दिवाळी साजरी करायची पण…!

दिवाळी साजरी करायची पण...!

भारतभूमीत प्रत्येक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. दिवाळी ही कशी साजरी करावी ह्या बद्दल मतभिन्नता आहे. प्रत्येकाच्या बालपणी दिवाळी साजरी करण्याचा एक वेगळाच आनंद होता. दिवाळी भिन्न प्रकारे साजरी केली जायची हे सांगावे लागण्याची गरज नाही. काळ बदला की सगळं बदलत जाते. प्रत्येक दिवस एक सारखा नसतो.

कोविड १९ मुळे निसर्ग व पर्यावरणाबाबत सामान्य नागरिकांना थोडे तरी भान आले असावे. जसा काळ बदलला तशा पद्धतीने प्रथा आणि चालीरीती बदलल्या पाहिजे असे वाटते. अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणा-याचा संदेश देणा-या या सणाच्या नावातच प्रसन्नता आहे. पूर्वी विकासाच्या पल्ल्याड दडलेल्या भारतात जेव्हा वीज ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती, तेव्हापासून सर्वत्र प्रकाश यावा या हेतूखातर सर्वत्र दिवे, आकाशकंदील लावले जात. दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा सण, पणत्या, आकाशदिवे, रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मिठाई आणि फराळाची देवाण-घेवाण, आनंदाचे उधाण, जुने मतभेद हेवेदावे विसरून एकमेकांना आनंदाने भेटण्याचे दिवस, नातेवाईक, भाऊ-बहीण यांच्या भेटीचा सण आणि त्याचबरोबर मुलांचा उत्साह, आनंद म्हणजे फटाके! फटाक्यांची आतषबाजी, धूमधडाका.

रात्र झाली की हवेत उडणा-या रंगीबेरंगी फटाक्यांनी आसमंत उजळून निघतो. फटाक्यांच्या धूमधडाक्याने परिसर व्यापून जातो. मुलांच्या उत्साहाला आणि मोठय़ांच्या अतिउत्साहाला उधाण येते. लहानथोर सगळ्यांनाच दिवाळीचे सगळ्यात मोठ्ठे आकर्षण असते सुट्टीचे! फराळ, फटाके, नवीन कपडे, फिरायला जाणे या सगळ्या ‘मज्जा’ त्यानंतर येतात परंतु समाजात असे अनेक अभागी असतात ज्यांना दिवाळीची सुट्टी मिळत नाही. तुमच्या-आमच्या आनंदासाठी त्यांना स्वत:च्या आनंदावर पाणी सोडावे लागते. सीमेवर दक्ष असलेल्या जवानांची आठवण आपण ठेवतो परंतु आपल्या शहरातही समाजाच्या आनंदासाठी कर्तव्यदक्ष राहणारी अनेक मंडळी असतात. सध्या देशात आणि राज्यात जे कोविड १९ चे संकट होते ते हळू हळू कमी होऊ लागले आहे तरी स्वताची काळजी म्हणून आपण आपल्या उत्साहामध्ये बदल केले पाहिजे.

मानव हा पंचमहाभुताने बनलेला आहे. त्यामुळे त्यातील एक जरी घटक कमी कमी होऊ लागला की सगळ चक्र बदलत जाते. त्यामुळे व्यक्ती हा हुशार प्राणी आहे असे म्हणतात त्याला ज्ञान प्राप्त करण्याची कला आहे. त्यामुळे आपल्या आजू बाजूला होत असलेल्या निसर्गाचा ऱ्हास त्याला दिसत असेल त्यामुळे बदल करावा की नाही हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. सण हे साजरे उत्साहात झाले पाहिजे परंतु त्यामुळे कोणाच्या जीवाची हानी होत असेल तर ते काय उपयोगाचे आहे. आज दिवाळी सण म्हणजे फटाके फोडणे परंतु त्यामुळे आज काय परिणाम होतात हे समजून घेणे गरजेचे आहे. फटाके ध्वनी आणि वायुपदूषणाला कारणीभूत ठरत असतात याकडे मात्र आपले लक्ष नसते किंवा असून सुद्धा त्याकडे कानाडोळा केला जातो. फटाक्यांच्या आवाजाने ध्वनिपदूषण तर होतेच परंतु फटाक्यांच्या धुरामुळे हवेच्या पदूषणाचा स्तरही वाढतच जातो. यामुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार वाढतात, वृद्धांना ध्वनी आणि वायुपदूषणाचा भयंकर त्रास होतो, लहान मुले, नवजात अर्भके, गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वृद्ध व आजारी रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत असून विषारी धुरामुळे मोकळा श्वास घेणे मुश्कील होत आहे. पक्षी आवाजाने घरटयातून उडून जात असतात. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाने फटाके विकण्यास बंदी केली आहे. प्रचंड वायुप्रदूषणामुळे मुंबईव पुणे शहराचा श्वास आधीच गुदमरत असताना फटाक्यांची आतषबाजी केली तर काय होईल यांची कल्पना करा!

