यशाची केमिस्ट्री शिकवणारे शिंदे गुरुजी

यशाची केमिस्ट्री शिकवणारे शिंदे गुरुजी

इसवी सन 2000 साली माझे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. बारावी हा करिअर आणि शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. बारावीच्या शिक्षणाला सुरुवात ही साधारणतः वयाच्या सोळाव्या वर्षी होते. आपण सोळावे वर्ष हे धोक्याचे वर्ष मानतो कारण हे वर्ष तारुण्याच्या प्रदार्पणाचे वर्ष मानले जाते.

अशा तारुण्याच्या उंबरठ्यावर बारावीसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून चुका होऊ नयेत म्हणून गरज असते ती एका उत्तम मार्गदर्शकाची. अशाच एका मार्गदर्शक व्यक्तीसोबत माझा त्या वर्षी संबंध आला. त्यांचे नाव आहे श्रीकृष्ण शिंदे. आम्हाला बारावीला ते रसायनशास्त्र शिकवायचे.

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या व्यक्तीस आपण प्रोफेसर तर शाळेत शिकवणार्‍या व्यक्तीस आपण टीचर म्हणतो! पण मी त्यांना प्रोफेसर नव्हे तर टीचर, उत्तम मार्गदर्शक, गुरु म्हणून संबोधेले. ते रसायनशास्त्र हा विषय तर उत्तमप्रकारे शिकवायचेच. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मी या विषयात 100 पैकी 95 मार्क मिळवू शकलो पण त्यांच्याबद्दलचा आदर हा फक्त या दोन गोष्टींमुळेच नाहीये तर त्यांची विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ, विद्यार्थ्यासोबत जोडलेले एक भावनिक नाते, आयुष्याकडे बघण्याचा दाखवून दिलेला दृष्टिकोन, प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा घालून दिलेला मंत्र या सर्व गोष्टींमुळे सुद्धा आहे.

त्यांचा शिकवण्याचा विषय हा रसायनशास्त्रापुरता मर्यादित असला तरीही विद्यार्थ्यासोबतचे नाते मात्र खूपच व्यापक होते. यश मिळवण्यासाठी आणि ज्यांचे भविष्य आपल्या हातात आहे त्यांना यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करावी याचे मला ते उत्तम उदाहरण वाटतात. अशी व्यक्ती आपल्याला देखील कुठेतरी अनुकरणीय वाटते आणि एखादी व्यक्ती तेव्हा महान होते जेव्हा इतर व्यक्ती त्यांच्या कार्य क्षेत्राव्यतिरिक्त देखील त्यांचे अनुकरण करायला लागतात. एखादी व्यक्ती मार्गदर्शक किंवा गुरुस्थानी वाटण्याचे रहस्य या गोष्टीत दडलेले असते. आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये उत्तम यशस्वी व्यक्ती पहायला मिळतील पण त्या व्यक्ती त्यांच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त अनुकरणीय असतीलच असे नाही. त्यामुळे बर्‍याच वेळेस मिळणारा मान हा त्या व्यक्तीला नव्हे तर पदाला असतो.

पदाव्यतिरिक्त मिळणारा खरा मान आणि आदर त्या व्यक्तीला गुरुस्थानी नेऊन ठेवतो. आज माझे बारावीचे शिक्षण पूर्ण होऊन 19 वर्षे उलटली आहेत. पुढे उच्च शिक्षण पूर्ण झाले, नोकरी लागली, संसार मार्गी लागला… पण 19 वर्षाखाली त्यांच्याकडून घेतलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेच्या मंत्राचा आजही विसर पडलेला नाहीये. रसायनशास्त्राच्या प्राध्यापकांच्या निमित्ताने आयुष्यात भेटलेल्या गुरूला 100 पैकी 100 मार्क घेऊन गुरुदक्षिणा देण्याचा त्यावेळी माझा प्रयत्न होता. त्यामुळे 95 मार्क मिळाल्याचा आनंद होण्यापेक्षा 5 मार्क कमी पडल्याची सल आजही मनात आहे. ती वेळ आज परत येणे शक्य नसले तरी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलच्या आदराच्या भावना व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

-राहुल बोर्डे, पुणे
9822966525

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “यशाची केमिस्ट्री शिकवणारे शिंदे गुरुजी”

  1. मस्त, नाहीतर आजकाल लोक कृतज्ञता विसरले आहेत

    1. Rahul Borde

      Thanks a lot

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा