कुणी देईल का मज त्या दु:खाची भूल?’

Share this post on:

“राजा रविवर्म्यानं त्याच्या उर्वशीच्या चित्रासाठी जे मॉडेल वापरलं होतं त्याबद्दल तुला किती म्हणून उत्सुकता होती. रविवर्म्याला त्या मॉडेलच्या शरीराबद्दल आसक्ती होती का? प्रेक्षकाला तशी उर्वशीबद्दल आसक्ती वाटावी अशी रविवर्म्याला अपेक्षा होती का? असली कलाबाह्य चावट उत्सुकता तुला वाटली होती?”

प्रा. विजय कारेकर यांचा ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या मार्च 2010 च्या अंकातील हा लेख तुम्हाला नक्की आवडेल. अवश्य वाचा. प्रतिक्रिया द्या.

चित्र वेळ, विचित्र स्थळ.
विचित्र न्यायाधीश
न्यायाधीश येरझारा घालतो आहे.
न्या. : उशीर का? उशीरा का झाला?
ना खड्डे, ना वळणे, ना घाट. ना पोलिसी हप्ता.
तर मग-
तर मग उशीर का झाला?
(शांतता)

कोणता वार आज?
वार! म्हणजे बरोबर आहे.
कोणता महिना हा?
म्हणजे बरोबर आहे.
कोणते वर्ष हे?
मग बरोबर आहे.
आणि काळ, वेळ, तिथी, नक्षत्र?
बरोबर, सर्वच बरोबर
मग का उशीर?
(शांतता)

हं! सुचलं.
मरणारा जो तो अवलिया. खोडकर.
स्वत:ला व इतरांना चकवून जगून मरून जगणारा.
मग तो आता यमदूतालाही काही बाता मारून, भुलवून वेळ घालवीत असणार.

म्हणत असेल त्याला, की तुझे चरित्र वा आत्मचरित्र देतो तुला मी प्रकाशित करून. तुला फुरासत नसेल, उसंत नसेल तर मीच करीन सारा खटाटेप लीलया.

जागतिक वाङमयात भर.
चल, काढ एकशे एक रूपये!
पूर्वी, फक्त रूपाया मागायचो!

(हसतो) तर मग ह्या रघुनाथ उर्फ रॉय किणीकरानेच घातला असा काहीतरी घोळ.

यमदूताचे आत्मचरित्र हा रॉय कसा काय लिहिणार? पण त्याची प्रतिभाच तरी अशी तिरकस, सूक्ष्म अन् अस्सल ऍब्सर्ड!
(शांतता)

येऊ देत तर शिंच्याला.
खिळवतोच त्याच्या प्रतिभेला क्रूसावर.
तो त्याचा दुसरा चक्रमसिंह कवी…
म्हणायचा कसा!

‘शव हे कविचे जाळू नका हो
जन्मभरी तो जळतचि होता?
फुले त्यावरी उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतचि होता!’

आता हा रॉय अग्निदिव्यातूनही तो
इकडं येतच आहे.
(मोबाईल वाजतो)

हॅलो, अरे यमदूता, का उशीर एवढा?
रेड्यावर तो मागे नीट बसला आहे ना?
तो रॉय. त्याच्या बातामध्ये गुंतू नकोस! भुलू नकोस!!
अरे पण असा थांबला आहेस का मध्येच?
काय? चारमिनारचं अख्खं पाकीट पुंकून निघूया म्हणतोय?
अरे पण आणलंच कसं ते त्यानं?
पाकीट अबाधित अग्निदिव्यातून? काय?
काय म्हणताहेत? अग्निदेव प्रसन्न आहेत त्यांना?
ठीक आहे. माफ करून टाक त्याला.
पण तेवढं झालं की लगेच नीघ.
(शांतता)

न्या. (हसतात) (वारकर्‍यांच्या तालात) ‘ग्यानबा तुकाराम’
रॉय – रोबस्ट रॉय.
चटणी भाकर खॉय।
विनातिकिट जॉय।
रूबाया करॉय भरून जॉय।
जॉयिस्ट रॉयिस्ट, रॉयिस्ट ऑयिस्ट॥
जाय जाय रॉय जॉय ए जॉय रॉय ॥
(स्तब्ध) (शांतता) ग्यानबा तुकाराम रॉय बा तुकाराम।
(एकदम करूण होतात)
विठू माझा लेकुरवाळा.
ये ग ये ग विठाबाई! (स्तब्ध)
(शांतता)

मी हे काय असं न्यायाधीश असताना देखील मी आचरटसा वागतोय. रॉयच माझ्यात शिरून राहिलाय की काय?

छे! मला तटस्थ, उदासीन राहूनच त्याची झाडाझडती घेतली पाहिजे.
(दूरस्थ काळजीने पाहतो. कपाळावर हात)
पृथ्वीवरून इथं यायला अवघी तीनच तर मिनिटं लागतात-
पण आता तर तब्बल पाच मिनिटं वीस सेकंद झाले.
– पण त्या रॉय किणीकराला आणायचे ही काही सोपी गोष्ट नव्हे.
आमचा यमदूत जेव्हा त्याच्यासमोर उभा ठाकला असेल तेव्हा-
तेव्हा मिश्किल हसून तो याला म्हणाला असेल, ‘वेलकम! आगतम् स्वागतम् सुस्वागतम् !

खरं म्हणजे केव्हाच यायला पाहिजे होतास तू. फार उशीर केलास.

म्हणजे तुमच्या तिकडच्या ऑफिसातही गोंधळ दिसतोय तर. नावागावांच्या, तिथी नक्षत्रांच्या नोंदी फिरवाफिरवी करता की काय लेकानो!

ठीक आहे. बैस, तू इथलं काही पेय घेत नसणार. चहा सुद्धा नको ना? आहे कुठे म्हणा साखर, दूध, गॅस शिल्लक.

काय? रेड्याला पार्किंगला जागा नाही म्हणतोस?

जम्बोजेटचे दिवस आलेत तरी तुम्ही अजुनी रेडा वाटतायत. शेवटी तरी दारिद्य्राने रंजल्या, गांजल्यांना जम्बो जेटचा आनंद देत चला.

यमदूत : अहो, रॉय साहेब काय, ज्या तुमच्या कंप्लेन्स असतील त्या तिकडं डायरेक्ट सांगा.

त्यावर रॉय म्हणाले, ‘मी तर उत्सुकच आहे तिकडं यायला.’

असा काही तरी झाला असणार संवाद. त्यामुळे दोन मिनिटं लेट!
(यमदूत पोहचतो. रडवेला चेहरा)

न्या. अरे हे काय? सगळ्या मानवजातीला रडवून येणारा तू आणि तुझाच चेहरा असा रडवेला! अरे पण तो आहे कुठे तो रॉय.

रॉय बॉय जॉय किणीकर?
(यमदूत हुंदका आवरतो. डोळे पुसतो.)

यमदूत : महाराज, लेट झाल्याबद्दल माफी असावी. त्याचं काय झालं- आम्ही अगदी जवळ म्हणजे केवळ 6 लाख 87 हजार मैलावर होतो. रेड्यावर मागे बसून ते रूबाया गात होते. यापूर्वी खास विमानाने तुकोबांना आणले होते. तेव्हा ते अभंग म्हणत होते ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ त्यानंतर हे एकमेव उदाहरण.

न्या. : अरे, पण त्यांची एखादी रूबीया तर सांग.

यमदूत :
‘हा देह तुझा पण देहातील तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो, वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना, देहातील तो म्हणतो॥

(यमदूत गहिवरतो. अश्रू पुसतो.)

न्या. : अरे, पण रडतोयस काय असा?
अगदीच कच्चे मडके आहेत.
तो रॉय किणीकर मुक्तीचे गाणे म्हणतोय! त्याला अपरंपार ज्ञान झालंय. नश्‍वरता त्याला कळालीय- अगदी कच्चं मडकं आहेस तू! पण ते असो- अरे, तो झिंच्या रॉय कुठाय?

यमदूत : तर रूबाया म्हटल्यावर म्हणाले, ‘तू थांब जरासा, पुंकून येतो विडी एक.’

म्हणून उतरले ना खाली. म्हणाले, ‘पुंकीन ही विडी स्वप्राणाने!’ मग हसले. – म्हणाले, ‘तू पुढे हो येतोच बघ कसा तुझ्या मागो माग.’

न्या. : हे रामाऽ! कशाला ठेवलास रे तू त्याच्यावर विश्‍वास!

यमदूत : नाही. ते फसवणार नाहीत. विटलेत संसाराला. पृथ्वीवरच्या अधर्माला, अमंगलतेला – तिथं ते असूनही नव्हते.

न्या. : अरे, काव्यात बोलतोस!! परीस स्पर्शच झाला की रे तुला दगडा!!

यमदूत : थँक्स! मी विचारले त्यांना ‘याल कसे अंतराळातून चालत?’ तर म्हणाले,

‘पृथ्वीवरही होतो मी अंतराळी,
ना गुरूत्वाकर्षण ना मायाकर्षण,
काही न बांधू शके या कविला!
शून्याची चक्रे बांधुनि पायी
झालो होतो मी बाबा साई
थुईथुई नाचूनी येतोच रे मी बाबा?

(तेवढ्यात रॉय किणीकर अलगद येतात.)
रॉय : नमस्कार. थँक्स फॉर कॉलिंग. मी ओव्हर व्हिअर. गुडमॉर्निंग किंवा गुडइव्हिनिंग म्हणणार होतो – पण इथं ना काळ, ना अवकाश.

न्या. : ना पानशॉप ना बार!

रॉय : म्हणजे? हा स्वर्ग आहे की काय? भलतीच सजा म्हणायची.

न्या. : हा ना स्वर्ग, ना नरक. ही आहे कोर्ट रूम. इथं झाडाझडती.
इथं ठरणार स्वर्ग की नरक.

रॉय : एवढेच पर्याय?

न्या. : शिंच्या रघुनाथ, किणाकरा. चूप रहा. काही काळ वेळ आहे की नाही?

रॉय : काळवेळ शब्द डिलीट करा. कारण काळवेळ ती तिकडं पृथ्वीवर.

न्या. : अरे, संपादका, पण थँक्स.

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात पण मेल्यावरही हा रॉय आहेच की आपली आयडेंटि टिकवून! पण – पण हे काय चाललंय भलंतच – झाडाझडतीचा वेळ फुकट चाललाय. प्लीज, गंभीर गंभीर व्हा!

रॉय : (हसतात)
भिरभिरतो भोवरा हसरा लाजरा
टोकावरी तोली सारा नखरा
जीव दुखरा परी हसरा
भिरभिरूनी शुन्याकाशी
गंभीर समेवरी आला.

न्या. : हे शिंच्या, रघुनाथा, तुझं हे काय चाललंय?

रॉय : सॉरी, आय टेक माय पोएम बॅक.

होतो मी गंभीर. आवडेल मला, पण-

न्या. : आता आणि काय?

रॉय : आता जे मी काळवेळ शब्दाचं एडिटिंग केलं ना-

न्या. : त्याचं काय?

रॉय : त्याचे दोन रूपये काढा!

न्या.: (रागावतात)
गंभीर व्हा प्रथम. पिंजर्‍यात उभे रहा.

रॉय : आतापर्यंत देहाच्या, संसाराच्या पिंजर्‍यात होतोच की रे बाबा.

न्या : तो पिंजरा वेगळा. हा तर झाडाझडतीचा पिंजरा.

रॉय : पण महाराज, मला आधी एक सांगा की तिकडं पृथ्वीवर पाठवताना मला कुठं काय विचारलं होतं? माझी निवड आवड वगैरे.

न्या : ते ठरलं होतं तुझ्या पूर्वीच्या जन्माच्या कर्मानुसार.

रॉय : कर्म तुमचं नि माझं!
(विडी शिलगावतात)

न्या : (उसळून) ‘ती फेक विडी तोंडातील काडी!’

रॉय : अहो, ही तर तुम्ही माझ्या रूबायातली एक ओळ मलाच ऐकवताय. म्हणजे माझा ‘उत्तररात्र’ संग्रह तुमच्यापर्यंत पोचलाय! ग्रेटच दिसतो प्रकाशक! लेकानं रग्गड पैका मिळवलाय की काय?

न्या : छे! ही ओळ तर माझीच अभिव्यक्ती आहे –

रॉय : अस्सं? मग पुढच्या ओळी अभिव्यक्त करा पाहू.

न्या : जळण्यातच आहे गम्मत वेड्या मोठी
दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी॥

रॉय : बाप रेऽ बापऽ! तुम्ही पण कसं अगदी माझ्यासारखं लिहीलं आहे? बाप रे बाप! काही तरी काळंबेरं दिसतंय! आहे तरी काय हे एकूण नाटक?
(शांतता)

‘हे पडद्यापुढचे नाटक म्हणजे भूल’
न्या : हे रॉय, त्याआधीची एक ओळ ऐक ‘हा बिंबाचा आणि प्रतिबिंबाचा हा खेळ!

रॉय : महाराजा, थांबा, हा काय तमाशा! थांबा मी तुम्हाला चाचपून पाहतो.

न्या. : अरे शिंच्या, तमाशा काय म्हणतोयस? आणि चाचपून काय पाहतो म्हणतो आहेस. म्हणजे तमाशातल्यासारखे अश्‍लील चाळे करणार की काय तू?

रॉय : छे छे ! चाचपून पाहणार म्हणजे तुम्ही नक्की आहात तर कोण?

न्या. : नको करूस तसं. फक्त विश्‍वास ठेव.

रॉय : पण का?

न्या. : कारण मगं तुझाच गोंधळ वाढेल त्यामुळं. नेमकं बिंब कोण आणि प्रतिबिंब कोण असा तो गोंधळच होईल मोठा

रॉय : गोंधळीच तर आहे मी.

न्या. : हे शिंच्या, तू अशी सुंदर बडबड करून अनेकांचे माकड केलेस. वाजवून डमरू केलेस अनेक नरांचे वानर. प्रसून त्यामुळे अनेक बसले सुवानर. पण ते विसर. आणि आता नीट उत्तरं दे माझ्या प्रश्‍नांची.

रॉय : बोला महाराज.

(कोणीतरी विंगेतून एक रूपया फेकतो.) रॉय तो उचलतात. बोला, काय म्हणणं आहे ह्या बंद्या रूपयाचं.

न्या. : अरे आण तो रूपया इकडं. माझाच आहे तो. मघा विंगेत पडला होता. मीच तर विचारणार आहे प्रश्‍न.

न्या. नीट ऐक. राजा रविवर्म्यानं त्याच्या उर्वशीच्या चित्रासाठी जे मॉडेल वापरलं होतं त्याबद्दल तुला किती म्हणून उत्सुकता होती. रविवर्म्याला त्या मॉडेलच्या शरीराबद्दल आसक्ती होती का? प्रेक्षकाला तशी उर्वशीबद्दल आसक्ती वाटावी अशी रविवर्म्याला अपेक्षा होती का? असली कलाबाह्य चावट उत्सुकता तुला वाटली होती?

रॉय : नाही. मला तशी उत्सुकता नव्हती. त्या ‘मॉडेल’ची कमनीय आकृतीच फक्त रविवर्म्याला महत्त्वाची व सुंदर वाटली. शरीर नव्हे. कामधर्म नव्हे.

न्या. : ठीक आहे पण आता प्रश्‍न दस्तुरखुद्द तुमच्या संबंधात आहे.

रॉय : विचारा तर खरे.

न्या. : ऐका महाशय.

‘ओठात अडकले चुंबन रूसले गाल
कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल

हे असलं लिहिताना तुझं मॉडेल कोण होतं? कोणत्या प्रकारचे तुझे
तिचे संबंध होते?’

रॉय : (हसतात)
काठोकाठ भरू द्या पेला
प्राशन करीता रंग जगाचे
क्षणोक्षणी ते बदलू द्या-

ऐकलत?
आता तुम्हीच सांगा. केशवसूत इथं माझ्या आधी आले असणार. त्यांना त्यांच्या ह्या पंक्ती ऐकवून विचारलेत का त्यांना, की तुम्ही किती ढोसत होतात? आणि ब्रँड कोणता होता?

न्या. : ओह, सॉरी, यू आर सिंपली अ ग्रेट बॉय.

रॉय : ओ माय लॉर्ड, प्लीज, स्टॉप फॉर अ व्हाइल. आय ऍम गेटींग बोअर. थोडा वेळ बे्रक घेऊ.

न्या. : नो प्रॉब्लेम. बे्रक ब्रेकऽ बे्रकऽऽ ब्रोऽऽक!

रॉय : कसं म्हणालात छान. लाटाच फुटल्या काठावर खळाळ् असं वाटलं.

न्या. : मला तर अगदी धोऽ धस्सऽऽ! असं ऐकू आलं!
(शांतता)

न्यायाधीश व रॉय किणीकर येरझाला घालतात. इकडं तिकडं अर्धवर्तुळाकार फिरतात.

न्यायाधीश रॉय आणि रॉय हे न्यायाधीशाच्या जागेवर नकळत जातात.

रॉय : (मोबाईलवर बोलतात. प्रत्यक्षात हातात मोबाईल नाही.)
हं बोल यमदूता! — बोल – बोल ना – काय? न्यायाधीशांचा आवाज नाही वाटत? अरे, आवाज बदलायचाच पण मी तोच आहे. मरणानंतर कुडी बदलतात तर आवाजाचं काय! ते जाऊ दे! कामाचं बोलं.

(आवाज ऐकू येतो) बाहेर रेड्यांची रांग लागलीय. मेेलेल्या धेंड्यांच रांग. फार गडबड करतायत?

रॉय : ठीक आहे. आवरतोच ही एवढी केस. तोवर सार्‍यांना थोपवून धर. मेल्या पोलिसांची गाडी मागव!

(एक यमदूत येतो. साहेब, टेलिग्राम आहे.)

वाच.
रॉय हसतात. न्यायाधीश दचकतात.

न्या. : काय म्हणता? मी वारलो!

रॉय : छे. तुम्ही नव्हे हो मी, तुम्ही फक्त आता माझ्या जागेवर आहात म्हणून तुम्हाला तसं फील आलं.

न्या. : झाली, ही काय गडबड आहे. बिंब एक्सपायर्ड कि प्रतिबिंब एक्सपायर्ड!

रॉय : घाबरू नका हो,
मरणालाही आपण पुरूनि उरतो,
नुरतो सरसो फुगडी सारी

न्याय. : म्हणजे, झिम्मा झिम्माऽऽ!

रॉय : मज्जा मज्जा, एंजॉय.

न्याय. : महाराज, थोडा वेळ आपण खेळ खेळू चला.

रॉय : (नाचतात) खेळ खेळू चला. खेळ खेळू चलाऽ!

झांजेचा आवाज.
शांतता

रॉय : आत्ता आपण एक नवा खेळ खेळू.

न्या. : कोणता?

रॉय : मी तुझ्याकडं चेंडू टाकायचा आणि तू परत माझ्याकडं टाकायचास.

न्या : अरे पण इथं आहेत कुठं चेंडू?

रॉय : अरे, कशाला हवेत मांसल चेंडू?

न्या : मग?

रॉय : आपण अदृश्य चेंडू खेळू!

न्या. : म्हणजे शून्य!

रॉय : करेक्ट पण शून्य असे अनेकवचनी म्हणालास. शुन्य हे केव्हाही केवळ एकच असतं.

न्या : बाकीच्या सार्‍या आवृत्त्या. झेरॉक्स. खोट्या, कळलंय मला.

रॉय : काय कळलं, कपाळ!

न्या : पूर्णात काही वाढवले किंवा वजा केले तरी

रॉय : पूर्ण उदच्यते!

शून्य आणि पूर्ण एकच. तर मग झेल हा चेंडू (चेंडू टाकण्याचा अभिनय)

न्या. : हा काय झेललाच. तर घे हा आता परत.
रॉय : हा काय घेतलाच.
(असा खेळ, चालू राहतो.)

‘वाहव्वाऽ! ‘शाब्बास’

‘ग्रेट’

‘शॉट’

(एक चेंडू न्यायाधीशाच्या छातीवर. ते थोडं कोसळल्यासारखं करतात)
शांतता

रॉय : हे शून्य भयंकर घनता न दिसे त्याची
शुन्याला एकच भीति असते अस्तित्वाची
प्रलयंकर शुन्ये फिरती विश्‍वाभवती
अन् आकर्षुनि गिळती विश्‍वातील वसती!

(न्यायाधीश टाळ्या वाजवतात. शाब्बास! वाहव्वा! ग्रेट! शॉट!)

न्या. : फार दमलो बुवा खेळून. जरा फ्रेश होतो.
(हात रूमाल शोधतो. जाकिटात नसतो. धोतराच्या सोग्याने चेहरा पुसतो.)

रॉय : हे यमदूता!

यमदूत : आलोच महाराज.

रॉय : दाखव रे जरा त्याला आरसा.

यमदूत : दाखवतो पण मेलेल्याला काय उपयोग आरशाचा?

रॉय : दाखव म्हटलं ना.

(आरसा दाखविण्याचं माझं करतो.)
(हसतात)

आरशात पाहती कोण कुणाचे रूप
देहात दिसे का तुजला तुझे स्वरूप
बघ गेला पारा फुटला आरसा आड
दिसले रे दिसले, अरूप आरशाआड॥

खळाळऽ असा ग्लासच्या काचा फुटल्याचा आवाज.

यमदूत कॅटवॉक करतोय न्यायाधीश व रॉय तिकडं पाहताहेत.

न्या. : अरे हे तू इथल्या कोर्टाच्या कामाच्या वेळेत काय करतो आहेस?
(यमदूत थांबत नाही. आकाशाकडे पाहतो.)

रॉय : कॅट वॉक ! कॅटवॉक करतो आहे.

न्या. : तुला झाले आहे तरी काय?

रॉय : विंगेत जाऊन चोरून काही प्याला तर नाही ना?

यमदूत : होय!

न्या : अरे पण न्यायालयात मद्यप्राशनास बंदी आहे –

यमदूत : मद्य नव्हे, मद्य नव्हे!

रॉय : मग?

यमदूत : मद्य नव्हे, मद्य नव्हे!

हे तर मंतरलेले पाणी!!

न्या : पण चालला आहेस तरी कुठं?

यमदूत : पुण्यनगरीस!

रॉय : पुण्यनगरीत कुठं?

यमदूत : विहिरीजवळ!

न्या : आत्महत्या करणार आहेस की काय?

यमदूत : खजिनाविहिरीजवळ.

न्या : तिथं काय आहे?
(रॉय चमकतात. हसतात. विडी शिलगावतात.)

न्या : काय आहे तिथं? कोणास भेटावयास चालला आहेस?

यमदूत : तिथं माझा आहे संसार संसाऽर! हा बघ जिना चढतो आहे
(रॉय – जीन चढली आहे लेकाला)
दाराची कडी वाजवली आहे.
बघ, ती मुलं. गुणी मुलं बघ कशी भुकेली आहेत. फार दिवसांनी अवचित येऊन देखील सारे भकास आहेत. चल स्वयंपाक घरात. चूल शांत आहे. सौभ्याग्यवती शांत आहे पण आतून धूमसत आहे. औदासिन्यानं माखलेली शांतता. ‘याचं सररिऍलिस्ट चित्र किती मस्त होईल! कुणीही बोलत नाही. हे काळं जाकिट खुंटीला लावलं. ते क्रूसावर दिलेल्या ख्रिस्तासारखं वाटतयं.’

तेवढ्यात माझे थोरले चिरंजीव म्हणाले आणि सपाटा घालून तडक बाहेर निघून गेले.

पुन: शांतता.

दिवाळीत फटाके विकावेत म्हणतोय. पंधरा रूपये देतील का?

मी म्हणालो, ‘फक्त पंधरा?’ आणि हसलो.

अनिल मनाशी म्हणाला, ‘आज नाना श्रीमंत झालेला दिसतोय!’ तोही बाहेर पडला. घरातून सौ. कडाडल्या. जाकीटाच्या खिशात वा कनवटीला दिडकीपण नसेल. घरात तेल नाही, तांदूळ नाही आणि अनिलला पंधरा रूपये कुठले देणार? देव का आणून देणाराय.

‘येस, कसं ओळखलं? छान! तू आंघोळ करून ये. देव पैसे आणून देईलच बघ.’ सौभाग्यवती आंघोळीस गेल्या.

मी पटदिशी एका फडक्यात देव्हार्‍यातले चांदीचे सारे देव गुंडाळले आणि गुपचूप सटकलो. त्याचे सराफ बाजारात चाळीस रूपये आले –

घरी आलो.

सौ.ला म्हणालो, ‘हे अनिलला पंधरा दे आणि संसाराला उरलेले ठेव’.

ती म्हणाली, ‘अहो पण दिले कोणी?’

मी म्हणालो, ‘देवानं!’ मला फक्त पाच रुपये दे. मी आलोच मी निघालो. सौ. पूजेला देव्हार्‍याजवळ गेली.

रिकामा देव्हारा.

‘विसरावे ऐेसे जवळ असावे काही
मुक्त हस्त द्यावे असे असावे काही
गाळावे अश्रू दु:ख असावे खोल
कुणी देईल का मज त्या दु:खाची भूल.’

मासिक साहित्य चपराक, मार्च 2010

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

One Comment

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!