अजातशत्रू व्यक्तिमत्त्व – प्रणव मुखर्जी

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व - प्रणव मुखर्जी

स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमधील दिग्गज नेत्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मात्र पहिल्यांदाच हा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केन्द्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या रूपानं पश्चिम बंगाल या राज्याला मिळाला. त्यांनी २५ जुलै २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १४ जुलै २०१७ पर्यंत पाच वर्षे देशाचं हे सर्वोच्च असलेलं पद भूषविलं!

प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील बीरभूम जिल्ह्यातील मिराती या खेडेगावात १९ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ते बालपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यामुळे त्यांचा वर्गात पहिला क्रमांक ठरलेलाच असायचा! त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण बीरभूम येथे झालं. त्यावेळी ते शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले होते. तेव्हा त्यांची बुद्धिमत्ता पाहून सामान्य स्थितीत असलेले त्यांचे वडील कामदा किनकर मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जींना उच्च शिक्षण देण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी बीरभूमच्या ‘सूरी विद्यासागर’ महाविद्यालयात शिक्षण घेत राज्यशास्त्र आणि इतिहास या दोन विषयात प्रथम श्रेणीत एम.ए. च्या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर वडिलांच्या परवानगीने त्यांनी कलकत्ता शहर गाठले आणि स्वतःला कायद्याच्या अभ्यासात झोकून दिले. त्यासोबत तेथे त्यांनी नोकरी साठीही प्रयत्न सुरू ठेवले.

एल.एल.बी. ही कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर प्रणव मुखर्जी यांना १९६३ साली २४ परगणा जिल्ह्यातील ‘विद्यानगर’ महाविद्यालयातून नोकरीसाठी बोलावणं आलं. त्याप्रमाणे तेथील प्राचार्यांना भेटून त्यांनी राज्यशास्त्र हा विषय शिकवण्याचा निर्णय घेतला. राज्यशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने प्रणव मुखर्जी काही दिवसातच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक लोकप्रिय प्राध्यापक म्हणून गणले जाऊ लागले. नोकरी करत असतानाच इतर क्षेत्रातही सक्रिय राहायला हवं हा विचार करून एक दिवस त्यांनी ‘देशेर डाक’ चं कार्यालय गाठलं. ‘देशेर डाक’ त्यावेळी आघाडीचं वृत्तपत्र होतं. तेथील संपादकांनी चर्चेच्या वेळी प्रणव मुखर्जी यांची बुद्धिमत्ता हेरून त्यांना पत्रकारिता करण्यास प्रोत्साहित केलं. मुखर्जींचं लेखन, वाचन अफाट असल्याने त्यांनी लगेच सहमती दर्शवली. मग प्राध्यापकी पेशासोबतच त्यांनी पत्रकारिताही सुरू झाली.

वडील कामदा किनकर मुखर्जी हे देशाचे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी देश पारतंत्र्यात असताना दहा वर्षांहून अधिक काळ तुरूंगवास भोगला होता! १९२० पासून त्यांनी इंग्रजी सत्तेविरूद्ध सर्व प्रकारच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास सुरूवात केली होती. तसेच कामदा मुखर्जी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सक्रिय सदस्य होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या विधान परिषदेचे अध्यक्ष पदही भूषवले. वडिलांच्या या राष्ट्रीय चळवळीतील योगदानाने प्रेरित झालेल्या प्रणव मुखर्जींनी १९६९ मध्ये राज्यसभेसाठी आपले नामांकन दाखल केले. अन् ते निवडून ही आले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतः ला झोकून दिले. त्यावेळी असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली राजकीय कारकीर्द फुलवली. १९७३-७४ मध्ये इंदिरा गांधीनी त्यांच्यावर अर्थखात्याच्या राज्य मंत्रीपदाचा कार्यभार सोपवला. त्यावेळी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि नाबार्ड यांची स्थापना करण्याच्या निर्णयात प्रणव मुखर्जी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती!

१९८२ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी यांना केन्द्रीय अर्थमंत्री म्हणून अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील पद देण्यात आलं. ती जबाबदारी संयमाने सांभाळत त्यांनी त्यावेळी अर्थतज्ज्ञ म्हणून जागतिक कीर्ती संपादन केलेले डाॅ. मनमोहनसिंग यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक केली. प्रणव मुखर्जी तब्बल पाच वेळा राज्यसभेवर निवडून आले होते. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना ते राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात निवडून आले होते. त्यावेळी म्हणजे १९९५-९६ मध्ये त्यांना परराष्ट्रमंत्रीपद बहाल करण्यात आले. १९९५ मधील न्यूझीलंडच्या आँकलंड शहरी राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या परिषदेत त्यांनी हजेरी लावली होती. तेथे त्यांनी भारताची भूमिका प्रभावी पणे मांडून उपस्थितांवर आपली छाप उमटवली होती.तसेच देशविदेशात शासकिय दौरे करून आपल्या देशाचं परराष्ट्रीय धोरण तेथील कार्यक्रमात मांडून आपली भूमिका स्पष्ट केली.

