रामची आई!

रामची आई!

राम शेवाळकर यांना त्यांच्या आईची आठवण येताच गहिवरून यायचे. गोपिकाबाई हे त्यांच्या आईचे नाव. मात्र तिच्या बाबतीत ते वयाच्या अडीच वर्षापासून दुरावले होते. एखाद्या अपत्यास जन्मत:च एखादा अवयव नसावा आणि त्याला त्या अपंगत्वाची सवय व्हावी, त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आईचे नाते होते.

गोपिकाबाईना सारेच बाई म्हणत, म्हणून राम शेवाळकर यांची भावंडेही त्यांना ‘बाई’ असेच संबोधत असत. बाईंच्या आईस आजीऐवजी सारी भावंडे ‘आई’ या नावानेच हाका मारीत असत. बाई लहानपणीच रामास सोडून गेली आणि मातेचे प्रेम, ममत्व त्या भावंडांस मिळालेच नाही. लहान बालकांना सावत्र आईचा जाच नको म्हणून रामांच्या वडिलांनी – भाऊसाहेबांनी दुसरे लग्न केले नाही. याबाबतीत राम शेवाळकर म्हणत, की भाऊसाहेबांच्या तशा निर्णयामुळे आम्ही आईच्या सावत्र प्रेमासाठीही पारखे राहिलो.

लहानपणीच्या अनेक गमतीदार आठवणी शेवाळकर अगदी रंगवून सांगत; मात्र त्या आठवणीस कुठे तरी दुःखाची किनारही असायची. विशेषतः त्यांच्या जन्मदात्रीच्या आठवणींमध्ये आणि अशा आठवणींचा उत्तरार्ध जसा राम शेवाळकर यांना दुःखदायक असायचा त्याहीपेक्षा तो ऐकणाऱ्यांसाठी क्लेशदायी असायचा. राम शेवाळकर यांना लहानपणी हाताचा अंगठा चोखायची सवय होती. ती सवय का लागली हे दूर कुठे तरी दृष्टी लावून राम शेवाळकर सांगायचे, की रामाचा जन्म झाला आणि त्यांच्या बाईस आजारपणाने घेरले. बाई अत्यंत निशक्त होत्या त्यामुळे आणि त्यांच्या सततच्या आजारपणामुळे रामाला हक्काचे आईचे दूधही मिळायचे नाही. कुणी तरी रामांच्या अंगठ्यावर दूध टाकून तोच अंगठा त्यांच्या तोंडात द्यायचे. या प्रसंगातूनच राम शेवाळकर यांना अंगठा चोखायची सवय लागली ती पार शाळेत जाईपर्यंत!

भाऊसाहेब आणि गोपिकाबाई यांचे लग्न झाले त्यांचे वय अनुक्रमे बारा आणि अठरा वर्षांचे! गोपिकाबाई रंगाने गोऱ्या तर बहुतांश शेवाळकरांप्रमाणे भाऊसाहेबांचा रंग! राम शेवाळकर या संदर्भात असे सांगायचे की,

त्यांच्या भावंडांना झळाळी देण्यासाठीच जणू गोपिकाबाई त्यांच्या घराण्यात आल्या; मात्र जाताना त्यांनी शेवाळकर कुटुंबास घनघोर अंधकारात ढकलले. स्वत:च्या रामाच्या मनात आईची (बाई) जी व्यक्तिरेखा कायम वसली ती केवळ तसबिरीला दैनिक नमस्कारामुळे! आईकडून, परिचितांकडून बाईंबद्दल ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकल्या त्यामुळे ती व्यक्तिरेखा काहीशी ठळक झाली एवढेच. शेवाळकरांसाठी बाई म्हणजे एक विरलेले, दुभंगलेले स्वप्न होते. जिवाला चटका आणि अखंड हुरहुर लावणारी, लहान वयात सोडून जाणारी आई देवाने कुणालाही देऊ नये, असे वाटायला लावणारी रामची असलेली आई म्हणजे बाई!

बाईच्या अकाली, दुःखद निधनानंतर त्या इवल्याशा पाखरांना सांभाळायला, मायेची सावली देऊन पदराखाली घ्यायला एका अनामिक ओढीने धावली ती त्यांच्या बाईंची आई, त्यांची आजी ! नियतीला अगोदरच हे माहिती असल्याप्रमाणे आजीला ती भावंडं आईच म्हणत. आईवर रामाची प्रचंड श्रद्धा व असीम प्रेम. लहानपणी राम अतिशय कृश होते. त्याच्यासोबत जन्मलेली इंदू मात्र चांगलीच गुटगुटीत आणि बाळसेदार. सर्वत्र चर्चा अशीच असायची, की जुळ्यात जन्मलेला मुलगा (राम) हा अतिशय अशक्त असल्यामुळे तो काही दिवसांचाच सोबती आहे. शेवाळकर घराण्याचे कुलदैवत रेणुकामाता! एक दिवस आईने रामाला रेणुकादेवीसमोर ठेऊन नवस केला, की आई, रेणुका माते, या बाळाला वाचव. तुझी ओटी खणा-नारळाने भरीन. आईच्या त्या धावेला रेणुकामातेने जणू आशीर्वाद दिला आणि आश्चर्य घडले, रामांची प्रकृती काही दिवसातच चांगली सुधारली. मात्र महद्आश्चर्य असे, की ठणठणीत असलेल्या रामाच्या जुळ्या बहिणीने या जगाचा घेतला. रामाच्या बारशाचा प्रसंग. त्यांचे बारसे जेवायला आलेली काही मंडळी म्हणाली की, ‘केवळ दैवी चमत्कारामुळेच बारसे जेवायचा हा योग आला.’

आईचा स्वभाव जसा प्रेमळ तसा कडक. साध्या चुकीसाठी प्रचंड रागावणारी आई काही क्षणांतच विरघळायची लगेच भरपूर प्रेम करायची. एकदा रामाने कशाचा तरी हट्ट धरला. आईने भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु राम मागणीवर कायमच. तेव्हा चिडलेल्या आईने रामाच्या गालावर चटका दिला. रामांचे डोळे भरून आले आणि त्या जागी फोड आला. तो पाहून आईचा जीव कासावीस झाला आणि साश्रू डोळ्यांनी स्वत:लाच कोसू लागली. आई रागात आली म्हणजे अनेकानेक शिव्यांचा भडिमार करीत असे मात्र कौतुक करतानाही त्याच विशेषणांची परतफेड होई.

राम शेवाळकर यांना वाचनाचे वेड लहानपणपासूनच होते. खरे तर वाचन हे एक अलौकिक व्यसन आहे. आज काहीच वाचायला मिळाले नाही ही जाणीव त्या व्यसनाचे एक लक्षण ! वाचनाच्या हव्यासापोटी त्यांना अनेकवेळा आईच्या शिव्या ऐकाव्या लागल्या, प्रसंगी मारही खाल्ला; परंतु त्यांचे वाचनाचे वेड वाढतच गेले. आजोळी गेल्यावर वाचनाच्या बाबतीत रामाची उपासमार होत असे; मात्र ‘दुधाची तहान ताकावर भागवावी’ त्याप्रमाणे आजोळी कोपऱ्यात लटकावलेली, तारांना खोचलेली जुनी पत्रं त्यांची वाचनाची भूक भागवायची.

आईला शिक्षक, प्रोफेसर अशा व्यक्तींचा फार जिव्हाळा ! रामाने यांपैकी कुणी तरी व्हावे ही त्यांची मनापासूनची इच्छा ! राम शेवाळकर शिक्षक झाले तेव्हा आईना खूप आनंद झाला. त्याच आनंदात त्या म्हणाल्या,
“रामा, मास्तर झाला. बरे वाटलं, पण बाळा एवढ्यावरच नाही थांबायचं तर चांगला प्रोफेसर हो”. मुलं मोठी होताहेत, शिकताहेत याचा आईला फार आनंद होत असे; परंतु शिक्षणासाठी पोरास घरापासून दूर राहावे लागत असे; याचेही भारी दुःख. पोरगं काय खात असेल, कुठे झोपत असेल, काही दुखलं-खूपलं तर कसं, या विचारांनी ती नेहमी अस्वस्थ असे. सुट्टीच्या दिवशी आणि सणावाराला रामाचे आगमन झाले की त्यांना पोटाशी धरून ती म्हणे, ‘रामा बाळा, काही खातोस का नाही ? किती सुकला गं माझा राम?’

भाऊसाहेबांच्या मुलावर सर्व धार्मिक संस्कार व्हावेत, ही आईची इच्छा आणि तळमळ! बारसे, मौंज, भावडांचे लग्न ह्या इच्छा भाऊसाहेबांनी पूर्ण केल्या. आईची एक प्रबळ इच्छा, ती म्हणजे रामाचे लग्न. ती रामामागे सारखा लकडा लावून म्हणायची, ‘बाळा, आता बस एकच इच्छा! रामा,
सूनमुख पाहायला हे डोळे तरसायलेत बघ.’

राम शेवाळकरांसाठी स्थळ येऊ लागली. परंतु स्वतः राम शेवाळकर लग्न करण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे प्रत्येक वधूपित्याला आणि नातेवाईकांना नकार देताना भाऊसाहेबांचा जीव मेटाकूटीला आला. त्यांनाही नंतर नंतर चिंता वाटू लागली.

तशातच राम शेवाळकर यांनी लग्नाचा विचार जाहीर केला आणि भाऊसाहेबांसह आईसही खूपखूप आनंद झाला. मात्र, इकडे शेवाळकर वेगळ्याच धर्मसंकटात सापडले. त्यांनी पसंत केलेली मुलगी घरी आवडेल का ? भाऊसाहेब परवानगी देतील का? आई काय म्हणेल ? अशा प्रश्नांनी शेवाळकरांच्या मनात वादळ उठले. मनामध्ये प्रचंड कालवाकालव सुरू झाली कारण राम शेवाळकर यांनी स्वतः मुलगी पसंत केली होती. दुसऱ्या शब्दांत तो प्रेमविवाह होता. त्यांच्या आईने अशा विवाहाबद्द्लची स्वतःची चीड अनेकवेळा बोलून दाखविली होती म्हणून रामांना भीती वाटत होती. शेवटी राम शेवाळकरांनी स्वत:चा विचार मोकळेपणाने सांगितला. आश्चर्याचा धक्का रामाला बसला कारण भाऊसाहेबांचे सोडा पण आईने एका शब्दानेही विरोध केला नाही. उलटपक्षी आई या विवाहाच्या बाजूने ठाम उभी राहिली. दुसऱ्या शब्दांत ‘प्रेमविवाहाचे विरोधक प्रचारक झाले।’ आई मोठ्या आनंदाने, कौतुकाने रामाचे लग्न ठरले, आता सूनमुख बघायचे, असे सर्वांना सांगू लागली. परंतु, तिचे दुर्दैव असे, की शेवाळकरांचे लग्न जवळ आले आणि आईची प्रकृती बिघडली. तिची समजूत घालताना नाकी नऊ आले. आईस – आजीस नातवाच्या लग्नास जाता आले नाही. बिचारी जड अंत:करणाने घरीच राहिली. ब्राम्हण परिवारामध्ये सोहळ्यात ‘सूनमुख’ पाहणे हा एक मंगलमय संस्कार; परंतु बाई म्हणजे आईही नाही आणि आईनंतरची आई आजीही नाही, अशा स्थितीत तो सोहळा पार पडला.

राम शेवाळकर यांच्यासाठी सर्वस्व असलेल्या आईचा तो शेवटचा काळही तसाच कालवाकालव उत्पन्न करणारा. राम शेवाळकर यांच्या जीवनातील तो वाईट कालखंड, कारण त्याच कालावधीत आई आजारी होती. काही दिवसांपासून मरणासन्न अवस्थेत होती. त्यांचं सर्वस्व, त्यांना लहानाचे मोठे केलेली आई, त्यांच्यावर सुसंस्कार केलेली आई जीवनाच्या अंतिम टप्प्यात होती. राम शेवाळकर यांना कॉलेजला जाणे आवश्यक होते; परंतु आईची ती अवस्था पाहून त्यांचा पायच निघत नव्हता. तिला त्या अवस्थेत सोडून जाणे यासाठी शेवाळकर स्वतःलाच अपराधी समजत होते. अपराधीपणाच्या जाणिवेने आईजवळ जाऊन बोलण्याचीही त्यांची हिंमत होत नव्हती. शेवटी, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ, याप्रमाणे राम शेवाळकर निघाले. परंपरेप्रमाणे देवांना नमस्कार, घरातील ज्येष्ठांना नमस्कार करून राम आशीर्वाद घेण्यासाठी आईच्या अंथरूणाजवळ जाऊन म्हणाले,

“आई मी चाललो गं. ”
“जातोस ? केव्हा येशील?”
“येईन की, दिवाळीला.”
“रामा, आधी नाही होणार?”
“आई, जमेल का नाही सांगता येणार नाही ग.”
“तर मग रामा, आपली ही शेवटचीच भेट.”

आई म्हणत असताना रडू लागली. ते पाहून रामाचेही डोळे पाणावले. त्यांची पावलंही जड झाली. त्याच जड पावलांनी, तितक्याच जड अंतःकरणाने आणि आसवं गाळीत राम शेवाळकर निघाले.

आईच्या शेवटच्या काळात राम शेवाळकर यांच्याप्रमाणे भाऊसाहेबही बाहेरगावी होते. आईची प्रकृती अत्यंत चिंतनीय झाली आणि भाऊंना निरोप गेला. भाऊसाहेबही हातातली कामे सोडून लगोलग परतले. हातपाय धुऊन ते सासूबाईजवळ पोहचले.

“मी आलोय बर.” हलक्या आवाजात आईंच्या कानात भाऊसाहेब म्हणाले. तो आवाज ओळखून तिने डोळा उघडल्यासारखा केला आणि लगेचच मिटला तो कायमचाच! कदाचित ती भाऊसाहेबांचीच वाट पाहत होती.

एक ती श्यामची आई आणि ही रामची आई!…

नागेश शेवाळकर
९८३४५४८१६६

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “रामची आई!”

  1. रविंद्र कामठे

    खूपच छान लेख.
    मायेनं ओंथबून वाहणारं एक बेट असतं
    आई हेच तर ह्या बेटाचं एक नाव असतं !
    रविंद्र कामठे🙏🏻

  2. Vinod s. Panchbhai

    व्व्व्वा! खूपच भावस्पर्शी लेख !
    वाचताना नकळत डोळे पाणावले !
    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!

  3. Jayant Kulkarni

    शेवाळकर सर आईचं महत्व काय आहे हे तुमच्या लेखातून समजतं! आईशिवाय बालपण हे ही अवघडच! पण आजीनं आई होऊन ती उणीव भरून काढली. सुंदर लेख आहे. आवडला.

  4. रमेश वाघ

    भावस्पर्शी

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा