आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे लोक, मार्गदर्शक, सल्लागार, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ट, वाचक, रसिक, विरोधक, निंदक ह्या रुपात भेटत असतात. हेच ते आपले खरे गुरु असतात. यंदाच्या गुरूपौर्णिमेनिमित्त मला लाभलेल्या ह्या गुरूंची आठवण झाली व अतिशय कृतज्ञपणे मला ह्या लेखाद्वारे माझी गुरुदक्षिणा अर्पण करावीशी वाटली. आयुष्यात मला लाभलेल्या ह्या गुरुंबद्दल मला कायमच आकषर्ण वाटले आहे. गुरुत्वाकर्षण म्हणा हवे तर!
माझ्याच काय पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली आई हीच आपली पहिली गुरु असते हे निर्विवाद सत्य आहे. आईच्या गर्भात असतानाच ती आपल्यावर अतिशय प्रेमाने वेगवेगळे संस्कार करून निस्वार्थीपणे आपल्याला घडवत असते. त्याचप्रमाणे आपले बाबाही आपल्यावर सर्वोत्तम संस्कार करून आपल्याला घडवायचा प्रांजळ प्रयत्न करत असतात. हेच खरे तर आपले गुरु! त्यांनी आपल्यासाठी खाल्लेल्या खस्ता, आपल्याला घडवण्याचे घेतलेले कष्ट ह्यांची जाणीव ठेवून त्यांच्या उतरत्या काळात त्यांचा नीट संभाळ करून त्यांचा वृद्धापकाळ जितका सुखद करता येईल तितका तो करणे हीच काय ती त्यांना दिलेली गुरुदक्षिणा आहे, असे ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने ठरवले पाहिजे अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.
मला कळायला लागल्यापासून मी माझ्या आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आयुष्यात मार्गक्रमण करतो आहे. ह्या जन्मदात्या गुरूंकडून मला स्वाभिमान, इमानदारी, प्रामाणिकपणा, सचोटी, कर्तव्यदक्षता, निष्ठा, कष्ट करण्याची मानसिकता, दुसर्यांचा आदर सन्मान करण्याची वृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन असे आणि अजून कितीतरी जीवनावश्यक संस्कार भरभरून मिळाले आहेत. जीवनातील खूप महत्त्वाची तत्त्वे आणि मूल्ये मला माझ्या आईवडिलांकडून ह्या संस्कारातून मिळाली आहेत. ह्या संस्कारांच्या बळावरच माझी गेले 56 वर्षांची कारकीर्द अविरत चालू आहे आणि पुढेही अशीच चालू राहील ह्याची मला खात्री आहे.
आपल्या शालेय जीवनात तर आपले शिक्षकच आपले खरे गुरु असतात. त्यांनी जीव तोडून आपल्याला केलेले ज्ञानार्जन, कलेचे दिलेले दान आपल्याला आयुष्यभर जगण्यासाठी खूप उपयोगी पडते. माझ्यावरही शालेय जीवनात शाळेतील शिक्षकांनी तर उत्तम संस्कार केलेच परंतु त्याच जोडीला माझ्या मोठ्या मामांचेही (जे स्वत: एक आदर्श शिक्षक होते) अमूल्य असे संस्कार माझ्यावर झालेत. मी आज जो काही आहे अथवा घडलो आहे तो माझ्या ह्या मोठ्या मामांनी मजवर केलेल्या संस्कारांची देण आहे. त्यांनी मला सर्वप्रथम शिस्त म्हणजे काय ते अगदी प्रेमाने समजावून सांगितले. तसेच वेळेचे भान, वेळेचे गणित व महत्त्व इतके प्रभावीपणे समजावून सांगितले की मी त्याचीच री ओढत आजवरच्या आयुष्यात यशस्वी झालो आहे.
माझे चुलतेही माझे खूप चांगले गुरु तर होतेच पण आमच्या वयातले 30 वर्षांचे अंतर कमी होऊन ते माझे खूप चांगले मित्रच होते असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही. माझ्या ह्या गुरुंनी मला व्यावहारिक ज्ञानाचे खूप चांगले धडे अगदी वयाच्या 10 व्या वर्षापासून दिले आहेत. त्यामुळेच मी वयाच्या 15 व्या वर्षापासूनच कमवायला लागलो व स्वत:च्या पायावर अभिमानाने उभा राहिलो.
मला उमजलेले एक गुपित तुम्हाला सांगतो, ते म्हणजे आपले मित्र हे आपले खूप चांगले गुरु असतात. माझ्या आजवरच्या अनुभवातून मी हे तुम्हाला सांगतो आहे. माझ्या अनेक मित्रांकडून मी वेळोवेळी खूप काही शिकलो आहे. वयाच्या 15 व्या वर्षी मला लाभलेला माझा गुरु मित्र, ज्याने मला वेश्यागमन का करू नये ह्याची शिकवण प्रत्यक्ष त्या स्थळी नेऊन दिली होती, ज्यामुळे आयुष्यात मला त्याच्या ह्या संस्काराचा खूपच उपयोग झाला व आजवर माझे पाऊल कधीही वाकडे पडले नाही. योग्य वयात योग्य ती शिकवण जर मिळाली तर ती आपले आयुष्य भरकटण्यापासून वाचवू शकते हे स्वानुभवावरून मी तरी सांगू शकतो. माझ्या ह्या गुरुमित्रांनी कुठल्याही गुरुदक्षिणेची अपेक्षा न ठेवता मला त्यांच्याकडील ज्ञान, कला-गुण, विद्या, क्लृप्त्या अतिशय सढळ हाताने दिल्यात आणि आज जो काही आहे तो मी घडत गेलो.
माझे एक मेव्हणे आहेत ज्यांच्याबरोबर मी वयाच्या 17 व्या वर्षी त्यांच्या फोटो स्टुडीओत काम करत होतो व त्यांच्याकडून व्यावहारिक ज्ञानाबरोबर सामाजिक, प्रासंगिक गोष्टींचे ज्ञानार्जन करत होतो. हे माझे असे गुरु आहेत की ज्यांनी मला आयुष्यात संघर्ष करायला शिकवला. आयुष्याशी तडजोड कशी करायची ह्याचे त्यांनी मला त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातल्या घडामोडींवरून उदाहरणासहीत नुसतेच समजून सांगितले नाही तर मला ह्या धकाधकीच्या व बेभरवश्याच्या समाजात स्वत:ला खंबीरपणे उभे राहण्याची कायमची शिकवण दिली. माझ्या ह्या गुरुंनीच माझ्यातल्या वाहन कौशल्याची जाणीव ठेवून मला उत्तम चालक बनवले आहे. जोखीम कशी, कधी, केव्हा, कुठे, कशासाठी, कोणाविरुद्ध, कोणासाठी, का घ्यायची ह्याचे अतिशय अफलातून प्रशिक्षण माझ्या ह्या गुरुकडून मला लाभले आहे हे ह्या लेखाच्या निमित्ताने नमूद करतो.
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्था; तडजोड, त्याग, प्रेम आणि संयम ह्या चार खांबांवर कशी उभी आहे हे 32 वर्षे निघुतीने आमचा संसार करून माझ्या सहचारीणीनेही माझ्या गुरूचा मान तर नक्कीच मिळवला आहे.
नोकरीच्या काळात मला खूप चांगले सहकारी लाभले जे नंतर माझे मित्रच झाले. हे सहकारी सुद्धा आपले खूप चांगले गुरु असतात. ह्या सहकार्यांच्या निस्वार्थी भावनेने केलेली मदत सुद्धा एक प्रकारची गुरुविद्याच असते असे माझे तरी मत आहे. माझ्या 40 वर्ष्याच्या नोकरीत खूप सहकारी मित्र/मैत्रिणी मिळवलेत ज्यांना मी माझ्या आयुष्यातले आदरार्थी गुरूच समजतो. मी 40 वर्षात जवळजवळ 14 नोकर्या केल्यात. माझ्या पहिल्याच नोकरीत मी ज्या कारखान्यात होतो त्या कारखान्याचे मालक हे माझे आदरणीय गुरु होते. आपल्या कामाबद्दलची निष्ठा किती आणि कशी असावी ह्याचे हे मालक म्हणजे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्याबरोबर एक वर्ष काम करत असताना मला जे काही अनुभव आलेत व त्यांनी स्वत: मला ज्या काही दीक्षा एक गुरु ह्या नात्याने दिल्यात त्याच्या जीवावर मी उरलेल्या 13 नोकर्या अगदी व्यवस्थित आणि समाधानकारकरित्या करू शकलो.
नुकताच मी माझ्या शेवटच्या नोकरीतून निवृत्ती घेतली. ह्या माझ्या शेवटच्या नोकरीत मी माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा म्हणजे जवळ जवळ 11 वर्षांचा काळ अतिशय स्वामिभामाने आणि अभिमानाने व्यतीत केला. माझ्या ह्या 11 वर्षांच्या प्रवासात ह्या कंपनीचे मालक-संचालक आणि संचालिका ह्या दोघांनी; एक मराठी माणूस जर मनात आणले तर व्यवसायात कसा यशस्वी होऊन शून्यातून विश्व निर्माण करू शकतो हे दाखवून दिले आहे. माझ्यासाठी हे दोघेही माझ्या नोकरीतले आदर्श गुरूच म्हणायला हवेत. जरी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असले तरी मी त्यांना त्यांच्या ह्या कर्तृत्वाबद्दल गुरुस्थानीच मानतो. व्यवसाय म्हणजे स्पर्धा ही आलीच! त्यात जोखीम घेऊन आलेल्या संधीचे सोने कसे करायचे ही एक कला आहे. त्यात ह्या मराठी दांपत्याने व्यवसायात अशी उत्तुंग भरारी घेवून आपल्या जिद्दीने हे व्यावसायिक यश प्राप्त केले आहे ते वाखाणण्याजोगे तर आहेच परंतु त्यांच्या ह्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मलाही काम करण्याची संधी मिळाली व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला हे माझे अहं भाग्यच आहे.
माझ्या नोकरीतील व्यापातून आणि माझ्या ह्या अनंत गुरूंकडून मिळालेल्या दीक्षेतून मी रोज काही ना काही तरी शिकत होतो व स्वत:ला घडवत होतो. आयुष्याच्या अशाच एका वळणावर वयाच्या पन्नाशीला मला माझ्यातील काव्यप्रतीभेची जाणीव झाली आणि मी चक्क रवीचा कवी झालो. माझ्या कवी होण्यात खरं पाहता सर्वात मोठा हात हा नियतीचा होता. माझ्या मते आपली परिस्थिती हीच आपला खूप मोठा गुरु असते आणि माझ्या बाबतीत तर ते अगदी तिने सिद्धच करून दाखवले आहे. एक-दोन नाही तर चक्क चार कवितासंग्रह प्रकाशित करून घेतलेत माझ्याकडून ह्या माझ्या गुरूने!
माझ्यातील काव्यप्रतिभेला उमजून, समजून, तिच्यावर अतिशय समंजसपणे, प्रामाणिकपणे व हळूवारपणे रुचेल, पटेल असे साहित्यिक संस्कार करून, मला सातत्याने लिहिते ठेवून, योग्यवेळी योग्य ते मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले ते माझे साहित्यक गुरु म्हणजे ‘चपराक’चे संस्थापक संपादक हे होय! माझ्या ह्या साहित्यिक वाटचालीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. मी त्यांचा ऋणी आहे. तसेच ‘चपराक’ परिवारातील सदस्य, ज्येष्ठ लेखक, कवी, साहित्यिक, समीक्षक, परीक्षक, टीकाकार, माझे सर्व रसिक वाचक ह्यांना सुद्धा मी गुरुस्थानीच मानतो! माझ्या ह्या सर्व गुरुजनांना मी आज सादर प्रणाम करतो व त्यांच्या ऋणात राहतो. हीच काय ती माझी गुरुदक्षिणा समजावी.
-रविंद्र कामठे
पुणे
9822404330
सुंदर लेखन.
अनुभव हाही आपला गुरूच.