अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!

लिव्ह इन रिलेशनशिप ही येऊ पाहणारी व्यवस्था अनेकांना न पटणारी आहे. अर्थात त्यांचा विरोध तसा दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे कारण जगात आपल्या संस्कृतीला एक आदराचे, वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. परंतु जेव्हा दुर्दैवाने साथीदार सोडून जातो तेव्हा होणारी मानसिक, शारीरिक घुसमट ही ज्यावर एकटे राहण्याची वेळ येते तेच जाणोत.

वयाच्या कोणत्याही वळणावर असताना अशाप्रकारे होणारी घुसमट अत्यंत वेदनादायी असते. त्यातही पन्नाशी गाठली असताना, संसार अर्धवट झालेला असताना येणारा एकाकीपणा हा असह्य असाच असतो. मुलं नोकरी, व्यवसाय आणि स्वतःच्या संसारात गुरफटलेली असतात. अशात नशिबी आलेला एकटेपणा जिवाची लाहीलाही करतो. अशा एकांगी जीवन जगणारांसाठी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही सोय अस्तित्वात येऊ पाहत आहे. परंतु समाज हा अशा नवीन संकल्पनेला सहजासहजी मान्यता देत नाही. भलेही कायद्याचा अडसर नसेल पण सामाजिक बंधने, समाजाचे रीतीरिवाज, परंपरा या गोष्टींचा दाखला देऊन विरोध होत असतो परंतु ही व्यवस्था किती आवश्यक आहे याचा विचार एखादी म्हातारी महिला करते आणि स्वतः पुढाकार घेऊन विधुर मुलाला आणि त्याच्या परिचयातील एका विधवा महिलेला ह्या व्यवस्थेचा अंगिकार करायला भाग पाडते तेव्हा या विषयाची आवश्यकता, महत्त्व, गरज सारे काही लक्षात येते.
चाळीशी ओलांडलेल्या आणि दुर्दैवाने आपले जीवनसाथी गमावलेल्या भिन्नलिंगी जोडप्याला या बंधनात राहणे किती गरजेचे आहे हे सांगणारी ‘अनोख्या रेशीम गाठी’ कादंबरी नुकतीच वाचण्यात आली. पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक श्री रवींद्र कामठे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून शब्दबद्ध झालेली ही कादंबरी नवनवीन कथाबीजे शोधून प्रकाशित करणाऱ्या श्री घनश्याम पाटील यांच्या चपराक प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित करुन वाचकांसमोर एक आव्हान उभे केले आहे. विषय नवीन आहे असे नाही परंतु तो मांडण्याची लेखकाची हातोटी, तळमळ महत्त्वाची आहे. विषयाचा आवाका मोठा असला तरीही लेखकाने तो समर्थपणे पेलला आहे. ही कादंबरी वाचताना लेखकाने आपले सर्वस्व त्यात ओतले असल्याचे जाणवते इतका कथानकात जिवंतपणा आला आहे. कादंबरी वाचताना वाचक एवढा त्यात मग्न होतो की, कादंबरीतील प्रत्येक क्षण, एकूणएक घटना आपल्या समोर घडते आहे याचा अनुभव वाचकांना येतो. वाचक कथानकाच्या भावविश्वात एवढा गुरफटून जातो की, प्रसंगी डोळ्यातून पाझरणारी आसवे त्याला वास्तवात आणतात. हा लेखकाच्या लेखन शैलीचा,अनुभव विश्वाचा, सामाजिक जाणिवेसह सामाजिक बांधिलकीचा जाणवणारा प्रभाव लेखकास कळतनकळत शाबासकी देणारा ठरतो. प्रकाशक घनश्याम पाटील यांनी या संग्रहाची पाठराखण करताना म्हटलंय की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ याकडे केवळ अय्याशीच्या नजरेने न पाहता उतारवयातील साथ म्हणून बघितले तर अनेकांचे एकाकीपण दूर होऊन त्यांचे आयुष्य सुसह्य होईल.’ खरेतर या नवीन संरचनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे अत्यंत गरजेचे आहे उलट अशी व्यक्ती एका दडपणाखाली हा निर्णय घ्यायला कचरते ते म्हणजे समाज काय म्हणेल? घरचे… नातेवाईक काय म्हणतील? स्वीकारतील का बहिष्कृत करतील. अशा अनेक प्रकारच्या गुंतागुंतीला लेखक रवींद्र यांची लेखणी परस्पर उत्तर देते त्यासाठी ही कादंबरी वाचणे गरजेचे आहे.
एका आगळ्यावेगळ्या विषयावरील कथानकाला सशक्तपणे गुंफण्यासाठी सुक्ष्मदृष्टी जशी आवश्यक असते तशीच विषयावरील चिंतन, मनन आणि संभाव्य सामाजिक रोष आणि परिणाम हे समोर ठेवून कथावस्तू फुलवत न्यावी लागते. लेखक कामठे मनोगतात एक गोष्ट लिहितात की, मी उगाच ओढून अजिबात लिहित नाही. जोपर्यंत उत्स्फूर्तपणे मला सूचत नाही तोवर मी लिहिण्याचा अजिबात प्रयत्न करीत नाही. खरेतर हे वाक्य नव्याने लिहिणारांसाठी एक मंत्र ठरावा कारण एखादा साहित्य बिंदू सापडला तर त्याला घाईघाईने शब्दांच्या बंधनात अडकवू नये. त्यावर विचारमंथन सुरु ठेवावे. असे करता करता एक वेळ अशी येते की, एक प्रकारची अस्वस्थता, बेचैनी जाणवू लागते त्यावेळी तो विषय कागदावर उतरावयाला सुरुवात करावी. अधीरपणाऐवजी अस्वस्थतेतून जन्मलेली कृती वाचकांना आपलेसे करते, भुरळ घालते.
लेखकाचा अभ्यास इतका सुक्ष्म आहे की, ते एक जळजळीत वास्तव प्रकट करतात. ‘नवऱ्याच्या पाठीमागे बाईकडे बघण्याचा पुरूषांचा दृष्टिकोन हा अतिशय वासनांध असतो. भले तो आपला नातेवाईक असला तरी! ‘जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं’ हेही एक सत्य लेखक नाकारत नाहीत.
अनोख्या रेशीम गाठी ही बहु पात्रं असलेली कादंबरी असली तरीही पूजा- प्रभाकर, सई- दीपक आणि आजी या प्रमुख पात्रांभोवती हे कथानक घुटमळत असताना प्रभाकरचा भाऊ- भावजय यांचाही प्रवेश लक्षणीय ठरतो. कथानकातील महत्त्वाचे प्रसंग हे कोकणातील आंजर्ले या गावात घडत असल्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य समर्थपणे वाचकांच्या भेटीला आणण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. वाचकांसाठी हे वर्णन म्हणजे दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.
एकाच इमारतीत राहणाऱ्या दोन कुटुंबाची ही कथा आहे. चाळीशी गाठणाऱ्या पूजाच्या संसारातील प्रकाश जसा अवेळी कायमचा ढगाआड जातो तसाच प्रकाशचा कौटुंबिक मित्र असलेल्या प्रभाकराच्या जीवनातील दीपही(दीपा) त्याचे जीवन अंधकारमय करुन मालवतो तेव्हा एकमेकांच्या अत्यंत हृदयद्रावक प्रसंगी पूजा आणि प्रभाकर हे एकमेकांना आधार देतात, सांभाळून घेतात. पूजाची सई आणि प्रभाकरचा दीपक हेही एकमेकांना दुःखाच्या काळात सावरण्यासाठी भरपूर मदत करतात. प्रकाश आणि दीपाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांची होणारी कालवाकालव, त्यांचा आकांत, आक्रोश लेखकाने जणू पेनमध्ये शाई न टाकता अश्रू टाकून शब्दांकित केली आहे की काय असे वाटते कारण लेखकाच्या लेखणीने केलेले वर्णन अनेक ठिकाणी वाचकांच्या आसवांना वाट मोकळी करून देते.
घटना कशीही असो भेटायला येणारांना तेच तेच सांगताना कुटुंबीय त्रासून जातात, प्रसंगी वैतागतात. दीपाच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा दीपक आजीला सोडण्यासाठी आंजर्ले या गावी जातो. गावी अशा दुःखद प्रसंगी भेटणारांची गर्दी असते. ती एक रीत आहे, परंपरा आहे आणि ती आजही गावोगावी टिकून आहे परंतु ज्याच्यावर तो प्रसंग गुजरलेला असतो त्यांची अवस्था केविलवाणी होते. येणारे सारेच दीपकला त्याची आई दीपाचा अपघात कसा झाला, कुठे झाला, दवाखान्यात वेळेवर पोहोचले नाहीत का अशा प्रश्नांनी भंडावून सोडतात अर्थात यात भेटायला येणारांचा दोष नसतो परंतु कौटुंबिक परिस्थितीचा विचार होणेही गरजेचे असते. अशा प्रश्नावलीतून घटनेचे दुःख कमी होण्याऐवजी वाढत जाते.
दुसरीकडे कळत नकळत या दोन कुटुंबातील संबंध अशा घटनांमुळे वृद्धिंगत होतात. त्याचाच परिपाक म्हणजे तिथे प्रेमाची रुजवणूक होते. सई आणि दीपक एकमेकांना नेहमी भेटत असतात त्यामुळे घडलेल्या घटनांचा प्रभाव थोडासा दूर होत असताना तारुण्यसुलभ गप्पा रंगत असताना एकदा दीपक सईने केलेल्या चेष्टेवर म्हणतो की, ‘राणीसाहेब, तुमच्यासाठी गाणेच काय मी नाच करायलाही तयार आहे.’ दीपकच्या अशा गमतीदार उत्तरातून त्याच्या मनात कोणता ‘दीपक’ तेवत आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. त्याचवेळी दीपकच्या उत्तराने आश्चर्यचकित झालेली परंतु तत्काळ सावरलेली सई दीपकचा हात सहजच दाबते त्यावेळी तिच्या मनात कोणते काहूर माजले आहे हेही समजू शकते.
अगोदर पासूनच कौटुंबिक नाती जपणारे हे दोन्ही कुटुंब दोन भयंकर आघातानंतरही दुरावत नाहीत. जसा सई- दीपकच्या वागण्यात मोकळेपणा येतो तसाच तो पूजा- प्रभाकराच्या हालचालीतही! नेहमीप्रमाणे प्रभाकर जेव्हा एकेदिवशी पूजाच्या घरी येतो. तेव्हा पूजाला त्याच्या आगमनामुळे बरे वाटत असल्याचे भाव सईला जाणवतात. त्याचवेळी प्रभाकर म्हणतात की, मी चहा प्यायला आलो आहे. काय सई, मिळेल ना एक कप चहा?’ हे वाक्य लेकी बोले सुने लागे याप्रमाणे असले तरीही तीर बरोबर पूजेच्या दिशेने जातो. काही क्षणात चहा पिऊन होताच बोलण्याच्या ओघात पूजा नोकरी करण्यासाठी इच्छुक असेल तर मी मदत करायला तयार आहे असे प्रभाकरने सांगताच पूजाचे पाणावलेले डोळे पाहून प्रभाकर तिच्या खुर्चीजवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन तिला आश्वस्त करतो परंतु प्रभाकरच्या मनात आपल्याबद्दलच्या प्रेमाची प्रभा पसरत असल्याची जाणीव होते मात्र दुसऱ्याच क्षणी तिच्या डोळ्यासमोर समाज नि नातेवाईक उभे राहतात.
प्रभाकर स्वतःच्या शब्दाला जागतो आणि पूजाला एका बँकेत नोकरी मिळवून देतो. दुसरीकडे सई-दीपक दिवसेंदिवस एकमेकांच्या जवळ येत होते. परंतु दोघेही स्वतःलाच एक प्रश्न विचारत, ही आपुलकी? जिव्हाळा? प्रेम की तडजोड? किती गंमत आहे पहा ना, तारुण्यातील हे प्रेमी प्रेम व्यक्त करण्यासाठी गोंधळलेले होते त्याचवेळी त्यांच्या पालकांचीही तीच अवस्था होती. दोन्ही प्रेमी युगल आपापले प्रेम व्यक्त करण्यासाठी विचार करत होते, गोंधळलेले होते. ही अवस्था, बेचैनी, तगमग टिपण्यात लेखक रवींद्र कामठे कमालीचे यशस्वी झाले आहेत. एकीकडे तारुण्यसुलभता होती तर दुसरीकडे मात्र काहीसे परिपक्व परंतु नियतीच्या निर्दयतेचे बळी पडलेले जोडपे होते. दोन्ही भावना व्यक्त करण्यात लेखकाची ‘तारेवरची कसरत’ झाली असणार परंतु ती लेखकाने लीलया पार पाडली हे निश्चित!

लेखक रवींद्र कामठे यांचे ‘तारेवरची कसरत’ हे पुस्तक मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळास भेट द्या.

एका निवांत क्षणी प्रभाकर दोन प्रस्ताव पूजासमोर ठेवतो पहिला म्हणजे सई- दीपकच्या लग्नाचा आणि दुसरा म्हणजे त्याचे पूजावर असलेल्या प्रेमाचा! पूजा पहिला प्रस्ताव आनंदाश्रू प्रसवत मान्य करते. दुसरा प्रस्ताव ती शब्दांच्या नव्हे तर स्पर्शाच्या सहाय्याने मूकपणे स्वीकारते. नंतर हलकेच सुचवते की, ‘अगोदर मुलांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली आणि नंतर ते त्यांच्या जीवनात स्थिरावले की आपण आपल्या संदर्भात निर्णय घेऊया.’
दोन्ही जोड्यांमध्ये प्रेमाचे धागे गुंफले जात असताना अचानक पूजाच्या जीवनात तिने बँकेत न केलेल्या एका घोटाळ्याचे बालंट येताच प्रभाकर खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहून ते प्रकरण सहज हाताळतो आणि पूजावर येऊ घातलेला कलंक अगोदरच पुसून टाकतो. या प्रसंगी पूजा आणि प्रभाकरच्या मनातील नाजूक भावना सई-दीपक अलगदपणे टिपतात. प्रश्न असा निर्माण होतो की, या चौघांच्याही प्रेमाची वाच्यता कुणी, कशी करावी? त्याला मान्यता कशी मिळावी? तरुणाईच्या प्रेमाला फारसा विरोध होत नाही परंतु विधवा-विधुर यांचे लग्न म्हणजे जणू एक क्रांतीच! अशा क्रांतीला पाठिंबा देणारी व्यक्तीही तशीच धीट, धाडसी आणि सकारात्मक विचाराची असायला पाहिजे. पूजा-प्रभाकर यांचे प्रेम शुद्ध, निस्वार्थ, प्रामाणिक, वासना विरहीत होते म्हणून त्यांच्या या विचाराला ठामपणे, विश्वासाने साथ देणारी एक व्यक्ती होती. ती म्हणजे आंजर्ले येथे प्रभाकरच्या भावाकडे राहणारी आई!
प्रभाकर- पूजा यांना सुट्टी मंजूर झाल्यामुळे ते चौघेही आंजर्ले येथे पोहोचतात. इथे कथानक काहीसे, थोडेसे अनपेक्षित असे वळण घेते. प्रभाकराच्या आईचा या कथानकात झालेला प्रवेश हा सर्वच गुंतागुंत सोडवणारा असाच ठरतो. घरात प्रवेश केल्याबरोबर आजीची अनुभवी नजर या चौघांच्या भावना ओळखते. आजी पूजाला जवळ बोलावून तिच्या डोक्यावर हात फिरवून म्हणते, “ये गं पूजा ये. मला तर बाई माझी मोठी सून दीपाच आल्याचा भास झाला…” एका दृष्टीक्षेपात आणि एका वाक्यात आजी अनेक प्रश्नांचा चक्रव्यूह भेदून टाकते.
आजी! आज जे वाचक पन्नाशी नंतरचे जीवन जगत आहेत त्यांना आजीचे कुटुंबातील स्थान आणि महत्त्व निश्चितच माहिती असणार. आजी प्रेमळ, मायाळू, कष्टाळू, संस्काराचे माहेरघर असलेली, धीरोदात्त अशा अनेकानेक गुणांचा समुच्चय असणारी! कुटुंबासाठी सर्वस्व देणारी आणि कुटुंबासाठी सर्वस्व असणारी आजी असणे हेही नशिबात असावे लागते.
आंजर्ले येथे राहणारी आजी म्हणजे धीरोदात्तपणा असलेली, समंजस, विचारी, कठीण समयी योग्य मार्गदर्शन करुन मार्ग काढणारी असते. एकूण सामाजिक परिस्थिती पाहता, साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वी आजीची असलेली सकारात्मक वृत्ती, तिची दूरदृष्टी हे सारे वंदनीय आहे.
त्याकाळातील परंपरेमुळे आजीचे लग्नही बालपणी झाले आणि बालवयात संततीही प्राप्ती झाली. परंतु दुर्दैवाने बालवयातच सर्पदंश झाल्याने प्रभाकरचे वडील पत्नीवर मुलांचा भार टाकून मृत्युमुखी पडले. या घटनेतून सावरताना, पती नसतानाचे कौटुंबीक आणि सामाजिक भोग भोगताना, संसारात आलेला एकटेपणाचा शाप भोगताना आजीची वृत्ती सकारात्मक बनत गेली असावी. निर्णयक्षमता सारी जबाबदारी अंगावर पडली की विकसित होत जाते. त्याला अनुभवाची जोड मिळत गेली की निर्णय घेणे सोपे जाते. आजीच्या जीवनात अचानक आलेला एकटेपणा स्वतः भोगल्यामुळे, तो असहाय्यपणा सोबतीला असल्यामुळे ते भोग प्रभाकराच्या वाट्याला येऊ नये ह्या विचाराने आजीने एका नजरेत प्रभाकर आणि पूजा यांच्या मनात रुजत असलेले प्रेम तर ओळखलेच परंतु त्यांच्या मनात चाललेली घालमेल ओळखली, त्यांनी समाजाची घेतलेली भीतीही ओळखली आणि ताडकन आजी म्हणाली,’पूजा म्हणजे दीपाच…’ एका क्षणात तिने साऱ्या शंका-कुशंकांना तिलांजली तर दिलीच परंतु सई आणि दीपकच्या प्रेमालाही हिरवा कंदील दाखवला. सोबतच प्रभाकर आणि पूजा यांचा सध्याच लग्न न करण्याचा मनोदय जाणताच कुणीही इतक्या तातडीने विचार करणार नाही असा मार्ग सुचविला तो म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप!’ तरुणाई एवढ्या पटकन घेणार नाही असा महत्वाकांक्षी निर्णय एका म्हाताऱ्या महिलेकडून जाहीर व्हावा ही एक क्रांतीच म्हणावी लागेल. सई- दीपकचे लग्न होईपर्यंत स्वतःचे लग्न करायचे नाही हा विचार करणाऱ्या प्रभाकर- पूजा यांनाही हा विचार सुचला नाही. इतके करुन आजी थांबली नाही तर एखाद्या नवविवाहित जोडप्याच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करावी अगदी तशीच पूजा प्रभाकर आणि पूजा यांच्याकडून यथाविधी करुन घेते आणि शेजारच्या बायकांना तीर्थप्रसादाला बोलवून त्यांच्या नात्याला सामाजिक मान्यताही मिळवून देते…
शहराच्या धकाधकीच्या जीवनातून गावी आलेल्या माणसांची अवस्था, ‘कितीतरी दिवसांनी अशी सुखासुखी झोप लागली’ अशी होते तेव्हा गावाकडची शांतता लक्षात येते. आंजर्ले गावाला लाभलेली नैसर्गिक देणगी आणि तिचे वर्णन लेखकाने हातचे काहीही राखून न ठेवता केले असले तरी ते अवाजवी नसून वातावरणाशी सुसंगत असेच आहे. हे वर्णन वाचताना वाचक एवढा रममाण होतो की, जणू आपण गोव्यात भ्रमंती करायला गेलो असाच भास होतो. लेखकाने अजून एक गोष्ट सशक्तपणे उभी केली आहे ती म्हणजे लयाला जात असलेल्या एकत्र कुटुंब पद्धती! चहा घेणे असो, नाष्टा- जेवण असो, गप्पाष्टके असो, कोणताही निर्णय घेताना एकमेकांशी विचारविनिमय करण्याची पद्धती असो सारे काही एकत्र कुटुंबाची महती स्पष्ट करताना मनावर बिंबवणारे आहे.
आजीचा भरभक्कम पाठिंबा, कुटुंबातील इतरांची संमती यामुळे कोकणाच्या नयनरम्य परिसरात दोन्ही प्रेमी युगलांच्या प्रेमाला नवीन चैतन्यमय पालवी फुटते आणि एक वेगळेच वातावरण तयार होते. समुद्र परिसरात दोन जोड्यांमधील हळूवार प्रेम हलकेच प्रकट होते, परंतु सारे काही सामाजिक बांधिलकीत राहून! एक असते तरुणाई तर दुसरे जोडपे असते त्यांचे पालक!
स्वतःच्या या प्रेमाला प्रभाकर जेव्हा यज्ञाची उपमा देतो तेव्हा त्यांच्या मनस्थितीची जाणीव होते. या प्रेम युद्धात त्यांना कशाकशाच्या आहुती द्यावा लागतात याची जाणीव होते. ती जाणीव लेखकाने कवितेच्या चार ओळीतून उद्धृत केली आहे…
आयुष्य इतकही सोपं नाही
जितकं आपण समजत असतो
आयुष्य इतकंही अवघड नाही
जितकं आपण ते करून ठेवतो
शेवटच्या दोन ओळी या आजीचे स्वभाव वैशिष्ट्ये स्पष्ट करणाऱ्या आहेत.
आंजर्ले येथील आठवडाभराचा मुक्काम एका क्रांतीची ज्योत प्रज्वलीत करुन, अनेक सकारात्मक बाबींना साकारुन, हळूवार -सर्वोत्कृष्ट प्रेमाची रुजवणूक करून संपला नि परत मुंबईला परतण्याचा दिवस आला तेव्हा लेखक सर्वांच्या मनातील भाव प्रकट करताना कुटुंबातील आपलेपणाची भावना नकळतपणे व्यक्त करतात…
‘गेले आठ दिवस हे घर कसं माणसांनी गच्च भरलेलं होतं. ह्या घराला माणुसकीचं उधाण आलेलं होतं. त्यात नात्याचं एक नवीन पीक आलं होतं. पूजा आणि प्रभाकरच्या अनोख्या ‘रेशीम गाठी’ बांधून नात्याचे नवीन कलमच आजीनं लावलेलं होतं आणि नियतीला चारीमुंड्या चीत केलं गेलं होतं…’
मुंबई येथे परतल्यावर प्रभाकर- पूजा हे सई आणि दीपकच्या मदतीने सारे निर्णय पटापट घेऊन त्या दोघांचा साखरपुडा मोठ्या उत्साहाने करतात. शिवाय प्रभाकर आणि पूजा यांच्या नवीन नात्यालाही समाज मान्यता मिळवितात. साखरपुड्याला आंजर्ले येथून आलेले नातेवाईक परत जाताना आजीला मुंबईला ठेवून गेल्यानंतर आजी सई आणि दीपक यांच्या मदतीने प्रभाकर आणि पूजा यांच्या नवीन नात्याला एक वेगळेपण देते ह्या आणि इतर अनेक ज्या घटना या आस्वादकात्मक लेखात व्यक्त करता आल्या नाहीत त्याचा आनंद लुटण्यासाठी श्री रवींद्र कामठे यांची ‘अनोखा रेशीम गाठी’ ही वाचनीय, चिंतनीय आणि क्रांतिकारी कादंबरी वाचायलाच हवी.
या आगळ्यावेगळ्या, सकारात्मक कथानकात एक बाब ठळकपणे जाणवते, ती म्हणजे या कादंबरीत प्रेमीयुगुलांच्या दोन जोड्या आहेत. एकमेकांवर प्रेम व्यक्त झाल्यानंतर, लग्न ठरल्यावरही यापैकी कुणीही मर्यादा ओलांडली नाही. अनेकदा तशी परिस्थिती आपोआप निर्माण झाली होती परंतु चौघांपैकी कुणीही वासनेच्या आहारी गेले नाही. त्यांचा संयम वाखाणण्याजोगा आहेच, सोबतच लेखकाचे स्वतःच्या विचारांवर असलेले नियंत्रण आणि लेखणीवर असलेले नियंत्रणही अधोरेखित करणारा आहे.
लेखक रवींद्र कामठे आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांना अशा एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल शतशः धन्यवाद! मनोमन आभार!! अनेकानेक शुभेच्छा!!!
००००
अनोख्या रेशीम गाठी: कादंबरी
लेखक: रवींद्र कामठे
प्रकाशक: घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन, पुणे
७०५७२९२०९२
पृष्ठसंख्याः १९२
किंमत: ₹३००/-
आस्वादकः नागेश शेवाळकर,
पुणे
९४२३१३९०७१

 

लेखक रवींद्र कामठे यांचे ‘अनोख्या रेशीमगाठी’ हे पुस्तक मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळास भेट द्या.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!”

  1. Nagesh Shewalkar

    व्वा! घनश्यामजी, माझा दीर्घ आस्वादात्मक लेख आपल्या ‘चपराक’च्या वेबसाईटवर प्रकाशित केला. खूप खूप धन्यवाद.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा