चपराक दिवाळी अंक 2012
आपल्याला रोज कित्येक माणसे भेटत असतात. काही ओळखीची, काही अनोळखी. काही प्रत्यक्ष भेटतात तर काही कुणाच्या सांगण्यातून. अश्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटलेल्या, लौकिकार्थाने सामान्य समजल्या जाणार्या माणसांच्यात मला जे असामान्यत्व जाणवले, ते खूप काही शिकवून गेले.
एका लहान गावात माझा ‘चर्पटमंजिरी’ कार्यक्रम होता. गावातल्या प्रतिष्ठित घरी माझी उतरायची सोय केली होती. राहायचे नव्हते पण गावात पोचल्यावर जेवणखाण, जरा आराम करण्याची सोय त्यांच्याकडे होती. त्यांचा मुकुंद नावाचा गाडी चालक कम नोकर मला रेल्वेस्थानकावर आणायला आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी न्यायलाही तोच होता. माझ्याबरोबर काही सीडीज होत्या. मी त्याला विचारले, ‘‘बाहेर एक टेबल लावूया. तू सीडीज विकशील का?’’
तो ‘हो’ म्हणाला. मी सीडीजची संख्या, किंमत वगैरे लिहून त्याच्या ताब्यात पिशवी दिली.
कार्यक्रम छान झाला. गावातली सगळी मान्यवर, प्रतिष्ठित कुटुंबे आली होती. कार्यक्रम संपल्यावर तिथेच जेऊन स्टेशनवर जायचे होेते. मुकुंद गाडी घेऊन तयार होताच. त्याने आधी ‘सीडीज’ चा हिशोब दिला. आम्ही स्टेशनवर गेलो. गाडी यायला वेळ होता. मी एक सीडी काढून मुकुंदला दिली. म्हटलं, ‘‘ही तुला भेट.’’
तो म्हणाला, ‘‘ताई, मी खरं तरं सांगणार नव्हतो, पण आता सांगतो. हिशोब करताना माझ्या लक्षात आलं की, एका सीडीचे पैसे कमी आहेत. गर्दीत कोणीतरी पैसे न देता उचलली असणार! मग मी तिथल्या पहारेकर्याची सायकल घेऊन घरी गेलो. तेवढे पैसे आणले आणि तुम्हाला बरोबर हिशोब दिला.’’
मी अवाक झाले. म्हटलं, ‘‘अरे, तू तुझ्या खिशातले पैसे कशाला घातलेस?’’
तो म्हणाला, ‘‘असं कसं? तुम्ही माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली होती. तुम्ही मला सीडी दिली म्हणून बोललो, नाहीतर सांगणारच नव्हतो. नेमके माझ्याजवळ काहीच पैसे नव्हते म्हणून घरी जावे लागले. तुम्ही जेवत होतात तेवढ्यात घरी जाऊन आलो.’’
मी विचारलं, ‘‘अरे पण तुझ्याकडे गाडी होती तर सायकल का घेऊन गेलास?’’
तर म्हणाला, ‘‘छे छे, माझ्या कामासाठी मालकांची गाडी कशाला वापरायची?’’
‘‘मग तुझ जेवण नसेल झालं!’’
‘‘राहू दे हो ताई, जेवणाचं काय एवढं!’’
मी त्याला सीडीचे पैसे दिले. तो घेतच नव्हता पण बळजबरीने दिले. तिथे स्टेशनवर वडापावची गाडी होती तिथे त्याला वडापाव घेऊन दिला, खायला लावला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण खरी हलले होते मी!!
तथाकथित प्रतिष्ठित, श्रीमंत जमावातल्या कोणीतरी सीडी हातोहात लांबवली होती आणि या गरीब माणसाला इमान, विश्वास महत्वाचा वाटत होता. कोणाला श्रीमंत म्हणायचं, कोणाला गरीब…?
***
रोज घरी येणारा दूधवाला, पेपरवाला, पोस्टमन यांचे ‘एका संस्थेचा प्रतिनिधी’ एवढेच आपल्या लेखी अस्तित्व असते. पत्र मिळाल्याशी कारण, तो पोस्टमन गोरा की काळा याच्याशी आपल्याला फारसे देणेघेणे नसते. हल्ली ‘इमेल’ च्या जमान्यात तर पोस्टमनची बिचार्याची कोणी वाटही पाहत नाही. पण पोस्टमनची एक व्यक्ती म्हणून दखल घ्यायला लावणारी एक हकीकत माझ्या बाबतीत काही वर्षापूर्वी घडली.
आम्ही तीन मैत्रिणींनी केलेल्या अनोख्या युरोप सहलीबद्दल माझी लेखमाला एका दैनिकात प्रसिद्ध झाली. अनेकांनी ते लेख वाचून मला पसंतीची पावती दिली पण मला आश्चर्याचा धक्का दिला तो एका पोस्टमनने. रोज दाराखालून पत्रे सरकवून जाणार्या पोस्टमनने त्या दिवशी बेल वाजवली. मला वाटले रजिस्टर असेल किंवा एखाद्या पत्राला कमी पैशाचे तिकीट लावले असेल. पण तो म्हणाला, ‘‘ताई मी तुमचे सर्व लेख वाचले. अतिशय आवडले. मुद्दाम सांगावेसे वाटले म्हणून बेल वाजवली.’’
मी थक्कच झाले. त्याला आत बोलावले. प्यायला ताक दिले. तो सांगायला लागला, ‘‘मी कॉलेजात असताना कविता करायचो. एक कवितासंग्रह प्रकाशित होण्याच्या बेतात असतानाच घराला आग लागली. लिहिलेलं सगळ जळून गेलं. मग पुढे पोट पाठीमागे लागलं आणि सगळच राहुन गेेलं. पण चांगलं काही वाचलं, ऐकलं की दाद दिल्याशिवाय राहवत नाही. बर, येतो’’ असं म्हणून तो सायकल मारून निघून गेला.
तेव्हापासून त्याची आणि माझी मस्त साहित्यिक मैत्री जमली.
***
एका गावातल्या जमिनदारांचा एक हृद्य किस्सा ऐकला. जमीनदार सुमारे सत्तरीतले. आता इनामे जरी गेली असली तरी गावात त्यांची जबरदस्त पत होती. ते अडल्या नडल्याचे कैवारी होते. भरपूर शेती होती. राबणारी कुळे होती, सुबत्ता होती.
अचानक एक धक्कादायक बातमी कळली. इनामदारांना सारखा ताप येत होता म्हणून तपासणी केली तर निदान झालं रक्ताच्या कर्करोगाचं!!
‘जेमतेम चार सहा आठवडे मिळतील’ असं डॉक्टर म्हणाले. झालं, गावावर शोककळा पसरली पण इनामदार माणूसच वेगळा होता. त्यांनी गावकर्यांना बोलावून सांगितलं, ‘‘गड्यांनो, मी काही आता राहत नाही. बोलावणं आलं, जायला पाहिजे. तुमचा निरोप घेता येतोय हे काय कमी आहे? असं करा, येत्या शनिवारी सगळ्या गावाने वाड्यावर जेवायला या! फक्कड मेजवानी करूया!!’’
गावकरी रडायला लागले. ‘‘धनी, काय बोलताय? ही काय मेजवानीची वेळ हाय होय?’’
इनामदार हसून म्हणाले, ‘‘अरे, माणूस गेल्यावर तेराव्याच जेवण घालतात ना? ते मी आत्ताच घालतोय. माझी माणसं माझ्या डोळ्यादेखत पोटभर जेवताना बघून किती समाधान वाटेल मला!’’
काय अफलातून कल्पना आहे नाही? मात्र त्यासाठी काळीज वाघाचच हवं!
***
आखाती देशात घडलेली एक घटना अशीच अंतर्मुख करणारी. आमच्या ओळखीतला सचिन नावाचा एक तरूण तिकडे काही वर्ष होता. एका मस्जिदीसमोर त्याच घर होतं. पहाटे साडेचार-पाच पासूनच ‘नमाजी’ मस्जिदीत यायला लागायचे. एक दिवस सचिन उठून पाहतो तर काय, रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीला मागुन कोणीतरी जोरदार धडक दिलेली. चडफडत सचिन गाडीजवळ गेला, नक्की किती नुकसान झालंय ते बघायला तर काचेवर अडकवलेली एक चिठ्ठी दिसली. त्यावर एक नाव आणि फोननंबर लिहिलेला होता. सचिन घाबरला. काही अतिरेकी कृत्य आहे की काय?
बिचकतच त्याने त्या नंबरवर फोन लावला. पलीकडचा माणूस म्हणाला, ‘‘मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच. रोजच्याप्रमाणे अगदी लवकर मी नमाज पडून बाहेर आलो. गाडी सुरू केली पण चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. इतक्या पहाटे तुम्हाला कशाला उठवा म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमच्याबरोबर पोलीस ठाण्यात येतो. तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’
त्याप्रमाणे सर्व झाल्यावर सचिनला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. तुम्ही आपणहून कबुलं कसं काय केलंत? हे सगळं तुम्ही सहज टाळू शकला असतात!’’
तो माणूस कानाला हात लावत म्हणाला, ‘‘तोबाऽ तोबाऽऽ, कोणी बघत नव्हतं कसं? अल्लाताला सगळं बघत असतो आणि रोज नमाज पढून माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर माझ्यासारख्या नापाक माणसाला मस्जिदीत जाण्याचा काय अधिकार?’’
क्या बात है! मला ते गाणं आठवलं-
जगसे चाहे भाग ले कोई, मनसे भाग ना पाये,
तोरा मन दर्पण कहलाये…
– मंजिरी धामणकर,
हेमदीप, नवी पेठ, पुणे 30.
चपराक दिवाळी अंक 2012
खूप छान
शुभेच्छा आपल्या चपराक ला