अपराध

अपराध

Share this post on:

कमल आणि विभावरी दोघी सख्या बहिणी. कमल मोठी, फारशी शिकली नाही. कॉलेजला शिकायला गेली आणि एका माणसाच्या प्रेमात पडली. विभावरी खूप हुशार. अभ्यासात, खेळात, दिसायलाही खूप सुंदर. देवाने सारं उजवं माप विभाला दिलेलं. तिचं सतत कौतुक व्हायचं. कमल मात्र अगदीच कपाळ करंटी. ऐन शिकायच्या वयात प्रेमात पडली. ज्या माणसाच्या प्रेमात पडली तो साधा मेकॅनिक.

आईला वाटायचं कमलने शिकावं; पण कमल ऐकायला तयार नव्हती. घरी या दोघींशिवाय फक्त आई. वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेलं. आईनं खूप कष्टानं या दोघींना वाढवलेलं. आईच्या प्रखर विरोधाला न जुमानता कमल घरातून पळून गेली. आईनं रागारागात कमलशी संबंध तोडून टाकले. शिक्षण अर्धवट, नवराही फारसा शिकलेला नाही, तरी कमल खूश हेाती. पहिल्याच वर्षी मुलगा झाला. आई बघायलाही गेली नाही. पुढे विभावरीचं शिक्षण झालं. तिला हेमंतनं मागणी घातली. कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या हेमंतचं सुखवस्तू स्थळ बघून आईला आनंद झाला. परिस्थिती नसतानाही आईनं थाटात लग्न करून दिलं. विभावरी सासरी गेली. कमलचा मुलगा तीन वर्षाचा झाला. आज कमल खूश होती. मुलाचा वाढदिवस होता. तिचा नवरा म्हणाला, ‘‘मी याला छानसा ड्रेस आणतो, मग आपण पिक्चरला जाऊ. तू तोपर्यंत तयार होऊन बस.’’
कमल खुशीत साडी बदलायला गेली. कमलचा नवरा मुलाला ड्रेस घेऊन, त्याला कडेवर घेऊन, रस्त्याच्या कडेला उभा होता . इतक्यात समोरून येणार्‍या ट्रकचा ताबा सुटला आणि कमलचा नवरा मुलासकट त्याच्या खाली आला. धावत आलेल्या कमलला समोर फक्त रक्तामांसाचा चिखल दिसत होता. एका क्षणात आयुष्य कुठं येऊन थांबलं होतं. बातमी आली आणि कमलची आई कोसळली. हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. कमलकडे बघावं की आईकडे. विभावरी आणि हेमंतची नुसती धावाधाव चालली होती. विभावरी आईजवळ बसली होती. आई एकटक विभावरीकडे बघत होती.
‘‘विभा मी वाचत नाही आता. फक्त एक वचन दे. कमाला सांभाळ शेवटपर्यंत. अंतर देऊ नको. आता तूच तिची आई हो.’’
‘‘आई अगं शांत हो तू. मी आहे ना.’’
आई म्हणाली ‘‘वचन दे मला.’’
विभावरी म्हणाली, ‘‘मी वचन देते.’’
आईच्या चेहर्‍यावरच्या दोन रेघा हलल्या. क्षीण हसण्याचा प्रयत्न होता तो आणि विभाच्या हातातला आईचा हात थंड पडला. आई गेली. सारं संपलं.
कमलला विभावरी आपल्या घरी घेऊन गेली. दुसरा पर्याय नव्हता. कमल नोकरी करू शकत नव्हती. शिक्षण नाही. विधवेला समाजात एकटं राहणं सोप नव्हतं. विभावरीनं आईला दिलेलं वचन निभावलं. कमल त्यांच्या मोठ्या बंगल्यातल्या एका खोलीत राहू लागली. ती अगदी अबोल, घुमी झाली होती. हेमंत आणि विभा तिला आपल्या परीने तिला खूश ठेवायचा प्रयत्न करत होते. ती फारशी बोलत नव्हती.
विभावरी-हेमंतचा संसार छानच चालला होता. बघता बघता लग्नाला चार वर्ष व्हायला आली. हिंडण्या फिरण्यात दिवस कसे गेले ते कळलंच नाही. आता मैत्रिणी सुद्धा ‘आता प्लॅनिंग पुरे’ म्हणून चिडवायला लागल्या. मात्र बाळासाठी आपण सिरीयस व्हायला हवं असं दोघांनीही ठरवलं. दुसर्‍याच दिवशी हेमंतने स्त्रीरोग तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेतली. दोघांच्याही तपासण्या झाल्या. साशंक मनानं दोघंही केबिनमध्ये बसले होते.
‘‘मि. बिरादार, तुमच्या मिसेसच्या गर्भाशयात प्रॉब्लेम आहे. स्ट्रक्चलर ऍबनॉरमॅलिटी आहे. एन्डोमेट्रिऑसिस आहे.’’
‘‘म्हणजे काय हो डॉक्टर?’’
‘‘त्याचं काय आहे ना, आपल्या गर्भाशयाच्या लायनिंगला जो टिश्यु असतो ना, तो बाहेर वाढला आहे. त्यामुळे विभावरीला मूल होणं शक्य नाही.’’
दोघांनाही त्या काय सांगत आहेत ते काही कळत नव्हतं. वैद्यकीय भाषा समजत नव्हती. कानात फक्त एवढेच शब्द घुमत होते ‘विभा आई हेाणार नाही.’ सुन्न होऊन दोघेही बसले होते.
‘‘पण डॉ. आता काहीच उपाय नाही का हो?’’ विभावरी रडत होती.
हेमंत म्हणाला, ‘‘जाऊ दे विभा , दोष माझ्यात निघाला असता तर आपण काय केलं असतं? आपण एखादं मूल दत्तक घेऊ.’’
विभावरी म्हणाली, ‘‘मला नकोय दत्तक मूल. मला आपलं बाळ हवंय. हेमंत तुम्ही दुसरं लग्न करा.’’
हेमंत अवाक् झाला. डॉ. म्हणाल्या, ‘‘हे बघा विभावरी, अशा टोकाला जाऊ नका. अहो मेडिकल सायन्स खूप पुढं गेलं आहे आता. तुम्ही स्वत:च्या पोटात मूल वाढवू शकत नाही हे जरी खरं असलं तरी तुम्हाला स्वत:चं मूल होऊ शकतं.’’
‘‘ते कसं काय?’’
‘‘ते प्रचंड खर्चिक आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे. त्या टेक्निकचे नाव आहे आय. वी. एफ.! यामध्ये गर्भधारणा शरीराबाहेर घडवून आणायची लॅबमध्ये. विभावरी तुमचे एगज आणि हेमंतचं स्पर्म घेऊन हे मूल वाढवता येईल पण त्यासाठी तुम्हाला एक ‘सरोगेट मदर’ लागेल.’’
विभा म्हणाली, ‘‘ते जे काय असेल ना ते आणू आपण आणि आपलं मूल आणू.’’
‘‘थांबा थांबा, आधी नीट समजून घ्या. सरोगेट मदर म्हणजे काही वस्तू नसते. सरोगेट मदर म्हणजे अशी बाई जी तुमचं मूल तिच्या शरीरात वाढवेल आणि बाळ जन्माला आलं की तुम्हाला देऊन टाकेल.’’
डॉ. पुढे सांगत होत्या. ‘‘याला जेस्टेशनल सरोगसी म्हणतात.’’
हेमंत म्हणाला ‘‘कितीही पैसे लागू द्या. मी हवी ती टेस्ट करायला तयार आहे पण आमचं मूल पोटात वाढवायला तयार असणारी बाई आणायची कुठून? समजा आपण खूप पैसे दिले तर अशी बाई मिळेल का?’’
डॉ. म्हणाल्या ‘‘तसं नाही करता येणार. पैसे देऊन बाई आणता येणार नाही कारण कमर्शियल सरोगसीवर भारतात बॅन आहे. मी तुम्हाला पुण्याच्या इनफर्टिलिटी सेंटरचा पत्ता देते. ते तुम्हाला आयवीएफबद्दल पूर्ण माहिती देतील. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या. कायदेशीर बाबी तपासून घ्या. वकील तुम्हाला योग्य तो सल्ला देतील’’ डॉक्टरांनी पुण्याच्या सेंटरचा पत्ता दिला.
घरी आल्यावर दोघांच्याही संमिश्र भावना होत्या. मूल नाही म्हणून दु:ख पण आपल मूल होऊ शकतं म्हणून आशा! आय. वी. एफ. ही काय भानगड आहे याबद्दल उत्सुकता, सरोगेट मदर कुठून आणायची याबद्दल चिंता. काय करावं काही सुचत नव्हतं. कमलला जेवताना विभावरीनं सारं सांगितलं. तीही बिचारी गोंधळली होती. तरी हेमंत म्हणाला, ‘‘कमल तुही आमच्याबरोबर पुण्याला चल. विभावरी गोंधळून गेली आहे. तिच्याबरोबर आपलं घरचं कोणीतरी हवं.’’
कमल काहीच बोलली नाही. तिला मुळात हे सारं समजलं नव्हतं पण विभावरी मध्येच रडत होती, मध्येच आपलं मूल आणू म्हणून हसत होती! ते बघून तिला आपल्या सोबतीची गरज आहे हे मात्र कमलला कळल होतं. ती ‘‘ठीक आहे’’ म्हणून रूममध्ये गेली.
दुसर्‍या दिवशी तिघंही पुण्याला गेले. तिघंही डॉक्टरसमोर बसले होते. ‘‘डॉक्टर, ही आय. वी. एफ. काय भानगड आहे?’’
डॉ. म्हणाले, ‘‘हो. सांगतो. काळजीपूर्वक ऐका आणि शंका मनात ठेवू नका. काही समजलं नाही तर विचारा. हे बघा, बाळ आईच्या एग आणि बाबांच्या स्पर्मपासून तयार होतं इतपत तुम्हाला माहिती आहेच पण विभावरी मूल तिच्या गर्भाशयात वाढवू शकत नाही. त्यामुळे हे एग व स्पर्म आम्ही लॅबमध्ये ग्लास प्लेटमध्ये फ्युज करतो. तो झायगोट बनतो. आणखी काही दिवस तो लॅबमध्ये ठेवून मग दुसर्‍या स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. यापेक्षा सोपं करून सांगणं आता शक्य नाही. तुम्ही प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. या पूर्ण क्रियेला आय. वी. एफ. म्हणतात. हे मूल जिच्या गर्भाशयात वाढवायचं आहे तिला सरोगेट मदर म्हणतात आणि या सर्व प्रकाराला जेस्टेशनल सरोगसी म्हणतात. आता तुम्हाला अशी स्त्री शोधायची आहे. त्याचे काही नियम आहेत. ती स्त्री एकवीस ते पस्तीस या वयाची हवी. जिचं एकतरी बाळंतपण कोणत्याही कॉम्प्लिकेशनशिवाय झालेलं असावं. जी तुमच्या बाळाशी जेनेटिकली रिलेटेड असेल. ती निरोगी असेल आणि कोणत्याही पैशाच्या मोबदल्याशिवाय ती निस्वार्थी भावनेनं तुमचं मूल वाढवायला तयार असेल. आता तुम्ही अशी स्त्री शोधा. वकिलाचा सल्ला घेऊन एक कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट बनवा. ज्यानुसार ती हे मूल जन्माला आल्यावर तुमच्या हवाली करेल आणि पंधरा दिवसानंतर निघून जाईल. नंतर उगाच झंझट नको म्हणून कायदेशीर कागदपत्र केलेली उत्तम.’’
हेमंत, विभा विचार करत होते. कमल शांतपणे सर्व ऐकत होती. नंतर तिघंही बाहेर आले. जेवताना कोणीच काही बोलत नव्हतं. तिघंही लॉजवर आले. हेमंतनं मित्राला फोन केला. ‘‘अरे सुरेश असा प्रकार चालू आहे बघ. मला तर काहीच सुचत नाही. मी अशी बाई कुठून आणू जी..’’ हेमंत सांगत होता. विभावरी कपाळाला हात लावून बसली होती. त्याचं बोलणं कानावर येत होतं आणि अचानक तिचे डोळे चमकले.
‘‘हेमंत, अरे ऐक, अशी बाई आपल्या घरातच आहे.’’
‘‘कोण? कमल?’’ हेमंत दचकला.
‘‘काहीही काय विभा! उगीचच वेड्यासारखा विचार करू नकोस. आपण शोधू कोणीतरी’’
‘‘अरे पण कोणीतरी का? ही का नको?’’
‘‘अगं विधवा आहे ती. लोक काय म्हणतील? आणि आपण तिला आधार दिलाय त्याचे उपकार असे फेडायला सांगायचे? काहीतरीच काय? नाही, नाही! अजिबात नाही. विभा तू हा विचार सुद्धा मनात आणू नकोस.’’
‘‘हेमंत अरे विधवा आहे ती आणि लोक काय म्हणतील याचा विचार आपण करू. नऊ महिने दुसरीकडे कुठेतरी राहू. पाहिजे तर आपल्या फार्महाउसवर राहू आणि उपकार आपण तिच्यावर केले नाहीत. मी आईला वचन दिलंय. उपकार ती आपल्यावर करेल. आपल्याला बाळ देऊन आणि बाळ आणि कमल दोघंही आपलेच आहेत. आता राहतो आहोत तसंच पुढंही सुखानं राहू.’’
हेमंत म्हणाला, ‘‘विभा शक्य नाही ते. हा हट्ट सोड तू. हा विषय सुद्धा कमलसमोर काढायचा नाही.’’
विभा हट्टाला पेटली होती. बाळाशिवाय दुसरा विषय डोक्यातच येत नव्हता. ‘‘मी कमीच्या रूममध्ये जाते. तुम्ही हा विषय माझ्यावर सोडा’’ आणि विभा उठून पलीकडे कमलच्या रूममध्ये गेली.
विभावरी कमलच्या पायावर कोसळली. ‘‘कमे, एवढं सुख दे गं मला. तुला हे करायलाच हवं माझ्यासाठी. मला कोणय गं तुझ्याशिवाय?’’
कमल मुळापासून हादरली. हे काय भलतंच वाढून ठेवलंय आयुष्यात.
‘‘विभा नको गं अशी भलत्याच पेचात टाकू. देवा कशी वेळ आणलीस माझ्यावर! जोडीदार गेला. पोटचा गोळा गेला. आताशी कुठं विसराळी पडत होते.’’
हळूहळू कमल जरा बरी झाली होती. त्यात हे काय भलतंच बोलते विभावरी? हे शक्यच नाही. लोक काय म्हणतील? एक विधवा गरोदर राहिली. शीऽऽ शीऽऽऽ! मी नाही असा विचार करू शकत! आणि पोटात पोर कोणाचं वाढवायचं तर बहिणीचं! पण विभावरी ठाम होती.
‘‘कमे हे बाळ तुझ्या पोटात वाढेल, ते तुझंही आहेच ना. आपण आयुष्यभर एकत्रच राहणार. मग कमे, कमे हात जोडते तुझ्यापुढे…’’
कमलच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता पण विभावरी उठली ती कमलचा होकार घेऊनच.
तिघेही परत इनफर्टिलिटी सेंटरला गेले. विभावरी म्हणाली, ‘‘आता आम्हाला बाळ कधी होईल?’’
डॉ. हसले. ‘‘इतकं सोपं नाही ते. वेळ लागतो. आधी कमलच्या तपासण्या होतील. रक्त तपासणी, एचआयवी, हिपॅटायटीस बी व सी, गर्भाशयाची आतून खोलवर तपासणी, इसीजी, पॅप स्मीयर, जेनेटिक स्यरीनिंग, सायकॉलॉजिकल टेस्टस वगैरे.’’
कमल शांतपणे येईल त्याला सामोरे जात होती. तिच्या डोळ्यासमोर एकच होते विभाचं, आपल्या उपकारकर्तीच बाळ वाढवायचं. आपल्या बहिणीला आई करायचं. मनात असंख्य विचारांनी गर्दी केली होती. पहिल्या बाळाच्या वेळी जोडीदार बरोबर होता. किती सुखावली होती ती. आता परत बाळ होणार पण या अशा विचित्र परिस्थितीत. मध्येच डॉ.च्या बोलण्याने ती भानावर आली. ‘‘कमल तब्येत छान आहे तुमची. काही प्रॉब्लेेम येईल असं नाही वाटत मला. आता आयवीएफ करायला हवं. या सायकलला दोन आठवडे लागतात. सर्व तपासण्या आणि आयवीएफ मिळून साधारण एक महिना लागेल.’’
कमलची अवस्था खूप विचित्र झाली होती. हेमंत खूप भांबावला होता पण कमलचा होकार आणि विभावरीचं बोलणं-वागणं बघून हळूहळू स्थिरावत होता. एकीकडे त्याला अपराधी वाटत होतं. आपल्यामुळं कमलवर काय वेळ आली आहे! दुसरीकडं मनोमन तिचे उपकार कसे फेडावे हेही कळत नव्हतं. तिला आपण काहीच कमी पडू द्यायचं नाही. आयुष्यभर तिला सुखात ठेवायचं. कधीही, काहीही झालं तरी आपण तिला भक्कम आधार द्यायचा. ती बिचारी कोणत्या परिस्थितीत आपल्यासाठी उभी आहे!
एक महिना गेला. धावपळ चालू होती. आयवीएफ झाले. सतत दवाखान्याच्या चकरा चालू हेात्या. कमलचा बरोबर एक महिन्यानं रिपोर्ट आला. ती गरोदर राहिली होती. दरम्यान हेमंतनं विभावरीला विचारलं की, ‘‘आपण कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट करावं असं माझा वकील मित्र म्हणतोय. काय करावं?’’
विभा म्हणाली ‘‘कोर्टाची वेळच येणार नाही. माझी मोठी बहिण आहे ती. आपण काय तिला वार्‍यावर सोडणार आहोत का? आणि हो तीही मुलावर हक्क सांगणार नाही. अहो तिचा हक्क आहेच. आपण मान्यच करतोय तो. आयुष्यभर एकत्रच राहणार आपण. उगाच कायद्याची भानगड नको. तरीही तुम्ही म्हणत असाल तर करू आपण. कमल सही करेल त्यावर.’’
त्यानुसार केलेल्या कायदेशीर कागदपत्रांवर कमलनं सही केली.
जसजसं दिवस पुढे जात होते, विभा कमलची खूप काळजी घेत होती. तिला हवं नको हे स्वत: पाहत होती. तूप खा, फळं खा. कमल सतत आनंदी कशी राहील याकडं लक्ष देत होती. गर्भसंस्काराच्या सीडी तिला ऐकवत होती. पाचवा महिना लागला आणि तिघंही फार्महाऊसवर रहायला गेले. सारं अगदी ठरल्याप्रमाणं विभाच्या नियोजनाप्रमाणं घडत होतं. कमलला सातवा लागला होता. बाळ पोटात लाथा मारत होतं. सोनोग्राफीचा रिपोर्ट ओके आला होता. कमलला या बाळाविषयी ओढ वाटली पाहिजे तरच हे बाळ छान होईल. त्यामुळं विभावरी सतत कमलला बोलताना ‘आपलं बाळ’ म्हणायची. कमलही हळूहळू बाळात गुंतत चालली होती. बाळ कसं दिसेल, कसं हसेल याचा विचार करायची. कमलला नववा महिना लागला आणि कमलला चेकअपसाठी नेलं. डॉ. विभावरीला म्हणाल्या, ‘‘बाळाची आई कशी आहे?’’
विभा म्हणाली, ‘‘बाळाची आई मी आहे. कमल फक्त सरोगेट मदर आहे. बाळ माझं नाव लावणार आहे.’’
कमल हे ऐकून चपापली. अरे हे काय ऐकतोय आपण! असू दे. विभा सहज बोलली असेल. बाळासाठी हळवी झाली आहे ती! पण विभा अस्वस्थ झाली होती. बाळ माझ्या नावाचं आहे. मी त्याची आई आहे. त्याला लहानपणापासून माझी ओढ वाटायला हवी. अगदी जन्मल्यापासून आणि ही कमल जर सतत समोर येत राहिली तर… ती बाळाला दूध पाजणार म्हणजे निदान वर्षभर तरी कमलला आपल्या बाळापासून दूर करता येणार नाही. कमी त्याला म्हणू लागली ‘मीच तुझी आई आहे तर… ते बाळ तिच्याकडंच राहणार. विभावरीच्या मनात वादळ थैमान घालत हेातं. कालपर्यंत जी बहीण देवासारखी वाटत होती ती आज वैरीण झाली होती. तिला बाळ हवं होते, कमीपासून हवं होतं पण आता कमी नको वाटत होती डोळ्यासमोर! पण मग काय करावं? आधी बाळ जन्माला तर येऊ दे. मग हे आपलं बाळ आपण कमीपासून घेऊ. कमीला खूप सारे पैसे आणि एक छोटसं घर घेऊन देऊ दुसर्‍या शहरात! पण आपल्या शहरात ती नको.
विभावरीच्या मनात काय चाललंय याची हेमंत आणि कमलला जराही कल्पना नव्हती. ते बिचारे आजही त्याच आनंदात होते. नऊ महिने भरले. कमलला मोठं पोट आलं होतं. उठायला, बसायला त्रास होत होता. ‘‘आता एक-दोन दिवसात डिलिवरी होईल…’’ डॉ. म्हणाल्या आणि तसंच झालं. कमलला दवाखान्यात हलवलं. तिचं ओरडणं ऐकून हेमंत घाबरला होता. विभावरी बाळ बघायला आतुर झाली होती. गोंडस, गुलाबी रंगाचं, इवलंसं हातपाय हलवत, टुकु टुकु बघणारं बाळ घेऊन डॉ. बाहेर आल्या. विभावरी विस्फारलेल्या डोळ्यांनी बघतच राहिली. भरपूर काळंभोर जावळ असलेलं ते बाळ तिनं कुशीत घेतलं. विभावरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. हेमंत म्हणाला, ‘‘कमलची तब्येत कशी आहे?’’
डॉ. म्हणाल्या ‘‘उत्तम! पण आता गुंगी आहे डोळ्यावर. फार थकवा आला आहे तिला. आराम करू द्या. मग भेटा.’’
हेमंत बाळाकडं एकटक बघत होता. कमलचे उपकार पुन्हा पुन्हा आठवत होता. थोड्या वेळानं डॉ. म्हणाल्या, ‘‘दूध पाजायला द्या बाळाला.’’
विभावरीनं बाळ दिलं. सिस्टर ते घेऊन आत गेली. विभापण आत गेली. कमलजवळ बाळ दिलं. तिनं ते पदराखाली घेतलं. विभा नजर रोखून पाहत होती. कमल किती नशिबवान. मी हिच्यामुळं आई होईन! पण हे सुख मला नाही. चटचट आवाज करत बाळ दूध पीत होतं. कमलच्या चेहर्‍यावर तृप्तीचे भाव होते. ती त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्याला कुरवाळत होती. विभावरीच्या मनात वादळ घोंगावत होतं. कमल आपली बहीण आहे हे सुद्धा विभावरी विसरली क्षणभर. माझं बाळ, माझं… माझं… विभाला आणखी काही दिसतच नव्हतं…
विभावरी विचार करत होती. बाळाला दूध पाजायला दिलंच पाहिजे का? जी मुलं अनाथाश्रमात वाढतात, रस्त्यावर सापडतात, बेवारशी असतात ती सुद्धा जगतातच की आईशिवाय. आपणही आता तेच करायचं. बाळाला वरचं दूध पाजायचं. मी त्याची खूप खूप काळजी घेईन पण कमलला मात्र बाळापासून लवकरात लवकर दूर करायला हवं.
आयुष्याच्या पटावरचं दान विभाच्या मनासारखं पडत होतं. हेमंतला अचानक कंपनीच्या कामासाठी दिल्लीला जावं लागलं. हेमंतला बाळाची, कमलची खूप काळजी वाटत होती पण डॉ. म्हणाल्या ‘‘काळजी करू नका. आम्ही आहोत.’’
हेमंत दिल्लीला गेला. विभाला तो पुन्हा पुन्हा ‘‘कमलची काळजी घे, तिच्याकडं लक्ष दे’’ असं सांगत होता. तसतसा विभाचा विचार अधिक पक्का होत होता. हेमंत दिल्लीला गेला.
विभावरी कमलच्या खोलीत आली. ‘‘कमल तू आता बाळात जास्त गुंतू नकोस. तुझी तब्येत चांगली आहे आता. तू दुसर्‍या शहरात जाऊन रहा. मी सर्व व्यवस्था करेन पण तू परत यायचं नाहीस. बाळाची काळजी मी घेईन. त्यानं मलाच आई म्हणायला हवं आहे आणि हो, उद्यापासून सिस्टर बाळाला वरचं दूध देतील. त्याला आता सवय व्हायला हवी.’’
कमलला हे ऐकून चक्करच यायची बाकी होतं. ‘‘विभा अगं डोकं फिरलंय का तुझं? त्याला जन्मून अवघा एक दिवस झालाय. माझ्याशिवाय ते कसं राहील? आईशिवाय त्याला पोरकं नको करूस गं. मी हात जोडते तुझ्यापुढे आणि आज असे एकाएकी काय झालंय? कालपर्यंत तर तू आपण एकत्र राहू, एकत्र वाढवू म्हणत होतीस. आता अचानक असं काय घडलंय? माझं एक दिवसाचं बाळ माझ्यावाचून कसं राहिलं? आईशिवाय वेगळं नको करू त्याला.’’
विभा भडकली. ‘‘माझं बाळ, माझं बाळ हेच आवडत नाही मला. माझं बाळ आहे ते. तुझं नाही. तू फक्त पोटात वाढवण्यापुरती आई होतीस. आता इथून पुढं नाही. तुझा या बाळावर काडीचाही हक्क नाही. आपण कायदेशीर कागदपत्रं केली आहेत ना, त्यानुसार मी आणि हेमंत आईबाबा आहोत त्याचे.’’
‘‘मी हेमंतला बोलते. कुठं आहे तो?’’
‘‘तो दिल्लीला गेलाय. इतक्यात येणार नाही.’’
कमल रात्रभर रडत होती. तिची मानसिक अवस्था फार वाईट झाली होती. त्यामुळं शारीरिक अवस्था सुद्धा बिघडली. ‘‘काय झालंय कमलला? काहीतरी ताण घेतला आहे त्यांनी. काही सांगत पण नाहीत. असा ताण घेणं बरं नाही त्यांच्या तब्येतीला. अशावेळी खूप जपायला हवंय त्यांना,’’ डॉ. बाई विभाला विचारत होत्या पण ती काहीच बोलली नाही.
विभाला संशयानं पछाडलं होतं. माझं बाळ ही घेईल का? हेमंत तर कमलला कधीच दूर करणार नाही. त्याचा फार जीव आहे तिच्यावर. माझ्याइतकाच की माझ्यापेक्षा जास्त. आता पुढं काय काय होईल? कमल सतत बाळाजवळ असणार. हेमंतला बाळाची खूप ओढ आहे. म्हणजे तो पण सतत त्या दोघांजवळच राहणार आणि मग त्याला कमलच जवळची वाटू लागली तर माझ्यापेक्षा जास्त… विभावरी बेचैन झाली होती. अस्वस्थपणे फेर्‍या मारत होती. कमलला बोलून आपण मोठी चूक केली. चार दिवसात हेमंत येईल. कमलनं त्याला माझ्याबद्दल सांगितलं तर… हेमंत हे कधीच सहन करणार नाही. काय करावं आता… पण समजा कमल आणि हेमंतची भेटच नाही झाली तर… हेमंतला हे कधीच कळणार नाही. नाहीतरी तिला कोण आहे मागे रडणारं? माझ्याच घरी राहते आश्रित म्हणून. ती गेली या जगातून तर काय फरक पडतो कोणाला? बाळ माझ्याजवळच राहिल. त्याच्या नजरेसमोर फक्त मीच राहीन!!
विभानं आपल्या पर्समधून पैसे काढून वॉर्डबॉयला दिले. त्याच्या कानात कुजबुजली. तो नाहीसा झाला. संध्याकाळी त्यानं एक बाटली तिला दिली. ती अस्वस्थ होती. या कमीला कायमची झोपवायची आता. तिनं पर्स टेबलवर ठेवली आणि ती टॉयलेटमध्ये गेली. परत आली तेव्हा कमल झोपली होती. उद्याची रात्र हिची शेवटची रात्र असेल.
विभा रात्रभर झोपली नाही. या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिली. रात्र फार लांबत आहे. ही रात्र लवकर संपायला हवी. या विचारातच तिला पहाटे डोळा लागला. सकाळी तिनं आवरलं. पर्स खांद्यावर घेतली. एकदा चेक करावं म्हणून पर्सचा आतला कप्पा उघडला. बाटली गायब झाली होती. विभाच्या पायाखालची जमीन सरकली. एखाद्यावेळी आपणच ती बाटली दुसर्‍या कप्प्यात ठेवली असेल. तिनं धावत जाऊन आधी दरवाजा बंद केला. पर्समधल्या सर्व वस्तु कॉटवर टाकल्या. बाटली गायब झाली होती. गेली कुठं? तेवढ्यात दारावर थाप आली. ‘‘मिसेस विभावरी बिरादार लवकर बाहेर या.’’
तिनं भराभर वस्तू पर्समध्ये कोंबल्या. धावतच जाऊन दरवाजा उघडला. डॉक्टर-सिस्टर्स सर्व पळत होते. कमलकडे. विभा दुसर्‍या रूममध्ये होती. ती धावत कमलकडे गेली. कमल निपचित पडली होती. तिचे ठोके लागत नव्हते. कॉटखाली बाटली पडली होती; तीच जी विभा शोधत होती. झोपेच्या गोळ्याची बाटली. आपण आलो तेव्हा ही जागीच होती तर! तिनंच घेतली बाटली. बाजूच्या टेबलवर पुस्तक होतं. त्यातून चिठ्ठी डोकावत होती. तिकडं कोणाचंच लक्ष नव्हतं. विभानं ते पुस्तक पटकन पर्समध्ये ठेवलं. ‘‘शी इज नो मोर.’’ डॉक्टर म्हणाले. बाहेर चर्चा चालू होती. कमाल आहे ना! असे कसे झाले? त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओवरडोस घेतला आहे. एवढं छोटं बाळ एकटं टाकुन आईला मरावसं का वाटलं असेल? विभा प्रचंड घाबरली होती. हातपाय थरथर कापत होते. ती तशीच टॉयलेटकडं धावली. दरवाजा बंद केला. चिठ्ठी काढली. कसला कागद आहे हा? ‘‘विभा हे जग मी माझ्या मर्जीनं सोडून जात आहे. बाळावर माझा कोणताही हक्क नाही आणि तो सोडून देऊन त्या चिमुकल्या जिवापासून लांब राहणं नसतं गं जमलं मला. मी फार गुंतत गेले बाळात. मला माफ कर विभा. मी सुरूवातीपासूनच कपाळकरंटी आहे गं. रूप नाही, शिक्षण नाही. जोडीदार आणि पोटचा गोळा दोघंही सोडून गेले. तू मोठ्या मनानं मला आपलंसं केलंस पण तू आता जे बोलत होतीस त्याचा अर्थच लावता येईना मला. तुला भीती वाटते माझी. का गं? पाठची बहीण तू माझी! पण तुझं मन मला कधी समजलंच नाही. ते बाळ तुझ्या पोटी जन्माला आलं असतं तर मी त्याची मावशी झाले असते. माय मरो मावशी उरो म्हणतात. या नात्यानंही मी खूप प्रेम केलं असतं त्याच्यावर. हक्क नसता गं गाजवला… पण तुझ्या मनात हा विश्वास मी कधीच निर्माण करू शकले नाही. मी अपराधी आहे तुझी. आता तुला आईच्या वचनातुन मी मुक्त करत आहे. माझ्या पोटातून आलेल्या या गोळ्याची तू आई आहेस आणि नेहमीच राहशील.
विभाला हुंदके आवरत नव्हते. तिनं चिठ्ठी फाडून टाकली. परत धावतच कमलच्या रूममध्ये गेली. डॉक्टर अजूनही धावपळ करत होते. तिची बॉडी अजून तिथंच होती. बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या फोटोतून आई विभाकडं पाहत होती. या अपराधाचं शल्य घेऊन विभा आयुष्यभर प्रवास करणार होती.

-अश्‍विनी निवर्गी
उदगीर, जि. लातूर
चलभाष – 8888815798
मासिक ‘साहित्य चपराक’ ऑगस्ट 2019

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!