गृहस्थी आणि गृहिणी

गृहस्थी आणि गृहिणी

स्त्री आणि स्वयंपाकघर यांचं एक अतुट नातं आहे. मला जर तुम्ही विचारलं, ‘‘घरातील सर्वात आवडती जागा कोणती?’’ तर मी उत्तर देईन ‘‘स्वयंपाकघर!’’

याला कारणही तसंच आहे. घरातल्या दुसर्‍या खोल्या या विभागुन घ्याव्या लागतात. प्रत्येकाची आवड आणि निवड याला अनुसरुन मांडणी व आखणी करावी लागते पण इथं मात्र साम्राज्य माझं असतं. हुकमत माझी असते, अधिकारही माझा असतो. कुठे कायपासून, कुठे कधीपर्यंत, मुशाफिरी निर्विवाद आपलीच असते. या खोलीतले खजाने, शोध, प्रयोग सार्‍याला ‘मी’चा स्पर्श असतो. या स्पर्शातली जादु कुटुंबाला बांधून ठेवते. दिवस उजाडताना पावलं आपोआप या खोलीकडे वळतात. सुव्यवस्थित, नीटनेटकं लावलेलं ते आपलंच साम्राज्य आपल्याला उभारी देतं. डीप-डीपपेक्षा सोनेरी चहाचा उकळता स्वाद दिवसभरासाठी मन ताजतवानं करतो.

हं, आता कधीतरी तिथे फार रेंगाळायला मन का-कू करतं पण ते तेवढ्यापुरतंच. ते उठवळ क्षण हळूच कुठल्याकुठे पसार होतात आणि मन परत त्या खोलीत घुटमळतं. कुटुंब पोषणाचा स्वादिष्ट मार्ग तिथुनच सुरु होतो ना? स्वयंपाकघरावरुन नजर फिरवताना लक्षात येतं, अनेक धातुंची, अनेक आकारांची चित्रविचित्र भांडी इथं गळ्यात गळे घालून सुखेनैव नांदतायत. निरनिराळ्या रंगाची सरमिसळ अनेक व्यंजनातून होत असते. काळ्या मोहोरीपासून पांढर्‍या मिठापर्यंत प्रत्येक रंग आपली आब राखून असतो. हिरव्या पालेभाजीपासून ते पिवळ्या धम्मक गुळापर्यंत. कशाचं काय करता येईल हा निर्णय तिचा असतो.

कुटुंबाची भूक भागवताना तिला त्यांचं स्वास्थ्यही पहावं लागतं. डाएट नावाचा बागुलबुवाही लिलया सांभाळावा लागतो. कधी डॉ. दीक्षित तर कधी दिवेकर, यांच्यातल्या लढाईचा सामना करावा लागतो. मधली वेळ, जेवणाचा डबा, पाहुण्यांसाठी खास पास्ता आणि पित्झा! करावं ते कमीच! पण हे सारं करताना मन मात्र खुशीत असतं. कष्टाची पुसटशी जाणीव होते, पण ती तिच्याकडून केव्हाच मनाआड होते. वर्तमान आणि भुत याची तुलना तिच्याकडून मधुनमधुन होते पण मग वर्तमान बरा म्हणायची वेळ येते. पूर्वी स्वयंपाक जिकीरीचा होता. कोळसे, स्टोव्ह, कुटुंबाचा वाढता घेर. स्वयंपाक सुकर करण्याची सुमार साधनं पण चव मात्र अप्रतिम असायची. आता कुटुंब मिनी, अत्याधुनिक साधनं, देशी आणि विदेशी चवीचे भारंभार प्रकार…

आजकाल तिला ही रोजची नवी स्पर्धा वाटते. नियमही बदलते झालेत. ज्याला जेव्हा जसं वाटेल तसा तो येतो आणि अन्नाचा आस्वाद घेतो आणि तरीही ती मात्र आनंदी आहे. तिच्या त्या इवल्याशा जागेतलं साम्राज्य नवनिर्मितीत तितकंच गुंग आहे. सकाळपासून तिची ही प्रयोगशाळा निरनिराळ्या सुवासांनी भरुन जाते. सलाडपासून बिर्याणीपर्यंत आणि शंकरपाळीपासून रसमलाईपर्यंत सारेच इथे गुण्यागोविंदाने दोस्ती करतात. स्वाद आस्वादाची ही दुनिया.

ही तिची निर्मिती असते. निर्माताही तीच आणि दिग्दर्शकही तीच. आंबेमोहराचा वाफाळता भात, पिवळं धम्मक वरण, वर साजुक तुपाची धार !आहाऽऽ स्वर्ग अजून वेगळा असतो का? पण विरोधाभास किती ना संसारातला? हे सगळे तोल त्या गृहिणीने सांभाळायचे, तोलायचे आणि जग मात्र त्याला गृहस्थी म्हणून संबोधते.
-नीता जयवंत
अंबरनाथ, 9637749790

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा