स्तुतिर्नैव यस्मै कदा रोचते च ।
धनं चा पि तस्मै विषं वै सदा च ॥
सदाचार वृत्तं हि यस्यामृतं च ।
नमामो वयं तं हि यज्ञेश्वरं च ॥
आजच्या काळात कोणाला ऋषी कसे होते याचे प्रत्यक्ष दर्शन करावयाचे असल्यास त्यांनी श्रीचतुर्वेदेश्वरधाम सावरगांव येथे परमादरणीय प्रातःस्मरणीय महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे गुरूजी यांचे दर्शन घ्यावे. अत्यंत तेजःपुज गौरवर्णांकित शरीर, गंभीर मुद्रा, ज्ञान आणि त्याग याचा एकत्रित झालेला समन्वय, नेत्रातील एक वेगळीच चमक, शांत, प्रसन्न, मुखमंडल पाहिले की हे कोणीतरी सत्ययुगातले वसिष्ठ अथवा वामदेवच अवतरले आहेत असा भास मनाला होत असे आणि अत्यंत नास्तिकही त्यांना विनयाने नतमस्तक प्रणाम करीत असत. असं एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व म्हणजे कस्तुरेशास्त्री किंवा कस्तुरे गुरूजी होते.
कस्तुरे गुरूजींचा आयुष्याचा प्रवास हा 98 वर्षांचा म्हणजे जवळजवळ एक शतकाचा आहे. यात त्यांनी भारताच्या राजकारणातली, सामाजिक जीवनातील स्थित्यंतरं अनुभवली आहेत. भारतीयांच्या जीवनावर पाश्चात्य जीवनशैलीचा पगडा पाहून ते अगदी बालवयापासूनच व्यथित होत होते. त्यांचे या देशावर आणि देशातील संस्कृतीवर नितांत प्रेम असल्यामुळे त्यांनी त्याच्या रक्षणाची उपाययोजना काय काय असावी याबद्दल वयाच्या अवघ्या चौदाव्या-पंधराव्या वर्षीच चिंतनाला सुरूवात केली.
‘‘आधुनिक काळात हिंदू संस्कृतीचे रक्षण कसे करावे?’’ या संज्ञेचा त्यांनी एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. त्यावेळी त्यांचे वय पंधराच वर्षाचे होते. यात त्यांनी संस्कृती कशाला म्हणावे, रक्षण म्हणजे नेमके काय? यासारख्या प्रश्नांचा खूप सखोल आणि प्रगल्भ विचार मांडलेला आहे. पतित पावन मंदिराची कल्पना या लेखात त्यांनी मांडली जी पुढे सावरकरांनी प्रत्यक्षात आणली. सावरकरांनी हा लेख वाचून तसे केले असे मला म्हणावयाचे नाही तर समान विचारक कसे एकाच प्रकारे विचार करतात याचे हे बोलके उदाहरण होय. याच लेखाने प. पू. गुरूजींच्या जीवनाची ध्येयनिश्चिती केली. आयुष्यभर भारतीय संस्कृती आणि तिचे शास्त्र याचे अध्ययन, अध्यापन करावयाचे अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली. 1908 ला त्यांचा जन्म आणि 2006 ला त्यांनी इहलोकीची यात्रा संपविली. या मधल्या जीवनात त्यांनी प्रत्येक श्वासागणिक कशाची काळजी केली असेल तर वेदांचे, संस्कृत भाषेचे, त्यातील शास्त्राचे जतन कसे होईल? त्याचा प्रचार, प्रसार कसा होईल? बस्स!
नांदेड येथे तीस वर्षे त्यांनी शास्त्राची सेवा केली. संस्कृत पाठशाळा, संस्कृत महाविद्यालय, मराठवाडा संस्कृत परिषद या संस्था स्थापन केल्या, वाढवल्या. हे सर्व करताना दारिद्य्र आनंदाने स्वीकारले. प्रसंगी उपाशी राहून पाठशाळा चालवली.
रजाकारांच्या काळात नांदेड येथून पाठशाळा त्यांनी बासर, जिंतूर, कार्ला टेकडी, धुळे या विविध ठिकाणी नेऊन चालवली पण काम बंद केले नाही. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी अशी त्यांची विद्यार्थी जीवनातली ओळख. संपूर्ण शांकरभाष्य, भामती, खंडणखंडखाद्य, अद्वैतसिद्धी यासारखे तर्ककर्कश ग्रंथ त्यांनी अभ्यासिले होते. वेदांततीर्थ, वेदांतरत्न, वेदांतोपाध्याय काव्यकुशल या पदव्या त्यांनी संपादित केल्या होत्या. त्यामुळे नोकरी मिळू शकली असती पण तो विचारही मनाला शिवला नाही कारण ध्येयपूर्ती! यासाठी सर्वस्व अर्पण केले. सावरकरांच्या भाषेत बोलायचे झाले तर ‘बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे’ याप्रमाणे संस्कृत, संस्कृतीरक्षण हे सतीचे वाण गुरूजींनी जीवनभर सांभाळले.
कै. एकनाथमहाराज खडकीकर, शंकरमहाराज कंधारकर, चिंतामणीमहाराज वसमतकर, अनंतमहाराज टाकळीकर, वसंतमहाराज दीक्षित, प्रा. डॉ. सी. ना. जोशी असे संस्कृतचे जवळपास दोनशे विद्यार्थी त्यांनी तयार केले. त्याकाळात प्राचार्य सुरेंद्र बारलिंगे सर, प्रा. राम शेवाळकर, प्राचार्य नरहर कुरूंदकर यारख्या लोकांशी चर्चा केल्या. व्याख्याने दिली. पुस्तके लिहिली. मराठवाड्यातील ज्ञानऋषी म्हणजे नरहर कुरूंदकर हे गुरूजींच्या ज्ञानासमोर आदराने नतमस्तक होत. गुरूजींची विद्वत्ता ओळखून बारलिंगे सरांनी पुरी शंकराचार्यांना माहिती देऊन त्यांना महामहोपाध्याय ही पदवी प्रदान करायला लावली. करवीर संख्येश्वर पीठाधीश जेरेस्वामींनी विद्यानिधी पदवी दिली आणि प्रवृत्तीधर्म, निवृत्तीधर्म ही दोन पुस्तके लिहून घेऊन प्रकाशित केली.
साहित्य शास्त्र यातील रस, विचार यावर जवळपास चाळीस-पंचेचाळीस व्याख्याने गुरूजींनी दिली होती. संस्कृत पाठशाळा नांदेड येथे सरस्वती महोत्सवात आधी आधुनिक विचारवंतांनी आपला विचार मांडावयाचा आणि नंतर प्राचीन पक्ष गुरूजींनी किंवा आचार्य गुरूजी अथवा एकनाथ महाराजांनी स्थापन करावयाचा अशी परंपराच होती. वयाच्या साठीनंतर मात्र संस्कृतीप्रमाणे त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला व सावरगाव या ठिकाणी आपली ब्रह्मप्राप्तीची साधना आरंभिली पण तिथेही चतुवेदेश्वरांची स्थापना करून वेदाध्ययनाची सोय केली. सामवेद, अथर्ववेद या दोन वेदांकरीता विद्यार्थी कर्नाटकात पाठवून त्यांना महाराष्ट्रात या दोन वेदांच्या शिक्षणाची सोय केली.
प. पू. गोविंददेव गिरीमहाराज यांना वेदकार्याची प्रेरणा देऊन वेदाची ध्वजा सर्वत्र फडकविली. आज सर्वत्र वैदिक विद्यार्थी जे दिसत आहेत ते गुरूजींच्या तपश्चर्येचेच फळ होय.
गुरूजींच्या जीवनातले आदर्श म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि भगवतपूज्यपाद श्रीशंकराचार्य हे दोघे. समर्थांची जन्मभूमी आणि सावरगाव एकदम जवळ आहे. समर्थांच्या जन्मभूमीत वेदकार्य असावे म्हणून तिथे एक वेदपाठशाळा गुरूजींनी स्थापन केली होती. ज्याला कार्य करावयाचे आहे त्याने समर्थांच्या दासबोधाचे चिंतन केले पाहिजे असे गुरूजी नेहमी म्हणत असत. समर्थांनी जसे रामदासी निर्माण केले तसेच गुरूजींनी वेदोपासक निर्माण केले. प. पू. गुरूजींचे जीवन एक आदर्श ऋषी जीवन होय. त्यांच्या या जीवनातून प्रेरणा घेऊन थोडेसे जरी जीवन वेदकार्याला लागले तरी आमच्यासारख्या क्षुद्र जीवांचे साफल्य होईल. तसे जीवन वेदकार्यार्थ लागो एवढी प्रार्थना समर्थांच्या चरणी करून मी लेखणी थांबवितो.
प्रमोदशास्त्री कुलकर्णी
परभणी
चलभाष – 9403960293
पूर्वप्रसिद्धी – साहित्य चपराक मासिक मार्च 2020