सोनवणी सर, उत्तर द्या!

सोनवणी सर, उत्तर द्या!

1999 मध्ये पोप जॉन पाल द्वितीय भारतात आले आणि त्यांच्या दिल्ली येथील वास्तव्यात त्यांनी जे विधान केले त्याचे पडसाद देशात आणि माहाराष्ट्रात देखील आजतागायत उमटत आहेत. ते म्हणाले होते, ‘‘पहिल्या सहस्रकात आम्ही संपूर्ण युरोप ख्रिस्ती केला. दुसर्‍या सहस्रकात संपूर्ण अमेरिका आणि आफ्रिका आम्ही पादाक्रांत केला; आता येत्या एकविसाव्या शतकात आशिया आणि विशेषतः भारत आमचे लक्ष असणार आहे.’’

सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना 1999 ते 2018 याकाळात भारतात वाढलेल्या विघटनवादी शक्ती, द्रविडस्थानची पुन्हा नव्याने होऊ घातलेली मागणी, खलिस्तानवाद्यांचा कुंठीत झालेला स्वर पुन्हा पंजाबच्या भूमीवर उमटणे हे कशाचे निदर्शक आहे? महाराष्ट्राच्या पार्श्‍वभूमीवर विचार केल्यास टोकाच्या जातीय द्वेषाचे पद्धतशीर पोषण केले जाणे, ब्रिगेड आणि मूलनिवासीवाद्यांनी महाराष्ट्राचे भावजीवन अतिशय गढूळ करून टाकणे या सर्व घटना आकस्मिक मानण्याचे कारण नाही. मागील वर्षी घडून गेलेले कोरेगाव भीमा प्रकरण सुद्धा एका व्यापक कटाचा भाग होता हे एव्हाना सिद्ध झाले आहे. सर्वच आघाड्यावर आपण अराजकाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय अशी स्थिती असताना समस्त लेखक, कवी आणि विचारवंत मंडळी मिठाची गुळणी धरून बसलीत हे अधिक क्लेशकारक आहे. याला संजय सोनवणी सरांसारखे लेखक मात्र अपवाद आहेत. त्यांनी वारंवार सामाजिक मुद्यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. मग तो बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने उद्भवलेला वाद असो की शबरीमाला प्रकरण. महाराष्ट्राच्या बुद्धीजीवी वर्तुळात आपले स्वतंत्र स्थान राखून असलेले संजय सोनवणी हे व्यक्ती म्हणून आम्हाला आदरणीय राहिलेले आहेत. खरे सांगायचे तर ते आमचे सन्मित्रच नव्हे तर आम्हाला ते गुरुतुल्य आहेत. 80 पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन करणारे ते समर्थ लेखक आहेत. अक्षरशः हजारो म्हणता येईल अशा विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. हे सारे एका बाजूला ठेवल्यास त्यांची उत्तुंग प्रतिमा आपल्यासमोर उभी राहते मात्र; त्यांची काही मते सांप्रत अनेकांना मान्य होताना दिसत नाहीत. त्यातला मी देखील एक… मला कधी कधी असा प्रश्‍न पडतो की असल्या भूमिका घेताना किंवा मते मांडताना सर स्वतःला पुन्हा पुन्हा पुरोगामी तर सिद्ध करू पाहत नाहीत ना? कारण अलीकडे मी जात मानत नाही असे म्हणून चालत नाही. ती पुन्हा पुन्हा सिद्ध करीत रहावी लागते. स्वतःला पुरोगामी सिद्ध करण्याच्या नादात बरेचदा दोन्ही; अर्थात डाव्या आणि उजव्या बाजूमधील संतुलन साधत रहावे लागते. त्याचा खेळ सोनवणी सर अव्याहत खेळत असतात असे म्हणायला जागा आहे. त्यांच्या सर्व मतांशी मी सहमत नाही आणि अर्थात त्यांचा देखील तसा आग्रह नाही. वैचारिक वाद महाराष्ट्राला नवे नाहीत पण अलीकडे असले वाद होण्याची परंपरा खुंटलेली आहे. माझ्या मतांच्या विरोधी म्हणजे तो शत्रू; असली भूमिका घेऊन वाद घालायला बसलो तर फलित शून्य! याहीपलीकडे आपण जर आपल्या भूमिकेला वा आपण करून घेतलेल्या ग्रहाला घट्ट चिपकून बसणार असू तर असले वाद न केलेले बरे. वादाची पहिली पायरी ही संवाद असेल तर असल्या चर्चेला काही अर्थ उरणार आहे.

सरांच्या कोणत्या मांडणी विषयी आक्षेप आहेत हे सुरुवातीला स्पष्ट केले पाहिजे. खरा आक्षेप आहे तो त्यांच्या वैदिक धर्म आणि हिंदू धर्म या मांडणीवर. ‘चपराक’च्या वाचकांना सोनवणी सरांची काय भूमिका आहे हे आधी सांगितले पाहिजे. त्यांच्या मते फ्रेडरिक म्याक्स्मुल्लरने मांडलेला आर्य आक्रमणाचा सिद्धांत जसा तथ्यहीन आहे तसा हिंदू धर्म हा वैदिक धर्माचे अंग आहे ही वास्तविकता देखील त्यांना मान्य नाही. या त्यांच्या वैचारिक मांडणीवर असंख्य प्रश्‍न निर्माण होतात. त्यांच्या विचारांची दिशा एका अप्रस्तुत मांडणीकडे सरकू लागते आणि मग ‘सोनवणी सर उत्तर द्या’ असे म्हटल्याशिवाय गत्यंतर उरत नाही.

वैदिक कोण?
सुरुवातीला सरांच्या या मांडणीकडे मी दुर्लक्ष केले परंतु मला त्यांच्या ‘वैदिक धर्म आणि हिंदू धर्म हे स्वतंत्र आहेत’ या मांडणीची गंभीरपणे दखल घ्यायला त्यांनीच बाध्य केले. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात ‘सनातन’च्या कुण्या समीर गायकवाडला अटक झाली आणि त्यादिवशी सोनवणी सरांनी समाज माध्यमावर विधान केले की वैदिकवाद्यांनी हिंदुंना हाताशी धरून घडवून आणलेला कट. वरवर पाहता कुणालाही सोनवणी सर वैदिक कुणाला ठरवू पाहताहेत हे स्पष्ट होईल. त्यांच्यासोबत दूरध्वनीवर झालेल्या संवादातून देखील आज ते कुणाला वैदिक ठरवू पाहत आहेत हे स्पष्ट झाले नाही. ‘‘ज्यांना आजही आपल्या ब्राह्मण, क्षत्रिय असण्यावर माज आहे ते वैदिक’’ असे काहीसे गुळमुळीत उत्तर त्यांनी त्यावेळी दिले. याशिवाय ‘‘शिव ही या देशातील प्राचीन देवता असून विष्णुचे उपासक हे वैदिक’’ अशी देखील त्यांनी मांडणी केलेली आहे; परंतु वैदिक म्हणजे ब्राह्मण ही मांडणी त्यांच्या लिखाणातून आणि बोलण्यातून प्रकट होते हे अगदी स्पष्ट आहे. मग असे जर असेल तर आजपावेतो ब्राह्मण ब्राह्मणेतर ही जी मांडणी केली जातेय त्यापेक्षा सोनवणी सर काय वेगळे सांगू पाहताहेत? माझा स्पष्ट आरोप आहे की, एक अत्यंत चलाख खेळी सर खेळू पाहताहेत. आतापर्यंत आर्य आक्रमण सिद्धांताचा चावून चोथा झालाय. ‘ब्राह्मण या देशातले नव्हेच आणि त्यांच्यासोबत आलेला धर्म देखील आपला नाही’ हे कितीही ओरडून सांगितले तरी या देशातील सामान्य हिंदू माणूस हिंदू धर्मासोबत आलेल्या परंपरा आणि संस्कार नाकारायला तयार नाही. ज्याला सर वैदिक संस्कार म्हणतात त्या संस्काराचे संचित इतके मोठे आहे की; वैदिक आणि हिंदू असे वेगळे करणे अनेकांना शक्य झालेले नाहीच. पोप महाशयाच्या दृष्टीने भारत हा धर्मांतराच्या दृष्टीने आता अग्रस्थानी असणार आहे या मागे देखील हेच शल्य आहे की हिंदू आणि ब्राह्मण असे विभाजन करण्याचा बराच प्रयत्न करून झाल्यावर देखील हिंदू समाजाच्या धर्मांतराच्या विरोधात उभा राहतो तो ब्राह्मण समाज वा त्यांच्या संघटना… सोनवणी सरांची मांडणी एक वेळ आर्य आक्रमण सिद्धांत नाकारते आणि त्याचवेळी हिंदू धर्म हा वैदिक धर्मापेक्षा स्वतंत्र आहे हे सांगते. यालाच मी ‘चलाख खेळी’ म्हणतो. आज जरी सरांचा हा स्वर जीर्ण असला तरी याच सिद्धांताच्या आधारे उद्या समाजाच्या विभाजनास ही मांडणी उपयुक्त ठरणार नाही कशावरून?

सर स्वतः अभ्यासक आणि संशोधक आहेत हे मान्यच आहे. त्यामुळे झरुतृष्ट, अवेस्ता आणि यजुर्वेद वा शतपत ब्राह्मण ग्रंथ यांचे उल्लेख त्यांच्या लिखाणात वारंवार येतात परंतु त्यांच्या लिखाणातील एक विरोधाभास त्यांच्या लक्षात आलेला दिसत नाही. वैदिक लोक दक्षिण अफगाणिस्तानातून भारतात दाखल झाल्याचा काळ जो सांगितला जातोय तो आहे इ. स. पूर्व चौथे शतक. वेदांच्या रचनेचा कालखंड देखील सोनवणी सर तोच सांगतात. शिवाय शूद्र (क्षुद्र नव्हे) टोळ्यांच्या आश्रयाने वैदिकांनी आपला उत्कर्ष साधला हे देखील ते मार्कंडेय व ब्रह्म पुराणाच्या हवाल्याने सिद्ध करतात. यजुर्वेदाच्या हवाल्याने ‘शुद्रार्यावसूज्येताम’ अर्थात आर्य व शूद्र यांना निर्माण करण्यात आले हे देखील सांगतात. याचा अर्थ भगवान बुद्धाच्या नंतर वेदांचा आणि या तथाकथित वैदिक टोळ्यांचा कालखंड गृहीत धरला आहे पण बौद्ध साहित्यामध्ये वारंवार तथागताच्या तोंडी अरीयू आणि अनरीयू असा शब्द प्रयोग येतो. हा शब्दप्रयोग भगवान बुद्ध ‘सभ्य आणि असभ्य’ या अर्थाने करतात. अरीयू अर्थात आर्य आणि अनरीयू म्हणजे अनार्य. अनेक भाषाशास्त्रींनी आर्य हा शब्द जातीवाचक नसून तो गुणवाचक असल्याचा निर्वाळा दिला आहे. मग प्रश असा उपस्थित राहतो; वैदिकांच्या आगमनापूर्वी आर्य आणि अनार्य असले शब्द बौद्ध वाड्मयात कसे दाखल झाले? सरांच्या लेखात आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडे सारेच हिंदू राहतात; असा समज वैदिकांचा झाला असावा. मात्र या वाक्याच्या पुष्ट्यर्थ ते कुठलाही तर्क वा पुरावा देत नाहीत. एकंदर ‘वैदिक इथे येण्याआधी सगळेच हिंदू होते’ हे त्यांना स्पष्ट करता आलेले नाही.

वर्णाश्रम व्यवस्था आणि शूद्र
शूद्र आणि वैदिकांचे सबंध सलोख्याचे होते असे सांगताना; चातुर्वर्ण व्यवस्थेत शूद्र टोळ्यांना या वर्ण व्यवस्थेत सामावून घेणे आवशक होते आणि म्हणून पुरुषसुक्तात त्यांना स्थान देण्यात आले, हा आणखी एक त्यांच्या मांडणीचा भाग. त्यासाठी ते कुप्रसिद्ध अशा
ब्राह्मणोीस्य मुखमासीद बाहू राजन्य कृतः
श्‍लोकाचा संदर्भ देतात पण मला स्पष्ट आठवते की सरांनीच पुरुष सुक्तात या ओळी प्रक्षिप्त असल्याचा निर्वाळा दिला आहे आणि समाजाच्या चलनवलनासाठी विराट पुरुषाचे ते वर्णन आहे, त्याचा वर्णाशी सबंध नाही हे त्याना मी सांगायला हवे का? वेदात आणि अन्य ग्रंथात देखील कितीतरी प्रक्षिप्त साहित्य घुसडण्यात आले हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्वछ आहे. हा आरोप वेदाचा अभ्यासक असलेल्या फ्रेडरिक मोक्षमुल्लरवर देखील झालेला आहे. मग पुन्हा त्या प्रक्षिप्त श्‍लोकाच्या आधारे सर काय सिद्ध करू पाहताहेत?

मगध राज्यात पुष्यमित्र शून्गाची सत्ता येईस्तोवर वैदिक धर्माचा तिथे मागमूस नव्हता हे सांगत असताना आचार्य चाणक्य वैदिक होता की हिंदू हे ते सांगत नाहीत. शतपत ब्राह्मण ग्रंथातील वामन अवताराचा सबंध सरांनी वैदिकांना भूमी नसल्याने विष्णुने वामनाचे रूप घेऊन असुरांची भूमी हस्तगत केली असे ते सांगतात.

मूळ कथा काय आहे आणि तिचा वापर आपल्या मांडणीच्या पुष्ट्यर्थ कसा केला आहे हे बघणे महत्त्वाचे ठरेल. वामनाची ही कथा ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बाविसाव्या व एकशे चौपन्नव्या सूक्तातील रुचेवरून घेतली आहे. वेदातील ही कथा आणि पुराणातील बळी वामनाची कथा याचा काहीही सबंध नाही. वेदातील या कथेचा संबंध असलाच तर तो सूर्याशी आहे, शेतकर्‍याशी नाही! पण ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद हा महाराष्ट्र देशी अत्यंत लाडका असल्याने त्यात तेल ओतून समाजविश्‍व गढूळ करीत राहणे हे सांप्रत महत्कार्य मानले गेले आहे. मूळ कथेत सूर्याला विष्णु गृहीत धरून रुचांची रचना केली गेली आहे, ज्यात तो सूर्य अर्थात विष्णु ह्या तीन गोष्टींना आपल्या तीन पाऊलांत व्यापतो. ज्यात ही तीन पाऊले म्हणजे दिवसाचे सकाळ, सायंकाळ व रात्र असे तीन भाग किंवा विश्‍वाचे पृथ्वी, आकाश व पाताळ असे तीन भाग ह्या अर्थाने आहे. ही सूर्यकिकरणांनी व्यापिलेल्या ह्या तीन भागांची रुपक कथा ऋग्वेदामध्ये आहे. ह्या तीन पाऊलांत तो सूर्य अर्थात विष्णु सर्व विश्‍व व्यापितो. ऋग्वेदाचे श्रेष्ठ भाष्यकार सायनाचार्य आणि महर्षी दयानंद सरस्वती यांनी जे भाष्य रुग्वेदावर केले त्यातही बळीराजाच्या कथेचा उल्लेख नाही. रुग्वेदातच काय, इतर कोणत्याही वेदात तो उल्लेख नाही. याचा अर्थ विश्‍वसनीय नसलेल्या पुराणातील वांग्यावरुन भरीत बनविले जात आहे. स्कंदस्वामी यांनी केलेले विष्णुसुक्तावरील भाष्य अधिक समर्पक आहे. विष्णु हा सूर्य असून त्याचे प्रभात, मध्यान्ह आणि अस्त ही तीन पाऊले आहेत असा अर्थ प्रकट करतात. याहीपुढे वेंकटमाधव, मुद्गल स्वामी यांच्या विवेचनात देखील वामनावतार असा उल्लेख येत नाही. खरे तर सूर्य हाच आपला पालक आहे. पृथ्वीची उत्पत्ती, मध्य आणि विनाश याचा कारक सूर्य आहे. पृथ्वीवरील जीवन हे त्याच्याच प्रकाशमानतेचे फलित आहे. त्याचे नसणे हे आपल्याला अंधार युगात घेऊन जाईल; म्हणून जर सूर्याला विष्णू म्हटले असेल तर त्यात कुठे चुकले?

मग वामन अवतारात असुरांची भूमी बळकावल्याचा निष्कर्ष आला कुठून? तर अभ्यासकांच्या मते तेत्तरीय संहितेमध्ये पहिल्यांदा विश्नुसुक्तातील त्या ऋचांचा अर्थ वामनअवताराशी जोडण्यात आला आणि पुढे पुराणकारांनी त्यात बळीराजाला आणून कथेचे विकृतीकरण केले. असो.

वैदिक – हिंदू मांडणीची प्रासंगिकता…

अनेकदा हिंदू धर्माला वैदिक धर्माच्या जोखडातून मुक्त करण्याची आवशकता सोनवणी सर व्यक्त करीत असतात. वैदिक धर्माच्या जोखडातून मुक्त करायचे म्हणजे अनेक गोष्टी नाकारणे आले. म्हणजे विद्रोह आला. नाकारायचे तर काय काय नाकारणार? आणि कशाकशाच्या विरोधात विद्रोह करणार ते देखील सरांना सांगावे लागेल. ‘सर्वेपि सुखिनः सन्तु’ म्हणणारा विचार नाकारणार? की ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार रद्दबातल ठरवणार? ‘अतिथी देवो भव’ नाकारणार? की ‘कृण्वन्तो विश्‍वमार्याम्’ नाकारणार? ‘समुद्र वसने देवी पर्वत स्तःन मंडले’ हा उदात्त विचार नाकारणार? की ‘उत्तरं यत समुद्रस्य हिमालायेत दक्षिणं वर्ष तत भारत नाम भारती यतर संतती…’ काय काय नाकारणार सर?

हिंदू हे मूर्तिपूजक आणि वैदिक हे निराकार परमेश्‍वराला माननारे ही मांडणी आज मान्य जरी केली तरी कोण वैदिक आणि कोण हिंदू असा भेद समाजात आता आहे तरी कुठे? वैदिक असो की हिंदू सारेच आज मूर्तिपूजक आहेत. शक, कुशान आणि हून जसे आज भारतीय समाजात दुधात पाणी मिसळावे तसे मिसळून गेले त्या प्रकारे तुमचे म्हणणे एकवार मान्य जरी केले तरी या अजागळ भारतीय समाजात वैदिक आणि हिंदू एकरूप झालेले आहेत. या देशाची मूळ देवता शिव आहे आणि अनेक स्वतःला वेदांगाचे अभ्यासक म्हणविणार्‍या ब्राह्मणांच्या घरातील कुलदैवत हे शिव, लक्ष्मी, खंडोबा, अंबाबाई असे आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपले म्हणणे आज अप्रासंगिक ठरते. आज आपल्या समाजाची अवस्था, त्यातील अंतःप्रवाह आणि संघर्ष आपल्याला ठावूक असताना पुन्हा विभाजनवादी मांडणी करून आपण एका नव्या संघर्षाला जन्म देताय. एकंदर आपली मांडणी ही ‘जुन्याच बाटलीतील नवी दारू’ असल्या प्रकारात मोडते. ब्रिगेडी आणि मूलनिवासीवाद्यांनी आर्य आक्रमण सिद्धांतांच्या आधारे समाजाचे वाटोळे केले आणि सद्भावाला नख लावले त्यात आपल्या मांडणीने भर पडणार आहे. सांप्रत काळी वैदिक कोण हे सिद्ध करता येत नाही. आपल्या दृष्टीने मोदी देखील वैदिक आहेत आणि रा. स्व. संघ देखील वैदिक! ते कसे काय याचे उत्तर आपण दिले पाहिजे.

आणि हो! याचे उत्तर आपल्याला द्यावेच लागेल आणि येणार्‍या काळात आपल्या मांडणीची प्रासंगिकता आणि विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल.

– प्रशांत आर्वे
चंद्रपूर
८८८८६२४९६९

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “सोनवणी सर, उत्तर द्या!”

  1. anant desai

    सुंदर लेख

  2. anant desai

    उत्तर वाचायला आवडेल

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा