दत्तात्रय उभे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्या ‘अपेक्षा’ मासिकाच्या दिवाळी अंकाने यंदा ‘भला माणूस, उत्तम माणूस’ हा विशेष विभाग केला आहे. विविध क्षेत्रातील 24 मान्यवरांचा परिचय या विभागातून करून देण्यात आला आहे. ‘चपराक’चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांच्याविषयी युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या अंकात लेख लिहिला आहे. हा लेख जरूर वाचा. आपल्या प्रतिक्रिया कळवा.
कारगील युद्धाच्या काळात मराठवाड्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातल्या भूकंपग्रस्त किल्लारीजवळील नारंगवाडीसारख्या एका छोट्याशा गावात कोणीतरी एक सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारा मुलगा कारगील युद्धाला पाठिंबा देण्यासाठी शाळेतील सवंगड्यांना घेऊन प्रभातफेरी काढतो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींबद्दल कविता काय लिहितो अन् ती कविता सोलापूर ‘तरूण भारत’च्या अंकात प्रसिद्ध होते. त्याचवेळी या मुलाचे लेख, कविता, कथा अनेक वृत्तपत्रात, साप्ताहिकात, दिवाळी अंकात प्रकाशित होतात. शालेय शिक्षण घेत असतानाच ‘देशाला आण्विक अस्त्रांची गरज’ हा राष्ट्रीय प्रश्नांचा वेध घेणारा लेख लिहिणे आणि तो रविवार पुरवणीत मुख्य लेख म्हणून प्रकाशित होणे असे भाग्य खूप कमी लेखकांना मिळते. हे सारेच कुणालाही अचंबित करणारे आहे.
सहावी-सातवीला असल्यापासूनच वृत्तपत्र विक्रीचे काम करत शाळा शिकणे, त्यानंतर मराठवाड्यासारख्या ग्रामीण महाराष्ट्रातून पुण्यासारख्या विद्यानगरीत अवघ्या सोळाव्या वर्षी येणे, दैनिक ‘संध्या’सारख्या सायंदैनिकात पडेल ते काम करणे, त्यानंतर अवघ्या अठराव्या वर्षी स्वत:चे नियतकालिक सुरू करून ते यशस्वी करणे हे सगळे एखाद्या चित्रपटातील कथा वाटावी असेच आहे. म्हणजे मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातील वृत्तपत्र विक्रेता ते महानगरातील एका साप्ताहिक, मासिक आणि राज्यातील आघाडीच्या प्रकाशनसंस्थेचा संपादक, प्रकाशक होणे हा प्रवास वाटतो तितका सोपा बिलकूलच नाही. त्यामुळे राज्यातील सर्वात कमी वयाचा यशस्वी संपादक होणे आणि ते व्रत सातत्यपूर्ण निभावणे म्हणेज कोणाही नत्तूखैरूचे काम नव्हे. त्यासाठी पाहिजे जातीचे असेच म्हणावे लागेल. अर्थात हा संपूर्ण संघर्षमय प्रवास करून तावून सुलाखून निघालेला ‘दादामाणूस’ आहे ‘चपराक’ साप्ताहिक, मासिक आणि प्रकाशन संस्थेचे संपादक घनश्याम वसंतराव पाटील!
तत्त्व, तळमळ आणि तिडिक या तीन गोष्टींशी बांधिल असणारे एखादे व्यक्तिमत्त्व कोण? असा प्रश्न जर कोणी मला विचारला तर पहिले आणि शेवटचे नाव आपसूकच समोर येते ते म्हणजे, घनश्यामदादा पाटील! खरेतर वरील स्तुती त्यांना फारशी रूचणार नाही ही बाब अलाहिदा.
घनश्याम पाटील हा दादामाणूस मोठा का आहे? किंवा किती मोठा आहे? याबाबत सविस्तर ग्रंथ होऊ शकतो! मात्र व्यक्तिस्तोम माजवणे त्यांना कदापि पसंत नाही. मुळातच पत्रकारिता आणि प्रकाशन व्यवसायात ज्या चार-दोन लोकांकडे पाहिल्यानंतर काहीतरी सकारात्मक घडेल असे वाटते त्यातील एक आश्वासक चेहरा म्हणजे घनश्यामदादा.
सीएचे करियर सोडून मी जेव्हा पत्रकारितेत जायचे ठरवले त्यावेळी माझ्यासमोर अनेक व्यक्ती वा संस्था होत्या. त्यातील अनेकांनी मला पैशांची मागणी करून शिकाऊ पत्रकार म्हणून काम देण्याचे आश्वासन दिले. दरम्यानच्या काळातच पुण्यातील विवेकानंद केंद्राच्या पुणे शाखेत एक मासिक नजरेत आले. त्याचे नाव होते ‘चपराक’. खरेतर ते मासिक मी पुणे मराठी ग्रंथालयातही पाहिले होते. मात्र त्यावेळी मला ते वाचायला मिळाले नाही. मात्र विवेकानंद केंद्रात हे मासिक पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात आले. नावात काहीतरी वेगळेपणा जाणवल्याने मी उत्सुकतेने ते मासिक न्याहाळले. विशेष म्हणजे त्याच्या मुखपृष्ठकथेने मी फारच भारावलो होतो. ‘देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज’ अशी ती मृखपृष्ठ कथा होती.
दरम्यान योगोयोग असा की ती मुखपृष्ठकथा माझे मार्गदर्शक आणि मित्र तसेच सोलापुरातील ‘दै. तरूण भारत’चे तत्कालीन उपसंपादक सिद्धाराम भै. पाटील यांची होती. त्यानंतर शिगेला पोहोचलेल्या उत्सुकतेने मी तो अकं वाचायला लागलो. त्यातील संपादकीय लेख आणि एकंदरीत असलेली अंकाची मांडणी पाहता संपादक घनश्याम पाटील म्हणजे कोणीतरी प्रचंड अनुभवी आणि वरिष्ठ संपादक असावेत, कारण एकंदरीतच त्यातील संपादकीय लेख हा अतिशय अनुभवी संपादकाने लिहिलेला असाच वाटत होता. विशेष म्हणजे त्यातील एक गोष्ट मला आजही लख्खपणे आठवते, ती म्हणजे अंकाच्या मासिकाची जी प्रेसलाईन दिली जाते ती साधारण, ‘अंकातील मजकुराशी संपादक सहमत असतीलत असे नाही’, अशी असते. मात्र ‘चपराक’च्या अंकातील वाक्य होते, ‘अंकातील मजकुराशी संपादक कदाचित सहमत असतीलही,’ असे होते आणि आहे. यातूनच संपादकांच्या आत्मविश्वासाची चुणूक जाणवते.
अर्थात हा झाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा मोठेपणा. मात्र त्यांच्या एकंदरीत कर्तृत्वाचा आढावा घेणेदेखील महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात संपादक होणे तसे सोपे झाले आहे. हातात मोबाईल आला अन् नेटपॅक मिळाला की झाला संपादक अशी एकंदरीत परिस्थिती आहे. कारण युट्यूब चॅनेलचा सुळसुळाट जणू देशभर पसरला आहे. कोणीही उठतो आणि युट्यूब चॅनेलचा संपादक म्हणून गावभर मिरवतो. अर्थात त्याचा चरितार्थ कसा चालतो हा भाग वेगळा. डीजिटल क्रांतीचे हे साईडइफेक्टच म्हणावे लागतील. पूर्वी साप्ताहिकाचाही असाच सुळसुळाट होता. असो.
मराठी पत्रकारितेत मागील दोन दशकात एकंदरीतच राज्यभर साखळी वृत्तपत्रामुळे जिल्हा दैनिकांची दाणादाण उडालेली पहायला मिळत आहे. जागतिकीकरणानंतर बर्यापैकी भांडवलदार वगळता मुद्रित माध्यमांकडे फारसे वळताना पहायला मिळत नाही. मात्र घनश्याम पाटील यांनी प्रचंड कष्ट, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपल्या मासिकाला जनमानसात रुजवले आहे. केवळ रुजवलेच असे नाही तर त्याला एक चळवळ बनवले आहे. आजच्या घडीला राज्यातील असा एकही जिल्हा किंवा तालुका नाही की, जिथे चपराक मासिकाचा वर्गणीदार नाही. एकीकडे अनेक भांडवली मासिके, साप्ताहिके मान टाकत असतानाच दुसरीकडे चपराक मासिक आणि साप्ताहिक मात्र जोमात खपतेय. केवळ खपण्यापर्यंतच हे मर्यादित राहत नाही तर वाचकांशी बांधिलकी जपत तब्बल 18 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या साहित्यशारदेच्या गळ्यातील ताईत बनून वाचकांची वैचारिक भूक भागवत आहे.
कोणत्याही मासिक किंवा प्रकाशनसंस्थेचे बलस्थान काय? असा प्रश्न जर राज्यातील प्रकाशकांना विचारला गेला तर अनेकजण सांगतील की, आमचे अमूक अमूक एवढ्या स्वेअर फुटाचे दालन आहे. अमूक अमूक राजकीय नेत्याचे, अभिनेत्याचे, उद्योजकाचे चरित्र आम्ही प्रकाशित केले आहे. मात्र यापैकी कोणीही प्रकाशक ठामपणे सांगणार नाही की, नवोदित लेखकाची कादंबरी, युवा कवीचा कवितासंग्रह आम्ही यशस्वीरित्या प्रकाशित केला आहे. त्याच्या चार-पाच आवृत्त्या आम्ही प्रकाशित केल्या आहेत! परंतु ‘चपराक’च्या संपादकांना विचाराल तर, त्यांनी ज्या लेखकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत त्यातील अनेकांची ती त्यांची पहिलीच पुस्तके असावीत. अर्थात नवोदित लेखकांची पुस्तके कोण वाचते हा जो हेतुपुरस्सर केलेला प्रकाशकीय कांगावा प्रकाशक घनश्याम पाटील यांनी ‘डंके की चोटपर’ खोडून काढला आहे. ते सहजच सांगतील की आमच्या या नवोदित लेखकाच्या पुस्तकाच्या चार आवृत्या झाल्या आहेत. त्यामुळे साहित्य क्षेत्रात त्यांनी घडविलेली ही एक साहित्यक्रांतीच म्हणावी लागेल.
वास्तविक पाहता, एखाद्या क्षेत्रात पदार्पण करून त्यांना शिंगावर घेणे ही तशी सोपी गोष्ट नसते. मात्र घनश्याम पाटील यांनी नियतकालिक आणि प्रकाशनक्षेत्रात पावला पावलावर चुकीच्या वृत्तीला शिंगावर घेतले आहे.
सुरवातीच्या काळात ‘चपराक’ हे काय नाव असते का? अशी अवहेलना करणारे लेखक आज चपराकने आमचे लेखन प्रकाशित करावे किंवा ग्रंथ प्रकाशित करावा यासाठी महिनो न् महिने उंबरठे झिजवताना निदर्शनास येतात. ही क्रांतीच नव्हे का?
2015 साली घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर प्रकाशक परिषदेने बहिष्कार टाकला होता कारण इतक्या दूरवर जाऊन ग्रंथविक्री करणे परवडणारे नाही, तसेच पंजाबी लोक मराठी पुस्तके खरेदी करणार नाहीत त्यामुळे आम्हाला तेथे स्टॉल लावणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यावेळी एक तरूण प्रकाशक उठतो आणि ठासून सांगतो की, आफ्रिकेच्या जंगलात जरी साहित्य संमेलन ठेवले तरी ‘चपराक प्रकाशन’ आपला ग्रंथविक्रीचा स्टॉल तेथे थाटेल. अर्थात हे सांगणारे घनश्याम पाटील हे एकमेव प्रकाशक होते. त्यामुळे मराठी वाचकांच्या जीवावर मोठी माया कमविणार्या प्रकाशकांना एका तरण्याबांड प्रकाशकाने दिलेली ही चपराकच म्हणावी लागेल.
जीवन जगताना माणसाकडे एकवेळ धनाचे दारिद्य्र असले तरी चालेल मात्र विचारांचे बिलकूल असता कामा नये, हे वाक्य घनश्याम पाटील कायमच सांगतात. त्यामुळे त्यांच्यातील विजूगिषीवृत्तीचे दर्शन घडते. या माणसाने आयुष्यात काही करता आले नाही म्हणून किंवा बापजाद्याची खूप संपत्ती आहे म्हणून या पत्रकारिता आणि प्रकाशनक्षेत्रात पाऊल टाकले नाही तर आधी विचार जन्म घेतात मग कृती या स्वामी विवेकानंदांच्या विचारावर अढळ विश्वास ठेवून या क्षेत्रातील अपप्रवृत्तींना चपराक देण्यासाठी आणि मराठवाड्याची साहित्याशी असलेली बांधिलकी जपण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केला आहे.
साहित्य वर्तुळात घनश्याम पाटील यांनी अनेक नवनवे प्रयोग केले आहेत. नाविन्याची कास धरून संस्कृती आणि आधुनिकतेची सांगड घालण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत असतात. ते कधीच रिकामे नसतात मात्र एखाद्या कामासाठी ते कायम उपलब्ध असतात. अर्थात साहित्यविषयक गोष्टींसाठी.
मासिकाची पेरणी त्यांनी ज्या पद्धतीने केली आहे ती वाखाणण्याजोगीच आहे. जर प्रकाशनविश्व अथवा नियतकालिकाविषयी कोणाला पी.एच.डी करायची असेल तर घनश्याम पाटील आणि ‘चपराक’ या दोन नावांशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. चपराक मासिकाने राज्यातील सर्वच नियतकालिकांचे विक्रम केव्हाच मोडीत काढले आहेत. अर्थात ते साहित्यिक दर्जा असो वा खपाच्याबाबतीत असो. त्यांचा हात आजच्या घडीला कोणीही धरू शकणार नाही.
मासिकासाठी त्यांनी दिवसरात्र एक केल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. अगदी एका रोपट्याप्रमाणे मासिकाची झालेली सुरूवात आता वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. दिवाळी अंकाचा विक्रम त्यांनी केव्हाच प्रस्थापित केला आहे. दिवाळी अंकाच्या गुणात्मक दर्जाबाबत त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. एकीकडे लॉकडाऊनमुळे अनेक संपादकांनी आपले अंक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच वाचकांशी बांधिलकी असणार्या चपराक मासिकाने मात्र थाटात त्याची तयारी केली आहे. जाहिराती मिळो अथवा न मिळो, वाचकांची बांधिलकी जपलीच पाहिजे, हे घनश्याम पाटील यांचे वाक्य कायमच प्रेरणा देऊन जाते.
अनेक राजकीय प्रलोभणे झुगारून त्यांनी पत्रकारितेशी इमान राखल्याची शेकडो उदाहरणे माझ्याकडे आहेत. मात्र इथे त्याची चर्चा करणे क्रमप्राप्त ठरणार नाही. एकंदरीतच घनश्याम पाटील यांच्या संपर्कात येणारी व्यक्ती कितीही नकारात्मक असो, त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर ती आपसूकच सकारात्मक होऊन जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील तो एक अद्वितीय असा पैलू आहे. व्यक्तिगत प्रलोभणे तर सोडा, त्यांना किंवा संस्थेला उद्ध्वस्त करणार्या अनेक घटना त्यांच्या आणि ‘चपराक’च्या आयुष्यात आल्या आहेत. मात्र त्या संगळ्यांना ते पुरून उरले आहेत. त्यामुळे आगामी शेकडो वर्षे मराठी साहित्य आणि पत्रकारितेत घनश्याम पाटील आणि ‘चपराक प्रकाशन’ची वैचारिक पाटीलकी नेत्रदीपक अशीच असेल यात तीळमात्र शंका नाही.
घनश्याम पाटील यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे अनेक नवख्या लेखकांना संधी उपलब्ध करून दिल्या तसेच अनेक पत्रकारही तयार केले. आज प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात त्यांनी तयार केलेले अनेक पत्रकार महत्त्वाच्या हुद्यावर आहेत आणि याची त्या सर्वांना जाणीवही आहे. कोणत्याही अडचणीच्या काळात घनश्यामदादा हा पर्याय त्यांच्यासाठी कायम उपलब्ध असतो. नुकतीच त्यांची अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेच्या उपाध्यक्षपदीही निवड झाली असून या माध्यमातून सर्वांचे संघटन करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
लिहित्या हातांना बळ देतानाच ते स्वतःही अनेकानेक विषयांवर सातत्याने लिहित असतात. त्यांची दखलपात्र आणि झुळूक आणि झळा ही दोन अग्रलेखांची पुस्तके वाचकप्रिय ठरली. इतक्या कमी वयात अग्रलेखांची पुस्तके येणे आणि त्यांना वाचकांची पसंती मिळणे हे उदाहरण आदर्शवत आहे. शिवाय त्यांचे अक्षर ऐवज हे समीक्षा लेखांचे पुस्तकही गाजले असून नुकतेच घरकोंडीच्या काळात प्रकाशित झालेले दरवळ हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील परखड आणि तडाखेबंद लेखन करण्याबरोबरच व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी जे वादळ निर्माण केले आहे त्याची सरकारलाही दखल घ्यावी लागली. त्यातूनच ‘ठाकरे सरकार उलथवून लावायचा प्रयत्न’ असे आरोप ठेवून त्यांच्याविरूद्ध पोलिसांकडे तक्रारीही देण्यात आल्या. लेखनावरून आणि बोलण्यावरून त्यांना अशी प्रेमपत्रे नेहमीच येत असतात आणि त्या सर्वांना ते पुरून उरतात याचा मी साक्षिदार आहे. सध्याच्या मराठी प्रकाशनविश्वात सातत्याने परखड बोलणारा आणि वस्तुनिष्ठ लेखन करणारा अपवादात्मक प्रकाशक म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल, प्रकाशक परिषदेचे साहित्य संमेलन असेल किंवा अनेक विभागीय साहित्य संमेलने असतील, प्रत्येक ठिकाणची त्यांची भाषणे म्हणजे मराठी साहित्याचा दस्ताऐवजच आहे. ज्या विषयावर कुणी कुजबूज करायलाही घाबरते ते विषय स्पष्ट शब्दात मांडण्याची त्यांची हातोटी लुभावणारी आहे.
चपराकचे कार्यालय हे सुद्धा महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र झाले असून अनेक लेखक, कलावंत, पत्रकार यांचे ते हक्काचे ठिकाण आहे. घनश्यामदादा आणि चपराक या दोन्ही ब्रँडनी जो दबदबा निर्माण केलाय तो या सर्वांसाठी संजीवक ठरेल हे मात्र नक्की.
– सागर सुरवसे
जिल्हा प्रतिनिधी, न्यूज 18 लोकमत, सोलापूर
9769179823
सुंदर लेख…आवडला!
खूप सुंदर लेख
खूप छान लेख लिहिला आहे.
घनशामदादा अगदीअसेच आहेत
खूप सुंदर लेख