शिक्षकदिनानिमित्त निवडक अल्पाक्षरी

कृपेश महाजन हे आजच्या पिढीचे ताकतीचे कवी आणि प्रयोगशील शिक्षक आहेत. त्यांचा ‘अनिमा-अनिमस’ हा वेगळ्या धाटणीचा कवितासंग्रह याच महिन्यात ‘चपराक’कडून प्रकाशित होतोय. शिक्षकदिनानिमित्त त्यांच्या या अस्वस्थ करणार्‍या अल्पाक्षरी खास ‘साहित्य चपराक’च्या वाचकांसाठी.

एक
सर,
अळीने पोखरल्यावर
मक्याच्या कणसाला दुखत असेल का?
म्हटलो-
होय नक्कीच!
झाडंही सजीव असतात
आणि
सजीव म्हटलं की वेदना आलीच!
सर,
वेदना म्हणजे काय असतं नेमकं?
बेटा, वेदना म्हणजे दुखणं!
सर,
काल नानाने लई मारलं आईला…
आई रडली नाहीच!
तिला काहीच दुखलं नाही…
माझी
माय
सजीव
नाही!

दोन
प्रकल्प म्हणून माझ्या लेकाने
पाण्याची बॉटल कापली
काळं बी आणलं कुठूनसं
गणेशवेलीचं…
माती आणली; पाणी घातलं
पोर्चमध्ये जाम चिखल चिखल…
म्हटलं चिखल करू नकोस आता…
तिसर्‍या दिवशीही पुन्हा तेच…
लेक आला बॉटल घेऊन समोर…
म्हणे-
पपा… अंकुरलंय बी…
बघा ना एकदा…
संतापून फटकावलं पोराला…
म्हटलो हे नसते उद्योग करण्यापेक्षा अभ्यास कर…
चार दिवसांनी लेकाला विचारलं-
कोण होशील मोठा होऊन?
लेक बोलला-
गणेशवेल!

तीन
एकल नृत्य स्पर्धेत
इयत्ता पहिलीतली सानिया
खूप छान नाचली…
मी आनंदलो…
तिला कडेवर घेऊन नाचलो…
तिचा गालगुच्चा घेतला…
तिचा पापाही घेतला मी….

इयत्ता चौथीतल्या तिनेच
खूप छान नृत्य केलं…
आता मात्र मला
ना कडेवर घेऊन नाचता आलं
ना गालगुच्चा घेता आला
ना तिचा पापा!

चार
पहिलीतल्या पोरीला
शाळेच्या पहिल्या दिवशी
बाप शाळेत सोडून जातो तेव्हा
ती असते घाबरलेली नवजात वासरी…
नि
मास्तर वाटतो तिला
कसायासारखा…
निरोपसमारंभावेळी
शाळा झालेली असते गोशाळा
मास्तर असतो गाईची माय…
आणि
हे जग
जणू कत्तलखाना!

पाच
बाजारात
इटूकली ‘नकोशी’ दिसली
मेथीच्या जुड्या टोपलीत घेऊन बसलेली…
पाच रुपये पुढे केले
नि म्हटलं
एक जुडी दे…
तिने दोन जुड्या घातल्या पिशवीत!
मला उर्वरित
विनासायास मिळालेली जुडी
‘नकोशी’ वाटली…
तरीही
हवीहवीशी!

सहा
वर्ग सातवी…
हजेरी घेताना लक्षात यायचं
की,
शब्बो कधीच हजर नसायची शाळेत…
तशीच आणखीही पाच सहा पोरंसुद्धा गैरहजर…
एवढं सगळं फुकट मिळतं
म्हणून जास्त झालंय पालकांना!
काय हरकत आहे शाळेत पाठवायला लेकरांना?
तिरिमिरीतच गाडी काढली
घरी गेलो शब्बोच्या
तर तिचा बाप टल्ली होऊन खाटेवर…
म्हणे वावरात गेलीयत सर्वजण…
मग तपास करत
थेट गेलो शेतात
तर
शब्बोचा
रांगणारा भाऊ
बांधावरची माती खाताना दिसला…
तिच्याहून छोट्या दोन बहिणी
कोवळ्या हातांनी निबर तण खुरपताहेत…
मोठी हिम्मत करून म्हटलो
शब्बोच्या आईला-
ताई, पोरीला शाळेत पाठवत चला दररोज…
तर ती म्हणते-
सर,
रोजंदारी द्याल तर पाठवते उद्या…
मला आणखी सहा पोरांच्या बांधावरती जायचं होतं
ते बाकीच राहिलं तेव्हा!

सात
शाळेत जाता जाता दिसतात
दप्तरं पाठीवर घेऊन
झुकून चाललेली मुलं…
मी गाडी थांबवतो…
गाडीचं दार उघडतो…
लेकरं बसतात आत दाटी करून!
शाळेत आल्यावर
मुलं आनंदाने माखलेली!
आणि
माझ्या गाडीची चाकं
नव्या आनंदात
धुळमातीवर स्वतःचा ठसा उमटवत पुढे!

आठ
परिपाठात जाम झापलं मुख्याध्यापकांनी पोरांना…
म्हणे बेंच का वाजवता रे?
बँडवाले व्हायचंय का?
अरे काहीतरी मोठं व्हा…
डॉक्टर, इंजिनिअर व्हा…
मी पाहिलं अब्दुल बँडवाल्याचं पोरगं
शरमल्याचं नकळत…
मुख्याध्यापकांनी पुढे विचारलं
की
सव्वीस जानेवारीला
ढोल कोण वाजवणार?
शफीकने वर आणता आणता
खाली घेतलेला हात
विसरता येत नाहीये कधीचा!

नऊ
प्रचंड अवखळ पोरांच्या
जवळ जवळ गेलो
आणि
पोरं शांत होत गेली…
पोरांशी एकरूप झालो
तेव्हा बुद्ध झालो!
पोरं माझ्यात भिनली
तसं
तेजोवलय
माझ्या सभोवती!

दहा
खेळाच्या शिक्षकांनी
रांगेत उंचीनुसार नीट उभी राहत नाहीत म्हणून
जाम बडवली पोरं…
रहावलं नाही मला..
त्यांना एवढंच म्हटलो की,
फुलपाखरांना
एका रांगेत
उंचीनुसार
उभं करून दाखवा…
पोरं आणखी काय वेगळी असतात?

अकरा
परिपाठाच्या रांगेत बसलेल्या तिच्या
पाठीवरची चेन नादुरुस्त झालेली…
मी सेफ्टी पिन मागवली
नि
टाचली पिनोच्या दोन्ही बाजूजवळ आणून!
दुसर्‍या दिवशी
अस्ताव्यस्त हातशिलाईने
उभा पिनो शिवलेला…
सुगरण
शिकू
लागलीय
विणणं!

-कृपेश महाजन
जळगाव
9579782707

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

5 Thoughts to “शिक्षकदिनानिमित्त निवडक अल्पाक्षरी”

 1. Vijay mali

  अतिशय आशयघन कविता आहेत. आपल्या चपराकडून अशेच दर्जेदार साहित्यप्रकाशित होत राहो. या सदिच्छेसह।

 2. aparna kadaskar

  अप्रतिम कविता.

 3. Sagar Sanjay Jadhav JOPULKAR

  सुंदर कविता.. तितक्याच अस्वस्थ करणाऱ्या..

 4. लखनसिंह कटरे

  फक्त अप्रतिम……!

 5. ANIL KOTHE

  घनश्यामजी धन्यवाद आणि आभार…
  कृपेश नुसता शिक्षक नाही..तो आईच काळीज असलेला पालक आहे. या कविता म्हणजे सृजनाची आस आणि ध्यास घेतलेल्या कवीमनाच्या काळजातील हुंदके आहेत..

  चपराक हे हुंदके ..हे संवेदनशील भाव वाचकांच्या पर्यंत पोचवते आहे.
  धन्यवाद.
  ??

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा