आम्ही कविसंमेलनांची अपत्ये

जेव्हा कविता लिहायला लागले त्यावेळी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी सत्यकथेसारखी नियतकालिके बंद पडण्याच्या मार्गावर होती. चांगले, दर्जेदार दिवाळी अंक निघायचे परंतु त्यात केवळ प्रस्थापित कवींच्याच कवितांना जागा होती. त्यावेळी मला आठवतंय कुठल्याही दिवाळी अंकाचा कविता विभाग हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून सुरू होऊन अरुणा ढेरे, किशोर पाठक यांच्या कवितांपर्यर्ंत येऊन थांबायचा. त्यांच्यानंतर कितीतरी नवीन कवी बरंवाईट लिहित आहेत याची दखलही या दिवाळी अंकांच्या संपादकांना नसायची. त्यामुळे छापील स्वरुपात कविता जाणकारांपुढे येण्याचं भाग्य आम्हा कवींना सुरुवातीला लाभलं नाही.

त्याचवेळी नेमका कविसंमेलन या प्रकाराला-कदाचित छापील मार्ग बंद झाल्यामुळे असेल पण एक मोठा बहर (चांगला वाईट) आलेला होता. त्यात मी आणि माझ्याबरोबरचे अनेक कवी सामील झाले. महाराष्ट्रभर आम्हाला आमची कविता पोहोचवता आली ती व्यासपीठावर कविता वाचल्यामुळे. त्यामुळे मी नेहमीच असं म्हणते की आम्ही कविसंमेलनांची अपत्यं आहोत. या कविता वाचनामुळे आम्ही बरी कविता लिहितो हे लोकापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर हंस, मौज, दीपावली अशा दर्जेदार दिवाळी अंकांची, साहित्यिक नियतकालीकांची दारं आम्हाला खुली झाली. आमच्या कवितांचे कवितासंग्रह प्रकाशित होण्याचे मार्ग आम्हाला खुले झाले. हे झालं ते केवळ सुरुवातीला व्यासपीठावर कविता वाचल्यामुळेच. ही वस्तुस्थिती मला आणि माझ्याबरोबरच्या अनेक कवींना (जे आज कवितेच्या प्रवाहात स्थिरावले आहेत) स्वीकारावीच लागेल.

मला आठवतंय पुण्यात 63 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन 1990 साली झालं. त्यावेळी नवोदितांच्या कविसंमेलनासाठी नव्या कवींचा शोध घेण्यात आला. आम्हाला संमेलनात कविता वाचण्याची संधी देण्यात आली. त्यातून पुण्यातील अनेक कवी पुढे आले आणि नंतर कवितेच्या क्षेत्रात स्थिर झाले. तेव्हा संमेलनाचा नव्या कवींचा शोध घेण्यासाठी उपयोग निश्‍चित होऊ शकतो. पण तशी दृष्टी आयोजकांकडे असायला हवी. कविता व्यापीठावर/संमेलनात वाचण्याचे चांगले वाईट दोन्ही पैलु आहेत. व्यासपीठावर सतत कविता वाचल्यामुळे प्रेक्षक/श्रोता हा काही कवींच्या जाणीव नेणीवेचा एक भाग झाला. कविता सादर करताना तिला दाद मिळाली पाहिजे यासाठी सादरीकरणाच्या विविध क्लृप्त्या लढवल्या जाऊ लागल्या. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कविता लिहिताना कवींच्या डोळ्यांसमोर त्यांच्याही नकळत एक श्रोतृवर्ग तरळत राहू लागला. त्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांना आवडतील अशा टाळीवाल्या कविता लिहिल्या जाऊ लागल्या. भल्याभल्या कवींची अशी अवस्था झाली.

अशावेळी भान ठेवावं लागतं ते आपल्या आतल्या कवितेचा आवाज शाबूत ठेवण्याचे आणि लोकानुनयी कवितेच्या प्रवाहात वाहून न जाण्याचे. आपल्या खर्‍या कवितेला दडपून न ठेवता खोट्या, आकर्षकतेला शरण न जाण्याचे.

या खोट्या कवितेमुळे कवितेचे खूप नुकसान होते आहे. विशेषत: पॉप्युलॅरिस्टिक कविता लिहिणार्‍या सवंग कवितांना चाली लावून रसिकांना भुलवणार्‍या कवींमुळे रसिकांची दिशाभूल होते आहे. जी स्टेजवर पॉप्युलर होते, गायली, वाचली जाते तीच कविता असाच समज सामान्य रसिकांचा होतो आणि ते खर्‍या कवितेपासून वंचित राहतात. दुसर्‍या बाजूला कवींचीही दिशाभूल होते आणि ते स्वत:च्या खर्‍या कवितेपासून दूरदूर जाऊ लागतात.

परंतु याचा अर्थ असा नव्हे की स्टेजवर वाचली जाते ती सगळीच कविता सवंग, खोटी किंवा श्रोत्यानुनयी असते. कित्येकवेळा अतिशय चांगली गंभीर कविता देखील स्टेजवरुन वाचली जाते आणि ती चांगल्या पद्धतीने प्रेेक्षकांकडून स्वीकारलीही जाते. वाचणारे, लिहिणारे अनेक प्रेक्षक कविता पारखून दाद देतात. त्यांना चांगल्या कवितेची चांगली जाण असते. त्यामुळे लोकांच्या रसिकतेला कमी लेखण्याची चूक कदापि करता कामा नये. ते चांगली कविता स्वीकारतात आणि वाईट कवितेला वरच्यावर उडवून लावतात. मात्र त्यासाठी जो एक अभिजाततेचा कान, मन तयार व्हावे लागते, ते आपोआप होत नाही. त्यासाठी संवेदनशीलतेची मशागत करावी लागते.

अखिल भारतीय साहित्य संमेलनातील कविसंमेलन बर्‍याच वेळा मार खाते, कोलमडते कारण साहित्य संमेलनातील वातावरण उत्सवी, जत्रेसारखे असते. गंभीरपणे, आस्थेने कविता ऐकणार्‍यांची संख्या तिथे थोडी असते. कवींची संख्याही बरीच असते. त्यामुळे सूक्ष्म,आतल्या आवाजाची कविता या गोंधळात हरवून जाते, आणि थोडी ढोबळ परंतु भावनिक अपील असणारी कविता दाद देऊन ऐकली जाते. छोट्या छोट्या संमेलनात जशी कवी संमेलने रंगतात तशी मोठ्या संमेलनात रंगणे अवघड असते. एरवी वर्षभर महाराष्ट्रात ठिकठिकाणी कविता वाचताना हा फरक मला ठळकपणे जाणवतो.

असे असले तरीही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे महत्त्व मात्र कमी होत नाही. कारण एरवी कविसंमेलनांच्या माहोलपासून दूर असणारे पण सुप्तपणे साहित्याची आवड बाळगणारे लायब्ररीतून विकत आणून पुस्तके वाचणारे रसिक त्या-त्या ठिकाणच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावत असतात. मोठ्या प्रमाणावर त्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती असते. त्यांच्यासाठी साहित्य संमेलनातील कवीसंमेलने ही खूप आनंददायी आणि महत्त्वपूर्ण ठरू शकणारी असतात. विशेषत: तरुण वर्गाला नव्यानेच साहित्यिक, कवींना ऐकता येते, आणि त्यांच्यातील रसिकतेला खतपाणी मिळते. ज्यांच्या स्वत:मध्ये कवित्वशक्ती सूप्त रुपात असते, तिला धुमारे फुटतात. त्यामुळे साहित्य संमेलन ही त्या-त्या शहरांसाठी एक पर्वणीच असते. यात शंका वाटत नाही.

अंजली कुलकर्णी
सुप्रसिद्ध कवयित्री
9922072158
मासिक साहित्य चपराक, मार्च 2010

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा