कृतीयुक्त शिक्षणपद्धतीची गरज

कृतीयुक्त शिक्षणपद्धतीची गरज

अन्न, वस्र, निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तसेच शिक्षण हेही मूलभूत घटक बनले आहे. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणामुळे व्यक्तिची प्रगती होते. चांगले-वाईट यातील फरक कळतो. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. आयुष्य सुखकर बनवण्याचे माध्यम आहे ‘शिक्षण’
पालक आपल्या मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवतात. त्याचबरोबर अनेक क्लासेसही लावतात. जेणेेकरुन मुलांनी चांगला अभ्यास करावा पण कोणत्या पद्धतीने मुलांना शिकविले जाते, हे सुद्धा तपासणे गरजेचे आहे. विशेषत: लहान मुलांना आपण शिकवताना त्यांच्या कलाने घेतले पाहिजे. त्यांना संकल्पना समजावून सांगितली पाहिजे पण आजकाल पाहिले तर मुलांना मारून, ओरडून शिकविले जाते. सध्या दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील पहिल्या व्हिडिओत असे दाखविले आहे की, आई मुलीचा अभ्यास घेत आहे. मुलीला 1 ते 5 अंक म्हणायला सांगितले, पण ती गोंधळली गेली. त्यामुळे ती नीट बोलू शकली नाही. यामुळे मुलीच्या आईने मुलीला मारले. ती मुलगी जास्त घाबरली, रडू लागली. अशा पद्धतीने तिचा मानसिक छळ सुरु होता. तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये असे दाखविले आहे की, शाळेतील वर्गात एका विद्यार्थ्यांने गृहपाठ अपूर्ण केला म्हणून शिक्षिकेने त्या मुलाच्या कानाखाली लगावल्या. 1 वेळा नाही तर 40 वेळा…

मुलांना एखादी संकल्पना समजली नसेल तर ती पुन्हा पुन्हा नीट समजावून सांगितली पाहिजे. नुसती घोकंपट्टी करून घेऊन उपयोग काय? त्यांना उदाहरणे देऊन शिकविले पाहिजे. मुलांना मारले, ओरडले की ती आणखी बिथरतात. त्यांना प्रेमाने, मायेने चूक लक्षात आणून दिली पाहिजे. लहान मुले म्हणजे ओल्या मातीचा गोळा असतो. तुम्ही जसा आकार देणार तसे ते घडणार. तुम्ही जे संस्कार करणार तसेच ते वागणार. मुलांच्या मनावर चांगल्या गोष्टी बिंबविल्या पाहिजेत. त्यांना अभ्यासाची भीती नाही तर अभ्यासाशी मैत्री करावीशी वाटली पाहिजे. सतत मारहाण, मानसिक छळ यामुळे मुले आणखी चीडचीड करतात. सतत मनावर दडपण ठेवून वागतात. बोलणे कमी करतात. त्यामुळे ते डिप्रेशनमध्येही जाऊ शकतात. अनपेक्षित पाऊलही उचलू शकतात.

पालकांनी घरी अभ्यास घेताना हसत-खेळत शिकवावे. विविध शालेय सीडीज उपलब्ध आहेत. त्या व्हिडिओज दाखवून, खेळाच्या माध्यमाने मुलांना शिकविले तर ते आवडीने शिकतील. त्यांना अभ्यासाचे ओझे वाटता कामा नये. आता तर वेगवेगळे शैक्षणिक ऍप्सही उपलब्ध आहेत. त्याद्वारे आपण मुलांना शिकवू शकतो. मुलांच्या आजुबाजुचे वातावरण आनंदी हवे. चूक झाल्यास टोकावे पण मारहाण नको. शरीराला नाही तर मनाला शिक्षा व्हायला हवी. पूर्वी तर गृहपाठ केला नसेल तर गुरुजी विद्यार्थ्यांना वेताच्या काठीने मारायचे.
छडी लागे छमछम
विद्या येई घमघम
काळ बदलला आहे. मुलांना सक्तिने नाही तर प्रेमाने, हसत-खेळत शिकविले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांच्या शाळेस जरूर भेट द्यावी. आपल्या मुलांना शाळेत कोणत्या पद्धतीने शिकविले जाते, हे पाहिले पाहिजे. मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलांना शाळेत सोडले म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. तर तिथे आपल्या मुलाला काही त्रास आहे का, तो नीट अभ्यास करतो का, याची खात्री करून घेतली पाहिजे. घरी अभ्यास घेताना त्यांच्याकडून नुसता रट्टा मारून घेऊ नका, प्रत्येक संकल्पना स्पष्ट करून सांगा. मुलांना अभ्यासात गोडी निर्माण झाली पाहिजे.

अभ्यासासोबत मुलांना खेळात रमवा. विविध ठिकाणी फिरायला घेऊन जा. विविध कलांमध्ये रस घेण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. कलागुणांना वाव द्या. आपण फक्त विचार करतो, त्या विचारांना कृतीची जोड दिलीत तर नक्कीच हसत-खेळत कृतीयुक्त शिक्षणपद्धतीची साथ मिळेल.

साप्ताहिक ‘चपराक’

अस्मिता येंडे
मुंबई
9619035195

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “कृतीयुक्त शिक्षणपद्धतीची गरज”

  1. Waghmare jitendra

    तुम्हाला वेळ असेल तर नक्की वरील लेखा संदर्भ त बोलने मला आवडेल. कारण काही गोष्ठी मला मान्य नहीं

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा