‘मिशन एम्प्लॉयबल’चा आधार गेला

‘मिशन एम्प्लॉयबल’चा आधार गेला

अन्न, वस्त्र, निवारा अशा कोणत्याही मूलभूत गरजा पूर्ण करायच्या असतील तर हाताला काम असणं गरजेचं असतं. गेल्या दशकातील बदलते ट्रेंड पाहता आय. टी. क्षेत्र झपाट्यानं वाढलं. जगभर रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या. ‘आयटीत जा आणि ऐटीत जगा’ असं पालकांकडून सांगण्यात येऊ लागलं. आयटीतल्या मुलांचा लग्नाच्या बाजारातला भावही वाढला. संगणक क्रांती झाल्यावर आयटीमुळं अनेकांचं जगणं सुधारलं. अनेकांच्या आयुष्यात स्थैर्य आलं.

या क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीची शोधाशोध सुरू होते आणि मग खटाटोप करावी लागते ती मुलाखत चांगली कशी होईल, आपला परिचय इतरांपेक्षा वेगळा आणि नेमकेपणानं कसा देता येईल, संभाषण आणि व्यक्तिमत्त्वातील पैलू कसे सुधारता येतील अशा सगळ्यांची! याचा विचार करता गेल्या काही वर्षातलं एक महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे लंडनमधील सुप्रसिद्ध सल्लागार क्रिस्टी बॉनर यांचं. अर्थशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या या मानसशास्त्रज्ञ मार्गदर्शिकेचं निधन झाल्याची बातमी आली आणि या अनाकलनीय, अनपेक्षित, हृदयद्रावक घटनेनं आमच्यासारख्या हजारो नोकरदारांचा मार्गदर्शक नियतीनं आमच्यापासून हिरावून घेतल्याची भावना निर्माण झाली.

काही व्यक्तिशी आपला थेट संबंध कधीच येत नाही, तरीही त्यांच्याविषयी मनाच्या कप्प्यात एक आपलेपणाची भावना असते. त्यांचे विचार इतके प्रभावी आणि प्रेरक असतात की त्यापासून अनेकांचे आयुष्य मार्गी लागते. त्यांच्या विचारांचा कळत-नकळत आपल्या मनावर मोठा परिणाम होतो आणि मग ती व्यक्ती आपल्याला आपली वाटते. क्रिस्टी बॉनर यांनी आर्थिक क्षेत्रातील भरीव योगदानानंतर वयाच्या चाळीशीत आपला मोर्चा मानसशास्त्राकडं वळवला. मानवी मनाचा अभ्यास करताना या नायिकेनं इतरांच्या कल्याणासाठी अफाट कष्ट घेतले. ‘मिशन एम्प्लॉयबल’ हे तिच्या आयुष्याचं ध्येय होतं. नोकरीसाठी प्रोफाईल अपडेट कसं करायचं, मुलाखती कशा द्यायच्या यावर तिनं विपुल लेखन केलं. ‘ग्लोबन करिअर ऍडव्हायझर’ अशी तिची ओळख होती आणि सततच्या ध्यासपूर्ण संघर्षानं तिनं ती ओळख कायम जपली.

जगातील सर्व गरजू व खाजगी नोकरी शोधणार्‍या तरूणाईला मदतीचं ठरणारं सध्याचं आघाडीचं माध्यम म्हणजे लिंक्डइन! आणि या माध्यमावरील सर्वात झळकणारं मानाचं नाव म्हणजे क्रिस्टी बॉनर! मानसशास्त्र या विषयातील क्रिस्टीचा सखोल अभ्यास आणि इतरांसाठी काहीतरी चाकोरीबाहेर काम उभं करण्याची बलाढ्य महत्त्वाकांक्षा या दोन्हीच्या जोरावर तिनं कामकाज सुरु केलं.

नोकरी बदलण्यासाठी इच्छुक आणि नोकरी शोधणार्‍या हजारो तरुण-तरूणींना तिनं सुयोग्य व सुलभ मार्गदर्शन केलेलं आहे. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला निदान नोकरीविषयक अत्यावश्यक सेवा व मार्गदर्शन तरी उपलब्ध असायलाच हवं असा तिचा ध्यास होता. त्यासाठी तिनं दिलेलं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण व दखलपात्र आहे.

चार भाषांवर प्रभुत्व असलेली, वीस वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्य केलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘मिशन एम्प्लॉयबल’चं ध्येय बाळगून त्याकरिता सदैव झटणारी क्रिस्टी बॉनर आज आपल्यात नाही. तिनं लंडनला तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. हजारोंच्या आयुष्याला दिशा देणार्‍या, त्यांच्या दुःखावार हळूवारपणे फुंकर घालणार्‍या, त्यांच्यासोबत प्रत्येक सुख-दुःखाचे क्षण वाटून घेणार्‍या या चतुरस्त्र, यशस्वी व जगप्रसिद्ध व्यक्तीला स्वतःचं दुःख व्यक्त करायला खरंच कुणाचा खांदा मिळाला नसेल?

मानवी मनाचं म्हणाल तर मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करणारी क्रिस्टी असो वा परिस्थितीनं नकारात्मक झालेल्या हजारोंना आध्यात्मिक मार्गानं उभारी देणारे गुरु भय्युजी महाराज असोत… काहीतरी चुकतंय, नजरेतून नकळत निसटून चाललंय आपल्या. इतरांच्या आयुष्यात नंदनवन फुलवण्याच्या अट्टहासापायी आपल्याच अंतरंगात उमलणार्‍या कळ्या मुळी जळून जात आहेत आणि आपण त्याकडं दुर्लक्ष का करत आहोत कुणास ठाउक…!

मानवी मनाच्या गाभार्‍यात खोलवर स्वतःशी सुरु असलेली लढाई घरकोंडीच्या काळात अशाप्रकारे रौद्ररूप धारण करून महाभयंकर घटनांच्या स्वरूपात बाहेर पडते आहे. काहीही असो! या अनाकलनीय, अनपेक्षित, हृदयद्रावक घटनेनं आमच्यासारख्या हजारो नोकरदारांची मार्गदर्शक आमच्यापासून हिरावून घेतली हे मात्र खरं.

-रेणुका व्यास
8378995535

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा