शरद जोशींची दुसरी बाजू!

शरद जोशींची दुसरी बाजू!

Share this post on:

‘शरद जोशी-शोध अस्वस्थ कल्लोळाचा!’ हे वसुंधरा काशीकर-भागवत यांनी लिहिलेले शरद जोशींच्या 17/18 वर्षांच्या सहवासात त्यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारे पुस्तक आहे. शरद जोशींच्या आयुष्याची दुसरी बाजू जी समाजासमोर कधीही आली नाही, ती आपणास काशीकरांच्या लिखाणातून वाचायला मिळते.

युनोतली प्रतिष्ठेची, पैशांची, सुखासीन नोकरी. युरोपातील सुसंस्कृत, समृद्ध, सुखी आयुष्य. ज्यात निश्‍चितता आहे, सुरक्षितता आहे ती सोडून दोन मुली, बायको सगळ्यांना घेऊन भारतात आले. केवळ भारतातल्या शेतकर्‍याचा विचार मनात घेऊन. महाराष्ट्रात येऊन कोरडवाहू शेती करायची. शेतकर्‍याच्या दारिद्य्राची कारणे शोधून उपाययोजना करावयाची. त्यासाठीच जमीन घ्यावयाची. अनेकांनी त्यांना वेड्यात काढावे अशीच परिस्थिती होती.

एक ब्राह्मण माणूस शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर काय काम करणार? प्रश्‍न कसे सोडवणार? इथपासून ते समाज शरद जोशींना स्वीकारेल का? असे अनेक प्रश्‍न होते पण तेच शरद जोशी शेतकरी योद्धे म्हणून आपल्यासमोर आहेत.

शरद जोशींनी कारखानदार आणि शेतकर्‍यांचं गणित मांडलं. एका दाण्याचे हजारो दाणे पिकवणारा शेतकरी गरीब… लोखंडात वाढ न करणारा कारखानदार मात्र श्रीमंत? शेतकर्‍याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्याला सरकारी धोरण कारणीभूत आहे. त्यामुळेच आपला शेतकरी दरिद्री आहे ह्या निष्कर्षावर ते आले. जोशींनी शेतकर्‍याला खर्‍याअर्थाने जागं केलं. शेतकरी अर्थसाक्षर झाला. उत्पादनखर्च काढू लागला. शेतीमालाला रास्त भावाची मागणी करु लागला आणि भाव ठरवण्याच्या पद्धतीला आव्हानही देऊ लागला.

शेतकर्‍याला सत्तेविरूद्ध उभे राहण्यासाठी धैर्य दिलं. शेतकर्‍यांचे दबावगट तयार केले. ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ अशी घोषणा दिली. शेतकर्‍याला स्वाभिमान दिला. आत्मसन्मान जागृत केला.

शरद जोशींच्या आयुष्याची दुसरी बाजू जी आपल्यासमोर कधी आलीच नाही, ती वसुंधरा काशीकरांनी आपल्या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली आहे. शेतकर्‍यांचा हा खंबीर नेता… एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आतून किती हळूवार-संवेदनशील होता, एकाकी होता हे वसुंधरा काशीकर-भागवतांच्या लिखाणातून सतत जाणवत राहते. पुस्तकातील 18 प्रकरणातून अर्थातच संवादातून हे सारं आपणास मिळतं. शरद जोशींच्या पहिल्या भेटीपासून ते अखेरपर्यंतच्या भेटीपर्यंतचे अनेक प्रसंग पुस्तकात आहेत.

लीलाकाकू, गझल गायन, बडनेरा रेल्वे स्टेशन, नर्मदा परिक्रमा, पुस्तकं आणि शरद जोशी, लक्ष्मी मुक्ती अशा प्रकरणातून कधीही व्यक्त न झालेले जोशी बघायला मिळतात. लीलाकाकू अर्थातच त्यांच्या पत्नीचे त्यांना खूप कौतुक होते. त्यांचा विषय निघाला की ते खूप हळवे होत होते. आज ती असती तर बच्चु, (लेखिकेला लाडाने ते बच्चु म्हणत) मी काही केलं नसतं. खुर्चीत बसून पुस्तके वाचली असती. त्यांच्या आठवणीने दुःखी होत, स्वतःवरच चिडत. अक्षरशः लहान मुलासारखे हुंदके देत. पत्नीच्या निधनानंतर प्रचंड एकटेपणा त्यांच्या आयुष्यात आला होता. एकप्रकारे त्यांचं संवादाचं माध्यमच हरवलं होतं. पत्नीवर त्यांचं उत्कट प्रेम होतं. 2002 सालातली गोष्ट. 22 वर्षापूर्वी वर्धा येथे जाताना पत्नीसमवेत एका टपरीवर चहा घेतला होता. आजही त्यांना पत्नीच्या आठवणीत चहा घेण्याची इच्छा झाली. खूप शोधूनही टपरी सापडली नाही. अजूनही ती आठवण त्यांच्या मनात घर करून होती… किती उत्कटतेनं दोघं आयुष्य जगले ते ह्या प्रसंगावरून दिसते.

लेखिकेने शरद जोशींना, ‘‘तुम्ही नर्मदा परिक्रमा का करत आहात?’’ असा प्रश्न विचारल्यावर त्यावर त्यांचे उत्तर असे होते, ‘‘संघटना पुढे न्यायची तर तब्येत चांगली हवी. नर्मदापरिक्रमा करुन मी नवं शरीर, नवी ताकद घेऊन परत येणार आहे. नर्मदा परिक्रमा पूर्ण होताच नर्मदा तुमच्यासमोर येते, तुमची इच्छा विचारते.’’

लेखिकेनी जोशींना विचारले, ‘‘समजा नर्मदा तुमच्यासमोर आली आणि तुम्हाला विचारले, की तुला काय पाहिजे? तर तुम्ही काय मागाल?’’

जोशींनी क्षणार्धात उत्तर दिलं, ‘‘मी कम्युनिकेशनसाठी माणूस मागेन.’’

समृध्द, श्रीमंत संवादासाठी ते भुकेले होते. बडनेरा रेल्वे स्टेशनवर माझी व शरद जोशींची भेट झाली होती. माझी त्यांची ओळख लेखिकेने करुन दिली. मी बँकेत वि. वसुली अधिकारी म्हणून काम करत होतो. जोशींनी अक्षरशः मला मिठी मारली. आपण दोन टोकं. काही हरकत नाही. म्हणाले… ‘‘देशपांडे साहेब, आमचा शेतकरी गरीब आहे. कर्जवसुली करताना फार कठोरपणाने नका करत जाऊ. सहानुभूतीने घेत जा!’’ आणि मग बर्‍याच मुद्यावर त्यांना व मलाही बोलायचे होते. गाडीचा भोंगा वाजल्याने नाइलाज झाला. शेतकर्‍यावरचे जबरदस्त प्रेम त्यांच्या बोलण्यात दिसून आले.

शरद जोशींची ग्रंथसंपदा विपूल आहे. ‘अंगारमळा’, ‘जग बदलवणारी पुस्तके,’ ‘अन्वयार्थ 1 आणि 2’ ही पुस्तके आपणास माहीत आहेतच.

वसुंधरा काशीकरांच्या लिखाणास भावनेचा स्पर्श झाला आहे. ओघवत्या लेखानशैलीमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. मनाला भिडते. अनेक प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी तरळते. शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा माणूस किती संवेदनशील, हळवा होता हे अनेक प्रसंगातून वाचायला मिळते.

एक तर शरद जोशी यांच्यासारखी माणसं कोणाजवळ व्यक्त होत नव्हती. व्यक्तिगत संवाद साधत नव्हती. शेतकर्‍यांसाठीच त्यांचं आयुष्य समर्पित होतं परंतु लेखिकेवरच्या त्यांच्या पितृवत प्रेमापोटी ते वसुंधरा काशीकरांजवळ व्यक्त झाले आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ते अचूक टिपून आपल्या लिखाणात मांडले. हेच ह्या पुस्तकाचे यश आहे. नाहीतर शरद जोशींची दुसरी बाजू आपणा सर्वांना समजली नसती. शरद जोशी समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
दिलीप देशपांडे
जामनेर, जि. जळगाव
9960365201

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!