अब तो
खतम हुआ ये खेल भी अब तो
डोली मे जब बैठी बहना
रस्ता देख रहे थे नैना
मै तो बाप हूं मेरा क्या है
‘तेरी मा का हाल बुरा है
तेरी बिवी करती है सेवा
सुरतसे लगती है बेवा
तुने पैसा बहोत कमाया
इस पैसेने देश छुडाया
देस पराया छोड के आजा
पंछी पिंजरा तोडके आजा
आजा उमर बहोत है छोटी
अपने घरमे भी है रोटी
चिट्ठी आई है
जयंत कुलकर्णी
दूरभाष: ८३७८०३८२३२
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.