मराठी ही सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांत जगात दहाव्या क्रमांकार आहे. असे असतानाही आपल्याकडे ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असं सातत्यानं सर्व माध्यमांतून सांगितलं जातं. भाषा नष्ट होतेय का? याबाबतची चर्चा आपल्यासाठी नवीन नाही. यापूर्वी शंभरहून अधिक वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 1908 साली पुण्यात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता, ‘मराठी भाषा मृतावस्थेला जाते आहे काय?’ या परिसंवादाचे अध्यक्ष होते इतिहासाचार्य वि. का. राजवाडे.
सर्व मान्यवरांनी भाषेच्या अस्तित्वाबद्दल गंभीरपणे चर्चा केली. त्यानंतर राजवाडे अध्यक्षीय भाषणाला बोलायला उभे राहिले. त्यांनी सांगितलं,
‘‘अरे, भाषा मृतावस्थेला गेलीय का, यावर चर्चा कसली करताय? जर भाषा संपली असेल तर आत्ता ही सभा थांबवा. ओंकारेश्वरच्या घाटावर चला आणि ‘भाषेवर’ अत्यंसंस्कार करा. ती मेली म्हणून जाहीर करा आणि पुढच्या कामाला लागा! आणि असे जर नसेल, आपल्या मायमराठीत थोडी जरी धुगधुगी शिल्लक असेल, तिचे संस्काराचे दूध आपण प्यायला असाल तर तिच्यात नव्याने प्राण फुंका. ती सुदृढ होईल यासाठी प्रयत्न करा. आपली भाषा वांझ नाही. तिची लेकरं म्हणून आपण हे जोरकसपणे करायला हवे…’’
दुर्दैवाने आजही आपल्याकडे भाषेच्या अस्तित्वावरून चर्चा झडतात. भाषा संपत चाललीय हे सांगणारे कमी नाहीत पण ती जगावी, वाढावी यासाठी कितीजण प्रामाणिक प्रयत्न करतात? ही सर्व नकारात्मकता बघून आम्ही ‘चपराक प्रकाशन’तर्फे पुढाकार घेतला आणि येत्या आर्थिक वर्षात रोज एक याप्रमाणे वर्षभरात 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा घाट घातला आहे. आमच्या या प्रकल्पाला मराठी वाचक, लेखक, विक्रेते यांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हजारो प्रतींची आवृत्ती काही दिवसात संपण्याचे भाग्य आमच्या लेखकांच्या पुस्तकांना लाभत आहे. अशाच आम्ही प्रकाशित करत असलेल्या पुस्तकांपैकी दर आठवड्याला एका पुस्तकावर, त्या लेखकांवर, आम्ही करत असलेल्या नवनवीन प्रयोगावर मी प्रकाशक या नात्याने या सदरात लिहिणार आहे.
27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त राजधानी मुंबईत ‘ब्राह्मण उद्योजक परिषद’ झाली. त्यात जगभरातले यशस्वी उद्योजक सहभागी झाले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभूदेसाई, वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम स्वित्झर्लंडचे अध्यक्ष योगेश जोशी, आयोजक भालचंद्र कुलकर्णी, गोविंद हर्डीकर, संजय ओर्पे असे मान्यवर सहभागी होते. या उद्योजक परिषदेत सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ हे राजकारणावर भाष्य करणारे महत्त्वपूर्ण पुस्तक आणि सुनील जवंजाळ यांच्या अल्पावधीत वाचकप्रिय ठरलेल्या ‘काळीजकाटा’ कादंबरीच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
भाऊ तोरसेकर म्हणजे मराठीतील एक अजब रसायन. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’तून त्यांच्या पत्रकारितेची सुरूवात झाली. गेली पन्नास वर्षे सातत्याने विविध विषयांवर परखड भाष्य केल्याने त्यांना अफाट वाचकप्रियता मिळाली. त्यांच्या ब्लॉगला थोडेथोडके नव्हे तर एक कोटी दहा लाख वाचक आहेत. सर्व भारतीय भाषांत हा अनोखा विक्रमच ठरावा. भाऊंनी आजवर जे राजकीय, सामाजिक भाष्य केले ते तंतोतंत कसे घडते हे आजवर अनेकवेळा दिसून आले आहे. त्यांनी 2013 ला ‘नरेंद्र मोदी सत्तेत येणार’ हे पुस्तक लिहून सांगितले, त्यावेळी त्यांची यथेच्छ टिंगळ-टवाळी करण्यात आली. 2014 ला मोदी बहुमताने आले तेव्हा मात्र सगळ्यांची बोलती बंद झाली. अगदी आत्ताआत्ताचे उदाहरण बघा. पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी फेसबुकला अधिकृत पोस्टच टाकली होती की, ‘कुछ तो धमाका होने वाला है. ही कारवाई सर्जिकल स्ट्राईक किंवा पाकव्याप्त काश्मीरातही नसेल. नियंत्रण रेषेनजिकच्या भागातील नसेल, तर मुळच्या पाकिस्तानातील भूमीत काही घडू शकेल. बलुचिस्तान, कराची, इस्लामाबाद वा लाहोर हे लक्ष्य असेल का?’ भाऊंनी हे लिहिल्यानंतर अवघ्या आठ दिवसात आपल्या सैन्य दलाने पाक अतिरेक्यांना घरात घुसून मारले.
भाऊ तोरेसकरांनी आजवर राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय विषयांवर तटस्थपणे जे लेखन केले त्यामुळे वाचकांना नवी दृष्टी मिळाली आहे. त्यासाठी ते साधी-सोपी भाषा वापरतात, रोजच्या जीवनातील उदाहरणे देतात. राज्यशास्त्राचे प्राध्यापक नसल्याने त्यांचा कोणत्याही घटनेकडे सामान्य माणसाच्या नजरेतून पाहण्याचा आवाका मोठा आहे. जीवनाच्या विद्यापीठातील त्यांचे अनुभवविश्व व्यापक आहे. म्हणूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ते अमित शहा अशा सर्वांना त्यांची दखल घेणे भाग पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आहे. मात्र स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्या टोळक्यातील बहुतेकजण भाऊंचे लेखन न वाचताच त्यांच्यावर ‘भक्ताचा’ शिक्का मारतात. खरेतर मोदींना पराभूत करायचे असेल तर भाऊंनी दिलेल्या क्लृप्त्या उघड्या डोळ्यांनी पाहणे, समजून घेणे अत्यावश्यक आहे. तसे न करता भाऊ मोदीच कसे निवडून येतील हे सांगतात म्हणून त्यांच्याकडे द्वेषाने पाहणारे कमी नाहीत. भाऊ मात्र त्यांच्या पद्धतीने जागल्याची भूमिका खमकेपणाने पार पाडत आहेत आणि सामान्य माणूस त्यांच्या लेखनावर भरभरून प्रेम करतो आहे.
भाऊ म्हणतात, तुम्हाला मोदी समजून घ्यायचा असेल तर आधी इंदिरा समजून घ्या! म्हणूनच 1964 ते 2014 असा पन्नास वर्षांचा व्यापक राजकीय पट त्यांनी नेमकेपणे मांडला आहे. 2014 ला मोदींना भरभरून यश कसे मिळाले? कॉंग्रेसमुक्त भाजपचा त्यांचा नेमका अजेंडा काय आहे? आजही त्यांची लोकप्रियता कशी टिकून आहे? उंच झोका घेतल्यानंतर तो अधांतरी असताना नेमके काय घडते? एक सत्ता उलटवून लावताना दुसरी कशी पुढे येते? आज कॉंग्रेस संपली असे म्हणताना भाजपाचे तरी खरे अस्तित्व टिकून आहे का? की आजचा भाजप म्हणजे जुना कॉंग्रेस झालाय?, आपल्याकडचे अनेक तथाकथित बुद्धिमंत, विचारवंत, विविध विचारांचे राजकीय पक्ष, आघाड्या इतक्या हतबल का झाल्यात? बहुतेक सेवाभावी संस्था मोदींवर का तुटून पडतात? आजच असहिष्णुता वाढल्याची जाणीव यांना कशी झाली? मोदींनी नेमक्या कुणाच्या नाड्या बांधल्या? प्रस्थापित म्हणून जे कोणी मिरवणारे आहेत त्यांना मोदी हुकूमशहा वाटत असताना सामान्य माणूस मात्र मोदींना उद्धारक, प्रेषित अथवा देवदूत का मानतो? या सर्वाची तटस्थपणे चिकित्सा होणे गरजेचे आहे आणि भाऊंनी ती त्यांच्या लेखनाद्वारे केलीय.
भावी पंतप्रधानाची चर्चा, लोकप्रिय नेता आणि पक्ष, भाजपा आणि मोदी, मोदीनु गुजरात, राष्ट्रीय नेत्याची लोकप्रियता, स्वप्नांवर स्वार होणारे नेतृत्व, आरंभ काळातल्या इंदिराजी, धूर्त इंदिराजी आणि भोळसट पुरोगामी, मतविभागणीचा सिद्धांतच बाबासाहेबांचा, आघाडीच्या राजकारणातले अराजक, कॉंग्रेसमधील पहिला दुभंग, सतत मत बदलणारा मतदार, फक्त चार टक्के मतांची लाट, इंदिरा हटाव-मोदी हटाव, नितीश गेल्याने भाजपा खूश होतो?, चार दशकानंतर पहिल्या राजकीय पर्यायाचा उदय, मतदाराचा शोध चालू होता आणि मोदींच्या नेतृत्वाचे आकलन अशा प्रकरणांद्वारे भाऊंनी या पुस्तकात मांडणी केली आहे.
इंदिरा गांधी यांच्यापासून खर्याअर्थाने आपल्याकडे व्यक्तीकेंद्री राजकारण सुरू झाले आणि आज इतक्या वर्षांनीही मोदींच्या रूपाने ते सुरूच आहे. हे चांगले की वाईट यावर मतमतांतरे असू शकतात, पण कॉंग्रेसला मागे टाकत मोदींनी जे घवघवीत यश मिळवले त्यातून आपण काहीतरी बोध घ्यायला हवा. मोदी हे देखील काही अमरपट्टा घेऊन जन्माला आले नाहीत. लोककवी मनमोहनांच्या भाषेत सांगायचे झाले तर,
‘एके दिवशी अत्रे जातील,
दुसरे दिवशी पित्रे रडतील!
आणि कुणीसा नवा विदुषक,
पुन्हा जगाची बगल खाजविल!’
त्यामुळे आज मोदी लाट असली तरी उद्या यांनाही मागे टाकणारा आणखी कोणी नक्कीच येणार आहे. 2014 पूर्वी नरेंद्र मोदी नावाचा कोणी नेता देशाचे राजकारण अशा पद्धतीने ढवळून काढेल असे कोणी सांगितले असते तर त्यावर कोणीतरी विश्वास ठेवला असता का? पण राजकारणात असे घडते. ‘असे घडते’ ही आशाच प्रत्येकाला कार्यरत ठेवते.
गेल्या पन्नास वर्षात आपल्या देशाच्या राजकारणात असे जे काही ‘घडले’ ते निकोप वृत्तीने आणि निर्मळ दृष्टीने मांडण्याचे काम भाऊ तोरसेकर यांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. त्यामुळेच आपल्याकडील सर्वपक्षीय राजकारणी नेते, कार्यकर्ते, पत्रकार, राजकारणाचे अभ्यासक, चिकित्सक वाचक अशा सर्वांना हे पुस्तक स्वतःचे आकलन शोधायला मदत करणारे आहे.
पुस्तकी व्याख्यातले राजकारण आणि विविध टप्प्यांवर बदलणारे राजकारण, प्रत्यक्ष जीवनात सामान्य माणसाला अनुभवावे लागणारे राजकारण या सर्वांत कमालीचा फरक असतो. जे पुस्तकी निष्कर्षांवर आपली मते ठासून मांडत असतात ते बहुतेकजण कायम तोंडघशी पडत असतात. त्यांना पोपटपंची करण्याशिवाय कोणत्याही समस्येवर उपाय शोधता येत नाहीत. त्यांच्या व्याख्या, गृहीते व समजूतींना उद्ध्वस्त करायचे झाले तर त्या परिवाराबाहेरील कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. असा पुढाकार घेणारा कुणी नेता पुढे आला तर सामान्य माणूस त्याच्यासाठी पायघड्या घालतो. मोदींनी नेमके हेच हेरले आणि आज ते जगाच्या केंद्रस्थानी आहेत.
इंदिरा गांधी यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू नक्की कोणता होता? त्यांनी विरोधकांना आणि स्वपक्षातील ज्येष्ठांना कशाप्रकारे रोखले? गेल्या पन्नास वर्षात विविध राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची काय भूमिका होती? ज्याला आपण ‘मायक्रो पॉलिटिक्स’ म्हणतो ते नेमके काय असते? आजवरच्या सत्ताधार्यांची मक्तेदारी झुगारून देत मोदी या लाटेवर कसे स्वार झाले? देशहिताच्या दृष्टिने नेमके ते काय करत आहेत? काय करू शकतील? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. ही चिकित्सा काही प्रमाणात का होईना शमवण्याचे आणि वाचकांना एक वेगळी दृष्टी देण्याचे काम हे पुस्तक करते. म्हणूनच ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ हे पुस्तक वाचणे अगत्याचे आहे. त्यातही भाऊंची भाषा प्राध्यापकी ढंगाची नाही. सोपेपणा हा त्यांच्या लेखनाचा आत्मा आहे. त्यामुळे सर्वप्रकारच्या वाचकांना हे पुस्तक सहजपणे समजून घेता येते.
‘चपराक’ने पुस्तकांच्या विक्रीचे अनेक विक्रमी उच्चांक केले आहेत. 14 फेब्रुवारी 2019 ला या पुस्तकाची घोषणा केली आणि प्रकाशनाच्या दिवसापर्यंत म्हणजे 27 फे्रबुवारी पर्यंत या पुस्तकाच्या 1163 पुस्तकांची नोंदणी आमच्याकडे झाली. भाऊंची वाचकप्रियता पाहता त्यांच्या चाहत्यांसाठी यानिमित्त एक खास योजना जाहीर करत आहोत. येत्या 10 मार्च 2019 पर्यंत हे पुस्तक आमच्याकडून मागवणार्यांना त्यांच्या सहीसह ते घरपोच पाठवले जाईल.
तुमची प्रत आजच सुनिश्चित करा. भाऊ तोरसेकर लिखित ‘अर्धशतकातला अधांतर’ पुस्तकाची नोंदणी करून हे पुस्तक ऑनलाईन विकत घ्या.
भाऊ तोरसेकर यांचा जबरदस्त चाहता वर्ग, त्यांची तटस्थ आणि परखड भूमिका, या विषयाचे गांभीर्य आणि ‘चपराक’ची प्रभावी वितरण व्यवस्था यामुळे पुढच्या तीन महिन्यात किमान पंचवीस हजार प्रती वाचकांपर्यंत पोहचतील याची आम्हाला खात्री आहे.
(पूर्वप्रसिद्धी – दैनिक ‘सुराज्य’, सोलापूर.)
४ मार्च २०१९
– घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
मोदी समजून घ्यायचा असेल तर नक्कीच इंदिरा पासून चा काळ समजून घेणे गरजेचे आहे .भाऊ तोरसेकर यांच्या अप्रतिम पुस्तकाचे परिक्षण खूपच छान शब्दात आदरणीय पाटील सरांनी केले आहे.
खूपच मोजक्या आणि नेमक्या शब्दांत भाऊ तोरसेकर यांनी लेखन केलंय आणि या पुस्तकाचा परिचयसुद्धा तितक्याच सहजसुंदर शब्दातून करून दिलाय..! मस्तच.
@शशी त्रिभुवन, अस्तगाव
सुंदर लेख…
अतिशय ओघवती भाषा..
मनःपूर्वक अभिनंदन.!
या पुस्तकामुळे आमच्या पिढीला राजकारण समजुन घेण्यास मदत होईल।पुस्तक मागवलंय।लवकरच वाचनात येईल।धन्यवाद।
एक कोटी दहा लाख वाचक ही मराठी माणसांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे
सुंदर लेख
खूपच सुंदर मांडणी