हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!

हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!

‘‘हैदराबाद हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे; तो हिंदुस्थानात विलीन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही…’’

-स्वामी रामानंद तीर्थ)

15 ऑगस्ट 1947! भारतीय इतिहासातील एक सुवर्णदिन! शेकडो वर्षे पारतंत्र्यात असणार्‍या भारतीयांनी यादिवशी उगवलेल्या, ग्रहणमुक्त झालेल्या सूर्याचे दर्शन घेतले. एक वेगळी स्फूर्ती, एक आगळे चैतन्य! मोठ्या आशेने, अपेक्षेने भारतीय जनता मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत होती. भारतात खर्‍या अर्थाने लोकशाहीचा जन्म झाला होता. मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नव्हते. हजारो लोकांच्या बलिदानाने, हजारो कुटुंबातील व्यक्तिंनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीने स्वातंत्र्यसूर्य उगवत होता. या स्वातंत्र्याला जशी आनंदाची, समाधानाची, शौर्याची, पराक्रमाची, बलिदानाची किनार होती त्याचप्रमाणे या स्वातंत्र्याला कुठेतरी नैराश्याची, संतापाची आणि अनिश्चिततेचीही किनार होती. मिळालेले स्वातंत्र्य पूर्ण नव्हते. भारतातील फार मोठा भाग पारतंत्र्यात इंग्रजांच्या अंमलाखाली जरी नसला तरीही या भागांवर भारतीयांचे राज्य नव्हते, भारतीयांचे कायदे या भागांमध्ये चालणार नव्हते. हा भाग संस्थानिकांच्या अधिपत्याखाली होता. तिथे त्यांचे राज्य होते, त्यांचा कायदा होता. अशा संस्थानिकांची संख्या साडेपाचशेपेक्षाही अधिक होती; परंतु स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारने कठोर निर्णय घेऊन ‘या सर्व संस्थानिकांनी विनाअट भारतात सहभागी व्हावे’ अशी अट घातली. केवळ तीन संस्थानिक वगळता इतर सारी संस्थानं भारतात सामील झाली; परंतु हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ या संस्थानिकांनी भारतीय प्रजासत्ताक स्वीकारण्यास नकार दिला.

हैदराबाद! निजाम राजवटीखाली असलेला एक भूभाग! भारत स्वतंत्र झाला त्यावेळी या संस्थानच्या गादीवर सातवा निजाम बसलेला होता. तो प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि सत्तापिपासू होता. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले तर आपली हुकूमत, आपले साम्राज्य नष्ट होईल, आपणास एक सामान्य नागरिक म्हणून रहावे लागेल या भयगंडाने निजाम त्रस्त होता. भारतीय राष्ट्रवाद हा निजामास मुळीच मान्य नव्हता. भारतीय सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, प्रजासत्ताक यांचा निजाम कट्टर विरोधक होता. स्वतःच्या राजवटीतही प्रजेचे हित पाहण्यात, प्रजेला किमान सोयी-सवलती मिळाव्यात याकडे तो मुद्दाम दुर्लक्ष करीत असे. 1911 यावर्षी निजामाच्या गादीवर बसलेल्या सातव्या निजामाचे म्हणजे मीर उस्मान अलीचे एकच स्वप्न होते ते म्हणजे स्वतः हैदराबाद संस्थानचा महाराजा व्हावे, सम्राट व्हावे! निजामाच्या अखत्यारित हैदराबाद राज्याचे किंवा निजाम स्टेटचे क्षेत्रफळ ब्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव चौरस मैल होते. या राज्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश, दक्षिणेकडे कर्नाटक, पश्चिमेला महाराष्ट्र आणि पूर्व दिशेला आंध्रप्रदेश ही राज्यं होती. सतरा जिल्हे आणि एकशे चार तालुके अशी या संस्थानची व्याप्ती होती. लोकसंख्येचा विचार केला तर या राज्यात सुमारे 1 कोटी 44 लाख अशी लोकसंख्या समाविष्ट होती. महत्त्वाचे म्हणजे भाषेचा विचार केला तर हैदराबाद राज्यातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास पन्नास टक्के तेलगू भाषिक होते. सव्वीस टक्के एवढे मराठी भाषिक लोक समाविष्ट होते. कानडी भाषा बोलणारे बारा टक्के नागरिक होते. आश्चर्याची गोष्ट अशी की, निजाम ज्या जाती-धर्माचे प्रतिनिधित्व करत होता ती मुसलमान जनता केवळ दहा टक्के एवढीच होती. असे असतानाही निजामाचे राज्य या भागात होते.

भाषेच्या संदर्भात विचार केला तर मराठवाडा, तेलंगण, कर्नाटक असे विभाग पडले होते. औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांचा मिळून मराठवाडा भाग, तेलंगणातील आदिलाबाद, मेदक, करीमनगर, वरंगळ, निजामाबाद, नलगोंडा, महेबूबनगर, अतराफबल्दा आणि खम्मम हे नऊ जिल्हे तसेच गुलबगार्र्, बिदर, रायचूर हे कर्नाटक प्रांतातील तीन जिल्हे मिळून हैद्राबाद संस्थानावर निजाम राज्य करत होता. या संस्थानचा निजाम सर्वेसर्वा होता. भारतीयांच्या म्हणजेच लोकांच्या हातात सत्तेचा वारु गेला तर स्वतःचे अस्तित्व संपवून टाकण्याप्रमाणे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत निजामास ते नको होते. जनतेमध्ये लोकशाहीची बीजं आणि संपूर्ण संस्थानांचे मिळून भारतीय संघराज्य हे वास्तव तो स्वतः तर स्वीकारत नव्हता परंतु संस्थानातील जनतेलाही संघराज्याची जाणीव होणार नाही, तशी जनतेमध्ये जागृती होणार नाही याची निजाम दक्षता घेत होता. यासाठी त्याच्या संस्थानात असलेल्या ‘दिनदार सिद्दिक संघटना’, ‘खाकसार पार्टी,’ ‘होमगार्ड अर्थात निझामसेना’ या सोबतच ‘रझाकार’ अशा संघटना कार्यरत होत्या. निजामाचे या संघटनांना प्रचंड प्रमाणात पाठबळ होते. या संघटना कशा कार्यरत होत्या, जनतेवर त्यातही हिंदुंवर कसा जुलूम, छळ, अत्याचार करीत होत्या हे पाहणे गरजेचे आहे.

रझाकार! अत्यंत जुलमी, कडवट अशी ही संघटना होती. स्वखुशीने कार्य करणारे कार्यकर्ते म्हणजे रझाकार! रझाकार संघटनेचा मुखिया किंवा प्रमुख हा मराठवाड्यातील लातूर येथील! व्यवसायाने वकील असलेला कासीम रझवी हा रझाकार संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख नेता होता. रझवीची वाणी अत्यंत कडवट होती. तो भाषणाला उभा राहिला की, त्याच्या वाणीतून पराकोटीचा हिंदुद्वेष उफाळून येत असे. त्यामुळे त्याचे भाषण त्याच्या अनुयायांना खूप आवडत असे. तो भाषणाला उभा राहिला की, त्याचे शिष्यगण ‘सालारे आझम जिंदाबाद’ या घोषणांनी आसमंत दणाणून सोडत असत. हिंदू धर्म आणि जनतेवर तो सातत्याने टीका करत असताना त्याचा जयजयकार होत असे. भाषणात कासीम म्हणत असे,

‘‘हम हिंदुओंको मुर्गी की गर्दन की तरह मरोडकर रख देंगे। गाजर की तरह काट डालेंगे।’’ त्याच्या अशा दर्पोक्तीपूर्ण उद्गारासाठी त्याचे अनुयायी टाळ्यांचा कडकडाट करायचे. रझवी, त्याचे कुटुंबीय आणि त्याचे सहकारी हिंदुद्वेषाने किती पछाडले होते, हिंदुंचा छळ करण्यासाठी ते किती नीच पातळी गाठत होते हे पुढील घटनेवरून लक्षात येईल. रझवीचा भाऊ तय्यब, आमीन आणि महमद हाजी या दोन मित्रांसह दुपारच्या वेळी एका खेड्यात पोहोचले. त्या तिकडीला चहा पिण्याची हुक्की आली. त्यांनी त्या गावच्या पाटलाला फर्मावले,

‘‘आम्हाला चहा प्यायचा आहे. लवकर चहाची व्यवस्था करा.’’

ते ऐकताच पाटील विनयाने म्हणाले, ‘‘सरकार, दुपारची वेळ आहे. गायी-म्हशी दूध देत नाहीत.’’

ते ऐकून गगनभेदी हास्य करत तय्यब म्हणाला, ‘‘गायी-म्हशी दूध देत नाहीत ना? हरकत नाही. घरी बायका तर असतीलच की! मग प्रश्‍नच मिटला. जा. आणा दूध. आम्हाला चहा प्यायचा आहे.’’

केवढी ही मग्रुरी, केवढी मुजोरी, किती नीचपणा, किती हलकटपणा, किती ही क्रूरता! शरीरातील रक्त खवळून बोलणार्‍याच्या नरडीचा घोट घेण्याची, त्याला त्याच्याच रक्ताने न्हाऊ घालण्याची, ती जीभ हासडण्याची, त्याच्या मुस्कटात हाणण्याची, त्या अपमानाचा बदला घेण्याची इच्छा का निर्माण झाली नसावी? हात का शिवशिवत नसावेत? तळपायाची आग मस्तकात का शिरत नसावी? सारे काही होत होते पण एक भीती, निजामाची दहशत आठवताच शरीर थंड पडायचे. वृत्ती भावनाशून्य व्हायची. आपण जर निजामविरोधी कृत्य केले तर मिळणारे फळ समोर दिसत असायचे. बिदर जिल्ह्यातील होन्नली या गावातील भाऊराव पाटलांनी निजामाचा आदेश धुडकावून विरोधी कृत्य केले. तेही 15 ऑगस्ट 1947 या दिवशी! सारे भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंदोत्सव साजरा करीत असताना होन्नली गावच्या पाटलांचाही आनंद गगनाला भिडला. झालेल्या आनंदाप्रित्यर्थ भाऊराव पाटलांनी तिरंगा ध्वज फडकवला. पाटलांची ही कृती निजाम राजवटीच्या विरोधाची ठरली, कारण ‘भारत स्वतंत्र झाला म्हणून कोणताही उत्सव निजाम राजवटीत साजरा करायचा नाही’ असा निजामाचा आदेश होता. पाटलाला धडा शिकवावा या हेतूने निजामाचे पोलीस होन्नली गावात दाखल झाले. ते भाऊराव पाटलाला शिव्या देऊ लागले, वाट्टेल ते बोलू लागले. त्यामुळे पाटील भडकले. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी पोलिसांच्या कानाखाली आवाज काढला आणि त्या पोलिसांना आपल्या वाड्यातील खोलीत डांबले. ती वार्ता पोलीस ठाण्यात हिसामोद्दीन या ठाणेदारास कळली. तो चवताळून भाऊरावांना अद्दल घडविण्यासाठी निघाला. हिसामोद्दीन आणि त्याचे सहकारी आपल्यावर चालून येत आहेत हे कळताच भाऊराव आपल्या सहकार्‍यांसह गावातून बाहेर पडले. हिसामोद्दीन गावात शिरला. सूडाच्या भावनेने पेटून तो भाऊरावांचा शोध घेत असताना ‘भाऊराव निसटले’ ही बातमी त्याला समजली. तो संतापला, चिडला. आपले सावज हाती लागत नाही हे पाहून संतापाने त्याच्या कपाळावरची शीर तडतडू लागली. बदला तर घ्यायचा आहे, पाटलाने ध्वज फडकावून केलेल्या बेईमानीचा हिशोब चुकता करावयाचा आहे, आपल्या पोलिसांना मारुन कोंडलेल्या कृत्याची, अपमानाची शिक्षा तर पाटलाला मिळालीच पाहिजे पण कशी? भाऊराव पाटील तर आपल्या हातावर तुरी देऊन निसटले. क्रोधाने लालभडक झालेल्या हिसामोद्दीनच्या डोक्यात अचानक वीज चमकावी तसा एक विचार चमकला. त्याच्या डोळ्यात पाशवी चमक आली आणि त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिला आणि दुसर्‍याच क्षणी सुरू झाले पाशवी अत्याचार, क्रूरतेचा नंगानाच! समोर दिसेल त्या बाईवर बलात्कार! त्या नीरव, भयभीत अशा वातावरणात घुमू लागल्या महिलांच्या आर्त किंकाळ्या! मदतीसाठी केलेल्या याचना! पण धावणार कोण? घराघरात असणारी माणसे घराबाहेर वळवळणार्‍या हातावर हात देऊन, मूग गिळून शांत उभी होती, कान असून बहिरी झाली होती, संताप आतल्या आत दाबत होती, ओठावर ओठ ठेवून शांत राहण्याच्या प्रयत्नात ओठांमध्ये दात घुसून ओठ रक्ताळत होते, चेहरा रागाने लालबुंद झाला होता. प्रतिकार करण्याची, दुश्मनाला कापून काढण्याची इच्छा होत होती परंतु भाऊराव पाटलांनी केलेल्या प्रतिकाराची शिक्षा गावातील माता-भगिनींना भोगताना पाहून शांत बसावे लागत होते. सर्वांची शांती झाल्यानंतर, समाधान लाभल्यानंतर हिसामोद्दीन आणि त्याचे जुलमी सहकारी परत निघाले. बैलगाड्या जोडायचे आदेश मिळाले. तळमळणार्‍या, मानसिक आधाराची, औषधोपचाराची गरज असणार्‍या, पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या घरातील पुरुष बैलगाड्या जुंपून त्या दुष्टांचे सारथी म्हणून निघाले. काय ही दुरवस्था? कशी ही लाचारी? कसा हा एवढा निशक्तपणा? पण होते हे असे, सातत्याने घडे ते असे.

आपल्या कृत्याचा बदला हिसामोद्दीन आणि त्याच्या माणसांनी तशा रीतीने घेतल्याचे भाऊरावांना समजले. भाऊराव रागाने थरथर कापू लागले. आता जीव गेला तरी बेहत्तर पण हिसामोद्दीनला सोडायचे नाही असा मनोमन निश्चय करून भाऊराव बदला घेण्याच्या इर्षेने निघाले. हिसामोद्दीन कोणत्या दिशेने, कोणत्या गावाजवळून जाणार हे भाऊरावांना पक्के ठाऊक होते. त्याप्रमाणे भाऊराव धनुरा या गावाजवळ असलेल्या एका झुडपात आपल्या मित्रांसह दबा धरून बसले. काही क्षणात बैलगाड्या येत असल्याची चाहूल लागली. सावज येतेय हे समजताच सर्वांनी आपापल्या बंदुका सज्ज केल्या. आले! आले! सावज आले! बव्हंशी लांडगे टप्प्यात येताच बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव झाला. भाऊरावांनी आपला शत्रू जाणला आणि त्याला यमसदनी धाडला…

कासीम रझवी या रझाकाराच्या आणि त्याच्या साथीदारांच्या अंगावर शहारे आणणार्‍या कहाण्या निजामाच्या कानावर येत होत्या पण तो त्यास आवरत नव्हता. एकप्रकारे मूकसंमती देत होता. उलट तो नेहमी म्हणत असे की, ‘‘हिंदू व मुसलमान माझ्या दोन्ही डोळ्यांप्रमाणे मला अत्यंत प्रिय आहेत’’ परंतु त्याचे हे नाटक सर्वांना माहिती झाले होते. निजाम बोलतो एक आणि करतो एक हा त्याचा स्वभावही सर्वदूर परिचित होता. तरुण मुली, विवाहित स्त्रियांंना उचलून नेऊन कलंकित करण्याची कुप्रथा सुरु होती. अशा प्रकारांना विरोध, प्रतिकार करणार्‍यांची गय केली जात नसे. झालेल्या प्रकाराबद्दल दाद मागणे तर सोडा पण उच्चारही करता येत नसे…

ज्या राज्यात केवळ दहा टक्के उर्दू भाषिक होते आणि उर्वरित बहुतांश हिंदू होते त्या निजामी राजवटीत उर्दू हे शिक्षणाचे माध्यम होते. उर्दू भाषा ही राजभाषा होती. सर्व स्तरावरील कारभार हा उर्दू भाषेत चालत असे. कार्यालयांना आठवडी सुट्टी शुक्रवारी असे. नोकरीत थोडेथोडके नाही तर पंच्याण्णव टक्के लोक मुसलमान होते. मशिदीसमोर कोणतेही वाद्य वाजवायला सक्त बंदी होती. मशिदीच्या परिसरातील घरे मशिदीपेक्षा कमी उंचीचीच असली पाहिजेत हा नियम होता. सभा, संमेलनं, मिरवणुका यासाठी हिंदुंना परवानगी घ्यावी लागे. इतर धर्मियांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची पूर्ण मुभा होती. त्याचवेळी कोणताही मुस्लीम इतर धर्म स्वीकारु शकत नसे. अशाप्रकारे निजामी राजवट जुलमी, अत्याचारी, धर्मवेडी, जात्यंध होती. या राजवटीविरोधात वाचा फोडणे, ब्र शब्द उच्चारणे, उघड विरोध करणे केवळ अशक्य होते परंतु या अशक्य गोष्टीला शक्यतेत परावर्तीत करण्याचे, जुलमाच्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठविण्याचे काही संघटित प्रयत्न झाले. त्यात प्रामुख्याने भिल्ल, हटकर आंदोलनं अशी काही ठळक उदाहरणं आहेत परंतु हे प्रयत्न तोकडे पडले. असे प्रकार कसे ठेचून काढायचे हे निजामाला चांगलेच माहिती होते. ही दोन्ही आंदोलने दडपण्याचा, हाणून पाडण्याचा प्रयत्न निजामाने कसोशीने केला परंतु नवसाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले आंदोलन वीस वर्षे चालू होते. निजामाच्या कोणत्याही अत्याचारापुढे नवसाजी आणि त्यांचे सहकारी झुकले नाहीत. यामधून एक सिद्ध झाले की, जनता एकजूट झाली, धैर्याने, धाडसाने निजामासमोर उभी राहिली तर निजामाची डाळ शिजत नाही. ही एक फार मोठी उपलब्धी नवसाजी नाईक यांच्या आंदोलनाची म्हणता येईल.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हैदराबाद येथील जनताही सामील झाली होती. हैदराबाद राज्यात लोकशाही पद्धतीने सरकार आले पाहिजे, हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात सामील झाले पाहिजे अशी या राज्यातील जनतेची सुप्त इच्छा होती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हेही ‘हैदराबाद हे राज्य स्वतंत्र असावे’ या मताचे नव्हते. त्यांचा निजामाच्या स्वतंत्र राहण्याच्या भूमिकेला प्रचंड विरोध होता. पटेल यांनी असा एक प्रस्ताव निजामापुढे ठेवला की, हैदराबाद राज्याने स्वतंत्र रहायचे की भारतात सामील व्हायचे यासाठी सार्वमत घेऊया. राज्यातील जनता जिकडे कौल देईल तो सर्वांनी मान्य करुया! परंतु निजाम या प्रस्तावासाठी तयार झाला नाही कारण त्याला भीती होती की, हैदराबाद राज्यात बहुतांश जनता हिंदुधर्मीय आहे. ती आपल्या अधिपत्याखाली नांदायला तयार होणार नाही. परिणामी आपला पराभव होईल. आपल्याला सिंहासन खाली करावे लागेल या विचाराने निजामाने पटेलांच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करून तो फेटाळून लावला.

स्वातंत्र्य मिळण्याचे निश्चित झाले आणि भारतातील वेगवेगळ्या संस्थानिकांचे डावपेच सुरु झाले. हे पाहून जवाहरलाल नेहरू यांनी सर्व संस्थानिकांना कळवले की, ‘जी संस्थाने भारतात सामील होणार नाहीत ते स्वतंत्र भारताचे शत्रू समजण्यात येतील.’ दुसरीकडे भारत सोडणार्‍या इंग्रजांनी एक डाव टाकला. संस्थानिकांच्या विलिनीकरणाचा प्रश्‍न कसा जटिल, कठीण आणि भारत सरकारसाठी कसा त्रासदायक होईल याची काळजी इंग्रज घेऊ लागले. तशातच भोपाळच्या नबाबाने आवाहन केले की, जे संस्थानिक स्वतंत्र राहू इच्छित आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन भारत आणि पाकिस्तान याप्रमाणे तिसरी शक्ती अर्थात तिसरे राष्ट्र निर्माण करावे परंतु या प्रस्तावाला जवळपास सर्वच संस्थानिकांनी केराची टोपली दाखवली आणि बहुतांश संस्थानिकांनी भारतीय प्रजासत्ताकात सहभागी होण्याची तयारी दर्शवली.

18 जुलै 1947 ला ब्रिटिश पार्लमेंटने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला मंजुरी दिली. संस्थानिकांच्या विलिनीकरणाची जबाबदारी सरदार पटेल यांच्याकडे सोपवण्यात आली. पटेल यांनी एक पत्रक काढून सर्व संस्थानिकांना आवाहन केले की, लोककल्याणाच्या व देशहिताच्या दृष्टिने संस्थानिकांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण ही खाती भारतीय संघराज्याकडे देऊन सामील व्हावे. इतर विषयात, राज्यकारभारात संस्थानांना पूर्ण स्वायत्तता दिली जाईल. या आवाहनाला काश्मीर, जुनागढ आणि हैदराबाद येथील संस्थानिकांनी विरोध केला तर इतर सर्व संस्थाने भारतात किंवा पाकिस्तानात सामील झाली. काही महिन्यात जुनागड हे संस्थान सौराष्ट्रात सामील झाले. काश्मीर प्रश्‍न युनोच्या पटलावर गेला आणि हैदराबाद संस्थान मात्र स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिले…

काही ठळक आंदोलने
वर उल्लेख आल्याप्रमाणे निजामी क्रूर राजवटीविरोधात नवसाजी नाईक (हटकर आंदोलन) आणि भिल्ल आंदोलन यांनी निजामाच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. नाईक यांनी चालविलेल्या प्रदीर्घ आंदोलनामुळे लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला. निजाम राजवटीविरोधात आपण सत्याग्रह करु शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर आर्य समाजाने निजामाविरुद्ध चळवळ सुरु केली. आर्य समाजाची स्थापना 1875 यावर्षी दयानंद सरस्वती यांनी केली. हिंदू समाज संख्येने जास्त असूनही दुर्बल असल्याची खंत दयानंद सरस्वती यांना नेहमीच सतावत असे.

1920 साली हैदराबाद येथे आर्य समाजाची स्थापना झाली. पाहता-पाहता दोनशेहून अधिक शाखांचे जाळे राज्यात पसरले. प्रत्येक जिल्ह्यात संघटनेची शाखा सुरु झाली. निजाम राजवटीत विनायकराव कोरटर हे आर्य समाजाचे अध्यक्ष होते. आर्य समाज ही संघटना शिस्तप्रिय, ध्येयवादी होती. आर्य समाजाची स्थापना झाली तेव्हा खाकसार पार्टी, निझामसेना, इत्तेहादूल संघटना अशा संघटनांनी हिंदुविरोधात रान पेटवले होते. हिंदुंचा अनन्वित छळ मांडला होता. या संघटनांचा प्रतिकार करण्यासाठी, हिंदुंचे रक्षण करण्यासाठी आर्य समाज ही संघटना ठामपणे उभी राहिली. हैदराबाद राज्यातील संघटनेला बळ देण्यासाठी, निजामाचा प्रतिकार करण्यासाठी उत्तर प्रदेशातून अनेक कार्यकर्ते हैदराबाद राज्यात दाखल झाले होते. या कार्यकर्त्यांनी राज्यात जागोजागी आंदोलन उभारले. आर्य समाजाने उभारलेल्या निजामविरोधी आंदोलनाला भारतातील जनतेने पाठिंबा द्यावा, आंदोलनाची माहिती देशातील जनतेपर्यंत पोहचावी यासाठी सोलापूर येथे आर्य समाजाचे एक अधिवेशन पार पडले. माधवराव अणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात ‘हैदराबाद निषेध दिन’ पाळण्यात यावा असा ठराव घेण्यात आला. त्याप्रमाणे संपूर्ण हिंदुस्थानात निषेध दिन पाळण्यात आला. दिवसेंदिवस आर्य समाजाचे आंदोलन उग्र होत असल्याचे पाहून निजामही संतापत होता, चिडत होता. नानाविध मार्ग अवलंबून त्याने हे राज्यभर पसरलेले आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश येत नव्हते. उलट हे आंदोलन दिवसेंदिवस पसरत होते. आर्य समाजाच्या शाखा वाढत होत्या. या शाखांद्वारे हिंदुंना एकवटताना निजामाने बळजबरीने मुसलमान केलेल्या हिंदुंचे शुद्धीकरण करण्याचे कार्य हाती घेतले. ही चळवळ येथेच थांबली नाही तर इच्छुक मुसलमानांनाही वैदिक दीक्षा देऊन हिंदू धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केले. 17 जुलै 1939 यादिवशी निजाम शासनाने काही राजकीय सुधारणा जाहीर केल्या. या सुधारणासंदर्भात आर्य प्रतिनिधी मंडळाने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन निजाम सरकारने केल्यानंतर दोन वर्षे चाललेले आर्य समाजाचे आंदोलन स्थगित करण्यात आले.

अबला कसे म्हणू तुला?
‘‘पाणी… पाणी… पाणी द्या रे मला…!’’ धापा टाकत ती वृद्ध महिला त्या घरासमोर उभी राहून अक्षरशः याचना करीत होती.

धड उभे राहता येत नव्हते. अंग थरथर कापत होते. हातातील काठी लटलट कापत होती. त्या घरातील एक इसम दारात आला. एक क्षण त्या म्हातारीचे निरीक्षण केले आणि पटकन दार लावून घेतले. निराश झालेली ती वृद्धा शेजारच्या दारात गेली. तिने पुन्हा याचना करीत ‘पाणी…पाणी…’ अशी आर्त हाक दिली. दरवाजा लावलेला होता. हातातल्या काठीने तिने दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला परंतु जमिनीपासून काठी उचलली न उचलली की तिचा तोल गेला. ती समोरच्या भिंतीवर आदळत असताना काठीने पुन्हा जमिनीला स्पर्श केला आणि म्हातारीला आधार मिळाला. तितक्यात दार उघडले. म्हातारीच्या आशेचा दीप तेवला. दारात एक विवाहिता उभी होती.

‘‘काय झाले हो काकी?’’ तिने विचारले परंतु म्हातारीच्या तोंडातून फक्त ‘पाणी…पाणी’ हे दोन शब्द महत्प्रयासाने बाहेर पडले.

‘‘थांबा हं. आणते पाणी…’’ ती महिला म्हणत असताना तिथे पोहचलेल्या तिच्या नवर्‍याने विचारले, ‘‘ए भवाने, कुणाला पाणी देतेस तू?’’

‘‘अहो, असे काय करता? त्या तुमच्या काकू आहेत. बघा पाण्यावाचून त्यांची कशी अवस्था झाली आहे ती. पिऊन पिऊन किती पिणार? मुश्कीलीने दोन घोट…’’

‘‘प्रश्‍न दोन घोट किंवा रांजणभर पाण्याचा नाही तर निजामाच्या हुकुमाचा आहे. काकीला कुणी अन्न, पाणी देऊ नये असा हुकूम आहे सरकारचा…’’ असे म्हणत त्याने बायकोला आत ओढले आणि खाडकन दार लावून घेतले. निराश झालेली वृद्ध स्त्री लटपटत मागे फिरली. समोर एक विहीर होती. महिलेची आशा पाणवली. ‘आता तर पाणी मिळेल. आता कोण अडवेल?’ असे म्हणत ती त्या विहिरीकडे निघाली पण दुसर्‍या क्षणी तिच्या डोक्यात एक विचार सर्रकन शिरला,

‘विहीर आहे. पाणी आहे पण पाणी शेंदण्यासाठी आपल्याजवळ तेवढी शक्ती नाही….’ विकलांग अवस्थेत ती वृद्धा तिथेच जमिनीवर टेकली…

  कोणती चूक केली होती त्या म्हातारीने की, ज्यामुळे तिला घोटभर पाण्यासाठी तरसावे लागत होते? त्या म्हातारीच्या मुलाने म्हणजे हणमंत मल्लप्पा बिराजदार यांनी किसानदलास मदत केली म्हणून त्याला निजामाच्या पोलिसांनी पकडले आणि कोणतीही शहानिशा न करता, हणमंताला काहीही न बोलू देता उचलून पेटलेल्या जाळात फेकले. ते पाहून हणमंताचे वडील मल्लप्पा त्यांच्या पायाशी लोळण घेत म्हणाले, ‘‘वाचवाऽऽ हणमंताला वाचवाऽऽ! वाटले तर मला जाळा…’’ अशी विनवणी करणार्‍या मल्लप्पा यासही निर्दयीपणे मारुन दूर जंगलात नेऊन फेकून दिले. हणमंताच्या आईला वाळीत टाकण्याचे फर्मान निघाले…

  मुक्तिलढ्यात भाग घ्यायचा म्हणजे घरावर, संसारावर तुळशीपत्र ठेवण्यासारखे आहे हे माहिती असूनही, जिवाला प्रत्येक क्षणी धोका आहे हे माहिती असूनही अनेक रणरागिणी या लढ्यात उतरल्या. एकप्रकारे देशासाठी आत्मबलिदान करण्याची त्यांची तयारी होती. घरातील व्यक्ती, नवरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोटच्या पोरांचा निरोप घेताना त्या महिलांच्या मनाची काय घालमेल झाली असावी? अक्षरशः छातीवर दगड ठेवून त्यांनी मुलांचा निरोप घेतला असावा. सरकारच्या निषेध मोर्चात सहभागी होणे, गुप्तपत्रके वाटताना ती पत्रके इतरांच्या विशेषतः सरकारशी संबंधित कुणाच्या हाती न पडण्याची दक्षता घेणे, शस्त्रास्त्रे आणणे-नेणे, कार्यकर्त्यांचा निरोप एकमेकांपर्यंत पोचविणे, भूमिगत राहून काम करणारा कुणी कार्यकर्ता आला तर त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, आंदोलनात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाबाळांची, त्यांच्या घरातील वृद्धांची काळजी घेणे इत्यादी अत्यंत महत्त्वाची, जोखमीची, धाडसाची कामे महिलांसोबत अनेक विद्यार्थीनीही करत असत. मोर्चात सहभागी झालेल्या स्त्रियांना शिक्षा म्हणून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकून देण्याचे अत्यंत नीच काम निजामाचे पोलीस करत असत. काही वेळा सहभागी बायकांसोबत त्यांची लहान मुले असायची. त्यावेळी निर्दयी वृत्तीचे पोलीस त्या गोजिरवाण्या लेकरांच्या केसाला पकडायचे आणि ट्रकमध्ये फेकून द्यायचे…

  अटर्गा या गावातील यशवंतराव सायगावकर हे गृहस्थ मागावर असलेल्या पोलिसांना चुकवत चुकवत गावाच्या बाहेर पडले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गावाबाहेरील एका ओढ्याजवळ यशवंतराव पोहोचले. त्या ओढ्यात एक स्त्री कपडे धूत होती. पळणारा माणूस आणि दूर अंतरावर पाठलागावर असलेले पोलीस पाहताच त्या बाईने ओळखले की हा माणूस निजामाचा दुश्मन आहे. तिने इकडे-तिकडे पाहिले. पोलीस जवळ येत असल्याचे पाहून तिने यशवंतरावांना ‘डुबकी मारा’ असे खुणावले. ते पाहून यशवंतरावांनी पाण्यात डुबकी मारली आणि दुसर्‍या क्षणी पोलीस तिथे आले. त्यांनी आजूबाजूला पाहिले. तिथे कुणी दिसत नव्हते. ओढ्यात धुणे धुणार्‍या बाईला त्यांनी विचारले,

  ‘‘ए बाई, इथे कुणी माणूस आला होता का?’’

  ‘‘व्हय की. एक माणूस धापा टाकत पळत आलता. खूप घाबरलेला होता. दोन घोट पाणी पिला आन् तिकडे पळत गेला…’’ ती बाई विरुद्ध दिशेला हात दाखवत म्हणाली. हेतू हा की, पोलिसांच्या हाती तो माणूस लागणार नाही. ते ऐकून पोलीस तिकडे पळत सुटले. पाण्यात डुबकी मारलेले यशवंतराव बाहेर आले. तसे त्या बाईने यशवंतरावांना ‘मागे या’ असे खुणावले आणि त्याप्रमाणे ते बाईच्या मागोमाग तिच्या घरी पोहोचले. ती स्त्री धनगर समाजाची होती. घरी पोहोचताच त्या स्त्रीने वडिलांचे धोतर, बाराबंदी आणि रुमाल यशवंतरावांना दिला. तो पोशाख चढवताच तिने त्यांच्या खांद्यावर एक जुनी घोंगडी टाकली. यशवंतराव यांचा तो पोशाख पाहून त्यांना कुणी ओळखू शकणार नव्हते. त्या महिलेचा कृतज्ञतेने निरोप घेत असताना यशवंतरावांच्या मनात सळसळत्या विजेप्रमाणे एक विचार शिरला,

  ‘मला एखाद्या बहिणीप्रमाणे मदत करताना या स्त्रीला कुणी पाहिले असते तर? हिने स्वतःचा जीव धोक्यात घातला म्हणून मी वाचलो. धन्य आहे ही स्त्री…’ असा विचार करत साश्रू नयनांनी त्या स्त्रीकडे बघत यशवंतरावांनी त्या महिलेचा निरोप घेतला…

  किसानदलाचे काही शूरवीर शस्त्रास्त्रे घेऊन सोलापूर येथून तोंडचिर या गावी निघाले होते. निजामाच्या पोलिसांना किंवा रझाकारांना सुगावा लागू नये म्हणून ही मंडळी सहसा रात्री प्रवास करीत असत. दिवसा जंगलात किंवा कुणी आश्रय दिला तर गढीत विसावा घेत. शेळगी गावात हे वीर विश्रांतीसाठी थांबले होते. गावच्या पाटलीण त्रिवेणीबाईंनी थकलेल्या कार्यकर्त्यांना जेवण दिले. किसानदलाचे कार्यकर्ते या गावात आहेत हे समजताच पोलिसांनी गावाला घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला. एक पोलीस किसानदलाच्या कार्यकर्त्याच्या गोळीबारात बळी पडला. ते पाहून दुसरे पोलीस रणांगण सोडून पळून गेले. सारे कार्यकर्ते आनंदी झाले पण तिथे थांबणे धोक्याचे आहे हे ओळखून कार्यकर्ते निघण्याची तयारी करत असताना त्रिवेणीबाई तिथे आल्या. सोबत आणलेली सात हजाराची रोकड आणि काही चांदीची नाणी कार्यकर्त्यांजवळ देत म्हणाल्या, ‘‘हे सारे तुमच्या कामासाठी वापरा. मला ह्या धनाची काही एक गरज नाही. माझ्याजवळ ठेवली तर रझाकार सारी धनदौलत तर लुटतीलच सोबत माझी अब्रूही लुटतील. त्यापेक्षा मीही तुमच्यासोबत येते. माझ्या हातून चार-दोन रझाकारांचा मुडदा पडला तर माझे जीवन सार्थकी लागेल…’’

 1. असे म्हणत त्रिवेणीबाई किसानदलाच्या आंदोलकांसोबत निघाल्या.

  महिलांच्या अब्रुशी खेळणार्‍या निजामाच्या हस्तकांना अनेक स्त्रियांनी चांगलाच धडा शिकविल्याची अनेक उदाहरणे आहेत. सोनूबाई नावाच्या एका महिलेवर एका जमादाराचा डोळा होता. तो नेहमी तिला घाणेरडे इशारे करत होता पण सोनुबाई प्रतिसाद देत नाही हे पाहून जमादाराने पुढील पाऊल टाकले. त्यादिवशी दुपारचे चार वाजत होते. सोनुबाई आडावर एकटीच पाणी भरत असल्याचे पाहून जमादार तिथे पोहोचला. त्याने अगोदर सोनुबाईला इशारा केला. सोनुबाईनेही त्यादिवशी मनात काही वेगळेच ठरवले होते. सोनुबाईने हसत, लाजत जमादारास प्रतिसाद दिला. ते पाहून जमादार हरखून गेला. तो आनंदाने सोनूबाईच्या मागे निघाला. एका बोळीत सोनूबाई शिरली. पाठोपाठ आलेल्या जमादारास ती म्हणाली, ‘‘मी जरा वेळाने शेतात जातेय. तिथे कुणी नाही. तुम्ही या तिकडे…’’ असे म्हणत लाजत सोनूबाई घरात शिरली. अनेक दिवसांची तपश्चर्या फळास आलेली पाहून हवेत तरंगत जमादार घरी आला. लगेचच तयार होऊन तो सोनूबाईच्या शेताकडे निघाला. गावाबाहेर पडताच त्याला शेताकडे जाणारी सोनूबाई दिसली. जमादाराच्या आनंदाला भरती आली. समोर चालणारी सोनूबाई शेतात पोहोचली. क्षणभर थांबली. जमादाराकडे बघून हसली. जमादाराच्या पायाला जणू भिंगरी लागली. तो झपाट्याने निघाला. सोनूबाई कडब्याच्या गंजीत शिरली. गंजीजवळ पोहोचलेल्या जमादाराने इकडे-तिकडे पाहिले आणि तोही आत शिरला. सोनूबाईकडे झेपावणारे जमादाराचे हात त्याला काय होतंय हे समजण्यापूर्वीच खांद्यापासून विलग झाले. पूर्वनियोजनानुसार त्या खोपीत चार-पाच तरुण दबा धरून बसले होते. जमादाराने खोपीत प्रवेश करताच ते जमादारावर तुटून पडले. हातात आलेल्या कोयत्याने सोनूबाईनेही जमादारावर अनेक वार करून त्याला यमसदनी पाठवले.

  निजामाच्या विरोधात अनेक महिला धाडसाने, जिवावर उदार होऊन लढल्याची खूप उदाहरणे आहेत. प्रत्येक प्रसंगाची नोंद घेणे शक्य नाही परंतु काही धाडसी महिलांच्या नावाचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे… गोदावरीबाई टेके, रुक्मिणीबाई कोरडे, गीताबाई विनायकराव चारठाणकर, काशी मराठे, शशिकला बाम, सांबाबाई बीरा, पोसानीबाई राजांलग, आशाताई वाघमारे, बाळूबाई गंगूलाल, पानकुंवर कोटेचा, सत्यवती श्राफ, माई अंबडकर, लक्ष्मीबाई बाळाजी मयेकर, चंदा जरीवाला, शांताबाई पेडणेकर, नागव्वाबाई नागय्या अंबेसंगे, विमलाबाई मेलकोटे, ग्यानकुमारी हेडा, उषा पांगरीकर, विमलबाई मेलकोटे, सीताबाई नांदापूरकर, अहिल्याबाई, कुसुम जोशी, चंदा भागवत, प्रमिला कुलकर्णी, कमल रांजणीकर, गोदावरीबाई धानोरकर, शकुंतलाबाई साले, शांताबाई कोटेचा, शैलजा गोगटे, सुशीला दिवाण, सरस्वतीबाई बोरीकर, दगडाबाई शेळके, सुलोचना बोधनकर, प्रतिभाताई वैशंपायन, करुणाबाई चौधरी इत्यादी अनेक महिलांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात अतिशय मोलाचे असे योगदान दिले आहे. यातून एक सिद्ध होते की, अबला हा शिक्का बसलेल्या बायका प्रसंगी दुर्गावतार घेऊन पुरुषांच्या बरोबरीने कोणतेही, जिवावर बेतणारे कार्य करताना मागेपुढे न पाहता योगदान देतात.

  उमरी बँकेची लूट!
  हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामात ठिकठिकाणी अनेक आंदोलने झाली. काही ठिकाणी सशस्त्र चळवळी झाल्या. उमरी! मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात असलेले एक गाव! या गावात झालेल्या आंदोलनाची आणि त्यातून उमरी बँकेची केलेली लूट हा या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख अध्याय! ही बँक लुटली. ती का लुटली याची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. उमरी येथे रझाकारांचा पडाव होता. 16 डिसेंबर 1946 यादिवशी सायंकाळी एक रझाकार एका किराणा दुकानावर गेला. त्याने एक काड्याची पेटी विकत घेतली. दुकानदाराने केवळ एक पैसा किंमतीपेक्षा जास्त घेतला. त्यामुळे रझाकार चिडला. त्याने इतर रझाकारांच्या मदतीने त्या दुकानावर हल्ला करून ते दुकान लुटले.

  काय घडतेय हे पाहण्यासाठी दुकानाजवळ राहणारे मुदखेडकर घरातील दोन भाऊ घराबाहेर आले. वास्तविक दोघांचाही त्या घटनेशी काहीही संबंध नव्हता पण दोघा भावांना पाहताच रझाकारी चाऊसने त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यात मोठे बंधू दिगंबरराव हे जखमी झाले तर दुर्दैवाने लहाना भाऊ दत्तात्रय गोळी लागून जागेवरच ठार झाला. जखमी झालेल्या दिगंबरराव यांना दवाखान्यात नेण्यात आले. औषधोपचार घेऊन दिगंबरराव घरी पोहोचले न पोहोचले तोच पोलिसांनी त्यांना अटक केली. कारण काय तर म्हणे त्यांनी लहान्या भावाचा म्हणजे दत्तात्रय यांचा खून केला. ‘गुन्हा कुणाचा, शिक्षा कुणाला?’ या घटनेमुळे उमरी गावातील तरुण चिडले. पंचक्रोशीतील गावातही या घटनेचे पडसाद उमटले. त्याचवेळी उमरखेड येथे हैदराबाद स्टेट कॉंग्रेसच्यावतीने एक कँम्प चालू होता. या प्रशिक्षणात हत्यार चालविण्याचे शिक्षण दिले जात होते. तिथे असा निर्णय घेण्यात आला की, दत्तात्रय मुदखेडकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी उमरी येथील बँक लुटायची. या लुटीत मिळालेला पैसा स्वातंत्र्यसंग्रामासाठी देण्याचे ठरविण्यात आले. पूर्वतयारी म्हणून रायफली आणि बंदुका आणण्यात आल्या. या कामगिरीसाठी 12 जानेवारी 1948 ची मध्यरात्र ठरवण्यात आली. उमरखेड येथून शस्त्रधारी तरुणांची एक तुकडी उमरी गावात दाखल झाली. तीस मैलाचे अंतर कापून उमरी गावात यायला त्यांना रात्र झाली. रात्रीच्या वेळी हल्ला केला तर कदाचित निष्पाप लोकांचाही त्यात बळी जाईल या विचाराने ती तुकडी माघारी फिरली. ती बातमी सर्वत्र पसरली. त्यामुळे निजामी पोलीस जागे झाले. पन्नास शस्त्रधारी पोलिसांनी बँकेभोवती कडे केले. काही हत्यारबंद पोलीस गस्तही देत होते.

  असा कडेकोट बंदोबस्त असताना बँकेत प्रवेश कसा करणार? तितक्यात एक घटना घडली. हदगाव तालुक्यातील तळणी येथील लोकांनी निजाम सरकारला सारा आणि लेव्ही देण्यासाठी नकार दिला होता. त्यासाठी एक पोलिसी पथक तळणी गावात दाखल झाले. त्यांनी तळणी गावातील सर्व दृष्टिने मजबूत असा एक वाडा ताब्यात घेतला.
  रात्रीची वेळ होती. आलेले पोलीस त्या वाड्याच्या गच्चीवर निवांत आराम करीत असताना बन्सीलाल तोष्णीवाल, साहेबराव देशमुख, नागनाथ परांजपे, आबासाहेब लहानकर, केशवराव शहाणे, शंकर शर्मा या तुकडीला तळणी येथे पोलीस मुक्कामी असल्याचे समजले. या सहा वीरांनी ताबडतोब तळणी गाठली. पोलीस आराम करीत असलेल्या वाड्याजवळ बाडसारखे एक कुंपण होते. हे सहा लोक तिथे दबा धरून बसले. बाजूला काही गावकरी शेकोटी पेटवून बसले होते. त्यांनी क्रांतिकारक आले असल्याची सूचना पोलिसांना देऊ नये म्हणून त्यांच्यावर बंदुका रोखल्या होत्या परंतु ती हालचाल गच्चीवर असलेल्या एका पोलिसाच्या लक्षात आली.

  ‘‘कौन है रे उधर?’’ त्या पोलिसाने दरडावून विचारले.

  ‘‘हम है सरकार, पहारेकरी! पहारा दे रहे है।’’ एकजण ओरडला. क्रांतिकारी शिपायांनी त्या लोकांना ‘कुणाला काही सांगाल तर गाठ आमच्याशी आहे’ असे बजावत सोडून दिले. मध्यरात्र झाली. सर्वत्र सामसूम झाली. वाड्याच्या बाजूला लपलेल्या त्या सहा शूरवीरांनी अचानक पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. झोपेतून जागे झालेले पोलीस गांगरले, घाबरले. महत्त्वाचे म्हणजे गच्चीवर जाताना पोलिसांनी बंदुकाही नेल्या नव्हत्या. भीतीपोटी ते खाली उतरत असताना त्यांच्यावर झालेल्या गोळ्यांच्या वर्षावात दोन पोलीस यमसदनी गेले तर बरेच पोलीस जखमी झाले. पोलिसांना काय झाले, कसे झाले, कोण आले होते, कुठून आले होते हे सारे समजायच्या आत क्रांतिकारकांची ती तुकडी आली तशी निघून गेली.

  दुसर्‍या दिवशी उमरी बँकेच्या संरक्षणासाठी आलेली खास तुकडी तळणी येथे पाठवण्यात आली. बँकेच्या संरक्षणासाठी उरले कोण तर उमरी पोलीस स्टेशनचे काही शिपाई, एक इन्स्पेक्टर, दोन अरब चाऊस आणि काही रझाकार! ही बदललेली परिस्थिती क्रांतिकारकांना फायदेशीर ठरली.

  30 जानेवारी 1948 हा दिवस उजाडला. पुन्हा उमरखेड येथील कॅम्पमधून एक सशस्त्र तुकडी उमरीच्या दिशेने निघाली. त्यांनी थेरबन या गावातून एक बैलगाडी भाड्याने घेतली. त्या बैलगाडीत जवळ असलेली सारी शस्त्रास्त्रे टाकून वर कडबा टाकला. पुढे कामन या गावी येताच नियोजनाप्रमाणे सारे क्रांतिकारक तीन गटात विभागण्यात आले. तीनही तुकड्या आपापल्या कामगिरीवर निघाल्या. त्याप्रमाणे उमरी रेल्वेस्थानकावर स्टेशनमास्तरांच्या खोलीत मोहन शर्मा, जगदीश आणि बाबूराव कुंटूरकर हे तरुण शिरले. त्यावेळी मास्तर खोलीत नसल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले. तरुणांनी वेळ न गमावता टेलिफोनच्या तारा तोडून टाकल्या. यामागे हेतू असा होता की, जी एक तुकडी बँकेवर हल्ला करणार होती त्या हल्ल्याची माहिती टेलिफोनच्या माध्यमातून शत्रूला समजू नये. पहिल्या तुकडीने सोपवलेली कामगिरी यशस्वीपणे बजावली.

  दुसर्‍या तुकडीचे नेतृत्व नागनाथ परांजपे यांच्याकडे होते. त्यांना स्थानिक नागरिक काशिनाथ शेट्टी हे मार्गदर्शक लाभले होते. या तुकडीने सरळ उमरी गावचे पोलीस ठाणे गाठले. ठाण्यातील वातावरण काहीसे गाफील होते. काही पोलीस बाहेर गेले होते. इन्स्पेक्टरही हजर नव्हते. पोलीस ठाण्यात केवळ तीन पोलीस होते. क्रांतिकारकांनी हवेत गोळीबार केला. पोलीस ठाण्यात शिरून पोलिसांची शस्त्रे ताब्यात घेतली. ते पाहून तिथले तीन पोलीस भीतीने थरथर कापत पळून गेले अशाप्रकारे दुसर्‍या तुकडीने त्यांच्यावर असलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

  शेवटची आणि निर्णायक कामगिरी करण्यासाठी तिसरी तुकडी सज्ज होती. या फळीत असलेले अनंत भालेराव, बाबासाहेब लहानकर, साहेबराव बारडकर, दिगंबर उत्तरवार, बन्सीलाल तोष्णीवाल, किशोर शहाणे, शंकरलाल शर्मा, धनजी पुरोहित, रघुनाथ पंडित इत्यादी लोक बँकेत शिरले. तोपर्यंत इतर दोन गटातील लोकही आपापली कामगिरी यशस्वीपणे पार पाडून तिथे पोहोचले. काही लोक सरळ शाखा व्यवस्थापकाच्या दालनात शिरले. रघुनाथ पंडित या वीराने बँकेचा मागचा दरवाजा बंद केला. संरक्षणासाठी असलेल्या अरब चाऊस याला गोळी घालून ठार मारण्यात आले. बँकेचा खजिनदार तिजोरीच्या चाव्या देत नाही हे पाहून त्याला यमसदनी पाठविण्यासाठी एक गोळी पुरेशी ठरली. ते पाहून दुसरा चाऊस जीव मुठीत धरून पळून गेला. शेवटचा हल्ला! बँकेची तिजोरी फोडून आतली सारी रक्कम सोबत आणलेल्या पोत्यांमधून भरण्यात आली. ती पोती बांधून गाडीत टाकली. फक्त पंचेचाळीस मिनिटाच्या या सशस्त्र कार्यवाहीत क्रांतिकारकांच्या हाती लाखो रुपयांचा खजिना आला. अशाप्रकारे उमरी बँक ऑपरेशन कमालीचे यशस्वी झाले. उमरी संग्राम हा एका सुनियोजित कार्यक्रम आणि त्याबरहुकूम कार्यवाहीचा उत्कृष्ट नमुना होता कारण नियोजनबद्ध काम करताना, आखणीनुसार अंमलबजावणी करताना थोडी जरी चूक झाली असती तरी अनेकांचे जीव धोक्यात आले असते. रेल्वेस्थानक, पोलीस ठाणे आणि बँक या तीन ठिकाणी झालेल्या कार्यवाहीची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी कावा’ या कारवाईशी केली तर ती अनाठायी ठरु नये…

  स्वामी रामानंद तीर्थ यांची महनीय कार्य!

   हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामात यशस्वी नेता, कणखर नेतृत्व, सुयोग्य नियोजन करणारे आणि या संग्रामात महनीय कार्य करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याची नोंद घेतल्याशिवाय, त्यांच्या कामगिरीचा अभ्यास केल्याशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासाची सांगता होणे कदापिही शक्य नाही! कोण होते हे थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ?

  स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी कर्नाटक प्रांतातील गुलबर्गा जिल्ह्यातील खेडगी या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर असे होते. स्वामी रामानंद आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या दोघांमध्ये एक फार मोठे साम्य होते ते म्हणजे दोघांचेही वडील संन्यासी होते आणि संन्यास घेतल्यानंतर पुन्हा प्रपंचात आले होते. दोघांनीही समाज उद्धारासाठी प्रचंड कार्य केले. स्वामी रामानंद यांचे प्राथमिक शिक्षण खेडगी या गावी झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी नॉर्थकोट हायस्कूल, सोलापूर येथे प्रवेश घेतला. परकीय शक्तीविषयी कमालीचा तिरस्कार आणि देशभक्तीची प्रचंड आवड त्यांना शालेय शिक्षणात निर्माण झाली. शाळेत शिकत असताना गांधी टोपी घालण्याचा प्रघात होता परंतु शाळेच्या मुख्याध्यापकांनी ‘शाळेत टोप्या घालायच्या नाहीत’ असा आदेश काढला! पण एकाही विद्यार्थ्याने टोपी काढली नाही. एकप्रकारे ते ‘असहकार आंदोलन’ होते आणि त्या आंदोलनाचा प्रणेता होता व्यंकटेश अर्थात रामानंद तीर्थ! भविष्यात कराव्या लागणार्‍या आंदोलनाचा श्रीगणेशा जणू बालवयातच झाला. आंदोलनाचे बाळकडू स्वामींना बालवयात कसे मिळाले ह्याचे एक उदाहरण म्हणजे स्वामी प्राथमिक शाळेत असताना विद्यार्थ्यांनी युनियन जॅकचा झेंडा अंगरख्यावर लावावा असा दंडक होता परंतु व्यंकटेश यांनी हा कायदा, नियम कधीच पाळला नाही.

  1 ऑगस्ट 1920 यादिवशी घडलेल्या एका घटनेने स्वामी प्रचंड निराश झाले कारण या काळ दिवसाने त्यांचे प्रेरणास्थान, आराध्य दैवत असलेले बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक ह्यांना हिरावून नेले होते. रामानंद खूप उदास झाले. मागचा-पुढचा, कोणताही विचार न करता स्वामींनी आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आणि जन्मभर ते त्यावर ठाम राहिले. 1929 या वर्षी स्वामींनी अंमळनेर येथील महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मध्यंतरी त्यांची महात्मा गांधी यांच्याशी पहिली भेट सोलापूरच्या रेल्वेस्थानकावर झाली. त्या घटनेमुळे आणि गांधीजीच्या विचारसरणीमुळे, कार्यामुळे ते गांधीजींकडे आकृष्ट झाले. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुणे येथील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

  1929 यावर्षी रामानंद हे सोलापूर जिल्ह्यातील हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेत मुख्याध्यापक या पदावर उपस्थित झाले. 1930 साली रामानंद यांची भेट स्वामी नारायण तीर्थ यांच्याशी झाली. त्यांच्या विचाराने, कार्यप्रणालीने रामानंद खूप प्रभावित झाले. पुढे चालून स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंद यांना दीक्षा दिली. तो दिवस म्हणजे 14 जानेवारी 1932! सन 1935 पर्यंत त्यांनी हिप्परगा या शाळेत अत्यंत उत्कृष्ट कार्य केले. त्यानंतर स्वामी अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी नूतन विद्यालयात राष्ट्रीय शाळेत हजर झाले. या विद्यालयात स्वामींनी राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविण्याचे महान कार्य केले. या शाळेचे संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे वंदे मातरम् चळवळ, खादीचा प्रसार, हैदराबाद मुक्तीसंग्राम यासारख्या जनहित चळवळी यशस्वीपणे राबविता आल्या.

  स्वामीजींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव, त्यांनी विद्यार्थ्यांवर केलेले सुसंस्कार, संन्यस्तवृत्ती, जीवनातून त्यागलेले ऐहिक सुख या सर्वांचा एक आगळावेगळा ठसा त्यांच्या सान्निध्यात आलेले विद्यार्थी, शिक्षक आणि जनता यांच्या मनात खोलवर उमटला. ‘स्वातंत्र्यासाठी सर्वस्व देणारी’ अशी एक पिढी निर्माण झाली.

  1937 यावर्षी स्वामींची निवड महाराष्ट्र परिषद, लातूर या संस्थेचे चिटणीस म्हणून झाली. पाठोपाठ म्हणजे 1938 साली रामानंद यांनी अंबाजोगाई विद्यालयातील नोकरी सोडली आणि ते हैदराबाद येथे गेले. 29 जून 1938 रोजी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना झाली. या पक्षाची पहिली आमसभा 9 सप्टेंबर 1938 ला घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे आमसभेची तयारी सुरू असताना निजाम सरकारने 8 सप्टेंबर 1938 ला हैदराबाद स्टेट कॉंग्रेसवर बंदी घातली. हा प्रकार घडताच सारे जण संतापले. निजामाच्या अशा क्रूर, निर्दयी, पाशवी कृत्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसने सत्याग्रह करण्याचे ठरवले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्याचे ठरले. अशाप्रकारे स्वामींना निजामाच्या विरोधात रणशिंग फुंकण्याची संधी मिळाली. जणू निजामाच्या जुलमी राजवटीचा अंत करण्याची ती सुरुवात ठरली. हैदराबादमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या आंदोलनातून स्वामीजींनी केवळ हैदराबाद शहरातीलच जनतेला नव्हे तर हैदराबाद राज्यातील रयतेला एक संदेश दिला की, हिंसेतूनच नव्हे तर महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक विचारसरणीतून निजामशाहीविरुद्ध मोठे आंदोलन उभारता येऊ शकते, जुलमी जाचातून जनतेला मुक्त करता येते. तसा आत्मविश्वास, तशी आशा या आंदोलनातून जनतेच्या मनात निर्माण झाली हे या चळवळीचे फार मोठे फलित होते. यानंतर स्वामींनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले. काही वेळा त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला. त्यांचे हे कार्य पाहून गांधीजींनी हैदराबाद येथून ज्या चार जणांची उत्कृष्ट सत्याग्रही म्हणून निवड केली त्यात स्वामीजीही होते. हा फार मोठा बहुमान होता परंतु निजाम सरकारला हा बहुमान देखवला नाही. त्याने स्वामींचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी स्वामीजींना वर्षभरासाठी तुरुंगात टाकले…

  15 सप्टेंबर 1941 ला रामानंद तुरुंगवास भोगून बाहेर आले. तो काळ म्हणजे 1942 चा ‘भारत छोडो’ हा इंग्रजांना निर्वाणीचा इशारा देणार्‍या आंदोलनाचा होता परंतु हैदराबाद राज्यातील जनता काहीशी द्विधा मनःस्थितीत होती. ते ओळखून स्वामीजींनी आवाहन केले की, ‘‘1942 च्या भारत छोडो आंदोलनात हैदराबाद राज्यातील जनतेने पारतंत्र्याच्या विरोधातील हा शेवटचा लढा समजून सहभाग घ्यावा. हैदराबाद हा भारताताच भाग आहे. दोघांचेही स्वातंत्र्य एकच आहे.’’ \

  या आंदोलनासाठी व्यापक चळवळ उभारणार्‍या स्वामींना निजामाने पुन्हा अटक केली.

  8 सप्टेंबर 1938 यादिवशी निजाम सरकारने स्टेट कॉंग्रेसवर घातलेली बंदी तब्बल आठ वर्षांनंतर म्हणजे 3 जुलै 1946 यादिवशी उठवली. यानंतर हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची पुनर्रचना करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर स्वामींनी हैदराबाद मुक्ती आंदोलन अधिक तीव्र केले. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस जवळ येत होता. विविध संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे यासाठी 7 ऑगस्ट 1947 हा शेवटचा दिवस जाहीर केला होता. अनेक संस्थानं भारतीय प्रजासत्ताकात विलीन होत होती परंतु निजामाचा एकत्रीकरणास प्रचंड विरोध होता. त्यामुळे स्वामीजींनी ‘करा अथवा मरा’ असा नारा देऊन आंदोलन अधिक तीव्र केले. दुसरीकडे सातव्या निजामाने पंडित नेहरू, सरदार पटेल यांचे न ऐकता, त्यांच्या प्रस्तावाला नकार देत ‘आझाद हैदराबाद’ या राज्याची घोषणा केली. त्यामुळे हैदराबाद राज्यातील जनता प्रचंड संतापली. स्वामींनी दिलेल्या ‘अभी नही तो कभी नही’ यातले मर्म जाणले. सोबत हेही ओळखले की, हैदराबाद राज्य 7 ऑगस्ट 1947 पर्यंत भारतात सामील झाले नाही तर पुढे भविष्यात ते कधीच घडणार नाही. आपणास निजामाच्या जुलमी राजवटीत अख्खे आयुष्य काढावे लागणार! दुसरीकडे निजामाच्या हेकेखोर घोषणेचा निषेध म्हणून 7 ऑगस्ट हा दिवस ‘झेंडा दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. हैदराबाद राज्यातील जनतेने या घोषणेला सहर्ष, सक्रिय पाठिंबा दिला. या दिवशी राज्यातील गावागावातून तिरंगा ध्वज फडकावून, उत्साही वातावरणात प्रभातफेर्‍या काढल्या. ध्वजवंदन झाले. स्फूर्तीगीते, घोषणांनी अवघे हैदराबाद स्टेट दुमदुमून गेले. स्वतः स्वामी रामानंद तीर्थ ह्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवताना थेट निजामाच्या नाकावर टिच्चून, त्याच्या नाकासमोर म्हणजे सुलतान बाजार हैदराबाद येथे मोठ्या दिमाखात तिरंगा ध्वज फडकावला आणि निजामाचे लक्ष वेधून घेतले. जनतेमध्ये उत्साह, चैतन्य, स्फूर्ती, आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वामींसारखा या आंदोलनाचा नेता, प्रणेता आपल्या सोबत आहे, हा नेता केवळ घोषणा देऊन, नारेबाजी करून थांबत नाही तर सर्वांच्या समोर राहून, कार्यकर्त्यांसोबत राहून आंदोलन करतो हा एक संदेश राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हेतू त्यामागे होता आणि स्वामी त्यात कमालीचे यशस्वी झाले.
  ह्या आंदोलनाची महती जनतेला पटावी, जनतेला भारतीय प्रजासत्ताकाचे महत्त्व पटावे, लोकशाहीची महती लक्षात यावी यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी एक संदेश प्रस्तुत केला. त्यांनी एक घोषणा दिली की, ‘जिम्मेदाराना हुकुमत लेके रहेंगे!’ ही घोषणा म्हणा, संदेश म्हणा किंवा नारा असेल पण त्यातला मतितार्थ, गर्भितार्थ फार मोठा होता. या एका वाक्यात स्वामींना म्हणायचे होते, ‘सध्याची हैदराबाद राज्यातील निजामाची राजवट ही जिम्मेदारीची नाही. ती हुकुमशाही आहे. नकारात्मक आहे. जुलमी आहे. खुनी आहे. देशद्रोही आहे. जनताविरोधी आहे. पापी आहे. अशी राजवट उखडून फेकणे, तिचा अंत करणे गरजेचे आहे. ही राजवट उलथवून टाकून आपले, आपण चालवलेले, आपल्या हिताचे, आपल्या माणसांचे, आपल्या माणसांसाठीचे सरकार असणे आवश्यक आहे. त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. एक जिम्मेदार, जनतेचे हित जाणणारे, विकासाची जाण, दृष्टी असणारे सरकार आणण्यासाठी आपण एक होऊया. लढूया. मरण आले तरी बेहत्तर पण या गैरजिम्मेदार निजामाचा अंत करुया.’
  या सोबत स्वामीजींनी युवकांनाही आवाहन केले. युवकशक्तीमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतावे या उद्देशाने स्वामी म्हणाले,

  ‘‘युवकांनो, लक्षात ठेवा की जुलूम आणि अन्याय यांचा प्रतिकार करणे हीच ईश्वरभक्ती आहे. देश तुमच्या पुरुषार्थाला आवाहन देत आहे. काही तरी करण्याची हाक देत आहे. जगभरच्या तरुणांनी आपापल्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले आहे. आताच्या क्षणी तुम्ही कराल तेवढा त्याग कमीच ठरणार आहे. देशाच्या हाकेला कृतीने ओ द्या आणि हे ध्यानात ठेवा की, विद्यमान परिस्थितीचे मूळ राजकीय प्रश्‍नात आहे. इतरत्र त्याचा शोध करु नका. पेटलेली ही ज्योत तेवत ठेवा. आमच्याकडून अर्धवट सुटलेले सूत्र तुम्ही त्याच वृत्तीने स्वीकारा. अडचणी आपला मार्ग रोखू शकत नाहीत हे स्मरणात ठेवा. जवळचे आणि दूरचे ऋणानुबंधी रडतील, आकांत करतील तरी मागे वळून बघू नका. पुढे आणि पुढेच चालत रहा! तोच आपला मार्ग होय.’’

  ही सरळ सरळ निजामाविरुद्ध चिथावणी होती. सरकार विरोधात केलेले बंड होते. निजामाला, त्याच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान, लावलेला सुरुंग कसा सहन होणार? ही चळवळ, हे बंड थोपविण्याचा त्याच्याजवळ एकच मार्ग होता. तो त्याने अवलंबिला. हैदराबाद मुक्ती आंदोलनाचे प्रमुख, स्टेट कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांना निजामाने 26 जानेवारी 1948 रोजी पकडून तुरुंगात टाकले पण त्यामुळे का चळवळ थंडावणार होती? आंदोलन का शमणार होते? नेता तुरुंगात असला म्हणून का कार्यकर्ते शांत बसणार होते? मुळीच नाही! स्वामींच्या अटकेने केवळ कार्यकर्तेच नाही तर जनता पेटून उठली. स्वतः स्वामी शांत बसले नाहीत. त्यांनी तुरुंगातून सूत्रं हलवायला सुरुवात केली. दिगंबरराव बिंदू यांच्या नेतृत्वाखाली एक कृतिसमिती नेमण्यात आली. या समितीच्या हे लक्षात आले की, सशस्त्र लढा उभारण्याशिवाय गत्यंतर नाही, दुसरा मार्ग नाही. हातात शस्त्र घेऊन मैदानात उतरण्याची आवश्यकता महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे होते; कारण महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते. त्यांना हिंसा, कुणाचे रक्त सांडलेले आवडत नव्हते. स्वामी रामानंद यांनी या दोघांसमोर कृतिसमितीची बाजू स्पष्ट करताना सांगितले की, ‘‘निजामाची राजवट ही कायद्याचे पालन करणारी नाही. मुळात निजामाचे कायदे हे जनविरोधी आहेत. हैदराबाद राज्यात अत्याचार, हिंसा, जातीयवाद प्रचंड प्रमाणात फोफावला असून सरकारची त्यास मूकसंमती आहे. अशा राक्षसी वृत्तीच्या, जुलमी, हुकुमशाही सरकारविरोधात सविनय, अहिंसात्मक लढा उभारुन काहीही फरक पडणार नाही. अशा आंदोलनांनी निजाम बधणार नाही. तो सिंहासन सोडणार नाही. हैदराबाद मुक्ती करायची असेल तर सर्व मार्गानी लढा देणे गरजेचे आहे, अपरिहार्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यानंतरचा लढा अहिंसात्मक ठेवणे अशक्य आहे. तो तसा ठेवता येणार नाही.’’

  स्वतःची बाजू गांधीजींसह सर्व नेत्यांना समजावून देण्यात स्वामीजी यशस्वी ठरले आणि लगोलग पुढील नियोजन झाले. सशस्त्र लढा या कार्यवाहीसाठी कृतिसमितीसमोर तीन महत्त्वाची कामे होती. (1) लोकांच्या शक्तीला नीट वळण लावणे. (2) हा लढा अंतिम आणि सर्वंकष बनविणे. (3) संस्थानाबाहेरील लोकशाहीनिष्ठ शक्तींची मदत मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे.

  संमती मिळाली. निर्णय झाला. नियोजन झाले. कार्यवाही सुरू झाली. त्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या जनशक्तीला एकत्र आणणे, त्यांना आंदोलनाचे महत्त्व पटवून देणे, हैदराबाद स्टेट बाहेर असलेल्या देशभक्तांना या आंदोलनात सहभागी करून घेणे ही महत्त्वाची कामे करताना आंदोलकांनी संस्थानात राहून भूमिगत कार्य करावे. आपल्या कामामुळे निजाम संतापून आपल्या कुटुंबातील व्यक्तींना त्रास देऊ शकतो म्हणून आपले कुटुंब संस्थानाच्या बाहेर सुरक्षित स्थळी ठेवावे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात असणारी रझाकारांची केंद्रे, केंद्रात असलेले रझाकार आणि त्यांच्याजवळ असलेला शस्त्रसाठा यांची इत्यंभूत माहिती असावी. आपल्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे कायमचे पत्ते जवळ असावेत. शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर, प्रत्यक्ष शस्त्र हाती आल्यानंतर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत सुस्पष्ट सूचनाही देण्यात आल्या. त्यानुसार व्यक्तिगत द्वेषामुळे हल्ले करु नयेत. कोणत्याही मालमत्तेची आणि मनुष्यहानी होणार नाही हे पहावे. कोणालाही विनाकारण त्रास होणार नाही हे बघावे.

  सशस्त्र प्रतिकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रपुरवठा करण्यात आला. हल्ला करण्यासाठी एक मार्गदर्शक नियमावली आणि कार्यक्रम देण्यात आला. त्याप्रमाणे पोलीस ठाणे अग्रक्रमाने निवडून त्यावर हल्ला करावा. तिथली शस्त्रे जप्त करून ती आपल्या कार्यकर्त्यांना देणे, धान्य साठवलेली गोदामं लुटून ते धान्य गोरगरीब जनतेस वाटून देणे, आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या रझाकारांच्या केंद्रांवर हल्ले करून तेथील कू्ररकर्मी दुश्मनांना जेरीस आणणे!
  शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी सोलापूर येथील विमलचंद गांधी मिलमध्ये हातबॉंब तयार करण्याचा कारखाना सुरु झाला तर उमरगा येथे नागणे गुरुजी, तुळजापूर तालुक्यातील नांदुरी या गावात जनार्दन भोकरे आणि व्यासाचार्य औसेकर यांनी हातबॉंब बनवायला सुरुवात केली. दुसरीकडे एस. एम. जोशी, ना. ग. गोरे या नेत्यांनी या सशस्त्र क्रांतीसाठी मदत केली. ही सारे शस्त्रास्त्रे या कालावधीत निर्माण केलेल्या वागदरी कॅम्प (सरासरी शंभर सैनिक), गौडगाव कॅम्प (जवळपास एकशे पन्नास सशस्त्र कार्यकर्ते), चाळीस सत्याग्रही असलेला खर्डा कॅम्प, शंभर स्वातंत्र्यसैनिक असलेला तडवळ कॅम्प, चिंचोली कॅम्प, केसरजवळगा कॅम्प (पंचवीस सैनिक), दुधनी कॅम्प, अणूर कॅम्प, मुस्ती कॅम्प, दीडशेहून अधिक शस्त्रधारी असलेला काजळा कॅम्प, लोणी कॅम्प (पंचवीस सैनिक), व्याड कॅम्प र्(ींरव लराि), देऊळगाव राजा कॅम्प, जांभोरा कॅम्प, भोगिलडा कॅम्प, डोंगरसवली कॅम्प, पोफळी कॅम्प, वाघोली कॅम्प, पाथर्डी कॅम्प (150 सैनिक), डोमरी कॅम्प (150 सैनिक), वाशीम कॅम्प, आगळगाव कॅम्प, टोका कॅम्प (125 सैनिक), धानोरा कॅम्प, कडा कॅम्प (125 सैनिक), शेंदुर्णी कॅम्प (125 सैनिक), खिळद कॅम्प (100 स्वातंत्र्यसैनिक), अंबेजवळगा कॅम्प (60 सैनिक) इत्यादी विशेष सैनिकी कॅम्पवर असणार्‍या कार्यकर्त्यांकडे देण्यात आली. या सर्व सशस्त्र आंदोलकांनी जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता निजामाच्या तोंडचे पाणी पळवले.
  सुनियोजित कार्यक्रमानुसार प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली. सरकार दरबारी सारा, लेव्ही देणे बंद करण्यात आले. शिंदीची झाडे हा सरकारी उत्पन्नाचा फार मोठा स्त्रोत होता. शिंदीच्या झाडांची प्रचंड प्रमाणात कत्तल करण्यात आली. शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये बंद पाडून बहिष्कार टाकण्यात आला. गावातील पाटील, कुलकर्णी यांनी राजीनामे दिले. रेल्वे वाहतूक बंद पाडण्यात येऊ लागली. सडक वाहतुकीवर अडथळे टाकण्यात आले. गावातील सरकारी नोकर, पोलीस यांचा सरकारशी संपर्क होऊ नये म्हणून वीज तोडणे आणि फोनच्या तारा तोडण्याचे काम सुरू झाले. स्थानिक पातळीवर जशी परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत, आत्मविश्वास खेडोपाडी निर्माण झाला होता. थोडेथोडके नव्हे तर अठरा हजार विद्यार्थी या लढ्यात प्रत्यक्ष उतरले होते. जुलमी निजामावर वचक बसविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी फार मोठी कामगिरी बजावली. कार्यालयांची नासधूस करणे, सार्वजनिक ठिकाणी बॉंबस्फोट करणे अशी जिवावरची कामे विद्यार्थ्यांनी केली. शहरातही चळवळ जोरात सुरू होती. खुद्द हैदराबाद शहरात शिवराय शास्त्री या विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली पोलिसांना सळो की पळो करून सोडले होते. हे अवघड कार्य करताना काही विद्यार्थी शहीद झाले. आपले बलिदान देताना या तरुणाईने जिवाची पर्वा केली नाही. या तरुणांनी हैदराबाद येथील बडीचावडी पोलीस ठाणे उडवण्याचा प्रयत्न केला. किंग कोठी परिसरातील एका मोठ्या भिंतीस भगदाड पाडण्यात आले. हैदराबाद येथील सिनेमागृहात, पोलीस ठाण्यात बॉंब टाकण्यात आले. तरुणाईचे शौर्य, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचे धाडस, त्यांच्या पराक्रमाची कमाल म्हणजे त्यांनी खुद्द निजामाच्या गाडीवर बॉंब टाकला. निजामाचे दैव बलवत्तर म्हणून तो त्या हल्ल्यातून वाचला…

  निरपराध लोक, कोणताही गुन्हा न केलेले परंतु हैदराबाद स्टेट कॉंग्रेसशी संबंधित असलेले, हैदराबाद राज्य निजाममुक्त व्हावे यासाठी काम करणार्‍या अनेक लोकांची रवानगी निजाम सरकार तुरुंगात करीत असे. वीरभद्र आर्य हे गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना एकदा फजले हक हे न्यायाधीश तुरुंगात भेट देण्यासाठी आले होते. ते येणार हे समजताच तुरुंगाधिकार्‍यांनी कैद्यांना सूचना दिल्या की, ‘‘ज्यावेळी न्यायाधीश तुमच्या कोठडीसमोरून जातील त्यावेळी प्रत्येकाने आपापले हात गुडघ्यावर ठेवून समोर बघत शांत रहावे. कुणीही मुन्सफ यांना सलाम वगैरे अभिवादन करु नये.’’

  फजले हक यांचे तुरुंगात आगमन झाले. तुरुंगाची पाहणी करताना ते वीरभद्र यांना ज्या कोठडीत ठेवले होते त्या बराकीसमोरून जात होते. तेव्हा वीरभद्र हे उभे राहिले आणि त्यांनी न्यायधीशांना सलाम केला. ते पाहून चिडलेल्या फजले हक यांनी विचारले, ‘‘तू एक गुनाहगार होकर भी मुझे सलाम करता है?’’

  त्यावर वीरभद्र यांनी शांतपणे परंतु खड्या आवाजात एक शेर ऐकवून उत्तर दिले,

  ‘गुन्हेगारों मे सामील है
  गुन्हाओं से हम नही वाकिफ।
  सजा को जानते है हम
  खुदा जाने खता क्या है!’

  ते ऐकून न्यायाधीश हक तणतणत, दाणदाण पाय आपटत निघून गेले परंतु झालेल्या प्रकाराने तुरुंगाधिकारी भयंकर चिडला. वीरभद्र यांना देण्यात येणार्‍या जेवणावर त्याने राग काढला. वीरभद्र यांना मिळणारे जेवण निकृष्ट दर्जाचे तर पाणी दूषित असे असायचे. त्यामुळे वीरभद्र यांची प्रकृती बिघडली. शेवटी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली…

  याच दरम्यान लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसला एक संदेजवजा पत्र पाठवले. त्यात जयप्रकाशजी म्हणतात, ‘हैदराबाद स्टेट कॉंग्रेस का आंदोलन जब तक निम्न तीन प्रश्नों का फैसला नही हो पाता तब तक न रुक सकता है न रुकना चाहिये।

  1) जनता प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ जी के हाथ निजाम सरकार सत्ता सोंप दे।
  2) हैदराबाद रियासत बिना किसी शर्त के हिंदी संघ राज्य मे शामिल हो जाये।
  3) पुलिस, गुंडे मिलिटरी या सरकार की और से जनता की जो धनधान्य आदि की लूट और हानी की गयी है उसकी भरपाई निजाम सरकार करे। मुझे स्वामीजी का ताजा वक्तव्य देखकर खुशी हुई और मै उनको विश्वास दिलाना चाहता हूँ की इस आंदोलन मे हम भी उनके साथ है।

  दुसरीकडे निजाम सरकार, पोलीस, रझाकार का शांत बसले होते? त्यांनीही निरपराध, निष्पाप जनतेचा अनन्वित छळ सुरु केला. गाव लुटणे, घरे पेटवून देणे, बेछूट गोळीबार करून सर्वसामान्य जनतेला घाबरून सोडणे, कार्यकर्त्यांच्या हत्या करणे, बलात्कार करणे असे भयंकर प्रकार सुरू केले परंतु निजामी राजवटीविरोधात पेटून उठलेले कार्यकर्ते घाबरले नाहीत, हरले नाहीत, मागे हटले नाहीत तर ते त्वेषाने, संतापाने पेटून उठले. त्यांनीही जोरदार प्रतिकार सुरु केला. वर्षभर सुरु असलेल्या सशस्त्र लढाईत लोकांनी लाखापेक्षा अधिक शिंदीची, ताडाची, मोहाची झाडे तोडली. जवळपास एक हजार खेड्यात काम करणार्‍या पाटील, पटवारी या लोकांनी काम करण्यासाठी नकार दिला. यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणावर महसुली उत्पन्न मिळणे बंद झाले. शंभरपेक्षा अधिक पोलीस ठाण्यांवर हल्ले झाले. त्यात हजारपेक्षा जास्त शत्रू सैनिक, रझाकार जायबंदी झाले. या सर्व प्रकारामुळे निजाम हतबल झाला. काय केले म्हणजे ही सशस्त्र क्रांती थांबवली जाईल या विचारात तो पडला. पोलीस तर सोडा पण रझाकार आणि लष्करी सैन्यालाही क्रांतिकारी मंडळी जुमानत नव्हती. भीक घालत नव्हती. दाद देत नव्हती. या सर्व शूरवीर क्रांतिकारकांचे बाबतीत स्वामी रामानंद तीर्थ गौरवोद्गार काढताना म्हणाले, ‘‘पाठीचा कणा व मान ताठ आहे अशा प्रजेवर अन्याय करणे सैतानी राजवटीलाही अशक्य असते.’’

  त्याचबरोबर स्वामीजी निझामालाही जनतेच्या मनात काय चालले आहे ते सांगताना म्हणतात की,

   ‘‘स्वतंत्र भारतात विलीन होणार्‍या लोकांची शक्ती निजामाने अजमावून पहावी. जगाचा इतिहास सांगतो की, लोक जे सरकार प्रस्थापित करतात ते सरकार सिंहासनावरून बाजूलाही खेचू शकतात! हैदराबाद स्टेट कॉंग्रेस निझाम सरकारसमोर ‘लोकाची, लोकाकडून व लोकाकरिता’ अशी प्रस्थापित राज्यव्यवस्था निर्माण करण्याची कल्पना स्पष्टपणे मांडत आहे… तुम्ही खेड्यात जाऊन पाहिले तर लेव्ही वसुलीनंतर शेतकर्‍यांच्या घरी एक शेर ज्वारी देखील शिल्लक राहत नाही. त्या शेतकर्‍याला जर विचारले तर तो म्हणेल, निझाम सत्तेवरून गेला पाहिजे!’’

  स्वामी रामानंद तीर्थ एका पत्रकात म्हणतात की, ‘‘आजच्या हैदराबादी राजवटीला जनतेचा पाठिंबा नाही. जुलूम-जबरदस्ती आणि दडपशाहीवर हैदराबादची ही राजवट जगते आहे. ही राजवट नाहीशी झाली पाहिजे आणि तिच्या जागी हिंदी संघराज्याशी निगडित असणारे लोकशाहीचे राज्य आले पाहिजे. हे साध्य करण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो असा की जनतेने या सरकारशी हरप्रकारे असहकार केला पाहिजे आणि सविनय कायदेभंगाच्या सामर्थ्याने या सरकारशी असलेले संबंध तोडले पाहिजेत.’’

  तहसीलदार हे तालुक्याच्या ठिकाणी असलेले शासकीय पद! निजाम राजवटीतील एक तहसीलदार फरीद मिर्झा हे निजामाला पाठवलेल्या निवेदनात सरकारच्यावतीने होत असलेली जोरजबरदस्ती, दडपशाही स्पष्ट करून शेवटी म्हणतात की, ‘‘मी नमूद केलेले पाशवी प्रकार हैदराबादच्या मुसलमानांच्या तोंडाला काळिमा फासण्यास पुरेसे आहेत. माझ्या मुस्लीम बांधवांना मी अशी सूचना देऊ इच्छितो की हे असले प्रकार असेच चालू राहिले तर आपणच आपला विनाश ओढवून घेऊ. निदान इस्लाम धर्म आणि माणुसकी यांच्याकरिता तरी असली कृत्ये थांबविली पाहिजेत. तहसीलदारसारखा एक जबाबदार अधिकारी असे बोलत असेल तर निजामाच्या दुष्कर्माचा यापेक्षा जळजळीत पुरावा दुसरा कोणता असू शकतो? परंतु फरीद मिर्झा यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची शिक्षा द्यायलाही निजाम कचरला नाही. त्याने मिर्झा यांना चक्क इस्लामद्रोही ठरवले. त्यामुळे उद्विग्न झालेल्या, निराश झालेल्या फरीद मिर्झा यांनी आपल्या पदाचा, नोकरीचा राजीनामा दिला.’’

  निजामाची चालढकल!
  निजाम भारतीय संघराज्यात विलीन होण्यासाठी स्पष्टपणे नकार देत होता ते कोणाच्या हिंमतीवर, कुणाच्या जिवावर हा विचार करणेही आवश्यक आहे. ‘आझाद हैदराबाद’ हे स्वप्न पाहताना निजामासोबत जहागीरदार, वतनदार, सरंजामदार, राज्यातील नबाब, उच्च विद्याविभूषित नागरिक, अधिकारी, आदिवासी आणि दलित समाज आणि हैदराबाद संस्थानातील मुसलमान जनता हे सारे आपल्याला हवे ते सहकार्य करील अशी अपेक्षा तो बाळगून होता. काही प्रमाणात ते खरेही होते. सर्वात महत्त्वाचा झटका निजामाला ब्रिटनच्या एका निर्णयामुळे बसला ज्या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, ब्रिटन हैदराबादला जो निधी पाठवणार होता त्यासाठी त्यानंतर भारत सरकारची परवानगी मिळणे आवश्यक होते. आपल्याला इतर राष्ट्रही मदत करतील ही त्याची अपेक्षा मात्र फोल ठरली कारण ब्रिटनने ‘आझाद हैदराबाद’ या भूमिकेवर तटस्थ राहण्याचे ठरवले. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या पाकिस्ताननेही ‘सैनिकी मदत करता येणार नाही’ असे निजामाला स्पष्ट कळवले. ब्रिटन आणि पाकिस्तान या राष्ट्रांकडून निराशा पदरी पडल्यानंतरही निजाम स्वतःच्या भूमिकेपासून ढळला नाही. त्याने अजून एक डाव टाकला. त्यानुसार स्वतंत्र भारतासोबत दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये असल्याप्रमाणे मैत्रीचा, शांततेचा करार करावा. केवढी धूर्त चाल होती ही! कारण असे संबंध निर्माण होणे, निजामाची ही अट स्वीकारणे याचा अर्थ निजामाचे ‘आझाद हैदराबाद’ हे अस्तित्व मान्य करणे! यासोबतच हैदराबादचा प्रश्‍न सरळ युनोच्या व्यासपीठावर उपस्थित करणे त्यामुळे ही समस्या वर्षानुवर्ष लोंबकळत राहील.

  आणखी एक महत्त्वाचे पाऊल निजामाने टाकले. वहिवाटीच्या हक्कानुसार हैदराबादचे स्वातंत्र्य सिद्ध करावे! परंतु निजामाचा हा कुटिल डाव स्वामी रामानंद यांनी उधळून लावताना भारत सरकारपुढे काही गोष्टी ठळकपणे मांडल्या. त्यानुसार हैदराबादच्या प्रश्‍नावर भारतीय मुसलमान तटस्थ राहतील हे पटवून दिले. सुरुवातीपासून स्वामी हैदराबादच्या विलिनीकरणाच्या प्रश्‍नावर तिथल्या जनतेचे सार्वमत घ्यावे. स्वामींनी हीच भूमिका पुन्हा भारत सरकारपुढे जोरकसपणे मांडली. हैदराबाद राज्यात संपूर्ण जबाबदार राज्यपद्धती लागू करावी. स्वामींनी एक महत्त्वाची गोष्ट सरकारपुढे ठामपणे मांडली की, विलिनीकरणाच्या विरोधात हैदराबादची जनता उठाव करणार नाही.
  स्वामीजींच्या अशा रोखठोकपणे मांडलेल्या भूमिकेमुळे चिडलेल्या निजामाने अजून एक धमकीवजा चाल खेळली. तो म्हणाला, ‘‘विलीनीकरणाचा आग्रह धरला तर साध्य काहीच होणार नाही. उलट फार मोठी रक्तरंजित क्रांती होईल. भारताने आमचा प्रस्ताव फेटाळला तर आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करु.’’

  स्वामी रामानंद तीर्थ यांचा ठाम विरोध असतानाही भारतीय सरकारने निजामासोबत एक करार केला. 29 नोव्हेंबर 1947 रोजी झालेल्या या कराराला ‘जैसे थे’ करार म्हणून संबोधले जाते. जैसे थे याचा सरळसरळ अर्थ असा की, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पूर्वी इंग्रज अंमल असतानाची राजकीय स्थिती कायम ठेवावी! म्हणजेच निजामाचे हैदराबाद स्टेट जशास तसे राहणार! त्यानंतर सहा महिन्यांनी निजामाने सुचविलेल्या काही सूचना भारत सरकारने अखेर 13 जून 1948 रोजी स्वीकारल्या. काय होत्या ह्या सूचना? या तहात ठरल्याप्रमाणे (1) तीन केंद्रीय विषयासंबंधी हिंदी पार्लमेंटला हैदराबादच्या कायद्याच्या व्यतिरिक्त कायदा संमत करण्याचा अधिकार असेल. (2) रझाकार संघटनेवर बंदी लादावी. (3) हैदराबादच्या लष्कराची मर्यादा वीस हजार एवढी असावी. (4) इतर राष्ट्रांसोबत व्यापार, आर्थिक व्यवहार करता येतील पण त्यासाठी हिंदुस्थान सरकारच्या प्रतिनिधींच्या देखरेखीखाली काम करावे लागेल. (5) हैदराबादेत ताबडतोब हंगामी सरकार कायम करण्यात येईल. या सरकारमध्ये हिंदू-मुस्लीम प्रतिनिधींचे प्रमाण समान म्हणजे प्रत्येकी पन्नास टक्के असेल. (6) 1 जानेवारी 1949 ला घटना समिती बोलावण्यात येईल. या समितीत बिगर मुस्लीम 60 टक्के आणि मुस्लीम प्रतिनिधी 40 टक्के या प्रमाणात असतील. (7) घटना समितीला जबाबदार असणार्‍या मंत्रिमंडळात हिंदू-मुस्लीम प्रतिनिधींचे प्रमाण 60:40 असे असेल. (8) संस्थानातील मुसलमान समाजाला सांस्कृतिक आणि धार्मिक बाबतीत दहा वर्षे संरक्षण दिले जाईल. (9) 1 जानेवारी 1954 पर्यंत नोकर्‍यांमध्ये हिंदू-मुस्लीम हे प्रमाण 60:40 असे करण्यात येईल. (10) हैदराबादने हिंदी संघराज्यात सामील होण्याचा प्रश्‍न सार्वमत घेऊन सोडविला जाईल. (11) आणीबाणीच्या परिस्थितीत हिंदी संघराज्याला हैदराबादेत आपले लष्कर ठेवता येईल.