फटाक्यातून निघालेल्या धुरात प्रचंड प्रमाणात विषारी वायू हवेत मिसळत असतो. मोठय़ा फटाक्यातून कार्बन मोनोक्साईड हा वायूसुद्धा बाहेर पडत असतो. यामुळे श्वसनाचे विकार, सर्दी, खोकला, डोळे झोंबणे असे विकार होत असतात. आज प्रत्येकाच्या विचारात बदल करण्याची गरज आहे. घरातील लहान मुलांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आणि जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याची संकल्पना रुजवायला हवी. लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्यास एक दिवस खरोखरच फटाकेमुक्त दिवाळी साजरी होईल! दरवर्षी दिवाळी मध्ये मिठाई आणि फराळाची देवाण-घेवाण, असते तसेच दिवाळी अंकाची देवाण – घेवाण करता येऊ शकते. एकमेकांना भेट वस्तू देतांना पुस्तक भेट देऊन प्रत्येकाच्या घरात ज्ञानाच दिप लावू शकतो. काळ बदला तसेच व्यक्तीने बदलले पाहिजे. पुस्तक हे व्यक्तीला घडवत असतात, पुस्तकातून अनुभव व प्रसंग कळत असतो. विचारांची प्रगल्भता वाढत असते. घरातील मुलांच्या हातात बाल वयात अर्थात शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना काय दिले पाहिजे हे जर कळायला लागले तर भारताचे भविष्य बदलण्यास वेळ लागणार नाही.

मागील महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिवाळी सणाच्या दिवसात घरात दुखाचे सावट अशी परिस्थिती आहे. आपल्या घरात सुखाचे वातावरण असल्याने आनंद असतो तसा आंनद इतरांच्या घरात निर्माण करण्यासाठी व्यक्ती म्हणून आपण प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. काळानुरूप उत्सवांमध्ये खूप आमूलाग्र बदल होतायंत. आपल्या सणांना आधुनिकतेची जोड मिळतेय खरी पण ती किती योग्य आणि आपल्या भविष्यासाठी उत्तम आहे यात शंकाच आहे. सांस्कृतिक परंपरेला आज आधुनिक टच मिळाला असला तरी जुनं ते सोनं. बदल जरी घडत असले तरी ते कायम स्वरूपी नसतात. दिवाळीच्या मंगल प्रसंगी गरीब, गरजू लोकांची दिवाळी आनंददायी कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.राज्यासह देशभरात उत्साहात साजरी केली जाणारी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. गेल्या आठ महिन्यात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मधून जनजीवन सावरत असतानाच आर्थिक घडी मात्र पूर्णपणे विस्कटली आहे.अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले असून अनेकांना रोजगाराला मुकावं लागलं आहे. अशातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान केलं.

बोगस बियाणं, खतांचा तुटवडा, लॉकडाऊनमुळे कोसळलेले भाव, अतिवृष्टी यासारख्या संकटाचा सामना करत कसबस हाताशी येणाऱ्या पिकाची आशा उराशी बाळगून दिवस ढकलणाऱ्या शेतकऱ्याचं पीक देखील वाहून गेल्याने दिवाळी साजरी तरी कशी करायची असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तर, दिवाळीत होणाऱ्या कोट्यवधींच्या उलाढालीवर देखील अनेकांची उपजीविका अवलंबून आहे. किमान घरात गोडधोड तरी कसं करणार असा सवाल गृहिणींना भेडसावत आहे. अश्यावेळी व्यक्ती म्हणून आपणच सोबत उभे राहून प्रत्येकाला सहकार्य केले पाहिजे. सरकार देईल या आशेवर कधी जगायचे नाही. सरकार कल्याणकारी कधी नसते ते जर तसे असते तर भ्रष्टाचार करून देखील लोकप्रतिनिधी निवडून येतात. योजना राबवून घोटाळे होतात. त्यामुळे लोक कल्याणच्या नावा खाली स्व–कल्याण करणारे सरकार असते. त्यामुळे लोक कल्याण करण्याचे काम हे जनतेने स्वताहून केले पाहिजे. जिथे गरज तिथे नेहमीच संवेदनशील नागरिक संकटात सोबत मिळून काम केले आहे.

भारतीय सण म्हणजे निसर्गाची पूजा असते, असा गौरव होत असतानाच, अलीकडच्या काळात या भारतीय सणांनी प्रदूषण वाढवण्यात मोठा हातभार लावला, हे कटू सत्य आहे. पर्यावरणाची काळजी फक्त दुस-याने घ्यावी, सल्ला फक्त दुस-याला द्यावा आणि दुस-यानेच मानावा, हा प्रकार चालू राहिला तर आज तोंडाला मास्क लावून दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. भविष्यात घरातच दिवाळी साजरी करण्याची वेळ येईल. त्यामुळे यंदाची दिवाळी कोणी कशी साजरी करावी हे मी सांगणार नाही कारण आपण सगळे शिक्षण घेऊन प्रगत झालो आहोत. त्यामुळे आपल्यातील सदसद्विवेकबुद्धी शाबूत असेल. आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीचे आकलन असले तर दिवाळी सण उत्साहात साजरा झाला पाहिजे पण पर्यावरणाचे भान राखून साजरा केला तर भविष्यातील संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
ई – मेल –bagul.mayur@gmail.com

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “दिवाळी साजरी करायची पण…!”

  1. Kishor kokje

    I am Crazy for reading. I reads all kinds of literature. I am also interested to reads the articles which published in your publication Many Thanks for Informative articles.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा