अनंत काणेकरांचा ‘दोन मेणबत्त्या’ नावाचा लघुनिबंध आम्हाला शाळेत असताना अभ्यासक्रमात होता. या लघुनिबंधातील पुढील वाक्य आयुष्यभर लक्षात राहिलं,
‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास
स्वतःसाठी जगलास तर मेलास’
हे पटवून देण्यासाठी त्यांनी दोन मेणबत्त्यांचे उदाहरण दिले आहे. एक मेणबत्ती स्वतःला जाळून रात्रभर लोकाना प्रकाश देते तर दुसरी मेणबत्ती, जिचा काहीच उपयोग झाला नाही म्हणून सडून, कुरतडून वाया जाते.
असेच काही लोक आपण समाजात पाहतो जे स्वतःची परिस्थिती असो की नसो सतत दुसऱ्याला मदत करत असतात. जमेल तशी आर्थिक, शारीरिक मदत ते करत असतात पण काही लोक आपल्या पोतडीतून एक रुपयाही बाहेर काढत नाहीत. स्वतःही खर्च करत नाहीत आणि गरजूंना मदतही करत नाहीत. त्यांची संपत्ती वाळवी लागून संपते, दुसऱ्या मेणबत्तीसारखी किंवा पुढची पिढी चैन करून ती संपवते आणि व्यसनी होते!
या बाबतीत मला सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, नट, संगीतकार, कथाकार, पु.ल.देशपांडे, ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ म्हणून लोकानी ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं असे पुलं यांचे उदाहरण द्यावेसे वाटते. साहित्यातून, नाटकातून, कथाकथनातून कला शाखेच्या सर्व मार्गानी मिळालेला पैसा ते दान करून गेले. बरं याची वाच्यताही त्यांनी कधी कुठे केली नाही! ते इहलोक सोडून गेल्यावर या गोष्टी समजल्या. समाजाने दिलेलं ते त्याच समाजाला परत करून गेले! नाहीतर आपण काही राजकारणी लोक पाहतो. समाजकार्याच्या नावावर पुढील सात पिढ्यांची सोय करून जातात! आणि राजकारणाला वारस ही देतात! बाकी कार्यकर्ते सतरंज्या उचलताहेत!
असेच दुसरे साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज. त्यांना साहित्यिक वर्तुळात तात्यासाहेब म्हणत. ते गेल्यानंतर त्यांच्या संपत्तीची नोंद वर्तमानपत्रात आली, ती ही नगण्य होती! तेही समाजाने दिलेलं त्याच समाजाला परत करून गेले.
डॉ. कलाम राष्ट्रपती होते. त्यांच्याबद्दल तर अक्खा हिंदुस्तान जाणतो की, ते गेले तेव्हा त्यांच्याकडे ‘ ऐहिक काहीच नव्हतं! ते शास्त्रज्ञ होते आणि हाडाचे शिक्षक. मुलांच्यात ते रमत. राजकारणाशी त्यांचा काडीमात्र संबंध नव्हता! स्पेस रिसर्चमध्ये ते भारतासाठी मोलाचं कार्य करून गेले!
असे सहृदय ‘देणारेही’ थोडे नाहीत. नावे घ्यावी तेवढी थोडी आहेत!
पूर्वीच्या काळी जेवायला बसण्यापूर्वी गावातील कारभारी गावातल्या देवळात जाऊन एखादा पांतस्थ उपाशी तर नाही ना? हे पाहून मग जेवत. तशी पद्धत होती. उपाशी असेल तर त्याला बरोबर घेऊन येऊन आपल्या बरोबर जेवायला घालत असत. हे अतिशय महत्वाचे आणि सहज घडणारे समाज कार्य होते! पुण्याचे काम होते! क्षुधाशांतीचे त्याचं मोल होणार नाही.
जुन्या काळातील शिक्षक देखील असेच होते. दिवसभर शाळेत शिकवत. मुलांवर खूप मेहनत घेत आणि रात्री किंवा पहाटे पुन्हा खूप हुशार आणि काही अती सामान्य मुलांना ज्यांची शिकायची इच्छा आहे अशा सर्वांना घरी बोलावून शिकवणी घेत. ती ही फुकट असे! शिक्षणाचं दान देण्यासाठी! शिक्षणाचा व्यापार झाला नव्हता तेव्हा!
शिबी राजाची एक कथा प्रसिद्ध आहे. एक कबुतर शिबी राजाच्या खांद्यावर येऊन बसतं व त्याला मनुष्यवाणीत म्हणतं,
“राजा माझा जीव वाचव, तो ससाणा मला मारून खायला टपलाय ”
इतक्यात तो ससाणाही तिथे पोचतो अन शिबी राजाला कबुतराला सोडायला सांगतो. एकाचा जीव वाचवून दुसऱ्याचा जीव जाऊ द्यायचा, हा कसला न्याय? राजा कबुतराच्या वजनाएवढं आपलं मांस ससाण्याला अर्पण करायला तयार होतो. त्यानुसार तराजूच्या एका पारड्यात कबुतराला ठेऊन दुसरीकडे राजा स्वतः आपल्या मांडीचं मांस कापून दुसऱ्या पारड्यात घालतो पण ते पुरत नाही तेव्हा राजा स्वतः त्या पारड्यात बसतो व ससाण्याला म्हणतो,
“मी स्वतःला समर्पण करतोय, तू मला खाऊन भूक भागव पण माझ्या आश्रयाला आलेल्या या कबुतराचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडीनच!”
हा त्याग बघून कबुतर व ससाणा म्हणतात ‘आम्ही देवता आहोत आणि शिबी राजाचं सत्व पाहण्यासाठी आलो आहोत’ असं सांगून ते दोघे आपल्या प्रत्यक्ष स्वरूपात प्रकट होतात आणि शिबी राजाची स्तुती करून, राजाचं कल्याण चिंतून निघून जातात! तात्पर्य शिबी राजाप्रमाणे दुसऱ्यासाठी देत राहा. कबुतराला वाचवण्यासाठी शिबी राजा स्वतःलाच समर्पित करतो! सर्वस्वाचा त्याग करायला तयार होतो!
सध्याच्या कोविडच्या काळात डॉक्टर, नर्स, जीवनावश्यक वस्तू विक्रेते, पोलीस, पॅरा मेडिकल स्टाफ, बँकर्स वगैरे लोक आशा प्रकारची निरपेक्ष सेवा देत आहेत.
अलीकडेच एक प्रसंग असा घडला की आशा प्रकारे डॉक्टरांच्या मदतीची गरज भासली. नव्वद वर्षांच्या आजी सकाळी उठल्या नाहीत म्हणून मुलाने उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांना गेल्या चाळीस वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. दिवसात दोन वेळा त्यांना इन्सुलिन चं इंजेक्शन घ्यावे लागे शिवाय तीन त्रिकाळ गोळ्याही होत्या. साखरेचं प्रमाण कमी झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या होत्या. काहीवेळा त्यांना असा त्रास होत असे तेव्हा साखरेचं पाणी किंवा साखर घालून हलवलेलं दूध देऊन काही काळाने त्या जाग्या होत, शुद्धीवर येत पण त्या दिवशी काही केल्या त्या शुद्धीवर आल्या नाहीत. जिभेखाली पिठीसाखर ठेवणं ही चालू होतं. मग मुलगा घाबरला. तोही पासष्ट वर्षांचा! मग डॉक्टरांना बोलावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. नेहेमी औषधे आणून देणाऱ्या दुकानदाराला फोन केला. त्याने त्याच्याकडून प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. त्याच्या माहितीतील डॉक्टर उपलब्ध नव्हते. शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांनी जवळ राहणाऱ्या एका डॉक्टर दाम्पत्याला फोन केला. ते स्वतः आले नाहीत, येणं टाळलं आणि त्यांनी हॉस्पिटलचा नंबर दिला. तेवढ्यात शेजाऱ्यांच्या लक्षात आले की, सोसायटीत एक तरुण डॉक्टर मुलगी भाड्याने राहायला आली आहे. एकाने तिला बोलावून आणले. ती नुकतीच हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी करून आली होती पण तरीही काहीही आढेवेढे न घेता ती आली आणि देवी पावली! तिने त्या आजींना तपासलं. साखर खूप कमी झाल्याचं निदान झाल्याने तिने स्वतः ती काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन करून अँब्युलन्स मागवली. अँब्युलन्सबरोबर त्या डॉक्टरही पेशंट सोबत गेल्या आणि लगेच ट्रीटमेंट होऊन आजी वाचल्या!
जवळ राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याने थोडं सौजन्य दाखवलं असतं तर थोडी अगोदर ट्रीटमेंट झाली असती इतकंच! पण तसं झालं नाही हे दुर्दैव! अशी काही माणसे डॉक्टरच्या पेशाला बदनाम करतात पण देवासारखी धावून आलेली रात्रभर हॉस्पिटलमध्ये काम करून आलेली मुलगी डॉक्टरी पेशाचं मर्म सांगून गेली! पेशा कोणताही वाईट नसतो, त्यातील काही माणसेच त्या पेशाला बदनाम करतात! त्यातून डॉक्टर म्हणजे जीवनाला नवसंजीवनी देणारे, नवचैतन्य देणारे पृथ्वीवरील देवदूतच!
अनंत काणेकरांच्या पहिल्या मेणबत्तीप्रमाणे या डॉक्टर मुलीने स्वतःची पर्वा न करता रात्रभर काम करून थकलेली असून सुद्धा आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग करून एका वृद्धेचा जीव वाचवला! आणि दुसऱ्या मेणबत्तीप्रमाणे ते डॉक्टर दाम्पत्य स्वतः पेशंट पाहण्याची तसदी न घेता हॉस्पिटलचा नुसता फोन नंबर देऊन अलिप्त राहिले! त्यांच्या ज्ञानाचा सरकारने त्यांच्यावर केलेल्या खर्चाचा समाजाला उपयोग झाला नाही!
प्रत्येक डॉक्टरला नोंदणी करताना शपथ दिली जाते. या शपथेमध्ये डॉक्टरांची कर्तव्ये, त्यांचे आचरण, त्यांची रुग्णाप्रति असणारी भावना या गोष्टी असतात. जर शपथेचं पालन झालं तर सर्व वैद्यकीय सेवा चांगल्या दर्जाच्या होतील. डॉक्टरांनी रुग्णसेवा हेच आपलं कर्तव्य मानलं पाहिजे. रुग्णांनीही नुसतेच औषधांवर अवलंबून न राहता आहार व्यायाम यांचे संतुलन करून प्रतिकार शक्ती वाढविली पाहिजे. तसेच काही दुर्दैवी घटना घडल्यास रुग्णाच्या नातेवाईकांकडून क्वचित प्रसंगी डॉक्टराना होणारी मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड हे दुर्दैवी प्रकारही थांबायला हवेत! फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पुन्हा रुजायला हवी!
देणाऱ्यांविषयी मग ते ज्ञान असो, आर्थिक मदत असो, वैद्यकीय सल्ला असो विंदा करंदीकर यांची एक सुंदर कविता आहे.
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरून
हिरवी पिवळी शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वी कडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भीमेकडून
तुकोबांची माळ घ्यावी
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे
——————–^——————–^——————–^–
जयंत कुलकर्णी
दूरभाष ८३७८०३८२३२
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
जयंतराव मी देखील लहानपणी काणेकरांची दोन मेणबत्या वाचले
आहे.स्वत:साठी जगलास तर मेलास….पण सध्याच्या जगात तर असे सांगीतले जाते की बस झाले दुसर्यासाठी जगणे.स्वत:साठी जगा.स्वत:साठी खर्च करा.मला पण हे पटत नाही.विशेषत:सिनीयर सिटीझनना हे सांगीतले जाते.चालायचेच हे कलीयुग आहे.मग काय
आपले नाव आपल्या पश्चात रहावे असे वाटत असेल तर. दुसर्यासाठी जगावे..स्वत:साठी जगलास तर आपले नाव आपल्या पश्चात कोणीही घेणार नाही…काय करायचे ते प्रत्येकाने ठरवावे…
..
धन्यवाद अशोकराव . हे शेवटी ज्याने त्याने ठरवायचे आहे. की आपला आनंद कशात आहे.
व्व्व्वा माऊली खूपच सुंदर आणि मार्मिक लिहलंय! लिखाण खरंच दर्जेदार आणि वाचनीय होतेय.
अभिनंदन! 🙏🌹🙏😊
फार सुंदर लेख.. खरंच प्रत्येक व्यक्तीने आपल्याला जमेल तशी मदत केली पाहिजे, ती कोणत्याही स्वरूपातील असो..गरजू व्यक्तीला जेवण द्या..गरजू विद्यार्थ्याला मदत करा..गरजू आजारी व्यक्तीला जशी जमेल तशी मदत करा..खूप छान लेख..👌👌
आत्म साक्षात्कार करून देणारा लेख
सुंदर लेख