  ह्या कराराचा मसुदा निजामाकडे पाठवण्यात आला परंतु काही नेत्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे निजामाने या करारावर सही केली नाही. काही सहकार्‍यांंनी त्याला सही करु दिली नाही. अशाप्रकारे निजामाचा एक डाव प्रत्यक्षात उतरू शकला नाही. सामंजस्याने हैदराबाद संस्थानचा प्रश्‍न सुटत नाही हे पाहून भारत सरकारने शेवटचा निर्णय घेतला…

  निर्णायक घाव : ऑपरेशन पोलो!
  सशस्त्र प्रतिकार झाला, एक क्रांती झाली. क्रांतिकारकांच्या तडाख्यातून स्वतः निजाम सुटला नाही पण सत्तेचा, खुर्चीचा मोह एखाद्याला किती अगतिक करतो, किती खालच्या पातळीवर नेतो याचे उत्तम, ज्वलंत उदाहरण म्हणजे हैदराबाद स्टेटचा सातवा निजाम! जवळपास पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक जनता विरोधात असतानाही निजामाची खुर्चीत बसण्याची हौस शमली नाही. सशक्त क्रांतीमुळे निजामाचे आर्थिक, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याच्या सैन्याची जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली. निजाम राजवट संपुष्टात आली नसली ती खिळखिळी करण्यात स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या लढवय्या सैनिकांना, सहकार्‍यांना फार मोठे यश मिळाले परंतु हैदराबाद संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन होत नव्हते. उलट त्याने वाटाघाटी करण्याचे नाटक करून भिजत घोंगडे ठेवण्याचे धोरण अवलंबिले. स्वतः नेहरु यांनी जाहीरपणे कबूल केले की, ‘‘निजामाचे शासन हे चोर, गुंड, धोकेबाज असे सरकार आहे. महत्त्वाचे म्हणजे इकडे भारतीयांशी बोलणी करण्याचे नाटक करताना तो परकीय शक्तींशी हातमिळवणी करून भारताच्या विरोधात कट रचत आहे.’’

  स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकार्‍यांना अशी खात्री होती की, निजाम स्वातंत्र्यसंग्रामातील कोणत्याही कारवाईला, चळवळीला, आंदोलनाला डगमगणार नाही, थारा देणार नाही. त्यासाठी भारत सरकारने केवळ लष्करी कारवाईचा एकमेव अंतिम मार्ग अवलंबून ह्या प्रश्‍नाचा कायम बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने होत असताना पंडित नेहरू यांनी लोकसभेत निवेदन केले की, ‘‘रझाकारांच्या अत्याचारामुळे लोकांचे जीवन सुरक्षित राहिलेले नाही. हैदराबादच्या सामिलीकरणाचा प्रश्‍न वाटाघाटीद्वारे मिटेल म्हणून आपल्या सरकारने संयम पाळला. संस्थानातील प्रजेचे जीवन अत्यंत असुरक्षित असल्यामुळे वस्तुस्थितीला सामोरे जाणे जरूरीचे आहे.’’

  खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात केलेले हे निवेदन हा निजामासाठी अंतिम इशाराच होता. या वक्तव्यातून ‘लष्करी कारवाईचे’ स्पष्ट संकेत मिळत होते.

  भारतीय लष्कराने सरकारच्या आदेशानुसार हैदराबाद संस्थानावर अंतिम कारवाई करण्याची तयारी सुरू केली. या कारवाईला ‘पोलीस कारवाई किंवा ऑपरेशन पोलो’ या नावाने ओळखले जाते. या मोहिमेचे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंह यांनी सूत्रं हातात घेतली. अतिशय काटेकोर नियोजन करताना त्यांनी लष्कराची पाच भागात विभागणी केली होती. या पाच भागाची जबाबदारी मेजर जनरल जयंतिनाथ चौधरी, एअर मार्शल मुखर्जी, ब्रिगेडियर शिवदत्त सिंग, मेजर जनरल डी. एस. ब्रार आणि मेजर जनरल ए. ए. सुंद्रा या कर्तव्यकठोर अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली होती.

  प्रत्यक्ष कारवाईची सुरुवात करताना लष्कराची चार भागात वाटणी करण्यात आली. पूर्व विभाग (नलगोंडा, वरंगल, करीमनगर), पश्चिम विभाग (बिदर, उस्मानाबाद, बीड), दक्षिण विभाग (गुलबर्गा, रायचूर, महबूबनगर) आणि शेवटचा उत्तर विभाग (औरंगाबाद, परभणी, नांदेड, आदिलाबाद आणि निजामाबाद)! 13 सप्टेंबर 1948ला चारही तुकड्यांनी आपापल्या कामगिरीकडे प्रयाण केले. पश्चिम विभागाकडे कूच केलेल्या तुकडीने सकाळी नऊ वाजता नळदुर्ग ताब्यात घेतले. अकरा वाजता उमरगा गावावरील निजामी राजवट संपुष्टात आणली. 14 सप्टेंबर रोजी जहिराबाद गाठले. येथे निजामाच्या सैन्याने थोडा प्रतिकार केला. त्यात एक भारतीय जवान शहीद झाला. 15 तारखेला कसलाही प्रतिकार न होता बिदर अलगद भारतीय लष्कराच्या ताब्यात आले. दुसर्‍या दिवशी बिदरचे विमानतळही भारतीयांचे झाले. बल्लारशा येथील पूल उडवून नादिरा सील केले. बार्शी इन्क्लेव्हवर ताबा मिळवला.

  उत्तर विभाग लष्कराने दमदार वाटचाल करताना तुळजापूर, जालना, परभणी आणि कन्हेरगाव ही गावे पादाक्रांत केली. श्रीपुरम येथे निजामी सैनिकांनी तुटका प्रतिवाद केला पण भारतीयांपुढे त्यांची डाळ शिजली नाही. या दोन्ही तुकड्यांप्रमाणे पूर्व आणि दक्षिण विभागाच्या गटांनी यशस्वी मार्गक्रमण सुरू ठेवले. दौलताबाद, औरंगाबाद, उस्मानाबाद, येरमाळा ही शहरे ताब्यात घेण्यात आली. कर्नूल गावी झालेल्या विरोधास भारतीयांनी नेस्तनाबूत केले. नळदुर्ग येथे भारतीय लष्कराने एक ट्रक पकडला. या ट्रकमधून निजामाच्या मदतीसाठी स्फोटकं जात होती. वरंगल विमानतळावर बॉंब फेकून तिथला प्रतिकार मोडीत काढण्यात आला. बोमक्कल जिंकले. सूर्यापेठ हे गाव सिकंदरबादपासून जवळ असूनही भारतीय वीरांनी त्यावर विजय मिळविला. हुमनाबाद, नळगोंडा, खम्ममपेठ, हुमनाबाद, होस्पेट ही शहरे निजामाच्या सैन्याकडून हिसकावून घेण्यात आली. बार्शी, हिंगोली ही शहरे ताब्यात घेतली. मुनिराबाद येथील रेल्वेस्थानकावर विजय मिळविला. अशाप्रकारे सर्व बाजूंनी हैदराबाद स्टेटच्या मुसक्या आवळण्यात भारतीय फौजांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले. तुंगभद्रा नदीवरील पूल ताब्यात घेण्यात आले.

  भारतीय लष्कर हैदराबाद शहराच्या चोहोबाजूंनी आल्याचे पाहून रझाकार, पोलीस, शस्त्रधारी सैनिक यांच्या तोंडचे पाणी पळाले. घाबरून ते रस्ता नेईल तिकडे धावत सुटले. हैदराबाद शहरावर आक्रमण करण्यापूर्वी ऑपरेशन पोलो या कार्यवाहीचे प्रमुख राजेंद्रसिंह यांनी निजामाच्या लष्कर प्रमुखाला निर्वाणीचा इशारा देताना सांगितले की, ‘‘एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमच्या कारवाया, तुमचे लष्कर पूर्णपणे निष्प्रभ, कुचकामी ठरले आहे. त्यामुळे निष्कारण प्राणहानी टाळा. शस्त्रे खाली ठेवा. रझाकार आणि तुमचे लष्कर निःशस्त्र झाले आहे. परिस्थिती पूर्णपणे आमच्या आवाक्यात आलेली आहे…’’

  आला! तो क्षण आला! ज्याची हैदराबाद राज्यातील जनता वाट पाहात होती. हा क्षण यावा म्हणून हजारो लोकांनी प्राणार्पण केले होते. हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. कैक जण तुरुंगात खितपत होते. हैदराबाद स्टेटवर तिरंगा फडकावण्याचा तो मंगलमय, पवित्र क्षण आला. 17 सप्टेंबर 1948 या दिवशी सायंकाळचे पाच वाजत असताना आकाशवाणीवरुन निजाम अखेर शरण आल्याची बातमी आली. निजामाच्या सैन्याने शस्त्र खाली ठेवून हाती पांढरे निशाण घेतले. स्वामी रामानंद तीर्थ, त्यांचे सहकारी, त्यांचे कार्यकर्ते, राज्यातील जनतेने नेटाने चालविलेल्या लढ्याची यशस्वी सांगता झाली. भारतीयांप्रमाणे तेरा महिन्यांनंतर का होईना हैदराबाद राज्यात स्वातंत्र्यसूर्य उगवला. त्याच दिवशी स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रणेते, धुरंधर नेते स्वामी रामानंद तीर्थ यांना सन्मानाने तुरुंगातून सोडण्यात आले. सर्वत्र आनंदाला भरते आले. विजयीगान सुरू झाले…

  स्वामी रामानंद यांच्यासह या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा नामोल्लेख करणे हे कर्तव्य आहे पण अशा दिग्गजांची, मान्यवरांची, शूरवीरांची संख्या भरपूर आहे. प्रत्येकाने दिलेला लढा, बजावलेली कामगिरी अतुलनीय, अंगावर काटा आणणारी आहे. हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे, कळत नकळत सहभागी असलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, भूमिगत राहून कार्य करणार्‍या, हौतात्म्य पत्करलेल्या असंख्य पुत्रांना त्रिवार नमन! जयहिंद!

  -नागेश सू. शेवाळकर
  9423139071

  संदर्भ ग्रंथ:-
  1) हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा.
  (लेखक – अनंत भालेराव )
  2) हैदराबाद मुक्तिलढ्याची जडणघडण
  (लेखक – बाळकृष्ण महाराज खडकेकर)
  3) हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम
  (लेखक – वसंत पोतदार)
  4) गुगलवर उपलब्ध असलेले अनेक लेख.

  चपराक

  पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
  व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
  Email - Chaprak Email ID

5 Thoughts to “हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!”

 1. Nagesh S Shewalkar

  मा. संपादक,
  मनःपूर्वक धन्यवाद.

 2. रमेश वाघ

  व्वा,खूपच सविस्तर लेख,मनःपूर्वक अभिनंदन सर

 3. Jayant Kulkarni

  हैद्राबाद मुक्ती संग्रामाची सव्वीस्तर माहिती या लेखा मुळे मिळाली. तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बद्दल संपूर्ण माहिती मिळाली. आंदोलनाचे चित्तथरारक वर्णन वाचायला मिळाले. लेख आवडला. शेवाळकर सर हा लेख म्हणजे माहितीचा खजिना आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!

 4. Vinod s. Panchbhai

  हैद्राबाद मुक्ती लढ्याचा इतिहास शेवाळकर सरांनी सविस्तरपणे मांडला आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबाबतची रोमहर्षक माहिती अत्यंत प्रेरणादायी आहे.

 5. प्रल्हाद दुधाळ

  खूप सविस्तर व माहितीपूर्ण लेख

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा