मागे जाणवणारी ती सळसळ, दूरवरुन आलेली अस्पष्टशी साद, गाण्याची हलकी निसटती लकेर! असंच काहीसं क्वचित कधी जाणवणारं. विश्वास आणि अविश्वास याच्या कडेलोटावर असतो आपण! संध्याकाळ दाटून आलेल्या वातावरणात एक अनोखी गुढता असते. मन येणार्या पावलांची चाहूल घेत असतं. मनाची अधीरता शिगेला पोहचलेली असते अन् दारावरील टकटक स्पष्ट ऐकू येते. जलद पावलं दाराकडे पटपट जातात. दारं उघडून पहावं तर समोर कुणीच नसतं. मग ती टकटक कुठुन झाली? आवाज खरा की अधीर मनाला झालेला भास? आणि मग मनातील आंदोलनं सुरु होतात. हा मनाचा खेळ असतो की प्रकर्षांने वाटणारी ओढ? भास की आभास?
जे नाही ते आहे, याची जाणीव मनाला होणं म्हणजे भास. असं साधं, सुटसुटीत विधान भासांच्या बाबतीत करता येईल पण हे भास सर्वांना नाही होत. असं म्हटलं जातं की कमकुवत मानवी मनाचे हे सारे खेळ असतात पण मला वाटतं त्या व्यक्तीचं मन अतिपारदर्शी असावं. जे त्या दुसर्या मनाच्या जवळ जाण्यासाठी उत्सुक असावं. वातवरणातील तो गंध, ती हालचाल ते सतत टिपत असतं. भास सुखद असतील किंवा दु:खद, आश्चर्यजनक किंवा भीतीदायक पण आपल्याही नकळत भास मात्र कधीतरी होतातच. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल. आलेली अनुभूतीही वेगळी असेल. काहींचा तर भास या शब्दावरील आक्षेप असू शकेल. त्यांच्या मते असं काही होत नाही. म्हणजे तसं काही नसतंच मुळी पण अनुभव आलेले मात्र आपली बाजू तितकीच ठासून मांडतात.
जागेपणी होणारे हे भास मला मात्र हवेसे वाटतात. कारण ते मला एका अजब दुनियेत घेऊन जातात. जाणारं माणूस निघून जातं आपल्यातून पण काही काळासाठी का होईना, एक अजब पोकळी मागे सोडतं आणि त्या पोकळीतून ही भासांची फुलपाखरं उडायला लागतात. त्या लडी अलगद उलगडतात. कळत नकळत जाणवतात. त्याक्षणी वाटतं, ती आत्ता इथे आहे, होती.. बोलली माझ्याशी. तिचे उष्ण श्वास जाणवले मला. तिचा पायरव, तिच्या वस्त्रांची सळसळ, बांगड्यांचा किणकिण… सारंच ऐकलं मी, माझ्या कानांनी ऐकलं, ते खोट कसं असेल?
हे जाणवतं कारण ते नातं तसंच जवळच असतं. सहवास, प्रेम आणि वियोगाची एक धारदार लहर ही सारी किमया करत असेल का? ही लहर इतकी वेगवान असते की तिचं नसणंही असणं होऊन जातं. नाहीतरी दिसतं किंवा असतं म्हणजे काय? मानवी ज्ञानेंद्रियांना झालेली जाणिवच अशा कुठल्या अस्तित्वाचा पुरावा असतो ना? मग भास ही सुद्धा जाणिवच असते. ती नसते तरी कसं म्हणावं छाती ठोकून? असतं म्हणजे आपण मानलं म्हणून आहे. अनेकदा आपण असलेल्या गोष्टीही नाकारतोच ना? आपल्याला रंगीत काही दिसतं म्हणून रंग असतात आणि रंगांधळ्या व्यक्तीला तसे रंग दिसत नसतात, ही वैद्यकीय सत्यस्थिती आहे. मग त्याला नसलेल्या जाणिवांना आपण नकार कसा देऊ शकतो? सगळ्या गोष्टी व्यक्तीच्या जाणिवा किंवा क्षमतेच्या आवाक्यातल्या असतात कुठे? भासही त्याला अपवाद नाही. कल्पना आणि अनुभवाच्या दोन धृवांमध्ये हेलकावे घेणार्या अनुभवाला भास म्हणावं का मग?
आपल्याच मनाला विचारावं वाटतं, मना सांग का मला हा अनुभव तू पुन्हा पुन्हा देत आहेस? अशाप्रकारचे अनुभव किंवा भास लहान वयापासून सरत्या वयापर्यंत केव्हाही येऊ शकतात. अनुभवांची जागा वेगळी असेल, संदर्भ वेगळे असतील, वेळ वेगळी असेल पण अनुभव नक्की असतात. होणारे हे भास म्हणजे दिवास्वप्न तर नव्हे? काही असो, जोपर्यंत आपण या भासांचा आनंद घेतो तोपर्यंत ते नक्की चांगले पण जेव्हा दु:ख निर्माण होईल, तेव्हा नकोसे असतात. मग हवेसे जवळ करू आणि नकोसे बाजूला ठेवू. खरं ना? नाहीतरी म्हणतात ना? मन चिंती ते वैरी न चिंती!
– नीता जयवंत, अंबरनाथ
९६३७७४९७९०