पतंगे गुरूजी

पतंगे गुरूजी

Share this post on:

माणसाच्या आयुष्यात शालेय जिवनातील संस्काराचे महत्त्व असतेच. माझे बहुतांश आयुष्य ग्रामीण भागात गेले. जुन्या निलंगा आणि नवीन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ हे आमचे गांव.

1972, 73 ला मी मँट्रीकची परीक्षा पास झालो. जिल्हा परिषद शाळा, येरोळ येथील आमच्या वर्गात त्यावेळी19 मुले होती. त्यात तीन मुलींचाही समावेश. त्यावर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आम्ही तिघे होतो आणि शाळेतली ती फर्स्ट क्लासची पहिलीच बँच होती म्हणून विशेष कौतुक. अर्थात सर्व श्रेय आमच्या गुरुजी लोकांचेच होते. मला एकसष्ठ टक्के मार्कस होते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आमचे गणिताचे शिक्षक पतंगे गुरुजी.

गावात वीज नंतर आली. कंदीलाच्या उजेडात अभ्यास चाले. गणित हा काही माझा आवडता विषय नक्कीच नव्हता परंतु त्याकाळातले शिक्षक झपाटलेले असत. पतंगे गुरुजी दररोजच त्यांच्या खोलीवर बोलावून कंदिलाच्या प्रकाशात आमची गणिताची शिकवणी घेत. ते त्रिकोणमिती शिकवत. साईन थिटा, कॉंस थिटा असे काही परवलीचे शब्द नित्य कानी पडत. गुरुजी उदगीरला राहत परंतु परीक्षेच्या काळात आम्हाला शिकवण्यासाठी म्हणून खास गावात मुक्काम करत. फीस वगैरे नव्हतीच. ती कल्पनाच अस्तित्वात नव्हती. गुरुजी जीव तोडून शिकवायचे. विषय समजावून सांगण्याची प्रचंड तळमळ आणि एखादे गणित आम्हाला सोडवता आले की त्यांना कोण आनंद होई. ते गणित सोडवायला सांगत आणि अडचण आली की समजावत. परीक्षेच्या काळात त्यांनी ध्यासच घेतला होता. एकही दिवस चुकला नसेल. परिणामी मँट्रिकला मी फर्स्ट क्लास मध्ये येण्याचे एकमेव कारण म्हणजे, गणितात मला चक्क 96 मार्कस मिळाले आणि ही साधारण घटना नव्हती. निदान त्या काळी. आजच्यासारखे भरमसाठ मार्कस् मिळत नव्हते.

पतंगे गुरुजी नंतर उदयगिरी कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर तिथेही काही दिवस आम्हाला त्यांच्या घरी बोलावून पहाटे पाच ते सहा असे शिकवत असत. काही अडलं की आम्ही त्यांना विचारावयास जात असू. त्यातच त्यांना आनंद होई.

नंतर कित्येक वर्षांनी वकील झाल्यावर एका ज्युनियर वकीलाला अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज तयार करावयाचा होता. म्हणून तो माझ्याकडे मदतीला आला. मी त्याला स्वतःच लिहिण्यास सांगितले. नंतर अडचण येईल तेव्हा ड्राफ्टींगमधे मदत केली. पतंगे गुरुजींच्या शैलीतच हे केलं. आजही तो वकील भेटला की म्हणतो,

‘‘तुम्ही जर त्यादिवशी मला तसं ड्राफ्टींग शिकवलं नसतं तर अजूनही मला जमलं नसतं.’’

आपल्याला जे माहीत आहे ते इतरांना सांगण्यात, शिकवण्यातही एक प्रकारचा श्रेष्ठ आनंद प्राप्त होतो. त्याचे वर्णन शब्दात करणे कठीण. मात्र मुळात त्यासाठी संस्कार हवे असतात आणि ते शालेय जीवनातच मिळतात.

-ऍड. प्रभाकर येराळकर
लातूर
98604 55785

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

One Comment

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!