१९९७ साली प्रणव मुखर्जी यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र २००६ मध्ये त्यांना पुन्हा परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं. त्याकाळी त्यांनी अनेक देशंाचे दौरे केले. त्यांच्यात असलेल्या विद्वतेनं आणि सडेतोड वक्तृत्व शैलीनं उपस्थित श्श्रोत्यांवर चांगलीच छाप पडायची. २००८ साली त्यांनी अमेरिकेचा दौरा केला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश यांच्या सोबतची भेट विशेष गाजली. त्यावेळी आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण आणि परखड विचार प्रभावीपणे मांडून उपस्थितांसमोर ठसा उमटवला. त्यानंतर २००९ साली लोकसभेच्या निवडणूकीनंतर डाॅ. मनमोहन सिंग पंतप्रधान यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जींना परत एकदा अर्थमंत्रीपद बहाल करण्यात आले. ते निष्णात कायदेतज्ज्ञ होतेच. शिवाय राज्यशास्त्र आणि अर्थ शास्त्राचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. २००८ साली त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा बहुप्रतिष्ठित असा ‘पद्मविभूषण’ या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं! तसेच २०१० साली त्यांना ‘आशियातील एक उत्तम अर्थमंत्री’ म्हणूनही सन्मानित करण्यात आलं. १९८२ ते २०१२ या तीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून अनेक अंदाज पत्रकं सादर केली.

संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव तसेच प्रशासनाचा, मंत्रीपदाचा, पक्ष संघटनेचा, उत्तम वक्तृत्वाचा दांडगा अनुभव प्रणव मुखर्जी यांच्या पाठिशी होता. त्याचप्रमाणे लोकसभा आणि राज्य सभेतील नेतृत्वाचा त्यांना प्रचंड अनुभव असल्याने त्यांना सर्वानुमते काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा! ६९% मते मिळवून प्रणव मुखर्जींनी त्यावेळी विजयश्री खेचून आणली आणि तेरावे राष्ट्रपती म्हणून देशाच्या सर्वोच्चपदी
ते विराजमान झाले! प्रभावी वक्ते आणि विद्वत्तेनं परिपूर्ण असलेल्याने त्यांचे बौद्धिक आणि राजकीय कसब वाखाणण्यासारखं होतं. मात्र त्यांच्याच कारकीर्दीत २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांच्या काँग्रेस पक्षाचं सपशेल पानिपत झाल्याचं त्यांना आपल्या डोळ्यांनी बघावं लागलं! त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर, काँग्रेसेतर भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावरही कुठल्याही प्रकारचा वाद किंवा मतभेद न करता प्रणव मुखर्जी यांनी आपली राष्ट्रपती पदाची पाच वर्षाची कारकीर्द निर्विविघ्नपणे पार पाडली!

प्रगाढ वाचक असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. न्यूयाॅर्कमधून प्रकाशित होणाऱ्या ‘यूरो मनी’ या नियतकालिकातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार १९८४ साली प्रणव मुखर्जी यांना जगातील सर्वोत्तम पाच अर्थमंत्र्यांच्या नामावलीत स्थान देण्यात आले होते. राष्ट्रपती पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतरही ते समाजकार्यासाठी सक्रिय होते. नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून त्यांना विशेष अतिथी म्हणून हजर राहण्यासाठी निमंत्रण आलं. त्यावेळी निमंत्रण स्वीकारु नये म्हणून त्यांच्या पक्षाच्या आणि समविचारी पक्षाच्या कित्येक नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र
प्रणव मुखर्जी यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचा परिचय देत सर्वांचा विरोध झुगारून रा. स्व. संघाचे निमंत्रण स्वीकारले आणि तेथील कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली राष्ट्रीय ऐक्याची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली.

अतिशय शांत, संयमी स्वभावाचे प्रणव मुखर्जी यांना बागकाम करण्याची तसेच शास्त्रीय अन् सुगम संगीत ऐकण्याचीही आवड होती. अभिरूचीसंपन्न असलेले प्रणव मुखर्जी कला आणि संस्कृतीचे भोक्ते होते. त्यांना विद्यार्थी जीवनापासून लिखाणाची आणि वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांच्या कडे भारतातील तसेच जगातील गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकांचा संचय उपलब्ध होता.

असे हे अत्यंत सभ्य आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व दिनांक ३१ आँगस्ट २०२० रोजी या नश्वर जगाचा निरोप घेत काळाच्या पडद्याआड झाले! त्यांना ‘चपराक’ परिवारातर्फे विनम्र आदरांजली!!

विनोद श्रा. पंचभाई
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

6 Thoughts to “अजातशत्रू व्यक्तिमत्त्व – प्रणव मुखर्जी”

  1. Pradnya

    उच्चविभूषित व्यक्तिमत्वाला आज आपण मुकलो आहोत…प्रभावी व्यक्तिमत्व .,…भावपूर्ण श्रद्धांजली .. प्रज्ञा करंदीकर बंगलूरु

  2. Sanjay D. Gorade

    एका आदर्श नेत्यांचा तितकाच संघर्षमय व यशस्वी पट, भावपूर्ण श्रद्धांजली

  3. प्रकाश भास्करवार,नागपूर

    माजी.महामहिम श्री प्रणव मुखर्जी ह्यांंची माहीत नसलेले चरित्र सर्वांना सांगितले आहे. त्यांच्या बद्दलचा आदर आणखी वाढला.
    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

  4. Meghana Joshi

    सुंदर. अभ्यासपूर्ण लेख आणि उत्तम मांडणी.

    1. Vinod S. Panchbhai

      आभारी आहे!😊

  5. गजानन मस्के

    खुप छान लेख

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा