माणूस म्हणून जगताना

माणूस म्हणून जगताना

चपराक दिवाळी अंक 2012

एक छोटासाच प्रसंग! दोन छोटी मुलं, असतील आठ-दहा वर्षांची. शाळा सुटल्याने आपापले दप्तर सांभाळत, बसची वाट बघत, आपापसात गप्पा मारत झाडाखाली उभी. त्यांचं संभाषण ओघानेच माझ्या कानावर पडलं… अरे, चिन्या म्हटलं आज माझा वाढदिवस आहे.

मग तुझे बाबा केक काणणार का? चिन्याचा भाबडा प्रश्‍न.

नाही रे, माझी आई मस्तपैकी पुरणपोळी करणार आहे आज. मग मी बाबांची टोपी घालून पाटावर बसणार. आई मला ओवाळणार, आणि हो बाबा मला दहा रूपयेवाला मोठ्ठा चॉकलेट आणणार आहेत. त्यातला अर्धा मी तुला नक्की देणारं बरं का चिन्या.

हो ऽऽ बस आली बघ माझी, भेटूया उद्या, असे ओरडतच चिन्या बसमध्ये चढला. त्याच्या पाठोपाठ मीही चढलो.

खरंच माणूस जन्माला आला की, खरं निखळ आयुष्य हे बालपणीच उपभोगायला मिळतं. किती निरागसता आणि भाबडेपणा असतो तेव्हाच्या त्या वागण्यात ! स्वार्थाचा व खोटेपणाचा लवलेशही नसतो बोलण्यात. कारण त्या वयात विचार करून काहीच बोलावं लागत नाही ना! ना अहंकार, ना मत्सर !! कुणाशी हेवेदावे नको की कुणावर कुरघोडी नको. एकमेकांवरचं रागावणं तेही काही मिनिटांपुरंतच, मग गळ्यात गळे घालून पुन्हा जैसे थे ! म्हणूनच संतांनी म्हटलं आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा..

कालांतराने जसजसे वय वाढत जाते, माणूस मग षडरिपुंच्या चक्रव्यूहाच्या जाळ्यात अडकला जातो. तेव्हा आपली सद्विवेकबुद्धी गहाण ठेवून तो चुकीचा निर्णय घेण्यासही तो अनेकवेळा बाध्य होतो. मग जोरों का झटका लागला की त्याचे पाय जमिनीवर येतात पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आपण ज्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, मनापासून त्यांच्यावर प्रेम करतो, तेच कधी कधी असे वागतात की, आपल्यालाच अपरिचीत वाटू लागतात! आपलं नेमकं काय चुकलं ते आपलं आपल्यालाच कळत नाही. यावेळी अपेक्षाभंगाचे जीवघेणे क्षण आपल्या अगदी जवळच्या माणसांकडून आपल्या वाट्याला येतात. अन् एक मात्र खरं, हे अपेक्षाभंगाच दुःख परक्या व्यक्तिंकडून होणं शक्य नसतं. कारण अपेक्षा ह्या केवळ आपल्याच माणसांकडून केल्या जातात, त्यांना आपले जवळचे समजून ! आयुष्यभर आपण आपल्या माणसांसाठी जिवाचं रान करतो, पण शेवटी त्या प्रामाणिक प्रयत्नांचं योग्य चीज झालं नाही तर अपेक्षाभंगाचं दुःख होणारच! कधी कधी असं वाटतं माणसांपेक्षा प्राणी परवडले. एखाद्या कुत्र्याला तुम्ही रोज एक साध बिस्कीट खायला द्या, तुमची साथ द्यायला मग तो रात्रंदिवस तयार असतो.

परमेश्‍वरानं दिलेलं बहुमूल्य जीवन जगत असताना आपलं शरीर हे नाशवंत आहे हेच नेमकं आपण विसरून जातो. पण त्याचा आपल्याला ताठा, अभिमान तरी किती! क्रांतिकारी संत कबीरांचं एक वचन आहे-

यह तन काचा कुंभ है, लिया फिरै थे साथ
टपका लगा फुटि गया, कछू न आया हाथ

माणसाचं हे शरीर म्हणजे मातीचा एक कच्चा घडा आहे आणि ते खरंही आहे. या शरीराचा कुठल्याही क्षुल्लक कारणानं कधी नाश होईल हे कुणी सांगू शकतं का? कबीरजी पुढं म्हणतात,

माटी कहे कुम्हारसे, क्या तू रौंदे मोहे
एक दिन एैसा आवेगा, मै रौदूंगी तोहे

कुंभारानं मातीला पायाखाली कितीही तुडवलं तरी त्याचंही शरीर एक दिवस त्या मातीतच जाणार असतं हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. त्यामुळे दुसर्‍यांचे दोष न बघता त्यांच्यातील केवळ गुण बघून त्याकडे आपण लक्ष दिलं तरच माणूस परक्यांवरही, अगदी आपल्या शत्रूवरही प्रेम करू शकतो. (कारण शत्रुही शेवटी माणूसच असणार.) नेमकं हेच वास्तव संत कबीरांनी पुढील दोह्यात व्यक्त केलं आहे.

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा अपना, मुझसा बुरा न कोय

इतरांचे दोष न बघता स्वतःमधील दोष शोधून ते नाहीसे करण्याचा प्रत्येक माणसाने प्रामाणिक प्रयत्न केला तर हे जग किती सुंदर होणार, नाही का?

रूढी, परंपरा, मानपान असल्या तद्दन फालतू गोष्टींसाठी आज माणूस माणसांपासून दूर होताना दिसतो. किरकोळ स्वार्थापायी त्यांचा अहंकार जागा होताना दिसतो. काही दिवसांपूर्वीचा एका परिचीताकडील एका पारंपरिक सोहळ्याचा प्रसंग! बरीच नातेवाईक मंडळी आपल्या कुटुंबीयांसह कार्यक्रमासाठी जमलेली. काही सधन घराण्यातील, काही उच्च विद्याविभूषीत तर काही आपले मध्यमवर्गीय, सर्वसाधारण!

तर अशा या भव्य सोहळ्यासाठी कोण कोण, काय काय परिधान केलं, काय काय लेऊन आलं, कुणी कुठली साडी नेसली याकडेच बहुतेकांचे जास्त लक्ष.बरं आजकाल रिटर्न गिफ्ट ची पद्धत असल्याने ते रिटर्न तोडीस तोड मिळाले नाही तर पुन्हा रूसवे फुगवे, अबोला हेही ओघानं आलंच. अशावेळी तुमचं फंक्शन गेलं खड्यात, आमचा काही मानपान आहे की नाही, अशी टोकाची वाक्य बोलायला माणसं कमी करत नाहीत अन् अशा प्रसंगात टाकून आलेल्या व्यक्ती सहभागी झाल्या तर मग विचारायलाच नको. मग त्यांची उतरेपर्यंत गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो.

अशावेळी सामोपचाराने न घेता वाद वाढविण्यास प्रोत्साहन दिले तर माणसं कायमची दुरावली जातात. मग त्यात सुक्याबरोबर ओलंही जळतं या न्यायाने ज्यांचा अशा घटनेशी काडीचाही संबंध नसतो त्यांनाही भुर्दंड सोसावा लागतो. असं म्हणतात माणसं तोडायला एक क्षुल्लक क्षण पुरेसा ठरतो. पण माणसं जोडायला वर्षं, तपं उलटतात. कधी कधी तर पिढ्यानपिढ्या खुन्नस, अबोला कायम टिकविला असल्याची काही खानदानी कुटुंबांची परंपरा आपल्याला दिसून येते! कारण काय तर घराण्याची इज्जत…

वाऽरे इज्जत…! एकमेकांशी प्रेमाने बोलल्याने, मधुर व्यवहार केल्याने यांची इज्जत जाते. त्यापेक्षा गरीब बिचारे मुके प्राणी गुण्यागोविंदाने गावागावात बागडताना दिसतात.

कोण दिवस येईल कसा कोण जाणतो ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीनुसार येणारा काळ खरंच खूप कठीण आहे. माणूस म्हणून जगताना आपल्या समोरचा दुसराही माणूसच आहे, याचे आपण सदैव भान ठेवायला हवे आणि एक दिवस कधीतरी अचानक आपल्याला जाणे आहे याची जाणही ठेवावी. भिन्न-भिन्न परिस्थिती, संकटे ही थोड्याफार फरकाने प्रत्येकावरच येतं असतात. त्यावर मात करण्यासाठी आज माणसातील इन्सानियतची खरी गरज आहे.

माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे
स्वार्थासाठी नाही तर, परोपकारासाठी जगावे.

– विनोद श्रा. पंचभाई, पुणे 58.
चपराक दिवाळी अंक 2012

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “माणूस म्हणून जगताना”

  1. सुनील पवार

    खुप सुंदर माणसाच्या माणुसकीला साद घालणारा लेख..??

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा