बळी तो...

बळी तो…

Share this post on:

आता जमाना बदलला आहे. सगळ्या व्याख्याच बदलायला लागल्या आहेत, म्हणी उलट्या पालट्या व्हायला लागल्या आहेत. त्यांचे अर्थच बदलायला लागले आहेत. सगळ्या क्षेत्रात आनंदी आनंद आहे. कुठल्याही व्यवस्थापनात जा एका चकरेत काम होणारच नाही आणि एका चकरेत झालेच तर आपणच चक्कर येऊन पडू, असं कसं झालं म्हणून. एखादा माणूस गोड बोलला तरी भीती वाटते, हा का बुवा गोड बोलला? काय असेल याच्या मनात? एखाद्याने आपले काम ताबडतोब केलं तरी मनात शंका निर्माण होते, ‘ह्याचा काय फायदा असेल बरं आपल्याकडून, म्हणून एवढ्या तातडीने आपले काम केले याने? कुणालाही बोलवा, ‘आलोच लगेच’ म्हणतो आणि येतच नाही. तर अशी एकंदरीत परिस्थिती.

मराठीत आपल्याला लहानपणी एक म्हण सांगितली जायची, ‘बळी तो कान पिळी’ म्हणजे जो बलवान असेल तोच राज्य करणार. आता ही म्हण मिळमिळीत वाटायला लागली आहे. आता बळी तो कान नाही पिरगळत तर तो मानच मुरगाळतो. पिळायची भाषा त्याला माहीत नसते, आता भाषा संपवायची!

चित्रपटातून पूर्वीच्या काळी एकच खलनायक असायचा. त्याचा दुष्टपणा दाखवण्यासाठी फार तर तो सिगारेट प्यायचा नाहीतर अतीच दुष्ट असेल तर दारूच्या अड्ड्यात बसायचा. नायिकेला आणि तिच्या आईला पळवून नेऊन डांबून ठेवायचा आणि शेवटच्या मारामारीत नायकाकडून भरपेट मार खायचा. डोंगरावरच्या मारामारीत एकदा का तो जखमी झाला की पोलिसांची फौज यायची. इन्स्पेक्टर (इफ्तेकार असेल उत्तम नाहीतर कोणीही चालून जायचा, फक्त गणवेश पाहिजे, मग मानेपर्यंत केस वाढले असले तरी चालायचं.) हातातल्या पिस्तुलाने हवेत गोळीबार करायचा. नायकालाच दम देत म्हणायचा, ‘कानून हात मे मत लो. कानून का काम कानून को करने दो, मौत का साया उसके उपर मंडरा रहा है. मंडरा रही है हे वाक्य फक्त मौत साठीच असायचं. नायक त्याला सोडून द्यायचा, खलनायकाला घेऊन पोलीस फौज निघून जायची, आता उरलेली पात्रंही पळत पळत डोंगराकडे यायची. लगेचच नायक ताजा तवाना होऊन नायिकेबरोबर गाणं म्हणायला लागायचा, दोघांचा हात हातात दिला जायचा आणि दी एंड ची पाटी दिसायची. इतका साधा कारभार असायचा. आता दिवस बदललेत, खलनायक प्रंचड हिस्त्र झालाय. तो एकटा नाही तर टोळीनेच वावरतो. डास मारावेत तशी मध्ये येणारी माणसे मारतो. नायकाच्या मित्रांचे हसत हसत पराकोटीचे हाल करतो. नायकही आता पूर्वीसारखा हात लोंबकळत ठेवून पळणारा राहिला नाही. तो बलदंड झालाय. सिक्स पैक वाला. तोही हिरोईनच्या तोडीस तोड कमी कपड्यात असतो. कधी कधी शर्ट न घालता ही वावरतो आणि शेवटी तोच खलनायकाला मारून टाकतो. थोडक्यात काय बळी तो कान पिळी नाही बळी तो मान मुरगळी किंवा मारूनच टाकी. तर हा काळाचा महिमा.

चित्रपटातच कशाला सगळीकडे तीच परिस्थिती आहे. त्यामुळे एकंदरीतच समाजातला आदरभाव कमी झाला. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीला मान देणे, त्यांचा आदर राखणे कमी पणाचे वाटू लागले. घरीच आईवडिलांना म्हातारा, म्हातारी म्हणून संबोधलं जात असेल ते बाहेर काय सन्मानाने वागवणार? बळाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो ही गुर्मी अंगात यायला लागली. बळ मग ते कसलही असो. शारीरक, मानसिक, आर्थिक वा खुर्चीचे. समोरच्याचा अपमान करायला त्यांना काहीही वाटत नाही. आपल्या अंगात बळ आहे म्हणजे आपण कोणालाही वेठीस धरू शकतो, काहीही उपदेश करू शकतो. ”कष्ट करा, त्याग करा, दुसऱ्याला मदत करा” सगळं तुम्ही करा. आपण करूचा संबंध नसतो. हे सगळं ठणकावून सांगणारं, गरीब बिचारे माना डोलावतात आणि कष्ट करीत रहातात कारण ते बलवान नसतात… पूर्वी म्हटलं जायचं, सत्य हे सत्यच असतं. ते सांगावं लागत नाही. आता तसं राहिलं नाही. असत्य अनेक वेळा ओरडून सांगितलं की ते सत्य वाटायला लागते. ते ओरडायला मात्र ताकद लागते. म्हणजे बळ आलेच. साधं वाचायला दिलेलं पुस्तकही परत मागायची भीती वाटते. मागितलं तर तोच डाफरतो, ’देतो ना…पळून चाललो का काय मी?”

अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात आपण पहातो, योग्य व्यक्तीला बक्षीस मिळत नाही. अयोग्य व्यक्ती बळाच्या जोरावर (इथे शारीरिक बळ नसते तर ओळख, वशिला हे बळ असतं) बक्षीस मिळवते. मोठी होते. पुढे अशी बक्षिसे मिळवण्याची चटकच लागते आणि ते मिळवण्याचे मार्गही सापडत जातात. एक गमतीदार उदाहरण आठवल. काव्यवाचन स्पर्धेत एक कवी उत्कृष्ट कविता म्हणून गेला, टाळ्यांचा कडकडाट झाला पण त्याला बक्षीस मिळाले नाही. तो परीक्षकांकडे गेला आणि त्यांनी विचारले “मला का नाही मिळाले बक्षीस? पहिल्या आलेल्या मुलीची कविता सुमार होती तरी तिला कसे बक्षीस मिळाले? परीक्षक म्हणाले, “कारण तिचे डोळे निळे होते” तर अशी असते स्पर्धा. एकदा का गळ्यात बक्षिसांची माळ पडली की ती व्यक्ती होते मान्यवर. एखादा गुणी शिक्षक, एखादा कष्टाळू कामगार, एखादा उमदा नाट्यकलावंत, शीघ्र कवी, प्रतिभावान साहित्यिक, मनस्वी चित्रकार आपल्याच धुंदीत, आपल्याच धुंदीत जगत असतो. व्यवहारातले छक्के पंजे त्याला माहीत नसतात, तो बक्षीसापासून कोसो दूर राहतो, त्याच्या क्षेत्रात रसिकांचा लाडका असूनही मान्यवर असूनही डावलला जातो.

आजही हुंडाबळी जात आहेत. स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. बालकामगार कामाखाली पिचून जात आहेत. एखादा बापच आपल्या मुलांना शिकवण्याऐवजी कामाला लावतो. स्वत:च्या मुलीला विकणारे बाप आहेत हे सारे कशाचं लक्षण आहे? बळाचाच वापर केला जातो ना? पूर्वीच्या काळी ठेकेदार हाता खालच्या मजुरांकडून वाट्टेल ते काम करून घ्यायचा. कामगार स्त्रियांवर अत्याचार करायचा. आता एखाद्या व्यवस्थापनात बॉस गरीब कारकुनाकडून, गरीब महिलेकडून खूप काम करून घेतो. दादागिरी करणाऱ्याना जास्त काम सांगितलं जात नाही आणि यांना कोणीही वाली नसतो. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आणि दहा-दहा जणांना लोळवणारा नायक फक्त सिनेमातच असतो.

एकंदरीतच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ती प्रचंड वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे, दारिद्रयामुळे आणि त्या अनुषंगाने वाढणाऱ्या बेकारीमुळे. बळाचा वापर करूनच काय पाहिजे ते मिळवायचं. त्यासाठी नीती, अनीतीचा विचारही मनाला शिवू द्यायचा नाही. डोक्यात येणारे हिंस्त्र विचार कृतीमध्ये आणण्यापूर्वी हृदयापर्यंत झिरपू दिले तर या गोष्टी घडणार नाहीत. पशुपक्षांना देखील कायद्याने अभयारण्ये निर्माण केलेली आहेत. माणूस मात्र कधीच कुठेच निर्भयतेने राहू शकत नाही एवढे मात्र खरे. जगताना कायम तो भीतीच्या वातावरणातच राहतो. न जाणो कोणी आपल्यापेक्षा बलवान येऊन आपल्यावर हल्ला करील.

-सदानंद भणगे
पसायदान,कलानगर सोसायटी
गुलमोहर रोड,सावेडी,अहमदनगर ४१४००३
९८९०६२५८८०

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

5 Comments

  1. बळी तो मान मुरगळी असं आता म्हणायला हवं. सिनेमातील जुना तुम्ही लिहिलेला पॅटर्न अनेक वर्षे तसाच होता! छान आहे लेख!

  2. अत्यंत वाचनीय असा लेख आहे.
    मांडणी खूप छान झाली आहे.

  3. अतिशय मार्मिक लेख!
    समाजातील हिंसक वृत्ती कमालीची वाढल्यामुळे
    आज ही गंभीर समस्या निर्माण झाली असावी असं वाटतं!

  4. मनाला भिडणारं खूप छान लिखाण… नीतिमत्ता , प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचा ऱ्हास होत चाललाय..!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!