कॉंग्रेसला ‘लकवा’ तर ‘घड्याळाची’ ‘चार्जिंग डाऊन’

कॉंग्रेसला ‘लकवा’ तर 'घड्याळाची' ‘चार्जिंग डाऊन’

सध्या महाराष्ट्रात पक्षनिष्ठा आणि घराणेशाहीवरुन मोठी रंगतदार चर्चा सुरु आहे. गल्ली-बोळातील सोम्या-गोम्यापासून ते अगदी विचारवंतांपर्यंत सगळेच निष्ठेच्या आणि घराणेशाहीच्या विरोधात बोलताना दिसत आहेत! मात्र असं असलं तरी दुसरी बाजू कोणीही पहायला तयार नाही. समाजात राजकारण सोडून इतर असे अनेक व्यवसाय आहेत की जिथे घराणेशाहीच चालते. उदाहरणार्थ डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, वकीलाचा मुलगा वकील, क्रिक्रेटरचा मुलगा क्रिकेटर, सनदी अधिकार्‍याचा मुलगा सनदी अधिकारी आपल्याला चालतात; मात्र राजकारण्याच्या मुलाबाबत घराणेशाहीचा आरोप होताना पहायला मिळतो. अर्थात कोणत्याही राजकारण्यांचे समर्थन करण्याचा हेतू नाही मात्र स्वतःला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा न्याय काय कामाचा?

सध्या सुजय विखे-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राज्याच्या राजकारणात मोठा गहजब माजलाय. याला कारणही तसेच आहे. कारण यातल्या एकाचे वडील हे विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत तर दुसर्‍याचे वडील राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे खासदार आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला मॅसेज ट्वीट करुन आपला त्रागा व्यक्त केलाय. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, ‘राज्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापली मुलं सांभाळा.’

हे ट्वीट उपहासात्मक असले तरी त्यातून भाजपवरील राग स्पष्ट दिसून येतोय. मात्र अस असलं तरी आव्हाड यांचा इतिहास थोडा कच्चा आहे असेच म्हणावे लागेल. कारण हा मुलं पळवण्याचा प्रकार काही आजचा नाही. त्यांच्याच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजवर राज्यातील किती जणांची पळवापळवी केली याचा धांडोळा घ्यायला हवा होता. 2014 साली खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार असलेल्या आनंद परांजपे यांचा प्रचार केला ते कोणत्या पक्षातून पळवून आणले होते? राष्ट्रवादीचे फायरब्रॅण्ड नेते छगन भुजबळ हे कोणत्या पक्षातून आयात केले होते? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले धनूभाऊ मुंडे कोणत्या पक्षातून पळवलेत? खरं तर अशी भलीमोठी यादी तयार होऊ शकते, मात्र विषयांतर नको…

महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पक्षातील नेत्यांच्या पळवापळवीचा आणि त्याचा मतदारांवर होणारा परिणाम. त्याबाबतीत सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कमालीचा हैराण झालेला आहे. राजकारण करताना साम, दाम, दंड या सर्वांचा वापर करुन शह-काटशह दिले जातात. त्यामुळे माझा नेता पळवला हे कारण सांगणे म्हणजे अपयशाचा स्वीकार करणे होय. या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची मानसिकता सध्या काहीसी अशीच दिसतेय.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र जनसामान्यांतून होणारा विरोध पाहता त्यांनी काढता पाय घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे राज्यभरातील मतदारांना जो संदेश गेला तो पराभूत मानसिकतेचाच. सामान्य मतदार हा आपले मत वाया जाणार नाही याचा विचार करतो. त्यामुळे पवारांच्या या निर्णयाचा परिणाम राज्यभरातील मतदारांवर निश्‍चितपणे होणार. तर तिकडे मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी देणार नाही, असे खुद्द पवारांनीच जाहीर केले असताना परिस्थिती मात्र वेगळी दिसली. शरद पवार हे राजकारणातले चाणक्य समजले जातात मात्र त्यांनाच आपल्या निर्णयावरुन माघार घ्यावी लागली. पवारांच्या राजकारणातली ही बहुदा पहिलीच वेळ असावी.

तर दुसरीकडे कॉंग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदी स्पष्ट होतेय. अशोक चव्हाण म्हणाले, ‘माझे पक्षात कोणीच ऐकत नाही. त्यामुळे मीच पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या विचारात आहे.’ जर राज्यातील विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील नेत्याची ही मानसिकता असेल तर राज्यातील कार्यकर्त्यांसह मतदारांची काय मानसिकता होईल हे वेगळं सांगायला नको.

राहता राहिला विखे आणि मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा. याबाबतीतही दोन्ही कॉंग्रेस सपशेल अपयशी ठरलेत. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याचा मुलगा जर भाजपात जात असेल तर तुमच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्ट होतो. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसने पक्षातील संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. केवळ मोदी, शहा, भाजप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने यशप्राप्ती होईल हा खुळचट आशावाद विरोधी पक्षांनी सोडावा कारण कार्यकर्त्यांच्या हाताला बळकटी दिल्याशिवाय आणि कार्यकर्त्यांना चार्ज केल्याशिवाय कोणतेही रणांगण जिंकणे अशक्यप्रायच आहे.
– सागर सुरवसे
पत्रकार, सोलापूर
९७६९१७९८२३

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा