तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी

तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी

Share this post on:

लगबगीने मॅडम वर्गात आल्या. पर्स टेबलवर ठेवली. स्कार्फने घाम पुसला. पर्समधला फोन काढून टेबलवर ठेवला. तेवढ्यात व्हाट्सअपची नोटिफिकेशन बेल वाजली. कोणाचा मेसेज असावा म्हणून त्यांनी व्हाट्सअप ओपन केलं तर व्हाट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून काही फोटो पाठवलेले होते. त्यांनी फोटोमध्ये बघितलं तर त्यांचाच फोटो होता. कालचा. गांधी जयंती साजरी करतानाचा. नंबर ओळखीचा नाही म्हणून मॅडमांनी त्या नंबरवर फोन लावला. विचारलं, “कोण तुम्ही?’

तिकडून आवाज आला,”मी अमुक-तमुक वर्तमानपत्रातला पत्रकार आहे. काल गांधी जयंतीची सुट्टी होती. गांधी जयंती तुम्ही काल साजरी करणं अपेक्षित होतं. तुम्ही परवाच संध्याकाळी शाळा सुटताना फोटोला हार घालून पूजा केलीत. हे चुकीचं आहे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.”

मॅडम म्हणाल्या, “एक काम करा, तुम्ही शाळेत या. आपण भेटून बोलू.”

पत्रकार महोदय शाळेत आले.

मॅडम म्हणाल्या, “हे बघा, परवा फोटोला हार घातला काय आणि काल फोटोला हार घातला काय, काय फरक पडतो? हार घालून नाही तरी सुट्टीच घेणार होतो ना! त्यामुळे आम्ही परवा हार घातला. त्याचा काय एवढा इश्शू करताय?”

“व्यावहारिकदृष्ट्या तुमचं बरोबर असलं तरी तांत्रिकदृष्ट्या मात्र तुम्ही चूक आहात.” पत्रकार बोलत होते. शेवटी ते म्हणाले, “मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला रोज अप-डाऊन करायला किती रुपये लागतात?”

मॅडम म्हणाल्या, “शंभर रुपये!”

पत्रकार म्हणाला, “मग सर्व स्टाफचे मिळून किती रुपये झाले?”

मॅडम म्हणाल्या, “आठशे.”

“एक काम करा, पाचशे रुपये द्या. मला बातमी छापायचा त्रास नाही. तुम्हाला पुढचे सायास नाहीत. मी समजेन काल तुम्ही येवून गेलात. वरून तुमच्या शाळेत उत्तम कार्यक्रम झाल्याची बातमी लावतो.” पत्रकाराने प्रस्ताव मांडला.

मॅडमांनी पर्समध्ये हात घातला. पाचशेची नोट पत्रकाराच्या हातात कोंबली. पत्रकार गायब झाला.

मॅडम वर्गात गेल्या. त्यांनी शिकवायला सुरूवात केली. फळ्यावर धड्याचं नाव लिहीलं ‘गांधीजींचे समयपालन.’

हे चित्र सार्वत्रिक नसलं तरी असे प्रसंग वारंवार आणि अपवाद न म्हणावेत इतक्या मोठ्या प्रमाणावर घडत असतात. घडतात. मॅडम बोलल्या त्यात व्यावहारीकदृष्ट्या काहीच चूक नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन असेही हार घालूनच जाणार होत्या त्या. दुसरं कुठलंही काम त्यांना त्या दिवशी करायचं नव्हतं. म्हणून त्यांनी आदल्या दिवशी हार घातला आणि दिवस साजरा केला. मुलांना माहिती सांगितली. तांत्रिकदृष्ट्या वेळ वगळता काहीच चूक नव्हतं पण मुळात या दिवशी सुट्टी देण्याची काही गरज आहे का? वास्तविक त्या दिवशी फार तर दप्तरमुक्त शाळा भरवावी. ज्या महापुरुषाच्या आठवणीसाठी आपण हा दिवस साजरा करतोय त्याच्या जीवनावर आधारित वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील, कार्यक्रम असतील हे घ्यावेत. अर्थात अशा प्रकारचे कार्यक्रम घेणार्या संस्था आहेतही; पण अधिकृतपणे या प्रकारचं शासकीय स्तरावरून कुठलंही नियोजन होत नाही. आपल्याकडे ‘वरून’ नियोजन आल्याशिवाय स्वतःहून पुढाकार घेणारे नसल्यातच जमा आहेत.

जर त्या दिवशी सुट्टी न देता तो दिवस त्या चरित्राचा अभ्यास करण्यासाठी समर्पित केला तर जास्त चांगलं नाही का होणार? गांधी जयंती असेल, टिळक पुण्यतिथी असेल, अजून कुठल्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्याच्या दिवशी आपण सुट्ट्या घोषित करतो परंतु त्यांच्या जीवनाविषयी काहीही ज्ञान आपल्या शिक्षकांना नसतं. आपल्या विद्यार्थ्यांना नसतं. यासाठीच त्या दिवशी फक्त त्या व्यक्तीच्या जीवनाविषयीचे सिनेमा, माहितीपट, जीवनाविषयीची पुस्तकं, लेख वाचावेत. चर्चा करावी. चिंतन करावे. अशा प्रकारच्या योजना असतील तर मला वाटतं खऱ्याअर्थाने महापुरुषांचं स्मरण केल्यासारखं होईल.

मला आठवते आमच्या लहानपणी एक शिक्षक होते. दरवर्षी गांधी जयंतीला भाषण करायचे. त्या भाषणांमध्ये ते वारंवार एकच दाखला द्यायचे. ते म्हणजे गांधीजी लहानपणी त्यांच्या मित्रासोबत विड्यांचे पडलेले थोटके जमा करायचे. ते थोटके पेटवून विड्यांसारखे ओढायचे. तरीही गांधीजी महान बनले. दरवर्षीचं त्यांचं हे भाषण ठरलेलंच होतं. ते असं भाषण का करायचे याचं कारण नंतर कळलं. ते स्वतः विड्या प्यायचे!

स्वातंत्र्यदिनाला सुद्धा तेच भाषण वर्षानुवर्षे करणारे शिक्षक बर्याच जणांनी अनुभवले असतील. आज समजा कुठल्याही महापुरुषांची जयंती पुण्यतिथी असेल, त्या दिवशी अधिकृत सुट्टी जरी असली, तरी एक तासाचा कार्यक्रम घेऊन सुट्टी देण्यात यावी अशा प्रकारचे परिपत्रक काढले जाते. त्या एक तासानंतर सुट्टी घेण्यापेक्षा दिवसभर शाळा भरवली आणि दिवसभर त्या सत्पुरुषाच्या विचारांच्या सानिध्यात संपूर्ण शाळेचा स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी राहिलं तर जास्त बरं नाही का होणार? मला वाटतं यावर सर्व सुज्ञ माणसांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आम्ही जे करतोय ते एक प्रकारचं कर्मकांडच नाही का?

कर्मकांड म्हणजे काहीतरी जुन्या काळातला व प्रतिगामी वगैरे शब्द आहे असे मानायचे काहीच कारण नाही. अशी खूप सगळी कर्मकांडं आहेत की जी आपण निर्वेधपणे करत आहोत. त्या कर्मकांडांचा तोटा मात्र आपल्या देशाला भविष्यात नक्की भोगावा लागेल. ज्यांच्या खांद्यावर उद्या आपल्या देशाचं भवितव्य जाणार आहे त्यांना मात्र या देशाची संस्कृती, या देशाचा इतिहास, या देशातले महापुरुष, त्यांचा त्याग, त्यांचे जीवन या विषयी अत्यंत त्रोटक माहिती आहे.

त्या संबंधित माहितीचे स्रोत सुद्धा तितक्या सहजपणे समोर दिसत नाहीत. जितक्या सहजपणे व्हाट्सअप, यूट्यूब, फेसबुकला उथळ व्हिडिओज आणि माहितीचा मारा होतो, तितक्यासहजपणे,तितक्या वारंवार सावरकर, टिळक, विवेकानंद, महात्मा गांधी, भगतसिंग, उमाजी नाईक, लहुजी वस्ताद, महात्मा फुले, बिरसा मुंडा आदींनी आपल्या देशाच्या भूगोलाला आणि इतिहासाला कसा आकार दिला या विषयीची माहिती मुलांच्या हाताशी येतेच असं नाही. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ना की, तण हे आपोआप वाढतं पण पिक मात्र जाणीवपूर्वक जोपासावं लागतं. तसंच काहीसं वाईट वागणुकीचं होतं. तण हे वाढणारच आहे. ते दूर करून त्या ठिकाणी सुविचाराची पेरणी करायची असेल, तर ह्या गोष्टीचा सर्व समाज धुरिणांनी, निर्णय निर्धारित करणाऱ्या लोकांनी विचार करावा एवढीच अपेक्षा.

जर आपण समजून घेऊन या गोष्टी करणार नसू तर त्या करणंसुद्धा निरर्थक आहे.
म्हणूनच आमचे तुकाराम महाराज म्हणतात, “तुका म्हणे झाला अर्थ आहे भेटी | नाही तरी गोष्टी बोलू नका||”

-रमेश वाघ, नाशिक 
9921816183

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

16 Comments

  1. खूपच छान समाज प्रबोधन करणारा लेख रमेशसर

  2. वाघसर विचार मनापासून आवडला. मोठया व्यक्तींच्या आठवणी जाग्या कराव्या किंवा त्यांचं चरित्र मुलांना सांगावं ज्यामुळे या देशासाठी , देशाच्या स्वातंत्र्यासाठी या महान व्यक्तींनी सोसलेल्या हाल अपेष्टा केलेला त्याग मुलांना माहीत होईल. त्यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त शाळेला सुटी देण्यापेक्षा दप्तर न आणता मुलांनी या महान व्यक्तींना समजून घ्यावं. हे स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही हे त्या मुलांना काळायलाच हवं!

  3. विचार प्रवर्तक आणि सद्यस्थितीत दोन्ही बाजूंनी डोळ्यात अंजन घालणारा असा लेख आहे. अभिनंदन!

  4. वाघ सर अतिशय सुंदर लेख
    कल्पना छान आहे नक्की अमलात आणण्याचा प्रयत्न करू

  5. वास्तविक सत्याची जाणीव करून देणारा लेख…… महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी निमित्त शासकीय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या सुट्टी (कामबंद) अना दुःखदायक ,खेददायक व अनाकलनीय आहेत….. ….

    1. छान लेख आहे,त्यात वास्तववादी चित्रण केले आहे.

  6. मनापासून प्रांजळ प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार

  7. आजच्या वास्तव परिस्थितीवर अचूक बोट ठेवले आहे . आता महापुरुष इतिहासात जमा झाले आहे हे मोठे दुर्देव आहे . हे चित्र बदलेल तरच इतिहास टीकेल .

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!