शिवसैनिकांचा लहानपणा; सत्तेसाठी शहाणपणा!

शिवसैनिकांचा लहानपणा; सत्तेसाठी शहाणपणा!

Share this post on:

शिवसेना हे नाव ऐकताच डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्यांच्या असीम धैर्याचे आणि संघटन कौशल्याचे. त्यानंतर दुसरे चित्र उभे राहते ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे. कारण महाराष्ट्रातील तरुणाईची सळसळती ऊर्जा म्हणजे शिवसेना आहे. तारुण्यात आलेल्या युवक – युवतीला व्यवस्थेबद्दल असणारी चीड व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणजे शिवसेना!

साधारणपणे साठ-सत्तरच्या दशकात भारतीय राजकारणात कॉंग्रेस आणि डाव्यांचा प्रभाव होता. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातही त्यांचाच वरचष्मा होता. त्यामुळे दोन्ही पक्षांची भूमिका ही सर्वधर्मसमभाव आणि प्रांतवादाविरहीत होती. त्यामुळे मुंबईत सर्व प्रांतातील लोकांना अभय होते. मात्र टप्प्याटप्याने परप्रांतीय लोकांना मिळालेल्या या अभयामुळे आणि राजकीय वरदहस्तामुळे अवैध धंद्याचा उगम झाला. त्याचे रुपांतर पुढे गँगवॉरमध्ये झाले. या सर्वात गळचेपी होऊ लागली ती मराठी माणसाची. त्यामुळेच मग शिवसेनेसारख्या संघटनेचा जन्म झाला. सुरवातीला शिवसेना ही मराठी माणूस, त्याचा रोजगार, भाषा याबाबत आग्रही होती. त्यामध्ये धर्माबाबत फारसा कट्टरपणा नव्हता. एकेकाळी शिवसेनेने मुस्लिम लीगसोबत युतीही केली. मात्र असे असताना गणोशोत्सवात हिंदु – मुस्लिम दंगल झाली आणि तेथूनच खर्‍याअर्थाने शिवसेना ही हिंदुत्त्वाच्या मुद्याकडे वळली. त्यामुळे भाजपला शिवसेनेच्यारुपाने महाराष्ट्रात बहुजनांचा सहभाग असलेला राजकीय साथीदार मिळाला. तेथूनच खर्‍याअर्थाने महाराष्ट्रात आणि देशात पुन्हा एकदा हिंदुत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला. त्याचे संपूर्ण श्रेय जाते ते शिवसेनेला.

शिवसेनेचे बलस्थान आहे ते म्हणजे बहुजन वर्गातील असलेला कार्यकर्त्यांचा चमू. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात शिवसेनेचा शिवसैनिक सर्वच जाती धर्माचा आहे. याचे सारे श्रेय जाते ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. त्यामुळे ब्राह्मणी तोंडवळा असलेल्या भाजपला नेहमी त्याचा फायदा झालाय. अर्थात यापूर्वी हिंदू महासभेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनीदेखील राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्त्वाच्या मुद्यावर राजकारण केले. मात्र त्यांच्या पश्चात हिंदू महासभा ही मोडकळीस निघाली.

हा सारा इतिहास पाहता हिंदुत्त्वाधारित सत्ता प्राप्त करणे आणि ती टिकवणे हे मोठे आव्हान शिवसेना आणि भाजपसमोर आहे. कारण यापूर्वी 1995 सालचे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आणि 1999 साली अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार वगळता फारशी सत्तेची संधी मिळाली नाही. मात्र 2014 साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एन.डी. ए.ला जनतेने कौल दिला आणि एक सशक्त सरकार देशाला मिळाले. भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याने सहयोगी पक्षांचे महत्त्व कमी झाले. त्यामुळे पूर्वी छोट्या भावाची भूमिका बजावणारी भाजप अचानकपणे मोठ्या भावाच्या रुपात गेली आणि तिथेच माशी शिंकली कारण अपयश पचवणे एकवेळ सोपे असते मात्र यश पचवणे हे तसे अवघडच. त्यामुळेच कुठेतरी सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आणि 2014 च्या विधानसभेला शिवसेना-भाजप युती तुटली.

महाराष्ट्रातील युती तुटल्याने केवळ दोन पक्षाची साथ सुटली नाही तर हिंदुत्त्वाच्या मतांचे विभाजन झाले. शिवाय स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या मतभेदाचे रुपांतर मनभेदात होऊ लागले. त्याचीच परिणती म्हणजे मुंबईतून किरीट सोमय्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी होत असलेला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध. हा विरोध वरकरणी आज दिसत असला तरी त्याची बीजे रुजलीत ती मागील विधानसभेवेळी झालेल्या काडीमोडात.

शिवसेना ही कट्टर कार्यकर्ता असलेली संघटना आहे. या संघटनेशी लाखो लोकांच्या भावना जोडलेल्या असल्याकारणाने संघटनेवर आणि शिवसेनाप्रमुखांवर केलेली टीका ही त्यांना वैयक्तिक स्वरुपाची वाटते. त्यामुळे आज राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास विरोध होतोय. शिवसैनिकांचा हा राग रास्त असला तरी त्यातून होणारे नुकसान हे युतीचेच आहे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत की, ‘‘हिंदु धर्मातील एक व्यक्ती धर्मांतरीत झाला म्हणजे याचा अर्थ केवळ एक हिंदू कमी झाला असे नव्हे तर आपल्या विरोधकांची संख्या एकने वाढते.’’

मुळात बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्त्वाकडे वळण्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे मुस्लिम लीगने केलेली गद्दारी. एकीकडे युती करता आणि दुसरीकडे हिंदू धर्मियांवर आणि त्यांच्या उत्सवावर हल्ले करता हा दुटप्पीपणा अथवा गद्दारी त्यांना मुळातच मान्य नव्हती. मात्र ‘भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही’ ही भूमिका म्हणजे मुस्लिम लीगच्या ‘त्या’ गद्दारीचीच पुढची आवृत्ती म्हणावी लागेल. जर शिवसैनिकांनी ही गद्दारी केल्यास मुस्लिम लीग आणि शिवसेनेत काहीच फरक राहणार नाही असे वाटते. त्यामुळे जी वागणूक आपल्याला योग्य वाटत नाही ती आपण इतरांसोबत करणे म्हणजे स्वतःशी खोटे बोलण्यासारखेच आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी अशा वागणार्‍यांना पक्षातूनच काढले असते. त्यामुळे भविष्यातील असलेले आव्हान लक्षात घेऊन शिवसैनिकांनी काही गोष्टीत लहानपणाची भूमिका घेणेच शहाणपणाचे ठरेल.

(साप्ताहिक ‘चपराक’)

सागर सुरवसे
पत्रकार, सोलापूर
9769179823

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!