सुशील अतिशय गरीब मुलगा. मी जेव्हा शाळेवर नव्याने रुजू झालो तेव्हा स्वागताला पहिल्यांदा हाच हजर होता. कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. सुशिक्षित होता. शाळेमध्ये कुठलीही नवीन गोष्ट करायची असली तरी मोकळ्या मनाने काम करायला कधीही तयार असायचा. बोलणंही छान. अंगामध्ये नम्रता. सगळं काही व्यवस्थित. फक्त एकाच गोष्टीची कमी होती. श्रीमंती. तीही काही दिवसांनी दूर झाली.
सुशीलची गावाच्या शेजारीच बारा एकर शेती होती, परंतु पाण्याची अडचण असल्यामुळे शेतीमध्ये काही पिकायचं नाही. हा मोलमजुरी करून जगायचा. चार पाच वर्षापूर्वी धरण झालं. शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झालं. त्याची प्रगती सुरू झाली. गावातल्याच एका मुलीशी लग्न झालं. हातात पैसा खुळखुळायला लागला. बसायला गाडी आली. दारात ट्रॅक्टर आला. हातात मोबाईल आला. सगळ्या सुविधा हाताशी आल्या.
काही दिवसांनी ज्या सुशीलला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं, तो दारूच्या नशेमध्ये बेहोष झालेला दिसायचा. त्याची ही अवस्था बघून वाईट वाटायचं. तो पिलेला असला की कधी समोर यायचा नाही परंतु बाकीच्या मित्रांकडून गावांमध्ये कळायचं की आता हा कामातून जायला लागला आहे आणि तशातच एक दिवस बातमी आली, “सुशिलने गळफास घेतला!”
लहानपणापासून अनाथ. वडील नव्हते. आई एकटीच. आईने वाढवलेला. घरात खायची मारामार, तरीही गावभर गुणवान म्हणून कौतुक झालं. आताही सगळ्या गावामध्ये प्रगतीशील शेतकरी म्हणून नाव झालं. पैसा भरपूर आला, पण तो सुखाने भोगण्याऐवजी त्याने कलहाला जवळ केलं. का होत असावं असं मानवी जीवनात?
माणसाला आभाळाएवढं दुःख पचवता येतं पण कणभर सुख पचवता येत नाही. अहंकार, मद , मत्सर, सुखासीन माणसालाच जास्त असतो. दैनंदिन जगण्याची भ्रांत असते तेव्हा त्याला अहंकार, मत्सर यासाठी सवडच नसते. त्याचमुळे कदाचित भगवान श्रीकृष्णाकडे माता कुंतीने दुःखंच मागितलं, “देवा मला दुःख दे, कारण दुःखामध्ये तुझी आठवण कायम राहते.”
असं काय घडतं असं मानवी आयुष्यात, की दुःखाचा डोंगर माणूस पचवतो; पण सुख आलं की पावलं चुकीच्या वाटेला लागतात. रावण असेल, बली असेल, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष असेल ज्यांनी प्रचंड तप करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं. तप म्हणजे काय? कष्टंच. ‘तपो द्वंद्वोसहनम्’ एका अर्थाने प्रचंड कष्ट सहन करून देव प्रसन्न झाला. विश्वाचं साम्राज्य पायाशी आलं; पणजे प्राप्त झालं ते पचवता मात्र आलं नाही.
गीतेमध्ये भगवंताने सुखाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक, राजस आणि तामस.आपल्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. बाहेरून जे मिळतं भौतिक साधन संपत्तीने जे मिळतं ते खरं सुख, असे आपण समजतो. त्यामुळे आपलं सुख हे परावलंबी, परतंत्र असतं. गीता अशी सांगते की,‘यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्।तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्’ जे मन आणि बुद्धीच्या प्रसन्नतेने प्राप्त होतं, जे सुरुवातीला कष्टमय वाटतं; परंतु याचा परिणाम अमृता सारखा असतो. ते खरं सात्विक सुख.
जसजसा चंगळवाद आपल्याकडे वाढत चालला आहे वाढतो आहे तसतसा सात्विक सुखाचा विसर आपल्याला पडतो आहे. त्यामुळे सुरुवातीला अमृतासमान भासणारं, परिणामी मात्र विषासारखं असणारं सुख आपण खरं सुख समजतो. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, ‘आणि अपेयाचेनि पानें। अखाद्याचेनि भोजनें।
स्वैरस्त्रीसंनिधानें। होय जें सुख॥’ हे सुख तामस आहे. वाईट आहे. दुसऱ्याचा घात करून, दुसऱ्याचा द्रव्यापहार करून, दुसऱ्यांच्या स्तुतीने, आळस आणि झोपेमुळे जे अनुभवाला येतं; ज्याने सुरुवातीला आणि शेवटीही आपल्या कल्याणाचा मार्ग दिसत नाही ते सुख तामस सुख आहे, असं माऊली म्हणतात.
ज्या सुखाने आपला द्वैत भाव नष्ट होतो, ज्या सुखाने आपल्याला खऱ्या आत्मप्रकाशाची जाणीव होते, आत्मस्वरूपाचे ज्ञान होते तेच खरं सुख. हे सुख शोधण्यासाठी कुठल्याही बाह्य गोष्टीची माणसाला कधीच गरज नसते. हे सुख‘आत्मबुद्धी प्रसादजम्’ असतं. ते मन आणि बुद्धीच्या प्रसन्नतेतून जन्माला येतं. त्या सुखाचा परिणाम म्हणजे कधीही न सरणारी सुखाची खाण प्राप्त होणं. म्हणूनच माऊली म्हणतात,‘तेव्हां सागरीं गंगा जैसी। आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी। अद्वयानंदाची आपैसी। खाणी उघडे॥’
आपल्या प्रत्येकाच्या मगदुराप्रमाणे आपली सुखाची व्याख्या वेगळी असू शकते; पण माऊलींचा जर सल्ला घ्यायचा तर माऊली त्याबाबत म्हणतात,‘तेवीं जालेनि सुखलेशें। जीवु भाविलिया अभ्यासें। जीवपणाचें नासे। दुःख जेथें॥’ सुख असं पाहिजे की त्यासुळे तुमचा सगळ्या प्रकारच्या दुःखाचा नाश झाला पाहिजे. अशाप्रकारचे सुख आपल्याला बाहेरून कधीही प्राप्त होऊ शकत नाही कारण बाहेरच्या गोष्टी ह्या शाश्वत नाहीत. आज असतील उद्या नसतील. म्हणूनच कदाचित शंकराचार्य म्हणतात की ‘ब्रह्म सत्य जगन्मिथ्या.’
माणूस कायम सुखाच्या शोधात असतो. त्याचा शोध कधी संपतच नाही. कारण रस्ताच चुकलेला असतो. शाश्वत सुख पाहिजे असेल तर पुन्हा एकदा आपल्याला माऊलींचेच ऐकावे लागेल. माऊली म्हणतात, ‘ऐसें स्वानुभवविश्रामें।वैराग्यमूळ जें परिणमे। तें सात्विक येणें नामें। बोलिजे सुख॥’ स्वतःच्या अंतकरणात, स्वतःच्या मन बुद्धीत, स्वतःच्या तपाने जे प्रकट होतं, तेच खरं सात्विक सुख. असं सुख अंगावर फुटून निघत नाही. असं सुख दुसऱ्याच्या दु:खाला कारणीभूत होत नाही. असं सुख कधीही नष्ट होत नाही. असं सुख ज्याला प्राप्त होतं तोच प्रार्थना करू शकतो, ‘सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात||’
रमेश वाघ, नाशिक
९९२१८१६१८३
रमेश सर खूपच छान लेख. मला माझ्या ह्या चारओळी खूप संयुक्तिक वाटल्या
आयुष्य इतकंही सोप नाही
जितकं आपण समजत असतो ।
आयुष्य इतकंही अवघड नाही
जितकं आपण ते करुन ठेवतो ।।
खूपच मर्मस्पर्शी आणि विचार करणारा सुंदर लेख!!
chan
मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान लेख आहे….
उत्तम विश्लेषण अप्रतिम लेखन
सुख म्हणजे नक्की काय असतं ?…… या प्रश्नाच्या उत्तरासाठी अंतर्मुख करायला लावणारा अप्रतिम लेख ! 👌
सर खूप छान लेख.खरंच सुख हे शाश्वत गोष्टींवर अवलंम्बुन नसून ते आपल्या वर अवलंबून आहे👍👍