श्रीगुरूचे केलिया स्मरण ।
होय सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण। श्रीगुरूंचे ॥
ज्ञानेश्वरांच्या या ओवीतूनच जीवनातील गुरूचे महत्त्व व अढळ स्थान अधोरेखित होते. दशदिशा अंधारलेल्या असताना जीवनात प्रकाशाचा कवडसा दाखविणारी व्यक्ती, शक्ती किंवा विचार म्हणजे ‘गुरू’.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूला अढळ स्थान असते. माझ्या आयुष्यातही माझे वडील आणि गुरू ह.भ.प. श्री बापूसाहेब डफळ यांचे स्थान महामेरूप्रमाणे आहे. राजकारण, समाजकारणात उल्लेखनीय कामगिरी, कुटुंबाचा आधारस्तंभ, उत्तम वक्ता, लेखक, कवी, कीर्तनकार, प्रवचनकार असा आजवरचा प्रवास. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व परंतु जगण्याचे हे सारे आयाम सोडून त्यांनी आपले जीवन विठ्ठलाच्या सेवेत रुजू केले आहे.
बालपणापासूनच टाळ चिपळ्यांच्या साथीने तुकोबा, ज्ञानोबा, नामदेव, जनाई, एकनाथ यांच्या अभंग, गौळणी, ओव्यातून शब्दांचे संस्कार कळत नकळत माझ्यावर होत गेले. एका मध्यमवर्गीय चाळीत सभोवताली फारसे अनुकूल वातावरण नसताना शिक्षणाचे महत्त्व केवळ त्यांच्या शिस्तबद्ध आचार-विचारातूनच उमगले. धामारीसारख्या दुष्काळी भागातून नोकरीनिमित्त स्थलांतरीत झाल्यावर वडिलांनी आपल्या भावंडांनाही स्थिरस्थावर केले अन् समाजात एकत्र कुटुंबपद्धतीचा आदर्श प्रस्थापित केला.
लहानपणी विविध पुस्तकांशी मैत्री त्यांनीच करून दिली. बाबासाहेब पुरंदरेंचे ‘राजा शिवछत्रपति’ केवळ हातात न देता गड, कोट भ्रमंतीतून शिवरायांचा इतिहास सांगितला. अनेक लेखकांचे लेखन केवळ त्यांच्यामुळे समजले आणि चांगली पुस्तके हे जीवनाचे सोबती झाले.
वयाच्या बाराव्या वर्षी एका कार्यक्रमात त्यांनी मला प्रमुख पाहुण्यांसमोर श्लोक म्हणून दाखवायला सांगितला. त्यांनीही माझे कौतुक केले. त्यांचा आशीर्वादही घेतला. ते पाहुणे म्हणजे मृत्युंजयकार शिवाजी सावंत होते. तो क्षण माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे.
वाचनाचे महत्त्व सांगताना दादा नेहमी म्हणायचे,
‘‘पुस्तकातील माणसे नक्कीच वाचा पण माणसाच्या मनातील पुस्तके जेव्हा वाचायला शिकाल तेव्हाच चांगला माणूस बनाल.’’
हे त्यांचे वाक्य ते तंतोतंत जगतात देखील. दांडगा जनसंपर्क आणि दु:खातही त्यांची साथ न सोडलेला त्यांचा परिवार आणि स्नेही हे त्याचे उत्तम उदाहरण.
घरात नेहमीच शिस्तबद्ध वातावरण असायचे. व्यायाम, विद्वत्ता, व्यवसाय आणि चांगले विचार यासाठी झटण्याचा त्यांनी नेहमीच सल्ला दिला. आयुष्यात पैशाचे महत्त्व केवळ व्यवहारापुरते…! सुखाची व्याख्या ही माणूस किती श्रीमंत आहे यावरून न होता त्याच्या मनाची, विचारांची श्रीमंती किती आहे यावरून होते हे वारंवार भिनवले.
खरे तर जेव्हा ‘मुली म्हणजे डोक्यावरचे ओझे’ अशी समाजामध्ये विचारधारा होती (कदाचित आता काही प्रमाणात बदल घडलाय) त्यावेळी आम्हा दोन्ही बहीणींना त्यांनी मुलाप्रमाणेच आचार-विचार स्वातंत्र्य दिले. आपल्या मुली स्वाभिमानी, उच्चशिक्षीत आणि स्वावलंबी व्हाव्यात म्हणून झटले. पारंपरिकता आणि आधुनिकता यातील योग्य गोष्टींचा मेळ त्यांनी घातला. मुलीचा बाप म्हणून मला त्यांचा नेहमीच अभिमान वाटला.
प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत ।
या श्लोकाप्रमाणे ते आमचे योग्य वेळी मित्रही बनले.
सक्तीची (लादलेली) निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांच्या डोळ्यात मी कधीच हतबलता पाहिली नाही. दूरदृष्टी ठेवून योग्य नियोजनामुळे अनेक संकटावर ते मात करू शकले. त्यांनी अनेक स्वप्नांची बीजे आमच्यामध्ये पेरली. दुष्काळातही ती अंकुरली, फुलली. त्याचा वेल आता बहरतो आहे. तो केवळ त्यांच्या प्रेमाच्या सिंचनाने…!
1964 साली खंडित झालेला अलंकापुरी प्रदक्षिणा सोहळा त्यांनी 2012 ला पुन्हा सुरू केला. वारकरी संप्रदायाचा प्रचार, प्रसार हे त्यांचे आता जीवितकार्य झाले आहे. केवळ माझेच नाही तर कितीतरी व्यक्तींचे प्रेरणास्थान, आदर्श आणि गुरूवर्यांना माझी ही शब्दपुष्पांजली समर्पित…!
-मीनाक्षी पाटोळे
राजगुरूनगर
9860557125
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..
अप्रतिम सोनु…सोनु म्हणजे मिनक्षी.. श्री. बापुसाहेब उर्फ दादा डफळ हा खरच दादा माणुस.. मिनाक्षीने लिहिलेला शब्दन शब्द खरा आहे.
माझ्या डोळ्यासमोर मिनाक्षी आणि तिच्या भावंडांच बालपण गेल.
दादांची शिस्त..कुटुंब.. भावंडांप्रती प्रेम.. सांप्रदायाचा ओढा..
आधी करावा प्रपंच नेटका …
तसा नेटका प्रपंच करुन.. परमार्थाची वाट धरलेला हा योगी अनेकांना वाट दावुन विठ्ठलाच्या सेवेत रुजु झाला.
मिनाक्षी तुम्ही सारेच धन्य आहात.. गुरुतुल्य पिता आणि तुमच्या सारखे गुणी लेकर …
खूप खूप शुभेच्छा…
अनिल कोठे.
९३७१०१५५४२.