नव्या भारताची सुरवात

नव्या भारताची सुरवात

हिंदीमध्ये एक उक्ती आहे, ‘लातो के भूत बातो से नही मानते.’ पाकिस्तान हा जगातला एक देश असा आहे की ज्याला कुठलीच मानवी भाषा कळत नाही. त्याला कंबरेत लाथ किंवा बंदुकीचीच भाषा कळ्त असेल तर त्याच भाषेत त्याच्याशी संवाद करण्याला पर्याय उरत नाही पण प्रश्‍न पाकिस्तानचा असण्यापेक्षाही आपल्याच देशातल्या बुद्धीचे अजिर्ण झालेल्या दिवाळखोरांचा आहे. मागली तीन दशके पाकिस्तान सतत दहशतवाद व जिहादी हिंसेचे हत्यार उपसून भारतात थैमान घालत असतानाही त्याच्याशी संवाद साधावा आणि दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यात भारताने पुढाकार घ्यावा, अशी मुक्ताफळे उधळणारे बुद्धीमंत इथेच बसलेले आहेत. पाकिस्तानने कितीही उच्छाद मांडला तरी त्याच्याशी दोन हात करण्यापेक्षा वाटाघाटी कराव्यात असा त्यांचा कायम आग्रह राहिला आहे पण त्या देशाशी संवाद करायचा तर कुठल्या भाषेत करावा याचे उत्तर यापैकी कोणालाही देता आलेले नाही. म्हणूनच तो संवाद होऊ शकत नव्हता.

उरी व पुलवामाच्या घातपाती घटनांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती भाषा शोधून काढली आहे असे मानायला हरकत नाही कारण ज्या भाषेत संवाद करायचा ती भाषा पाकिस्तानला समजली पाहिजे आणि भारतालाही बोलता यायला हवी ना? उर्दू ही पाकिस्तानची राजभाषा आहे. काही लोक इंग्रजीतही बोलतात. भारताला त्या दोन्ही भाषा अवगत आहेत पण वाटाघाटीला बसायचे तर पाकिस्तान त्या दोन्ही भाषेत बोलत नाही. वाजपेयी असोत किंवा मोदी, त्यांनी तसा प्रयत्न केल्यावर पाकिस्तानने हिंसेने व घातपातानेच उत्तर दिले होते. मग संवाद व्हायचा कसा? तर त्या भाषेचा शोध मोदींनी सुरू केला आणि त्यांना सर्जिकल स्ट्राईक वा हवाई हल्ले अशी भेदक हिंसक भाषा आता सापडलेली आहे आणि पाकिस्तानच नव्हे तर भारताचा आणखी एक शेजारी चीनलाही ती भाषा हळूहळू समजू लागली आहे.

दोन वर्षांपूर्वी उरी येथे पाकिस्तानने प्रायोजित केलेल्या घातपाती संघटनांनी लष्करी तळावर हल्ला केला आणि अनेक सैनिक हकनाक मृत्युमुखी पडले होते. त्याच्याही आधी असे अनेक हल्ले झालेले आहेत आणि मोदी सरकारच्या काळात पठाणकोटचा हल्ला तसाच झालेला होता. असे काही घडले की मग भारतानेही सैनिकी कारवाईतून पाकला चोख उत्तर द्यावे अशी सामान्य भारतीयांची इच्छा असते! पण नुसते तसे कोणी बोलले तरी तात्काळ आपल्याच देशातले विद्वान व बुद्धीमंत दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने युद्धाचा पर्याय असू शकत नसल्याची भीती घालू लागायचे. किंबहुना म्हणूनच कारगिल युद्ध झाले तेव्हा घुसखोर पाकिस्तान्यांना हुसकून लावताना भारताच्या हवाई दलाने युद्धात भाग घेतला तरी साधी नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती. आपल्या हद्दीत राहूनच युद्धही खेळले गेले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अशा प्रकारचे घातपाती हल्ले होत राहिले आणि पाकिस्तानशी संवाद करण्याचे आग्रह चालूच राहिले. अणुयुद्धाची भीती घालण्याचेही डाव चालूच राहिले.

दरम्यान अनेक सरकारे आली आणि गेली. मोदी सरकार त्याला अपवाद ठरले. म्हणून दोन वर्षांपूर्वी आधी हे अणूयुद्धाच्या भीतीचे ओझे मानगुटीवरून उचलून फेकून देण्यात भारत यशस्वी होऊ शकला. उरीच्या घटनेनंतर नेहमीप्रमाणेच सैनिकांचे बलिदान वाया जाणार नाही अशी भाषा इथे भारतात बोलली गेली पण त्यात पाकला दम वाटला नाही. कारण मागल्या तीन दशकात तीच भाषा नेहमी बोलली गेलेली होती. मोदी त्यात कुठलाही बदल करायला धजावणार नाहीत, याची पाकिस्तानी नेते व सेनापतींना खात्री होती. म्हणूनच ते गाफील राहिले आणि पहिलावहिला सर्जिकल स्ट्राईक भारताने केला. त्याचा अर्थ होता नियंत्रण रेषा ओलांडून पाक प्रदेशात घुसून शत्रूला मात देणे. अर्थात त्यामुळे पाकला अक्कल येईल अशी कोणाची अपेक्षा नव्हती.

पाकिस्तान धडा शिकेल वा शहाणा होईल अशी अपेक्षाच मूर्खपणाची आहे. त्यांना सभ्यपणाची वा समजूतदार भाषाच समजत नसेल तर कंबरड्यात लाथ घालण्यालाही पर्याय नव्हता. सर्जिकल स्ट्राईक ही त्याची सुरूवात होती. तो अंतिम उपाय नव्हता पण इथले विरोधी पक्ष व दीडशहाण्यांना दीर्घकालीन युद्ध वा रणनीती यातला मूलभूत फरक कुठे समजतो? म्हणूनच अशा दिवट्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यापर्यंत दिवाळखोरी केलीच. कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने फर्जिकल स्ट्राईक अशी टिंगलही केलेली होती. कुठल्या एका प्रचारसभेत मोदींनी 56 इंची छातीचा उल्लेख केला होता, तो संदर्भ घेऊन उठसूट आपल्याच पंतप्रधानाची टवाळी करण्यातच आपले विद्वान रमून गेलेले होते. मग पाकिस्तानने भारताला वा त्याच्या सैन्याला घाबरून आपले उपद्व्याप कशाला थांबवावेत? ते चालूच राहिले आणि पुलवामापर्यंत घटनाक्रम आला. अशा प्रत्येक घातपाती हल्ल्यानंतर पाकमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करणे शक्य नव्हते. तो क्रिकेटचा सामना नव्हे. तुमचा एक डाव खेळल्यावर आमचा एक डाव अशी सुरक्षा व्यवस्था नसते. युद्ध हा शेवटचा उपाय असतो आणि सतत हत्यार उपसण्याने हत्याराची धारही बोथट होत असते, हे पाकिस्तानही ओळखून आहे.

म्हणूनच सर्जिकल स्ट्राईकची भारतातच टवाळी झाल्याने पाक गाफील राहिला. त्याला नवा पंतप्रधान वा नवे भारत सरकार अनुभवातून शिकणारे आहे, याचे भान आले नाही की राहिले नाही. त्यामुळेच सर्जिकल स्ट्राईक अपयशी ठरला तर पुढे पाऊल टाकले जाईल अशी शक्यता वाटली नव्हती. ती अक्कल पाकचे माजी लष्करशहा जनरल परवेज हुशर्रफ यांना होती व आहे. म्हणूनच भारत सर्जिकल स्ट्राईक करू शकतो हे त्यांनी तसा हल्ला होण्यापूर्वीही ओळखले होते आणि कालपरवा पाकिस्तानातला कोणी वाचाळवीर अणुबॉम्बची धमकी देताना ऐकल्यावर त्यांनी तात्काळ त्याचेही कान उपटले होते.

साडेतीन वर्षापूर्वी भारतीय सेनादलाने म्यानमार हद्दीत घुसून उल्फाच्या अतिरेक्यांचा खात्मा केलेला होता, भारतीय सीमा ओलांडून म्यानमारच्या जंगलात ही कारवाई झाली तेव्हा त्या देशाकडून पहिली प्रतिक्रियाही आलेली नव्हती पण त्याच्याआधी मुशर्रफ यांनी पाकिस्तानातून डरकाळी फोडलेली होती. कारण या निवृत्त लष्करशहा सेनापतीला असाच हल्ला नंतर भारतीय सेना पाकिस्तानवर करू शकेल याची रास्त शंका आलेली होती. म्यानमारच्या घटनेनंतर मुशर्रफ यांनी पुढला धोका ओळखला होता व भारताने असले काही पाकिस्तानच्या विरोधात करू नये म्हणून इशाराही दिलेला होता. तेव्हा मुशर्रफ पाकिस्तानचे कोणी अधिकारी वा सत्ताधारी नव्हते, तरीही त्यांनी इशारा दिलेला होता आणि ते म्हणाले होते, आमची अण्वस्त्रे दिवाळीतले फटाके नाहीत. ती अर्थातच पोकळ धमकी होती. त्याचा अर्थ असा होता की भारताने सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानच्या हद्दीत केला तर पाकिस्तान अणुयुद्ध पुकारू शकेल अशी भीती त्यांना घालायची होती पण तसा अण्वस्त्रांचा वापर भारत वा पाक करू शकत नाही हे त्यांनाही पक्के ठाऊक होते.

पण हुलकावणी देण्यापलीकडे त्यांना काही करायचे नव्हते. त्या हुलकावणीला भीक न घालता भारताने उरीनंतर सर्जिकल स्ट्राईक केलाच आणि त्याला पाकिस्तान उत्तरही देऊ शकला नाही. चोख उत्तराचा मुखवटा तेव्हाच गळून पडलेला होता आणि म्हणूनच अणुयुद्धाची पोकळ भाषा कामाची नाही हे मुशर्रफ यांना उमगले होते. यापुढे अणुयुद्ध वा अणुबॉम्बचा धाक घालून भारतीय सेनेला रोखता येणार नाही हे मुशर्रफ यांना समजले असले तरी उथळ इमरानला कसे कळायचे? म्हणून त्याने पुलवामाच्या घटनेनंतर भारतावर हल्ला करण्याचे इशारे दिले आणि पाकच्या काही अर्धवट शहाण्यांनी अण्वस्त्रांचे इशारे दिले, तेव्हा मुशर्रफ यांना सत्य जगासमोर कबूल करण्याची वेळ आली.
बालाकोटच्या हल्ल्यापूर्वी दोन दिवस दुबईत बसलेल्या मुशर्रफ यांनी भारताला इशारे देण्यापेक्षा पाकिस्तानातल्या दिवाळखोरांचे कान उपटले होते. तुम्ही अणुबॉम्बची धमकी देऊन काही फायदा नाही. एक बॉम्ब भारतावर टाकलात तर वीस बॉम्ब तुमच्यावर टाकून भारतीय सेना पाकिस्तानचे नामोनिशाण पुसून टाकू शकेल, त्यापूर्वी भारतावर पन्नास बॉम्ब टाकावे लागतील असा तो इशारा होता. त्याचा अर्थ असा की भारताला युद्धात ओढू नका आणि अणुयुद्धाच्या गमजा करू नका. पाकपाशी तितके युद्ध लढण्यासाठी अणुबॉम्ब नाहीत की युद्धात टिकण्याची क्षमताही नाही असेच मुशर्रफना सांगायचे होते. किरकोळ हल्ले व घातपात करून भारताच्या कळी काढाव्यात, उचापती कराव्यात पण युद्धापर्यंत वेळ येऊ द्यायची नाही असा त्यातला गर्भितार्थ होता.

ती खरेतर भारतासमोर पाकिस्तानी सेना वा युद्धसज्जता टिकू शकत नसल्याची कबुली होती. हे सत्य जितके मुशर्रफना ठाऊक आहे, तितकेच पाकिस्तानच्या विद्यमान सैनिकी नेतृत्वालाही ठाऊक आहे. म्हणूनच त्यांनी जिहादी व तत्सम उचापतखोरांच्या हाती पाकिस्तान सोपवला आहे. बाकी सैनिकी सज्जता करण्यापेक्षा भारतातच हुर्रीयत, काश्मिरीयत असले गद्दार उभे केलेत आणि वेळोवेळी त्यांनी भारतविरोधी पवित्रा घेतला की मग त्यांच्या समर्थनाला उभे राहून भारताला हतोत्साहीत करणारी एक बुद्धिजिवी भारतीयांची खास पलटण उभारली आहे. भारतात ज्यांना टुकडे टुकडे गँग म्हणून ओळखले जाते ती पाकिस्तानची इथली खरी युद्धआघाडी आहे. पाकवर भारतीय सेना कठोर कारवाई करण्याची शक्यता दिसली किंवा निर्माण झाली की पाकिस्तानची ही दिल्लीतली बुद्धीजिवी सेना सर्वात आधी रणांगणावर येऊन युद्ध नको म्हणून आक्रोश सुरू करीत राहिलेली आहे आणि त्यात पाक फौजेसमोर भारतीय राजसत्तेने सतत शरणागती पत्करलेली आहे. म्हणून हा जिहादचा आजार बळावत गेलेला आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले. तिथून ही स्थिती बदलत गेलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोदी अशा भारतातल्या पाकिस्तानी फौजेला दाद देत नाहीत की त्यांच्या दबावाखाली येत नाहीत. मात्र विस्कळीत दबलेल्या सेनेला थेट पाकिस्तानवर कारवाईची मोकळीक देण्यात अर्थ नव्हता. त्यासाठी आधी भारतातल्या पाकिस्तानी फौजेला नामोहरम करणे व अस्सल भारतीय फौजेला युद्धासाठी सज्ज करण्याची गरज होती. पहिली दोन-तीन वर्षे मोदींना त्यातच खर्ची घालावी लागली. त्यात भारतातले पाकिस्तानचे हस्तक नामोहरम करणे आणि पाकिस्तानात भारताचे हस्तक उभे करणे ही प्राथमिक तयारी आवश्यक होती. ती पूर्ण झाल्यावर हळूहळू मोदींनी आक्रमक पवित्रा व धोरण आखायला सुरूवात केली. दुसरीकडे परराष्ट्र धोरणातूनही पाकिस्तानची चहूकडून कोंडी करण्याला प्राथमिकता दिली. अमेरिकेला पाकिस्तानपासून तोडले आणि चीनला पाकबाबतीत नरम व्हायला भाग पाडणारी स्थिती झाल्यावर पाकिस्तानला धडा शिकवण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. आधी सर्जिकल स्ट्राईक आणि आता पाकिस्तानी भूमीत जाऊन इस्लामाबाद नजिकचा हल्ला हे म्हणूनच महत्त्वाचे आहेत.

आजवरचे बोटचेपे धोरण भारताने सोडल्याची ती खुण आहे. नियंत्रण रेषा किंवा सीमारेषा यांचे पावित्र्य पाळण्याचे एकतर्फी धोरण मोदी सरकारने गुंडाळून ठेवले आहे आणि तुम्ही अंगावर आलात तर थेट शिंगावर घेणार असे नवे आक्रमक धोरण पत्करलेले आहेत. कारगिल युद्धात ज्या भारतीय विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती त्यांनी सर्जिकल स्ट्राईलच्या वेळी ती मर्यादा ओलांडलीच पण मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरचा वादग्रस्त प्रदेशही ओलांडून थेट पाकिस्तानी भूमीतल्या बालाकोट या केंद्रावर बॉम्बहल्ला विमानांनी केला आहे. त्यातून एक संकेत स्पष्टपणे समोर पाठवण्यात आला आहे, यापुढे दहशतवादी जिहादी हल्ला झाला तरी ते पाकिस्तानने पुकारलेले युद्ध समजूनच उत्तर दिले जाईल असा यातला संकेत आहे.

जागतिक लोकमत, अणुयुद्धाच्या धमक्या वा भीती यात आता भारत अडकून पडणार नाही आणि कुठलाही हल्ला म्हणजे युद्ध समजूनच पाकिस्तानला वागवले जाईल असा यातला मतितार्थ आहे. जगभर उच्छाद मांडलेले जिहादी दहशतवादी पाकिस्तानात प्रशिक्षित होतात आणि त्यांना पाकिस्तान थोपवू शकत नसेल तर तिथे जाऊन त्यांना रोखणे व प्रसंगी संपवून टाकणे म्हणजे भारताची सुरक्षा व्यवस्था असा तो साफ संकेत आहे. बालाकोट हे पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावणपिंडीपासून नजिक आहे आणि तितकेच राजधानी इस्लामाबाद येथूनही नजिकचे ठिकाण आहे. तिथपर्यंत घुसून केलेला हवाई हल्ला म्हणजे पाकिस्तानात कुठेही घुसून भारतीय सेनादल आपली सुरक्षा चोख ठेवणार असा इशारा आहे.

हा घटनाक्रम इथेच थांबवायचा की आणखी पुढे पाकिस्तानच्या कुठल्याही भागात घेऊन जायचा हे पाकिस्तानने ठरवायचे आहे, यातला इशारा मुशर्रफ यांना कृतीपूर्वीच समजला होता आणि कृती केल्यावर पाकिस्तानचा आश्रयदाता चीनलाही समजला आहे, यापेक्षा अधिक पाकिस्तानला पाठीशी घातला तर भारतीय फौजा पाकमधील चिनी गुंतवणूकीचेही मोठे नुकसान करू शकतील हा तो इशारा आहे. जगाला भेडसावणारा जिहादी दहशतवाद एकट्या भारताची डोकेदुखी नाही तर जगाला त्रास देणारा आजार आहे आणि त्याचा बंदोबस्त भारत करील पण अवघ्या जगाने त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असाही एक जगासाठी संकेत त्यात सामावलेला आहे. म्हणूनच बालाकोटवर भारतीय हवाई दलाने केलेले हवाई हल्ले वा पाकचे मोठे नुकसान हा केवळ पुलवामा येथील शहीदांच्या हत्याकांडाचा सूड वा बदला नाही. तो पाकिस्तानच्या जिहादी षडयंत्राला नामोहरम करून कायमचे नेस्तनाबूत करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ती नव्या समर्थ, सुरक्षित व खंबीर भारताची सुरूवात आहे. पाकिस्तानला समजू शकणार्‍या भाषेतला तो संवाद आहे.

-भाऊ तोरसेकर
९७०२१३४६२४

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा