आत्महत्येचा बॉंडपेपर

आत्महत्येचा बॉंडपेपर

प्राध्यापकी पेशाच्या मरणकळा 

जून 2018 मधील प्रसंग आहे.

पुण्यातल्या ‘ब्रँडेड’ म्हणवून घेणार्‍या एका ख्यातनाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मुलाखती सुरू होत्या.

संस्थेमध्ये 20-22 वर्षे काम केलेल्या अत्यंत सिनियर व डॉक्टरेट प्राध्यापकांचे पॅनेल मुलाखत घेत होते. ती काहीशी खालीलप्रमाणे-

पॅनेल : आमच्या संस्थेमध्ये पगार करण्याची पद्धत तुम्हाला माहीत असेलच. किमान पुढील सहा महिने पगार होणार नाही, चालेल का?

मुलाखतदार : चालेल सर… हरकत नाही.

पॅनेल : समजा अजून वर्षभर पगार झाला नाही तर..?

मुलाखतदार : सर… मग थोडा विचार करावा लागेल.

पॅनेल : विचार नाही, आताच सांगा. अशा अटींवर देखील तुम्ही संस्थेमध्ये काम करण्यासाठी तयार असाल तरच तुमचे नाव पुढे पाठवले जाईल, अन्यथा नाही. त्यासोबतच तुम्हाला शंभर रुपयांच्या बॉण्डवर लिहून द्यावे लागेल की पगार झाला नाही तरी मी संस्थेच्या प्रतिमेला धक्का लागेल अशी कोणतीही कृती करणार नाही. केल्यास तात्काळ नोकरीवरून काढून टाकण्यास माझी हरकत नाही…

मुलाखतदार : चालेल सर.

पॅनेल : ठीक आहे, एक जुलैपासून जॉईन व्हा.

…आणि अशाप्रकारे पुण्यातल्या एका सर्वोत्तम समजल्या जाणार्‍या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या मुलाखती पार पडल्या.

गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पिळवणुकीमुळे एकूणच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामध्ये एकीकडे पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संस्थेत उभारलेले प्राध्यापकांचे असहकार आंदोलन असेल तर दुसरीकडे संस्थाचालकाच्या पत्नीचे पेपर प्राध्यापकांकडून लिहून घेण्याचे प्रकरण असेल.

अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला असल्याचा बाऊ करून त्यामागे शिक्षणसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर चालणार्‍या प्राध्यापकांची आर्थिक पिळवणूक आणि शिक्षण संस्थांमधील घोटाळ्यांकडे अर्थपूर्णपणे सर्व जबाबदार शासकीय संस्था व विद्यापीठ यांनी केलेली डोळेझाक यामुळे उच्चशिक्षित प्राध्यापकांची तरुण पिढी अक्षरशः भिकेला लागली आहे. यामुळे एकूणच शिक्षणक्षेत्राच्या व विद्यार्थ्यांच्या भविष्याचे होणारे अतोनात नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे.

उदाहरणार्थ :

एक अशी संस्था पुणे विद्यापीठात शिकणार्‍या एकूण अभियांत्रिकीच्या विद्यार्थी संख्येच्या तब्बल 30% ते 35% प्रवेश गिळून टाकते. अजूनही जिथे काही प्रमाणात डोनेशन घेऊन देखील विद्यार्थी प्रवेश घेतात. तेथील प्राध्यापक अठरा-अठरा महिने विनावेतन शिकवत आहेत आणि त्याच संस्थेचे संस्थाचालक मात्र आपल्या मुलांच्या शाही लग्नात करोडो रुपयांची उधळण करीत आहेत.

प्राध्यापकांच्या नावावर कर्ज काढून पगार करणे, एकूण पगारामधील फक्त बेसिक पगार देणे आणि नंतर देईल तेवढा आणि देईल तेव्हा पगार देणे अशा अघोरी प्रथा सुरू केल्यामुळे एकेकाळी जिथे IIT, NIT किंवा परदेशातून शिकून आलेल्या प्राध्यापकांची फौज संस्थेचा नावलौकिक वाढवत होती तिथे आता गाव ओवाळून टाकलेल्या प्राध्यापकांचा मोकाट भरणा केल्याचे दिसून येत आहे.

फक्त कमी वेतनात, माणसाला माणूस आणि डोक्याला डोकी रिप्लेस करून शक्य तितकी मलई लाटण्याच्या हट्टापायी आपण शिक्षण क्षेत्राचे कसे वाटोळे करत आहोत याची फिकीर देखील न बाळगणे याहून खालच्या थराला संस्थाचालक पोहोचले आहेत. साहजिकच हे सर्व अगतिक घडत आहे ते तेथील प्राचार्य आणि संचालकांच्या डोक्यातील अघोरी कल्पनांमुळे.

विनावेतन काम करत असल्यामुळे प्राध्यापकांच्या शिकवण्यावर आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम हा मोजता येत नसल्यामुळे त्याची दखल घेतली जात नाही किंवा घेऊ दिली जात नाही.

1. महिनोंमहिने बिनपगारी शिकविताना तयारी करून शिकविण्याला किंवा मुळातच शिकविण्याला उत्साह येत नाही. त्यामुळे प्राध्यापक वर्गामध्ये जाऊन फक्त पाट्या टाकण्याचे काम करू लागतात.
2. फावल्या वेळेत शेअर मार्केटिंगसारख्या ऑनलाईन माध्यमातून पैसे कमविण्यासाठी प्रयत्न करु लागतात.
3. विद्यापीठ परीक्षांच्या पेपर तपासणीमधून मिळणारे मानधन हा देखील अर्थार्जनाचा एक विश्वासू पर्याय असल्यामुळे कमीतकमी वेळात जास्तीतजास्त पेपर तपासणी करुन मानधन कमावण्याच्या नादात अत्यंत सुमार दर्जाची पेपर तपासणी करतो.
4. आपण शिकविलेल्या विषयांचा निकाल वाढवण्यासाठी महाविद्यालयांतर्गत इनसेम परीक्षा, तोंडी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांवर मार्कांचा पाऊस पाडला जातो.

यामुळे साहजिकच अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून बेअकली विद्यार्थ्यांच्या मेंढरांचे कळपच्या कळप दरवर्षी हजारोंच्या संख्येने पास होऊन बाहेर पडत आहेत.

अशी परिस्थिती असताना देखील दोन-दोन हजार विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाल्याचे मोठमोठे प्लेसमेंटचे आकडे दाखवून शिक्षणसंस्था त्यांचे ब्रँडिंग करत आहेत.

मात्र अशावेळी कोणतीही संस्था ही एका वर्षी एकूण किती विद्यार्थी डिग्री पास झाले? त्यापैकी कितीजण कँपस ड्राइव्हमधून प्लेस झाले? किती बेरोजगार म्हणून बाहेर पडले? कोणत्या कंपन्यामध्ये प्लेस झाले? हे सहसा कोणीही विचारात नाही आणि स्वतःहून सांगण्याइतके सज्जन संस्थाचालक उरले तरी किती?

मोठमोठ्या आयटी कंपन्यांमध्ये एचआरसोबत असलेल्या आर्थिक संबंधामुळे कोअर इंजिनियरिंग ब्रँचेस सोडून ढिगच्या ढीग विद्यार्थी हे आयटी कंपन्यांमध्ये प्लेस केले जातात. एकच विद्यार्थी दोन-तीन कंपन्यांमध्ये प्लेस झालेला असला तरी देखील बेरीज करताना मात्र वेगवेगळी केली जाते.

एकूणच काय तर संस्थाचालकांची अविवेकी हाव व त्याला उच्चशिक्षित संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख यांची साथ यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आहेत किंवा डबघाईला आल्याचे भासवले जात आहे. त्यामुळे कित्येक प्राध्यापकांनी आपल्या आवडत्या शिक्षण क्षेत्राला रामराम ठोकून बदलणेच पसंत केले आहे. कित्येक प्राध्यापकांनी कॅफे, केक शॉप आणि बिर्याणी हाऊससारखे उद्योग सुरु केले आहेत तर हतबल होऊन नैराश्येत गुरफटलेल्या एका प्राध्यापकाने पेटवलेल्या आपल्या डिग्री सर्टिफिकेटचा व्हिडीओ आपण सर्वांनी पाहिला असेलच.

आता राहिलेल्या गाळाच्या चिखलात संपूर्ण विनाअनुदानित इंजिनियरिंग महाविद्यालये घाणेघाण झाली आहेत. अशावेळी जागरूक पालकांनी व विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी महाविद्यालय किती जुने आहे? संस्था किती मोठी आहे आणि त्याच्या इमारती किती चकाकणार्‍या आहेत? प्लेसमेंटचे आकडे किती मोठे आहेत? याकडे पाहून प्रवेश घेण्यापेक्षा तेथील प्राध्यापक किती समाधानी आहेत आणि त्यापेक्षा सोपं म्हणजे प्राध्यापकांना पगार किती आहे? आणि किती महिन्याचा पगार बाकी आहे इतक्या साध्या प्रश्नाच्या उत्तरातून जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

कारण आपल्या पाल्याला प्राध्यापकांकडून शिकून घ्यायचे आहे की मेंढपाळाकडून? किमान एवढा तरी प्रश्‍न आपल्या मुलाच्या भविष्यासाठी विचारणे निश्‍चितच आवश्यक आहे.

कॉलेज आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याचे रडगाणे गाणार्‍या प्रत्येक संस्थाचालकांच्या व त्यांच्या परिवाराच्या संपत्तीमध्ये मात्र भरमसाठ वाढ होत असल्याचे लपून राहिलेले नाही कारण शिक्षणसंस्थेमधून मिळणारा आर्थिक मलईचा दरवर्षीचा वाटा हा आधीच काढून घेतला जातो आणि कॉलेज चालविण्याकरिता लागणारे पैसे सोडून उर्वरित रक्कम प्राध्यापकांच्या पगाराकडे वळवली जाते. म्हणजेच ज्या प्राध्यापकांच्या खांद्यांवर संस्था उभी आहे त्यांच्या उदनिर्वाहाला मात्र सगळ्यात शेवटचे प्राधान्य दिले जाते.

उच्चशिक्षित मूर्ख प्राध्यापक देखील ‘विद्यार्थी हेच आपले दैवत आहे आणि कॉलेज हेच आपले मंदीर आहे’ अशा भाबड्या विश्‍वासावर निमूटपणे आपल्या व आपल्या परिवाराच्या पोटाचे लचके तोडून संस्थाचालक, संचालक व प्राचार्य मजा मारत असल्याचे पाहत राहतात.

अशा ठिकाणी कोणी प्राध्यापक बंड करून संस्थेविरुद्ध उभा राहिला तर त्याला नामशेष करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करायला संस्था मागे-पुढे पाहत नाही. मग त्या प्राध्यापकाने संस्थेसाठी जीवाचे रान केले असेल तरी त्याची पर्वा केली जात नाही. हे बंड यशस्वी करण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा व वेळ प्राध्यापकाकडे नसतो आणि विद्यापीठ, DTE, AICTE, समाजकल्याण, शिक्षणशुल्क, पोलीस अशा शासकीय संस्थांना बाई, बाटली आणि पाकिटात कसे उतरवायचे यात आता तरबेज झाले असल्यामुळे संस्थाचालक मुजोर झाले आहेत.

अशाच राक्षसी मानसिकतेच्या संस्था जर शिक्षणक्षेत्राचे प्रतिनिधित्व करत राहिल्या तर भविष्यात येणारी प्राध्यापकांच्या पुढच्या पिढीमध्ये चांगले प्राध्यापक येण्याची शक्यता जवळपास संपली असून फक्त मान, मेंदू आणि मणका नसलेली गांडुळांची पिढी शिल्लक असेल यात किमान मला तरी शंका नाही.

सन 2020 मध्ये भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर असताना, देशात सर्वात जास्त युवांची संख्या असताना त्यांच्या भविष्याला दिशा देणारा प्राध्यापक मात्र दिशाहीन झाला आहे. शिक्षकासारखा पवित्र आणि उच्च मूल्यांवर आधारित पेशादेखील आता आपल्या अंतिम मरणकळा सोसत आहे.

(साप्ताहिक चपराक)

प्रा. अनिकेत पाटील
चलभाष 7507207645

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

8 Thoughts to “आत्महत्येचा बॉंडपेपर”

  1. Gumpha kokate

    भयानक वास्तव

  2. sunil jawanjal

    अनिकेत पाटील जी आपण केवळ पुण्यातीलच प्राध्यापकांची ची स्थिती मांडली नाही तर महाराष्ट्रातील असंख्य विना अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापकांची होणारी पिळवणूक मांडली आहे .असंख्य प्राध्यापकांचे जगणंच जिरवणार यांची मस्ती कधी जेवणार हा प्रश्न मात्र निरुत्तर आहे.

    1. Dr.Reshma Azad Patil

      अगदी बरोबर

  3. Sunil Pande

    अतिशय वास्तव आणि भयानक चित्रण . विद्यार्थी आणि पालक याचा विचार करत नाही कधी .

  4. Vinod. S. Panchbhai

    एक विदारक वास्तव…
    खूप अंतर्मुख करणारा लेख.

  5. Vishal Pawar

    अगदी नावा प्रमाणेच चपराक दिली आहे. एक प्राध्यापक लेखक या नात्याने या विषयी काही लिहिलं…….तर माझ्याही नोकरीवर गदा येऊ शकते…..!!

  6. Dr.Reshma Azad Patil

    भयावह वास्तव

  7. Pradip Pisal-Patil

    विद्यार्थ्यांकडून fees मात्र टाईम to टाईम घेतात….फी नाही भरली तर पोरांना कॉलेज मधे घेत नाहीत…..मग teachers चा पगार का देत नाहीत वेळेत ?……या संस्थाचालकांना फटके दिले पाहिजेत ???

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा