प्रतिमा पूजन झाले. सगळे आपापल्या जागेवर बसले. सूत्रसंचालकाने भाषण करण्यासाठी माझे नाव पुकारले. मी प्रतिमेला नमस्कार केला आणि भाषण करण्यासाठी डायसकडे गेलो. सभोवार दृष्टी फिरवली. आता भाषणाला सुरूवात करणार इतक्यात हर्षदा उभी राहिली.
“सर, काहीतरी वेगळं सांगा. गांधीजींचा जन्म, शिक्षण, आंदोलने, शिक्षा, मृत्यू. सगळं दरवर्षी ऐकून पाठ आहे आम्हाला.”
तिचा नूर पाहून आश्चर्य वगैरे बिलकुल वाटलं नाही, कारण तिचं म्हणणं शतश: खरं होतं. तरीही सातवीच्या मुलीने निडरपणे अशी मागणी करणं सुखावणारं होतं. मी सभोवार नजर फिरवली आणि बोलायला सुरूवात केली.
“आज मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे एका वेगळ्याच विषयावर गप्पा मारणार आहे.” सगळी लेकरं सावरून बसली. मलाही हुरूप आला. माझी भाषण समाधी लागली.
“गांधीजी विलायतेला शिकायला गेले होते. त्यांच्यासोबत तिथे शिकणारे गांधींचे थिओसॉफिस्ट मित्र ऑलकॉट बंधू एडविन अर्नॉर्ल्डच्या गीतेचा इंग्रजी अनुवाद सॉन्ग सेलेस्टियलच्या साह्याने गीतेच्या मूळ संस्कृत मजकुराचा अभ्यास करत होते. गांधी हे भारतीय आहेत, ते संस्कृत अधिक चांगल्याप्रकारे जाणत असतील असा विचार करून त्यांनी विशिष्ट संस्कृत शब्दाच्या अर्थाबद्दल त्यांचा सल्ला घेतला परंतु गांधीजी त्यांना मदत करू शकले नाहीत. माझे सत्याचे प्रयोग या त्यांच्या आत्मचरित्रात गांधीजींनी लिहीलंय, “संस्कृत किंवा गुजराती भाषेत मी गीता वाचलेली नसल्यामुळे मला माझीच लाज वाटली.” अर्थात गांधीजी मात्र त्यांचे अज्ञान सहज घेणारे नव्हते. आपण एखादी गोष्ट सहजपणे माहीत नाही किंवा येत नाही म्हणून सोडून देतो. गांधीजींनी त्यानंतर मूळ संस्कृतमधील गीताच नव्हे तर जगातील इतर धर्मांच्या धर्मग्रंथांचेही वाचन व अभ्यास केला.
सर्व ग्रंथाच्या अभ्यासाअंती गीता हे पवित्र पुस्तक गांधींचे सर्वात विश्वासार्ह आध्यात्मिक मार्गदर्शक बनले. त्यांच्या जीवनातील सर्व परीक्षांतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी स्थिर साथीदार बनले. भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे मुख्य पुढारी म्हणून सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध लढा देताना गांधींना अनेक काळ्या क्षणांचा, संकटाचा सामना करावा लागला. अशा कसोटीच्या क्षणांमध्ये, शक्ती, सांत्वन आणि नैतिक-आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांनी गीतेचा आसरा घेतला. गांधीजी स्वत:म्हणतात, “गीता आध्यात्मासाठी अतुलनीय आहे… गीतेने ७०० श्लोकांत सर्व शास्त्रे आणि उपनिषदांचे सार दिलेले आहे”
गांधीजींनी खूप पुस्तके वाचली पण गीता आणि तुलशीरामायण या दोन पुस्तकांचा त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव होता. गांधींजीनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की “गीता फक्त माझे बायबल किंवा कुराण नाही तर ती माझी आई आहे… माझी शाश्वत माता. मी माझ्या जन्मदात्या आईला लवकर गमावले परंतु या अनंतकाळच्या आईने तिची जागा घेतली. ती कधीही बदलली नाही.” विनोबादेखील म्हणायचे, “आईच्या दुधापेक्षाही जास्त माझे गीतेच्या दुधावर पोषण झालेले आहे.”
गांधीजी म्हणायचे गीता ही कामधेनूसारखी आहे. ज्याला जे हवंय ते देण्याचं सामर्थ्य गीतेत आहे. ज्ञानी, भक्त, कर्मयोगी, संन्यासी कोणालाही गीता निराश करत नाही. जो जे वांछील ते देण्याची ताकद फक्त गीतेत आहे. गीता ही जितकी पंडितांसाठीआहे, त्यापेक्षाही जास्त ती सामान्य माणसासाठी आहे. ती फक्त पारायण करण्यासाठी नाही, जीवनात उतवण्यासाठी आहे. एक तरी ओवी अनुभववावी हे वचन गांधीजी जगले. त्यांनी गीतेचे व्यवहारात प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याच्या आश्रम-रहिवाशांनी पाळलेली अकरा व्रते हे त्यांनी घडवलेलं गीतेचं प्रात्यक्षिकच आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अस्वाद, परिश्रम, स्वदेशी, अस्पृश्यतानिवारण, अभय आणि सर्व धर्म-समानता या सर्व तत्वांचे मूळ गीतेतच आहे.
