शांतता प्रस्थापित करण्यासाठी हवी शस्त्रसज्जता!

शांतता प्रस्थापित करण्यासाठी हवी शस्त्रसज्जता!

चपराक दिवाळी 2020
‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क – 7057292092

कोणतीही क्रांती ही शस्त्राशिवाय होत नाही असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या बळावर जुलूमी रावजटीविरूद्ध संघर्ष उभारला आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आजही अनेकदा स्वसंरक्षणासाठी शस्त्र उचलण्याशिवाय पर्याय नसतो. इतरांवर वार करण्यासाठी शस्त्र वापरणे चुकीचेच पण स्वतःवरील हल्ला परतवून लावायचा असेल, राष्ट्राच्या संरक्षणासाठी सीमेवर निधड्या छातीनं उभं रहायचं असेल तर शस्त्राशिवाय पर्याय उरत नाही. आज आपल्या अशा अनेक मर्दानी खेळांचा, रांगड्या वृत्तीचा, अशा शस्त्रास्त्रांचा आपल्याला विसर पडता असतानच कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ येथे ‘सव्यसाचि गुरूकुलम्’च्या माध्यमातून लखन जाधव यांनी या सगळ्याचे दर्शन घडविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रनीतिचा तुम्हाला अंदाज बांधायचा असेल तर एकदा या गुरूकुलमला भेट द्यायलाच हवी. लखन जाधव यांच्या या अफाट कार्याला प्रथम ‘चपराक परिवारा’तर्फे मानाचा मुजरा करतो.

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर माणूस एकवेळ या गरजांशिवाय राहू शकेल पण तो संस्काराशिवाय राहणार नाही. आपल्या संस्कृतीतील धाडसाची, पराक्रमाची परंपरा खंडित झाल्यानेच देशासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आजची तरूणाई व्यसनाच्या आहारी गेलीय, त्यांचे नीतिधैर्य खचतंय, ते निराशेच्या गर्तेत अडकल्यानं अनेक व्यसनांच्याही आहारी गेलेत. हे सगळं थांबवायचं असेल तर त्यांना मनानं कणखर बनवण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करणं आणि शिवनीती आचरणात आणणं हाच एकमेव पर्याय आहे असं मत सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेचे अध्यक्ष असलेल्या लखन जाधव यांनी व्यक्त केलं.

खरंतर लखन जाधव आणि त्यांच्या टीमनं 7 ते 9 डिसेंबर 2019 रोजी श्रीसमर्थ जांब येथे झालेल्या समर्थ महासंगमात त्यांच्या कौशल्याची चुणूक दाखवली होती. तेव्हापासूनच या अवलियाला भेटण्याची उत्सुकता होती. शांतीच्या मार्गावरील अहिंसेचा समर्थक म्हणून मला स्वतःला शस्त्रांचं समर्थन कधीच करावं वाटलं नाही. किंबहुना कोणत्याही रक्तपातापासून कोसो मैल दूर असल्यानं त्याचं महत्त्वही कधी वाटलं नाही, मात्र लखन जाधव यांना भेटल्यावर, आजच्या परिस्थितीविषयी उघड्या मनानं चर्चा केल्यावर आणि त्यांच्या अचाट, अफाट साहसी कला बघितल्यावर आजच्या काळातही या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत याची प्रचिती येते. इथल्या प्रत्येक तरूणांनी आणि विशेषतः तरूणींनी लखन जाधव यांच्या तळपत्या कार्याची नोंद घेणं, त्यांच्याकडून चार गोष्टी आत्मसात करणं आणि जगरहाटीला सामोरं जाताना स्वतःचा बचाव करण्याइतपत शस्त्रविद्या शिकून घेणं हे अत्यावश्यक वाटतं.

आम्ही गुरूकुलमला पोहोचलो. तिथल्या भगिणींनी औक्षण करून आमचं स्वागत केलं आणि लखनगुरूजींशी संवाद सुरू झाला. ते बोलत होते आणि आम्ही अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. इथं काही अनावश्यक प्रस्तावना करण्यापेक्षा लखनगुरूजींच्याच शब्दात आपण हे समजून घेऊया.
null

लखन जाधव गुरुजी
लखन जाधव गुरुजी

मी काम सुरू केलं आणि दिसून आलं की अनेक शाळांत मुलं प्रार्थनेसाठी देखील उभी राहू शकत नाहीत. पाच-दहा मिनिटांनीच ते डळमळायला लागतात. चक्कर येऊन पडतात. त्यातही मुलींच्या अनेक तक्रारी होत्या. त्यांना लिंबू पाणी द्यावं लागायचं. अनेक शाळांनी मुलांना प्रार्थनेसाठी थांबता येत नाही म्हणून प्रार्थनेचा वेळही कमी केला. मुलांची दहावी होते-बारावी होते पण त्यांना पुढं काय करायचं हेच कळत नाही. या सगळ्याचा विचार करताना एक लक्षात आलं की आज स्वसंरक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जातात पण त्यातून जी तत्त्वं मांडली जातात त्याच्या मुळाशी गेलो तर त्या सर्वांच्या मुळाशी आपली युद्धनीती आहे. आजच्या व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास केला तरी तो वेदापर्यंत जातो. आपल्या ऋषिमुनींनी हे सगळं त्यात कधीच नोंदवलंय.

माझे वडील कराटेत ब्लॅक बेल्ट होते. त्यामुळं लहानपणापासून त्यांना बघत होतो. आम्हाला चौथीला संजय पाटील नावाचे एक गुरूजी होते. ते अतिशय राष्ट्रभक्त होते. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. त्यांच्याकडून प्रथम शिवचरित्र ऐकलं. मग सातत्यानं एकच ध्याय लागला की आपल्याला शिवरायांचं दर्शन होईल काय? आज अनेक लोक साधना करताहेत, परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी धडपडताहेत. मला शिवरायांच्या भेटीचे वेध लागले होते. त्यांची शस्त्र पाहण्याची इच्छा निर्माण झाली होती. ती हातात घ्यावीत, चालवावीत असं वाटायचं. किंबहुना माझं जीवनध्येयच झालं होतं ते! मग वाघनखे, दांडपट्टे स्वप्नात यायचे. प्रत्यक्षात महाराज जी शस्त्रं वापरायचे ती आज चित्रातसुद्धा उपलब्ध नाहीत. मुलांना साधा दांडपट्टा म्हणजे काय असं विचारलं तर ते सांगू शकणार नाहीत. वाघनख्यांचा नेमका आकार कसा असतो? ते कुठं वापरलं जातं? हातात कसं घातलं जातं? हेही कळत नाही. मुलांना फक्त तलवार, ढाल अशी दोन-चार शस्त्र सोडली तर बाकी कशाचीच माहिती नसते. अनेक शस्त्रांची वर्णनं इतिहासात येतात पण अनेकांना ती चित्रातही माहीत नाहीत. मला बालवयातच या सर्वांची ओढ लागली.

त्यावेळी या शस्त्रांची ओढ लागल्यावर वाटायला लागलं की कराटे हा आपला खेळ नाही. प्रत्यक्षात जगभरातील मार्शल आर्ट आपल्याच देशातून गेल्यात पण तरी आपल्या देशी खेळांची सर त्याला येणार नाही. लाठीकाठी, कुस्ती, मल्लविद्या, मल्लखांब या आपल्या खर्‍या विद्या आहेत. त्या शिकण्यासाठी मी गुरूजींकडं हट्ट धरला. योगायोगानं त्यावेळी आमच्या शाळेत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवण्यासाठी एक संघ आला होता. त्यांनी तिथं जाहीर केलं की ज्यांना कुणाला हे शिकायचं असेल त्यांच्यासाठी आम्ही याचं प्रशिक्षण देतो. त्या गर्दीत मीही एक होतो. त्यांच्याकडं नाव नोंदवलं आणि माझं प्रशिक्षण सुरू झालं.

ही गोष्ट 2000-2001 सालातली आहे. त्यावेळी आमचे गुरूजी कोल्हापूरातून इथं शिकवायला यायचे. मग त्यांनी जाहीर केलं ‘किमान माझा प्रवासखर्च निघेल इतकं शूल्क तरी मुलांनी द्यायला हवं.’ त्यानंतर सगळ्यांनीच तो क्लास बंद केला. मला तर ही विद्या शिकायची होती पण एकट्याला ती शिकवण्यासाठी येणं त्यांना परवडणारं नव्हतं. मी दहावीच्या वर्गात असतानाच माझे वडील गेले. अजूनही माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांच्या नावावर एकही साधा सातबारा नाही. ‘हे विश्वची माझी घर’ ही माऊलींची संकल्पना मला माझ्यासाठीच वाटते. आज बाहेर वावरताना हृदयात छत्रपती शिवाजी महाराज असले तरी खिशात गांधीबाबा असावे लागतात. आमच्याकडं ते नाहीत. हे गडकोट, त्यांचा पराक्रमांचा वारसा हीच आमची ठेव. आमचं मूळ गाव ज्योतिबा डोंगर. तिथल्या अतिक्रमित पत्र्याच्या शेडमध्ये राहून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. बारा वर्षांपूर्वी मी ते घर सोडून या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं. आजही तिथं आई राहते. देशभरातील अनेक मुलं तिथं येऊन राहतात. शस्त्रास्त्र विद्या शिकतात. गेली सतरा वर्षे मी वेगवेगळ्या भागात हे खेळ, या विद्या शिकवण्याचं कार्य करतोय. त्याच्या आधी दोन वर्षे मी याचं प्रशिक्षण घेतलं.

सरांनी ज्योतिबातला क्लास बंद केल्यानंतर मी रोज सायकलवर कोल्हापूरला जा-ये करायचो. कोणत्याही परिस्थितीत ही विद्या आपण शिकायचीच असा ध्यास होता आणि त्यात मला यशही आलं.

सव्यासाचि गुरुकुलम
सव्यासाचि गुरुकुलम

छ. शिवाजीमहाराजांनी जो विचार दिला होता, जी प्रेरणा दिली होती तिच सर्वांना द्यावी या ध्यासानं पछाडलं होतं. थोडासा बालीशपणा वाटेल पण मी चौथीला असतानाच ठरवलं होतं की मी कधीच नोकरी करणार नाही. या भारतभूच्या सेवेसाठी स्वतःला अर्पूण घ्यायचं. ‘मृत्यू हीच विश्रांती’ हे मला ठाऊक आहे. त्यामुळं सतत कार्यमग्न राहणं हा माझ्या जीवनशैलीचाच एक भाग बनलाय. गुरूजींनी तेव्हाच आम्हाला एक संदेश दिला होता,

कशासाठी आणि जगावे कसे हे
विचारू स्वतःला असा स्वतःला नेहमी
जगू पांग फेडावया मायभूचे,
आम्ही मार्ग चालवू हे जिजाऊंचे।

शिवरायांनी हा जो मार्ग आखून दिलाय तोच पुढे घेऊन जायचं ठरवलं होतं. खरंतर निश्चितता काहीच नव्हती. काय करायचंय हेही माहीत नव्हतं पण मर्दानी खेळ जगभर पोहोचवायचे हा ध्यास मात्र पक्का होता. मग चरित्र आणि चारित्र्य आपोआप घडत गेलं. तरूणांना एकत्र बांधुन ठेवण्याचं हे माध्यम मिळालं.

मी लहान असल्यापासून आजही मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न भीषण आहे. मातृसत्ताक असलेल्या आपल्या देशात स्त्रीशक्ती सुरक्षित नाही ही चिंतेची आणि लाजीरवाणी बाब आहे. एका बाजूला झांशीची राणी, जिजाऊ माँ साहेब, अगदी दुर्गा, चंडिका, महिशासूरमर्दिनी सर्वांची नावं आपण घेतो आणि तरीही आपल्या लेकी बाळी सुरक्षित नाहीत. ही परिस्थिती पाहून खूप दुःख व्हायचं. ती शक्तीचं रूप असताना किती दिवस तिच्या रक्षणासाठी फळी निर्माण करायची असंही वाटायचं. ती स्वतःच जागृत झाली तरच हे चित्र बदलू शकेल. त्यामुळं आम्ही आजवर जवळपास चाळीस हजार मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं. माझी पत्नीही स्वतः प्रशिक्षित आहे आणि ती आता इतरांना प्रशिक्षण देते. शहरात, कॉलेजात, कामाच्या ठिकाणी जाणं यापेक्षा अंबाघाटासारख्या आदिवासी, दुर्लक्षित भागात जाणं हे मोठं आव्हान आहे. तिथल्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्यावर जाऊन ती मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देते. ते करत असतानाच कराटे, ज्युडो आपल्याकडे शिकवले जाते पण प्रत्यक्षात त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळं मुलींना आम्ही असं ट्रेनिंग दिलं की त्यांच्या घरातल्या प्रत्येक छोट्यामोठ्या कामात त्यांनी सेल्फ डिफेन्सचं सूत्र वापरायचं. अगदी त्यांच्या डोक्यातील पीन, बांगड्या अशा प्रत्येक गोष्टींचा वापर संरक्षणासाठी कसा करायचा हे त्यांना शिकवलं. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा कसा वापर करायचा हे शिकवलं. म्हणजे कुणी हात धरला तर तो कसा सोडवायचा, मागून येऊन अचानक धरलं तर त्याला कसं बाजूला सारायचं हे त्यांना शिकवलं. वसिष्ट ऋषिंनी धनुर्वेद संहिता नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्यात हे सगळं माडलंय.

आठ वर्षे सुजर ढोले सरांकडे प्रशिक्षण घेत असताना मी वेदांचाही अभ्यास केला. त्यातून मला नवनव्या गोष्टी कळल्या. आज महाराष्ट्रात किंवा किमान कोल्हापुरात या कला जिवंत आहेत पण तरी त्याविषयी इत्यंभूत माहिती फार कुणाला नाही. मग या अभ्यासाची मला गरज वाटू लागली. ही कला फक्त शिवकालीन नाही तर यापूर्वी चाणक्यानं वापरली होती. अगदी त्याच्याही आधी प्रभू श्रीरामांनी या सगळ्याचा प्रभावी वापर केला होता हे अभ्यासातून माझ्या लक्षात आलं. मानवी वंश जसा जन्माला आला तेव्हापासून युद्धकला अस्तित्वात आहे. रामायण-महाभारत काळाचा अभ्यास केला तर अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला कळतात. त्या फक्त जाणून घेण्याची इच्छाशक्ती हवी.

वेदांत युद्धशास्त्राविषयी तपशीलवार वर्णनं आहेत. ही विद्या कुणाला शिकवायची, कुणी शिकवायची, विद्यार्थ्याची लक्षणं काय आहेत, आचार्यांची गुणवत्ता नेमकी काय आहे हे सगळं त्यात आलंय. माझे सद्गुरू संजय गोडबोले गुरूजी यांनी या सगळ्यांचा माझा अभ्यास करून घेतला. मी आध्यात्माच्या अंगाने हे सर्व समजून घेतलं. वेद, उपनिषदं, रामायण, महाभारत, कौटिल्यीय अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, शिवचरित्र अशा सगळ्यांचा अभ्यास ओघानं आलाच. गुरूकुल सुरू करताना उत्तम विद्यार्थी घडवायचं स्वप्न होतं. यादृष्टिनं अर्जुनसारखं दुसरं उदाहरण नाही. म्हणूनच आम्ही ‘सव्यासाची गुरूकुलम’ असं नाव आमच्या संस्थेसाठी निवडलं. मला कुणाला तरी जिंकायचंय, स्पर्धा करायचीय अशा गोष्टींचा विचार न करता अर्जुनानं उत्तम योद्धा होण्यास प्राधान्य दिलं. तेच मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तसं समर्पण आजच्या विद्यार्थ्यांकडं हवंय.

    सध्या आमच्या संस्थेत 32 मुलं-मुली पूर्णवेळ निवासी आहेत. त्यांच्या सरावात सातत्य आहे. महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात जवळपास साडेचार हजार मुलं आमच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या रोजच्या सरावाचे अपडेट आमच्याकडे येतात. हे मर्दानी खेळ ऑलिंपिकपयर्र्ंत जावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आधीचे मंत्री विनोदजी तावडे यांच्यासोबत यासंदर्भात माझ्या जवळपास सहा मिटींग झाल्या होत्या. ‘खेलो इंडिया’च्या उद्घाटन समारंभात त्यांनी आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना भारतीय कलांचं सादरीकरण करण्याची संधी दिली होती. सगळ्या केंद्रीय मंत्र्यासमोर आम्ही हे सादर केलं. आज वाघनखं म्हटलं की अफजलखन डोळ्यासमोर उभा राहतो. शत्रूला मारावं कसं हे महाराजांनी दाखवून दिलं. भवानी तलवार, तुळजा तलवार, जगदंबा तलवार यांच्या फक्त नावाचा उच्चार झाला तरी शाहिस्तेखान डोळ्यासमोर दिसायला लागतो. पट्टा समोर दिसला की बाजीप्रभूंचं शौर्य आठवतं. तीनशे बांदलांना सोबत घेऊन त्यांनी अठरा तास पावन खिंड लढवली. हवेतल्या हवेत शत्रूचा हात कापणारे शिवा काशिद आठवतात. एकेक शस्त्र आपल्यापुढे एकेक इतिहास उभा करतात. त्यामुळं या शस्त्रविद्यांना शासकीय पातळीवर मान्यता मिळाली पाहिजे. प्राथमिकपासून ते पुढील सर्व वयोगटासाठी शस्त्रविद्येच्या स्पर्धा व्हायला हव्यात.

    एखाद्या मुलानं व्यायाम सुरू केला आणि स्वतःचा चेहरा आरश्यात बघितला तर त्याचं मानसिक आरोग्यही सुदृढ होतं. यामुळं मुलांचं मानसिक धैर्य वाढतं. त्यांच्यात निर्भयता येते. कणखर मन तयार झाल्यानं त्यांच्यापासून कोणतेही आजार कोसो मैल दूर राहतात. पहाटे साडेचारला आमचा दिनक्रम सुरू होतो. जवळपास 55 प्रकारची शस्त्रास्त्रं इथं शिकवली जातात. ज्ञानेश्वरीपासून अनेक ग्रंथांंचं पारायण होतं. मुलं शरीरानं आणि मनानं भक्कम कशी होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुलांच्या जडणघडणीनुसार आम्ही त्यांचं वेळापत्रकही बदललं आहे. प्रत्येक मुलाकडं वैयक्तिक लक्ष दिलं जातं.

सव्यासाचि गुरुकुलम येथे 'चपराक दिवाळी अंकाचे' प्रकाशन करण्यात आले
सव्यासाचि गुरुकुलम येथे ‘चपराक दिवाळी अंकाचे’ प्रकाशन करण्यात आले

आम्हाला तक्रार करायची नाही पण पाश्चिमात्य सुखसुविधांचा इतका भडिमार होतोय की त्यामुळे समाज याबाबत अजूनही म्हणावा तसा जागृत नाही. समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. इतकं कष्टप्रद जीवन का जगावं असं अनेकांना वाटल्यानं व्यायामाकडं, खेळाकडं दुर्लक्ष करतात. मग प्रतिकारशक्ती कमी झाली की याची मोठी किंमत मोजावी लागते. युद्धाला विरोध करणार्‍यांना मला नम्रपणे सांगावंसं वाटतं की अनेक विचारवंतांनी हे मान्य केलंय की शांतता प्रस्थापित करण्यासाठीसुद्धा युद्धच करावं लागतं. जे राष्ट्र शस्त्रबळांनी संरक्षित आहे तिथंच ज्ञानविज्ञानादी कला आनंदात राहू शकतात असं आपलं शास्त्र सांगतं. एक दिवस आपल्या सैनिकांनी काम थांबवलं तर काय होईल याचा विचार करा. ते तिकडं शस्त्रसज्ज होऊन आपलं रक्षण करत असल्यानंच आज आपण इकडं अहिंसेवर चर्चा करू शकतो.

ज्याच्याकडं स्वसामर्थ्य आहे, चारित्र्याचा अलंकार आहे तोच सेनापती युद्ध टाळूनही युद्धात विजयी होतो असं पितामहा भीष्म म्हणायचे. तुम्ही नेभळट असाल तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यासाठी अंगी सामर्थ्य बानवायला हवं. सामर्थ्य असेल तरच बुद्धिनं युद्ध टाळता येतं. दुर्बलांना मात्र कुणाही कसलीच किंमत देत नाही. आपल्या भारतीयांचं ही मूलभूत जीवनमूल्य आहे. युद्धात सापडलेल्या स्त्रियांसोबत कसा व्यवहार करावा याविषयी जगभरात फक्त शिवचरित्रात मार्गदर्शक सूचना आहेत. संस्कृतीचा टेंभा मिरवणारे अनेकजण युद्धात सापडलेल्या स्त्रियांवर अनन्वीत अत्याचार करायचे. एकाच स्त्रीवर सर्व वयोगटातील पुरूष बलात्कार करायचे. हे सगळं छ. शिवाजी महाराजांनी निर्धारानं थांबवलं कारण त्यांच्याकडं सामर्थ्य होतं. असं सामर्थ्य अंगी असेल तरच आपण शिस्त लावू शकतो, चांगले संस्कार रूजवू शकतो.

आज मुलांत आईवडिलांना नमस्कार करण्याइतकेही संस्कार शिल्लक राहिले नाहीत. त्यांच्यात क्रौर्याच्या भावना वाढत चालल्यात. त्यांच्यात संस्कार राहत नाहीत. आईवडिलांकडे मुलांना देण्यासाठी वेळ नाही. त्यातून अनेक समस्या उद्भवत आहेत. आजकाल मुली नशा करण्यासाठी काय काय करतात हे बघितलं तर थक्क व्हायला होतं. जिवंत सापाचा दंश जिभेवर नशा म्हणून घेणार्‍या मुली बघितल्या की आपण कुठे वाहवत चाललोय याची चिंता वाटते.

आमच्या संजय गोडबोले गुरूजींनी मला निश्चित दिशा दाखवली. त्यांनी योग्य मार्ग दाखवला आणि मी या क्षेत्रात आलो. एखादा वात काढलेला बॉम्ब असावा अशी गत आजच्या तरूणांची झालीय. कुणीतरी त्याला फक्त एक काडी लावली की तो पेटतो. त्यामुळं त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम असणार्‍या. त्यांच्याविषयी आदर वाटणार्‍या तरूणांसाठी मी युद्धकला शिकवतो. सैन्य दलातील एखाद्या वरिष्ठ अधिकार्‍यांपुढं एक पिस्तुल आणि एक तलवार ठेवली तर ते आधी तलवार उचलतील. मस्तपैकी इकडून तिकडून फिरवून पाहतील. कारण त्यामागं आपल्या संस्कृतीचा इतका मोठा इतिहास आहे.

आज हे काम करताना आमच्यापुढे अनेक अडचणी आहेत. त्यात महत्त्वाची अडवण म्हणजे या शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यासाठी मैदानंच उपलब्ध नाहीत. स्वतंत्र आखाडे नाहीत. मातीच्या व्यायामापासून शस्त्रविद्येपर्यंत पूर्वी आखाड्यात सगळं काही शिकवलं जायचं. आज त्याचंही स्वरूप बदललं आहे. कुस्ती, मर्दानी खेळ, मल्लखांब असे सगळे विभाग वेगवेगळे झाले आहेत. आज पहिलवानकी सुद्धा बिघडलीय. पोट फुगलेला, बलदंड तरूण म्हणजेच पैलवान असे अनेकांना वाटते आणि त्यांचा वापर फक्त राजकारण्यांच्या मागेपुढे फिरण्यासाठी केला जातो. मल्ल सिंहासारखा असावा. त्याची छाती रूंद आणि पोट लहान असायला हवं. आज दुर्दैवानं अनेकांना हे पटत नाही. त्याच्या कमरेत, मनक्यात ताकत असायला हवी.

    आज आम्हाला शस्त्र मिळत नाहीत. 1857 चं स्वातंत्र्यसमर झाल्यावर 1858 ला ब्रिटिशांच्या लक्षात आलं की इथली मराठा जमात लढवय्यी आहे. ते आपल्याविरूद्ध बंड करतील. त्यामुळं त्यांनी शस्त्रबंदीचा कायदा आणला. त्या कायद्यामुळं आमच्याकडची शस्त्र संपली. ती अक्षरशः भंगारात गेली. ज्यांच्या रक्ताच्या टिळ्यांनी आपण स्वराज्य मिळवलं, आज तोर्‍यात मिरवतोय ती शस्त्र आपण मोडीत काढली.

    आमच्या गारगोटीतील एक पोलीस अधिकारी मला भेटायला आले. आमच्या मुलांकडील शस्त्र पाहून त्यांनी चिंतेनं विचारलं, ‘‘या मुलांना तुम्ही पाच-सहा हजार वर्षे मागं का नेताय? त्यांच्या हातात पुस्तक देण्याऐवजी शस्त्र का देताय? त्यातही आज अण्वस्त्रांसारखी अत्याधुनिक शस्त्र आलेली असताना त्यांना असं लाठीकाठीचं प्रशिक्षण देऊन काय उपयोग?’’

    मी त्यांना म्हणालो, ‘‘आज अणुबाँब आपण खिशात घेऊन फिरू शकत नाही. अत्याधुनिक पिस्तुल सोबत बाळगू शकत नाही. त्याला परवानगीही नाही. लाठी काठी घेऊन आपण महायुद्ध घडवत नाही. ती स्वसंरक्षणासाठी सहज मिळते. शिवाय शस्त्र आपल्याला संयम शिकवतो. शस्त्र आणि संयम हा तुम्हाला विरोधाभास वाटेल पण हे खरंय. अफजलखानाने छ. शिवाजीमहाराजांवर चाल करून येताना स्वतःच्या बायकांना ठार मारलं. त्याउलट छ. शिवाजीमहाराजांनी ठरवलं होतं की माझ्या तलवारीमुळं मी एकाही मावळ्याचा जीव वाचवू शकलो तरी माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. आपल्याकडं एकही देवी देवता अशी नाही की ज्यांच्या हातात शस्त्र नाही. ते शस्त्र आपल्याच संरक्षणासाठी असतं. तुमच्या कमरेला पिस्तुल आहे पण तुम्ही त्याचा गैरवापर करत नाही कारण तुम्हाला त्यातील गोळीचं महत्त्व माहीत आहे. तसंच या शस्त्राचं सामर्थ्य आम्ही मुलांना समजावून सांगतो.’’

    ज्यांना भारत कळलाय तो कोणताही माणूस विवेकीच असतो. भारतातल्या भाचा अर्थ आहे भक्ती. भा म्हणजे ज्ञान आणि भाचा अर्थ आहे तेज. रत म्हणजे त्यात रममाण असणारा. भारूड म्हणजे भक्तीवर आरूढ होणारा. तसाच भारत शब्दाचा अर्थ आहे. तो फक्त भरत राजापुरता मर्यादित अर्थ नाही. भक्ती, ज्ञान आणि तेज ज्यांच्याकडं आहे तो खरा भारतीय. हेच सूत्र आम्हाला आजच्या तरूणापर्यंत पोहोचवायचे आहे. संस्कारशील, धाडसी, निर्भय असणारी पिढी घडवणं हेच आमच्या गुरूकुलमचं ध्येय आहे. शिक्षण तुम्हाला सगळीकडं मिळेल पण इथं माणूस घडवला जातो. त्यासाठी महाराष्ट्रभर जवळपास दीडशे ठिकाणी आमच्या संस्थेचे तरूण अनेकांना शस्त्रविद्या शिकवत आहेत.

    लखन जाधव यांचा संपर्क क्रमांक – 8055556005
    – प्रमोद येवले
    9970048048

    आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
    Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

    चपराक

    पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
    व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
    Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा