श्री रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु:शताब्दी प्रबोधन समितीची वाटचाल
बालपणापासून संघ संस्कारात वाढलो. शाखेत राष्ट्रपुरुषांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या. अनेक महापुरुषांची चरित्रे ऐकण्याचा छंद त्यातूनच जडला. त्यातच काही पराक्रमी राजे व संतमहंतांची चरित्रे आवडीने वाचली. शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद अशा अनेकांची चरित्रे वाचली.
या चरित्रांमधून काही गोष्टी कळल्या व त्या अंगवळणी पडाव्यात यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यातच संघशाखेतून संघटना बांधणीचे तंत्र कळाले. संघटना बांधणीचे कौशल्य असलेल्या महापुरुषांची चरित्रे वारंवार वाचनात आली. त्यातही शिवाजी महाराज, समर्थ रामदास व स्वामी विवेकानंदांनी संघटना बांधणी कशी केली याचे चिंतन सतत होत गेले.
पुढील आयुष्यात या महापुरुषांच्या कार्यात थोडासा हातभार लागला. जसे शिवाजी महाराजांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे छायाचित्र अनेक गावात वाटण्याचा योग आला. स्वामी विवेकानंदांच्या कन्याकुमारीपासून जवळ असणार्या बेटावर उभारलेल्या शिलास्मारकासाठी एक-एक रुपया जमा करण्याचे भाग्य लाभले. पुढे समर्थ रामदास स्वामींच्या जन्मस्थानासाठी काम करण्याचा योग चालून आला.
परभणी येथे चैतन्य ज्ञानपीठाच्या बैठकीस आमचे सहकारी मित्र दिलीप कस्तुरे यांच्या आर्जवी सूचनेमुळे सहजच गेलो. बैठकीचा मूळ विषय होता, समर्थांना जे श्रीराम दर्शन झाले त्या घटनेस 400 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने श्रीसमर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु:शताब्दी प्रबोधन समितीची स्थापना करावी आणि सलग 4 वर्षे विविध उपक्रम त्या समिती मार्फत करावेत. रीतसर त्या प्रबोधन समितीसाठी धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घेऊन नोंदणी करावी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सदस्य अशी रचना करावी असे ठरले. त्या बैठकीतील चर्चेत थोडा सहभाग घेतला. दुपारी भोजनाच्यावेळी चैतन्य ज्ञानपीठाचे राष्ट्रीय समन्वयक श्री. मुकुंदराव गोरे यांनी मी या प्रबोधन समितीचा अध्यक्ष व्हावे अशी गळ घातली. नाही-हो करत नाईलाजाने या ऋषितुल्य व्यक्तिच्या आज्ञेला होकार दिला आणि दिनांक 14 जानेवारी 2016 रोजी या समितीची रीतसर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री. सुरेशराव नांदेडकर, सचिव श्री. विनायक दसरे, कोषाध्यक्ष श्री. अशोकराव शेलगावकर, सदस्य श्री. मधुकरराव वैद्य, श्री. सुहासराव बीडकर व श्री. सीताराम उन्हाळे आणि निमंत्रक म्हणून श्री. मुकुंदराव गोरे तसेच समर्थ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. भारत कुलकर्णी अशा नियुक्त्या झाल्या.
चतु:शताब्दी प्रबोधन समितीचा मुख्य उद्देश समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव जांब समर्थ हे जागतिक प्रेरणास्थान व्हावे. कारण ही जन्मभूमी अतिशय उपेक्षित राहिलेली. तशी मराठवाड्यातील सर्वच महान संतांची जन्मस्थाने उपेक्षितच आहेत. मग ते ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मस्थान आपेगाव, नामदेवांचे नरसी, जनाबाईंचे गंगाखेड, साईबाबांचे पाथरी, तेरचे गोरोबा काका, आणि संत एकनाथांचे पैठण ही सर्व उपेक्षितच आहेत.
प्रबोधन समितीच्या नियमित बैठका सुरू झाल्या. त्यातून कार्यक्रमांच्या रचना करण्यात आल्या. मराठवाडाभर जांब समर्थ येथील समर्थ पादुकांच्या भिक्षाफेरीचे आयोजन करण्यात आले. या पादुका प्रामुख्याने जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड व संभाजीनगर या जिल्ह्यात नेण्यात आल्या. भिक्षाफेरी दि. 5 मार्च ते 5 एप्रिल 2016 या कालावधीत घ्यावी, त्याचे गाव, दिनांक व वेळेसह वेळापत्रक तयार करून त्याची पत्रके वरील सर्व ठिकाणी बैठका घेऊन वितरित करण्यात आली. सुरुवातीचे 20 दिवस चैतन्य ज्ञानपीठाचे सचिव श्री. सूर्यकांतराव कुलकर्णी व मधुकरराव वैद्य प्रमुख म्हणून भिक्षाफेरीत सोबत होते. पादुका पूजनासाठी एक पुजारी आणि पादुका पूजनाच्या साहित्याचे पत्रक तसेच समर्थ मंदिराची पावतीपुस्तके दिली गेली. पादुकांसाठी एक आकर्षक रथ व ध्वनीवर्धकासह आणखी एक गाडी होती.
दि. 5 मार्चला जांबेतील समर्थ मंदिरातून भजनीमंडळ, गावातील महिला व नागरिकांनी जल्लोशात निरोप दिला. पहिला कार्यक्रम परतूर तालुक्यातील आष्टी येथे होता. दुपारी 12 वाजता पादुका आष्टीत दाखल झाल्या. सेथील ग्रामस्थ लेझीम पथक व भजनीमंडळासह स्वागतासाठी उपस्थित होते. जवळजवळ 3 तास वाजतगाजत भिक्षाफेरी खंडेश्वरी मंदिरात आली. मंदिरात भागवत कथा सुरू असल्याने सर्वांनी पादुकांचे दर्शन घेतले. सरपंच अमोल जोशींनी पादुका पूजन केले. सर्व भक्तांसमोर श्री. सूर्यकांतराव कुलकर्णी व रामप्रसाद थोरात या दोघांनी भिक्षाफेरी कशासाठी काढली याबद्दल माहिती दिली. तेथून भिक्षाफेरी माजलगाव जि. बीड येथे मुक्कामी गेली. दुसरे दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून पादुका पूजन व भिक्षाफेरी सुरू झाली. भिक्षाफेरीसोबत श्री. रविंद्र ठोसर, श्री. श्रीधरबुवा रामदासी, सौ. दुर्गाताई कुलकर्णी व अन्य महिला होत्या. माजलगावमध्ये दिवसभरात जवळ-जवळ 37 घरात पादुकापूजन झाले. डॉ. दबडगावकर यांच्याकडे प्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. तेथून भिक्षाफेरी परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, सेलू इत्यादी तालुकास्थानातून नंतर परभणी शहरात दाखल झाली. 3 दिवस भिक्षाफेरी व पादुकापूजन शहरात झाले. 3 दिवसात 120 घरात पादुकापूजन झाले तसेच 5 क्विंटल भिक्षा मिळाली. रात्री कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व नियोजनात परभणीतील कार्यकर्ते श्री अशोकराव शेलगांवकर, सुहासराव बीडकर, श्री. रामदासी, श्री. सुगांवकर, विजयराव पेशकार यांनी प्रचंड मेहनत घेतली. परभणीहून पूर्णा व नंतर 3 दिवस नांदेड शहरात भिक्षाफेरी पोहोचली. नांदेडमध्ये 3 दिवस पादुकापूजन, भिक्षाफेरी व रात्री हनुमान मंदिरात भजन, कीर्तनाचे भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. मंदिरात काढलेल्या रांगोळीने सर्वांनाच मोहित केले. या सर्व नियोजनात प्रबोधन समितीचे उपाध्यक्ष श्री. सुरेशराव नांदेडकरांचे परिश्रम कोणीच विसरू शकत नाही. त्यांच्यासोबत बंडोपंत कुंटूरकर, डॉ. विजयराव लाड, सुषमाताई माढेकर, सौ. चौधरी, अरूणराव किनगांवकर यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. नांदेडहून मुखेड, नायगाव, हदगांव, माहूर व किनवट इत्यादी ठिकाणी पादुकायात्रा गेली. माहूर गावात तर पादुकांचे अभूतपूर्व स्वागत झाले.
नंतर हिंगोली, वसमत, जिंतूर येथुन पादुका यात्रा जालना जिल्ह्यातील मंठा येथे आली. मंठा येथून परतूर शहरानंतर 3 दिवस जालना शहरात पादुकांचे आगमन झाले. जालना शहरात 3 दिवसात 150 घरात पादुकापूजन झाले. दोन मंदिरात सामुहिक पूजन करण्यासाठी जवळ-जवळ 25 ते 30 जोडपी उपस्थित होती. जालना शहरातून बदनापूरमार्गे पादुका संभाजीनगर शहरात दाखल झाल्या. संभाजीनगरात पादुका 3 दिवस मुक्कामी होत्या. या ठिकाणी श्री. रविंद्र भामरे, शामराव देशमुख, अनंतराव भागवत, शंकर जाधव, सौ. सुषमाताई धांडे, सौ. ज्योतीताई चिटगोपकर यांनी खूप परिश्रम घेतले. संभाजीनगरहून 3 एप्रिल रोजी पादुकांचे आगमन अंबड शहरात झाले. येथे जवळ-जवळ 65 घरात पादुकापूजन झाले परंतु अंबड येथेच पादुकाफेरी थांबविण्यात आली. सहकारमहर्षी माजी आमदार व खासदार अंकुशराव टोपे यांच्या दुःखद निधनामुळे पादुका दौरा स्थगित करण्यात आला.
पादुका दौरा व भिक्षाफेरीच्या सुखद अनुभवामुळे बरेचजण या कामात जोडले गेले. नंतर बैठकीसाठी एखादे कार्यालय जालना शहरात असावे म्हणून शोधाशोध सुरू झाली परंतु समर्थभक्त श्री. शिवाजीराव सूगांवकरांनी ही समस्या सोडवली. स्वतःच्या भाग्यनगरमधील वास्तूत कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली. दर मंगळवारी बैठक सुरू झाली. पुढे काय करावे याचा विचार सुरु झाला. प्रामुख्याने जांब गावातील भीषण पाणीटंचाईचा विषय बैठकीत चर्चिला गेला. जांब गावात सर्वच लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून होते. सर्वांना पाणी विकत घ्यावे लागे. या समस्येवर कशी मात करावी याचा विचार सुरू झाला. समर्थांनी मार्ग दाखविला. जलबिरादरीच्या डॉ. राजेंद्र सिंहांच्या सहकार्यांनी उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केले. या परिसरात एकूण 3 नद्या आहेत हे कळते. त्यांची नावे आनंदी नदी, बनाची नदी व ढवळी नदी हे लक्षात आले. मुलतः नांदेड परंतु संभाजीनगर येथे स्थायिक असलेले आर्किटेक्ट श्री. समाधान कापशीकर यांनी नद्यांच्या सर्वेक्षणाची माहिती उपलब्ध करुन दिली.
लवादाचे अध्यक्ष मा. श्री. अंबादासराव जोशींनी विभागीय आयुक्त श्री. उमाकांतराव दांगट यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत आनंदी नदीच्या खोलीकरणाबद्दल विचारविनिमय झाला. ग्रामस्थ, शासन, समर्थमंदिर ट्रस्ट व प्रबोधन समितीच्या सहभागाने खोलीकरणाचे काम सुरू झाले. नंतर नाम फाउंडेशन व समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांनी पोकलँड उपलब्ध करून देऊन मोठा वाटा उचलला. आनंदी नदीच्या या खोलीकरणासाठी प्रबोधन समितीने पादुकायात्रेत जमा झालेला सर्व निधी या कामासाठी दिला. ग्रामस्थ व समर्थ मंदिरानेही आपला वाटा उचलला. या कामावर श्री. सुरेशराव नांदेडकर, श्री. बाबासाहेब तांगडे, सुशील तांगडे व पत्रकार श्री. राजकुमार वायदळ यांनी दिवस-रात्र एक करून खोलीकरण करून घेतले.
सुदैवाने 2016 साली खूप चांगला पाऊस झाला. परिसरातील नद्या व ओढे ओसंडून वाहू लागले. 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी प्रथमच हे दृश्य पाहिले. जांबवासीय पाण्याच्या उपलब्धतेमुळे सुखावले. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, आ. राजेश टोपे, श्री. अंबादासराव जोशी व श्री. मुकुंदराव गोरे यांच्या उपस्थितीत आनंदी नदीच्या जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. जानेवारी 2017 पर्यंत नदी वाहत होती. परिसरातील सर्व विहीरी व कूपनलिका तुडुंब भरल्या. पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली. 2017 च्या मे महिन्यात प्रबोधन समितीने बनाची नदीचे दीड कि. मी. व आनंदी नदीचे अर्धा कि. मी. खोलीकरण केले.
प्रबोधन समितीच्या वतीने जांब येथे दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. त्यातील पहिली कार्यशाळा वनौषधीसंबंधी होती. चित्रप्रदर्शनी व प्रात्यक्षिकासह वैद्य मिलिंद रामपूरकर, नांदेड यांनी गावकर्यांना मंत्रमुग्ध तर केलेच परंतु या विजिगिषु प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी एक लाख रूपयांचा निधीसुद्धा दिला. दुसरी कार्यशाळा लातूर येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय कांबळे यांनी घेतली. त्यांनी कचरा ही आपत्ती नव्हे तर संपत्ती या विषयावर जांबेतील तरुणांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने प्लॅस्टिक कचर्यावर कशी मात करता येईल हा विषय मांडला. श्री. कांबळे यांनी लातूरमध्ये 100 ते 125 महिलांना या कामातून रोजगार मिळवून दिला आहे. विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जोडण्याचे कार्यक्रम घेतले गेले. वक्तृत्व स्पर्धा, मनाच्या श्लोकांचे पाठांतर इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उदंड प्रतिसाद मिळाला. तशातच श्रावण शु. अष्टमी दि 11 ऑगस्ट 2016 रोजी आदरणीय गोविंदगिरी महाराज व श्री. भूषण स्वामींच्या उपस्थितीत प्रबोधन समितीचा पहिला कार्यक्रम समर्थमंदिरात संपन्न झाला. स्वामीजींचे उत्कृष्ट मार्गदर्शन, पालकमंत्री श्री. बबनराव लोणीकर व आ. राजेश टोपेंच्या उपस्थितीने सर्वजण सुखावले. या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नांदेड येथील मार्कण्डेय यांचा संघ व संभाजीनगरची आरती पॉल यांच्या आकर्षक योगासनांनी सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या कार्यक्रमासाठी श्रीमती सुषमाताई माढेकर व क्रीडाभारतीचे कहाळेकर यांनी परिश्रम घेतले. प्रसादाची व्यवस्था ग्रामस्थ व नांदेडचे श्री. अमर नेरलकर यांनी उत्कृष्टपणे सांभाळली.
नंतर दिवाळीच्या काळात योगासनवर्गाचे आयोजन केले गेले. तसेच मे महिन्यात 7 दिवसाचा संस्कारवर्ग आयोजित करण्यात आला. यासाठी आदरणीय स. भ. सुनीलजी चिंचोलकर, योगेश महाराज साळेगांवकर व हर्षदा जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्कार वर्गात जिल्ह्यातून 38 विद्यार्थी उपस्थित होते.
2017 साली गीताजयंतीस दिनांक 25 नोव्हेंबरला प्रबोधन समितीचा द्वितीय वर्षाचा कार्यक्रम ह. भ. प. अविनाश गोहाड (परभणी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमात जालना येथील श्री. गणेश सुपारकर यांच्या तालमीच्या बाल व तरुणांनी मल्लखांबाची उत्कृष्ट अशी प्रात्यक्षिके सादर केली तर हिंगोलीच्या मुलींच्या संघाने दोरीच्या मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विषय होते, वृक्षारोपणाची गरज आणि संतांच्या दृष्टीकोनातून पर्यावरण संरक्षण. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यासाठी मोठ्या रकमेची बक्षिसे दिली गेली.
पुणे येथील राम कशाळकर व सौ. कशाळकर यांनी चैतन्य ज्ञानपीठास जांब परिसरातील 3 एकर जमीन विकत घेऊन दान केली.
त्यानंतर प्रबोधन समितीचा तिसर्या वर्षाचा कार्यक्रम एका वेगळ्या उपक्रमाचा समारोप म्हणून संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या आधी अनेकांना जोडता यावे म्हणून दासबोधाची चक्रिय पारायणे करावीत असा विचार झाला. या कार्यक्रमाची आखणी अतिशय कल्पकतेने करण्यात आली. त्यासाठी एक सुंदर माहितीपत्रक तयार करण्याचे ठरले. त्याची जबाबदारी प्रामुख्याने विनायकराव दसरे, विनायकराव देशपांडे, विनायकराव देहेडकर, सुभाषराव देशमुख व अशोकराव देशमुख यांच्यावर सोपवली गेली. किमान 400 पारायणे व्हावीत असा हेतू. दासबोधात 20 दशके आहेत म्हणून चातुर्मासात या उपक्रमाची सुरुवात करावी असे ठरले. 20 जणांचा एक गट तयार करावा, प्रत्येकाने त्याच्या वाट्याला आलेल्या दशकापासून सुरुवात करावी, आठवड्यातून फक्त एक दशक वाचायचा व उरलेल्या 6 दिवस त्या दशकाचा अभ्यास करून चिंतन-मनन करावयाचे. यातून त्या गटाचे एक पारायण व चातुर्मासातील 20 आठवड्यातून स्वतःच्या एका पारायणाची पूर्तता. या उपक्रमास आमच्या कल्पनेच्या पलीकडे प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रभरात जवळजवळ 197 गट तयार झाले. आषाढ शुद्ध एकादशी सोमवारी या उपक्रमाची सुरुवात झाली. दासबोध पुरविण्याचे दायित्व स. भ. गिरीश सातोनकरांनी स्वीकारले. फक्त 100 / – रूपयात दासबोध उपलब्ध करून आमची चिंता मिटवली. जवळ जवळ 4000 पारायणार्थींनी सहभाग नोंदविला. या उपक्रमाचा सांगता सोहळा 4 डिसें. 2018 गीताजयंतीला व्हावा असे ठरले. किमान 500 ते 600 पारायणार्थी एकत्र येतील असे वाटले पण प्रत्यक्षात 3000 पारायणार्थींनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमास चैतन्य ज्ञानपीठाची सर्व कार्यकारिणी, प्रबोधन समितीचे सर्व पदाधिकारी, समर्थ मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसादाची सर्व व्यवस्था ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे परंतु निःशुल्क केली. ग्रामस्थांच्या सहभागाने सर्वांची मने जिंकली. आमचा उत्साह त्यामुळे वाढला.
शेवटच्या कार्यक्रमाची रचना दासबोधाच्या चक्रीय पारायणाच्या उपक्रमानेच भव्यदिव्य स्वरूपात करावी असे नंतरच्या बैठकांमध्ये ठरले. दरम्यानच्या काळात श्री. शिवाजीराव सूगावकरांनी त्यांचे भाग्यनगर मधील घर विकले. आम्हाला कार्यालयासाठी वृंदावन कॉलनीतील अशोकराव देशमुखांनी स्वतःची राहती जागा उपलब्ध करून दिली. प्रत्येक मंगळवारी बैठक अशी रचना केली गेली. बैठक संख्या वाढत गेल्यामुळे मोठ्या जागेची आवश्यकता होती परंतु ब्राह्मणसभा मंगल कार्यालयाच्या वास्तुने आमची चिंता मिटली. अल्पदरात ही जागा उपलब्ध झाली. मंगळवारच्या बैठकीत मोठ्या कार्यक्रमाचे चिंतन सुरू झाले. कार्यक्रमाचे प्रारुप तयार होऊ लागले. किमान 10,000 समर्थभक्त एकत्र व्हावेत असा संकल्प सोडला. कार्यक्रम त्रिदिवसीय व्हावा असे ठरले. काही मोठ्या बैठकांचे आयोजन संभाजीनगर, भालगाव मठ, जालना व जांब समर्थ येथे करण्यात आले. विविध प्रकारच्या समित्या गठीत कराव्यात असे ठरविले. महाव्यवस्थापक कोणास करावे या चिंतेत सर्वजण होते परंतु समर्थकृपेने श्री. महेशराव कवठेकरांसारख्या समर्थ व्यक्तिने या कार्यकमाची महाव्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या जसे स्वागत समिती, संयोजन समिती, निमंत्रक मंडळ व व्यवस्थात्मक बाबींसाठी विषयवार समिती अशा रचना करण्यात आल्या. सुरेशराव नांदेडकरांनी जवळजवळ 52 समित्यांची यादी बैठकीत ठेवली. खाते प्रमुख ठराविले गेले. प्रमुख खात्यांचे खातेप्रमुख निश्चित करण्यात आले. सहव्यवस्थापक म्हणून श्री. रविंद्र भामरे, निवास व्यवस्था सुरेशराव नांदेडकर, भोजन व्यवस्था दिलिपराव कस्तुरे, पाणीव्यवस्था श्री. विनायकराव देशपांडे, पार्किंग व्यवस्था राजकुमार वायदळ, वीजव्यवस्था श्री. सूर्यकांतराव कुलकर्णी, वैद्यकीय व्यवस्था डॉ. जगदीश करमळकर, स्मरणिका जबाबदारी श्री. मुकुंदराव गोरे, शरदजी कुबेर व श्रीनिवास जोशींनी स्वीकारली. निधीप्रमुख म्हणून श्री. महेशचंद्र कवठेकर, कार्यालयप्रमुख श्री. सुभाषराव वझरकर, सुरक्षाव्यवस्था श्री. अविनाश जोशी अशी रचना केली गेली.
चातुर्मास चक्रीय पारायण योजना कार्यान्वित करण्यात आली. श्री. सुभाषराव देशमुखांनी पारायणप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. चक्रीय पारायणासाठी अनेक ठिकाणी बैठकी घेण्यात आल्या. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वदूर पारायणकर्त्यांचे गट तयार होऊ लागले. प्रामुख्याने जांब समर्थ, जालना, अंबड, परतूर, सेलू, परभणी, नांदेड, हिंगोली, कळमनुरी, बीड, अंबेजोगाई, माजलगाव, निलंगा, संभाजीनगर, देऊळगावराजा, धुळे, नागपूर, पुणे, ठाणे, नगर, कोल्हापूर, वाई, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, फलटण अशा अनेक गावात मोठ्या प्रमाणात पारायणकर्त्यांचे गट तयार झाले. परदेशात काही गट तयार झाले. त्यात दुबई, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांचा समावेश होता. जवळजवळ 750 गट म्हणजे 15000 पारायणकर्त्यांचा सहभाग झाला.
पारायणकर्त्यांच्या सांगता सोहळ्यात समर्थ महासंगम असे नामकरण करण्यात आले. 7, 8, 9 डिसें. 2019 या त्रिदिवसीय कार्यक्रमाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. कार्यक्रमात महनीय व्यक्तिंचा समावेश असावा तसेच काही प्रात्यक्षिकांचा समावेश असावा असे विविध बैठकात ठरले. संपर्क मोहीम हाती घेतली. सर्वजण पारायणकर्त्यांना भेटून कार्यक्रमास येण्यासाठी प्रवृत्त करत होते. कार्यक्रमास खूप मोठा खर्च येणार हे लक्षात घेऊन 3 दिवसांसाठी रुपये 2000 शूल्क ठेवण्यात आले. स्वागतसमिती सदस्यांसाठी रू. 1 लाख अशी योजना ठरली. प्रत्येक जिल्ह्यातून किमान 15 स्वागत समिती सदस्य असावेत असे नियोजन करण्यात आले.
उद्घाटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. सरसंघचालकांनी अथवा मा. सरकार्यवाह उपस्थिती दर्शवावी यासाठी प्रयत्न केले आणि मा. सरकार्यवाह श्री. सुरेशजी (भैयाजी) जोशींनी येण्याचे मान्य केले. समारोपप्रसंगी आदरणीय श्री. गोविंदगिरी (किशोरजी व्यास) महाराजांनी येण्याची निश्चिती झाली. उद्घाटनप्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून कण्हेरी मठाचे महंत अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांनी येण्याचे कबूल केले. दिनांक 8 डिसें. रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत कोल्हापूर येथील श्री लखन जाधव यांच्या चमूची शौर्य प्रात्याक्षिके आणि दुपारी 12 ते 2 या वेळेत संतपूजनाचा कार्यक्रम आणि 4 ते 5 या वेळेत हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी असे भरगच्च कार्यक्रम योजण्यात आले. भारूड, कीर्तन, दोन परिसंवाद असेही कार्यक्रम ठरले. ह. भ. प. निरंजन महाराजांनी भारूडाचे उत्कृष्ठ सादरीकरण केले. तसेच ह. भ. प. आनंदे महाराजांचे समर्थांच्या ओवीवर उत्कृष्ट कीर्तन झाले. त्यांच्या ज्ञानाई शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व गावातील तरूणांनी पावली खेळून हरीपाठाचे अत्युत्कृष्ट सादरीकरण केले. सबंध सभामंडप व आबालवृद्धांनी या सादरीकरणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. परिसंवादाचे विषय अप्रतिम होते. ‘पारायणातून आचरणाकडे’ या विषयासाठी मा. प्रकाशजी पाठक, धुळे, प्रा. दादासाहेब जाधव, तुळजापूर, प्रा. अभिजित देशमुख, बुलडाणा आणि मा. मनिषाताई बाठे, पुणे यांनी उत्कृष्ट मागदर्शन केले. दि. 9 डिसें. 2019 रोजी ‘प्रपंच करावा नेटका’ या विषयावर स. भ. श्री. शरदजी कुबेर, धुळे, मा. अविनाशजी गोहाड, परभणी, मा. डॉ. विजय लाड , नांदेड व ख्यातकीर्त व विश्वहिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शिका मा. मंगलताई कांबळे यांनी उत्कृष्ट पद्धतीने प्रबोधन केले. दि. 8 डिसें 2019 ला जिल्ह्यातील नेते खासदार, आमदार यांनी प्रबोधन करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केले गेले. समारोपप्रसंगी श्री. विनायकराव देहेडकर यांनी थोडक्यात प्रास्ताविक केले, त्यानंतर आदरणीय स. भ. श्री. गोविंदगिरी महाराजांनी आशीर्वादपर उत्कृष्ट मार्गदर्शन करून कार्यक्रमाचा मूळ उद्देश स्पष्ट केला तसेच सर्वांकडून संकल्प वदवून घेतला.
कार्यक्रमस्थळातील नगरांना महनीय समर्थभक्तांची नावे दिली होती. त्यामध्ये समर्थ भक्त शंकर देव, स. भ. नानासाहेब धर्माधिकारी, स. भ. अण्णा भागवत, स. भ. सुनिलजी चिंचोलकर, स. भ. मधुकर (अण्णा) गोसावी, स. भ. मारूतीबुवा रामदासी अशी नावे दिली होती. यामध्ये संपूर्ण परिसराला कै. राम कशाळकर यांचे नाव दिले होते.
समर्थभक्तांच्या पूजनासाठी 3 फूट उंचीची समर्थ रामदास स्वामींची मूर्ती सभा मंडपात दर्शनी भागात ठेवली होती. त्यासोबत श्री. सुरेशराव नांदेडकरांनी श्री. रामनाम जप वह्यांसाठी उभारण्यात येणार्या दगडी शिल्पाची सुंदर प्रतिकृती जी की नांदेड येथील मुक्त पत्रकार आणि पुरातत्त्व विषयाचा अभ्यास असलेले श्री. सुरेशराव जोंधळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली दीपमाळेची आकर्षक दगडी शिल्पाची सुंदर प्रतिकृती सर्वांचे आकर्षण ठरली. त्याचप्रमाणे ह्या तेरा कोटी रामनामाच्या लिखित वह्या व 108 कोटी रामनामाच्या जपाचे कार्ड जालना येथील अयोध्यानगरीत राहणारे श्री. अनिकेत कुरूंदकर यांच्या परिवाराने अत्यंत श्रद्धेने व सेवाभावाने स्वतःकडे ठेवून घेतले होते हे नमूद करणे माझे कर्तव्य आहे. या वह्या व जपाचे कार्ड ज्या रामनाम स्मृतीस्तंभात जतन करायचे आहेत त्या स्मृतीस्तंभाचे निर्माण कार्य प्राधान्याने व तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. कारण या जपयज्ञात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या भावनेचे व भक्तीतरंगाचे ते मूर्त स्वरूप असेल.
समोर उत्कृष्ट कारंजे व 40 फूट उंचीचा भगवा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. 3 एकर दान स्वरूपात मिळालेल्या जमिनीवर कोणकोणत्या गोष्टी व्हाव्यात त्याचे आराखडे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस लावण्यात आले होते. त्यामध्ये वैद्य श्री. मिलिंद रामपूरकर यांच्या अभ्यासपूर्ण संकल्पनेतून साकारलेल्या आयुर्वेद ग्रामची वैद्यकिय संरचना व श्री. दिलीपराव कस्तुरे यांच्या संग्रहातील ‘नक्षत्रवन उद्यानाचा’ आराखडा एक आगळेवेगळे आकर्षण ठरला.
जालना येथील ‘सुमित डेकोरेटर्स’चे श्री. रत्नाकर काप्रतवार यांनी अल्पदरात सभामंडप, एल ई डी स्क्रीन, लाईट व्यवस्था, निवास व भोजनाचे मंडप तसेच स्वच्छतागृहे यांची उत्कृष्ट व्यवस्था केली. तर 3 दिवसाचा चहा, अल्पोपहार व भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था नांदेडचे स. भ. अमर नेरलकर यांनी सांभाळली.
या सर्व कार्यक्रमासाठी खर्चाचे मोठे दायित्व पुणे, संभाजीनगर व जालना जिल्ह्याने उचलले. जवळजवळ 90% भार या तीन नगरांनी उचलला. त्यासाठी पुणे येथील चैतन्य ज्ञानपीठाचे पदाधिकारी, संभाजी नगरमध्ये महाव्यवस्थापक व सहव्यवस्थापक आणि जालना येथील प्रबोधन समितीच्या कार्यकर्त्यांसोबतच पारायणकर्त्यांचे गटप्रमुख यांचा सिंहाचा वाटा होता. जांब येथील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी स्वतःचे व्यवसाय बंद ठेवून 15 दिवस खूप कष्ट घेतले. कार्यक्रमासाठी आष्टी येथील श्री. आष्टेकर यांनी तीन दिवस मोफत दूध दिले, तसेच जांबेतील कार्यकर्त्यांनी मोफत पाणी दिले. रा. स्व. संघाच्या घनसावंगी तालुक्यातील परिसरातल्या प्रमुख 60 कार्यकर्त्यांसह पडेल ते काम करून कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.
-विनायक देहेडकर
जालना
चलभाष – 9403503803