कितीही वाईट प्रसंग घडला तरी गांधीजींची मन:शांती कधीही ढळत नसे. या गोष्टीचे श्रेय ते गीतेला देत. गीता ही सर्व शास्त्रांचे सार आहे आणि त्या गीतेचं सार हे गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या उत्तरार्धात आहे असं ते मानीत. दुसऱ्या अध्यायाच्या उत्तरार्धात अर्जुन भगवंताला स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारतो आणि भगवंत त्याला स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे ते समजावतात.’दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनीरुच्यते ॥’ हेच सोप्या भाषेत माऊलीही समजावतात, ‘नाना दुःखी प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना’. ज्याला सुखाची अपेक्षा नाही आणि जो दु:खाची उपेक्षा करीत नाही तो स्थितप्रज्ञ. ज्याची भीती आणि क्रोध नाहीसा झालेला आहे तो स्थितप्रज्ञ. ‘अर्जुना तयाचां ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ॥’ हे तत्वज्ञान फक्त घोकंपट्टीपुरतं मर्यादित न ठेवता गांधीजींनी ते जीवनात प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर उतरवलं.
निर्भयता हीच गीतेची खरी फलश्रृती आहे असं गांधीजी म्हणत. मी गीतेचा अभ्यासकही आहे आणि भेकडही आहे हे होऊच शकत नाही. गांधी निशस्त्र होते तरीही निर्भय! कधीही कोणासमोर झुकले नाहीत. अन्यायी इंग्रज सरकारला त्यांच्यासमोर झुकावे लागले. याला कारण गांधीजींची निर्भयता. त्या निर्भयतेचा स्त्रोत होता गीता!
श्रीकृष्णाचा उपासक आहे आणि अज्ञानी आहे हेही होऊ शकत नाही. भावार्थदिपिकेत माउली म्हणतात, कीं अविद्यातिमिररोंखें । श्लोक सूर्यातें पैजा जिंकें । अविद्येचा अंधार घालवायचा असेल तर गीताज्ञानाचा दीपकच हवा, तिथे सूर्याचा उपयोग नाही. जो गीतेचा उपासक आहे तो फुसका असता कामा नये. तो ज्ञानोपासक, तेजपूजक, सत्वशील, धैर्यशील, त्यागी, बुद्धिमान, संशयरहीत असलाच पाहिजे. हे गुण जीवनात उतरवणे म्हणजेच प्रत्यक्ष गीता जगणे असे गांधीजी मानीत. आपल्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या गीतेवरील चिंतनाचे फळ म्हणून त्यांनी गुजराती भाषेत गीतेवर ‘अनासक्तीयोग’ नावाचा ग्रंथ लिहीला. त्यामध्ये आपल्या जीवनाच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या जडणघजणीचे श्रेय गांधीजी गीतेला देतात.
तत्त्वज्ञान रूक्ष असतं असा सामान्य लोकाचा समज असतो पण ते जीवनात उतरलं तर अवघं जीवनच महाकाव्य बनतं, हे गांधीजींनी जगून दाखवलं. गीतेच्या याच गुणाचं वर्णन करताना माउली म्हणतात ‘एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले । आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ|’ तत्त्वज्ञानाला रूचकर बनवण्याचं सामर्थ्य गीतेत आहे असे गांधीजी म्हणत. गांधीजींना प्रचंड आवडणार्या ‘वैष्णव जण तो तेणे कहियो|’ या नरसी मेहताच्या भजनाचा उगमस्त्रोतही गीताच आहे. त्याचीच मराठी आवृत्ती म्हणजे तुकोबांचे, ‘जे का रंजले गांजले|’
संकटाच्या छाताडावर लाथ मारण्याचं सामर्थ्य गीतेनं गांधीजींना दिलं. सर्व काही हरूनही मनानं अजिंक्य राहण्याचं बाळकडू गीतेने त्यांना पाजलं. गांधीजींच अफाट कर्तृत्व जगाला माहीत आहे पण त्यांच्या त्या कर्तृत्वामागील उर्जास्त्रोत नेमका दुर्लक्षित आहे. त्यांच्या या सामर्थ्यस्त्रोताच्या मदतीने या महात्म्याच्या स्वप्नातील भारत उभा करणे हीच गांधीजींना खरीश्रध्दांजली ठरेल. ज्या गीतामृतावर टिळक, गांधी, विवेकानंद, भगतसिंग, विनोबा आदींचा पिंड पोसला ते आजही आपणा सर्वांसाठी उपलब्ध आहे; पण गायीच्या आचळाला तोंड लावल्याशिवाय वासराला दूध कसे मिळेल?”
मी भाषण संपवलं. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मला वाटलं मुलांच्या डोक्यावरून गेलं असेल!(तुमच्यासारखंच!) तितक्यात अमृत उठला, म्हणाला, “सर, आम्हाला ही गीता कुठे मिळेल?”
मी उपस्थित सर्व पालकांच्या स्मार्टफोनमध्ये गीतेचे अँप डाऊनलोड करून दिलं. लेकरं गांधीजींचा विचार वारसा घेऊन घराकडे गेली. त्यांच्या उत्साहाने उसळणार्या पाठमोर्या आकृती पाहताना वाटलं, ” गांधीजींच्या स्वप्नातील भारत एक दिवस नक्की आकाराला येईल!”
रमेश वाघ, नाशिक ९९२१८१६१८३
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
खूप छान लेख आहे.
अप्रतिम लेख सरजी!
आजकाल गांधीजींबद्दल काहीही न वाचलेले सुध्दा मोठमोठ्याने त्यांच्या विरोधात बोलताना दिसतात. तेव्हा त्यांची किव येते!