माध्यमांतराचा रंजक धांडोळा

माध्यमांतराचा रंजक धांडोळा

आशय आणि विषयाशी प्रामाणिक असलेली कोणतीही कलाकृती ही थेट काळजाला स्पर्शून जाते. लेखकाचं जीवनानुभव, त्यानं घेतलेली अनुभूती, त्याचं चिंतन, कल्पनाशक्ती या व अशा सगळ्यांचा आविष्कार जेव्हा शब्दरूपात व्यक्त होतो तेव्हा त्याच्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडतं. ते इतकं ताकतीनं उतरतं की समाजमनाची पकड घेणं ही सहज प्रक्रिया बनून जाते. वाचकांना विचार करायला भाग पाडणं, त्याला नवी दृष्टी देणं, त्याच्या इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब त्यात उमटणं, त्याची स्वप्नं साकारल्याचा आभास निर्माण करणं, त्याच्या मनातील सुप्त भावनांना अंकुर फोडणं आणि काहीवेळा त्याला खतपाणी घालणं हे सर्वकाही एखाद्या अव्वल साहित्यकृतीतून घडू शकतं. असं साहित्यच काळाच्या ओघात टिकतं. हे टिकावू साहित्य तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आणखी विकसित करून, ते फुलवून त्याला अभिनय, संगीत, नृत्य, गायन अशा कलांची जोड देवून रसिकांसमोर आणणं हे कौशल्य सोपं नाही. जे सोपं नाही तेच काम लिलया करणं हा मराठी माणसाचा स्थायीभाव. त्यामुळंच दादासाहेब फाळके नावाच्या एका मराठी माणसानं भारतीय चित्रपटसृष्टीला चेहरा दिला. या क्षेत्राचं जनकत्व स्वीकारलं.

चित्रपटसृष्टीचं बेफाम अर्थकारण पाहता त्याची भव्यता कुणाच्याही सहजपणे लक्षात येईल. निर्मितीचा हा खेळ खेळताना लागणारं ‘रॉ मटेरिअल’ महत्त्वाचं ठरतं. एखादी कादंबरी, त्यापासून तयार केलेली पटकथा, आवश्यकतेनुसार निवडलेली गाणी हा चित्रपटाचा आत्मा असतो. त्यातील कलाकारांचा अभिनय, त्यातलं संगीत, नृत्य यामुळं त्यात प्राण फुंकला जातो. या सगळ्या माध्यमांतराच्या प्रक्रियेचा धांडोळा घेणं हे मोठं रंजक असतं. त्यासाठी अभ्यास लागतो. साधना लागते. ते सूक्ष्म बदल टिपण्याची कुवत लागते. मूळ संहिता आणि त्याला चित्ररूप देताना केलेले बदल हे सारं समजून घेण्याची क्षमता फारच थोड्या लोकात असते. पुण्यातील मराठी भाषेचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र थोरात यांनी अभ्यासासाठी हाच विषय निवडला. ‘मराठी कादंबरीवर आधारित मराठी चित्रपटांचा तौलनिक अभ्यास’ हा विषय त्यांनी संशोधनासाठी निवडला. त्यानिमित्त अतिशय दर्जेदार अशा वाचकप्रिय कादंबर्‍या निवडल्या. त्यावर झालेल्या चित्रपटांचा अभ्यास केला. या अभ्यासाचं मूर्त रूप म्हणजे ‘चपराक’नं प्रकाशित केलेलं त्यांचं ‘कुंकू ते दुनियादारी’ हे पुस्तक. अतिशय सुबोध शैलीतलं हे पुस्तक फक्त माध्यमांतराची प्रक्रियाच उलगडून दाखवत नाही तर या सर्व कादंबर्‍या मुळातून वाचण्याचं कुतूहल निर्माण करतं. या कादंबर्‍यांवर झालेले चित्रपट पुन्हा पहायला आपल्याला उद्युक्त करतं. मराठी साहित्यकृती आणि त्यावर आलेले सिनेमे यांच्याविषयीचं आपलं आकलन समृद्ध करतं.

मुळात एखादी कलाकृती निवडणं आणि त्यावर चित्रपटनिर्मिती करणं हेच धाडसाचं काम असतं. यात कोट्यवधी रूपयांची उलाढाल असते. रंजन आणि प्रबोधन हे वरवर दिसणारं वास्तव असलं तरी यातला व्यवसाय, नफेखोरी महत्त्वाची ठरते. त्यामुळं निर्माता आणि दिग्दर्शक त्यासाठी आपलं अस्तित्व पणाला लावतात. कोणत्याही चित्रपटासाठी शे-पाचशे लोकांचा समूह अव्याहतपणे मेहनत घेत असतो. त्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचं पडद्यावर झळकणारं प्रतिबिंब त्यांच्या व्यावसायिक आडाख्याची गोळाबेरीज ठरवतं. त्यामुळं साहित्यकृतींच्या माध्यमांतराच्या प्रक्रियेला मोठं महत्त्व आहे.

प्रा. राजेंद्र थोरात यांचं भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांना साहित्याची उत्तम जाण आहे. चित्रपट निर्मितीशी संबंधित प्रत्येक घटकांकडं निकोपपणे पाहण्याची त्यांची दृष्टी व्यापक आहे. त्यांची चोखंदळ अभिरूची आणि विवेकनिष्ठ भूमिका यामुळं कुणावर अन्याय होऊ नये यासाठी ते कायम सजग असतात. आपल्या कामाशी ते प्रामाणिक आहेत. त्यामुळंच त्यांनी या विषयाला योग्य तो न्याय दिलाय. कुठंही फाफटपसारा न करता आपले मुद्दे नेमकेपणानं मांडल्यानं त्यांचं हे पुस्तक अनोखं ठरलंय.

साहित्यकृतींच्या माध्यमांतराचा अभ्यास करण्यासाठी डॉ. थोरात यांनी निवडलेल्या कलाकृती पहा –

ना. ह. आपटे यांची ‘न पटणारी गोष्ट’, साने गुरूजींची ‘श्यामची आई’, व्यंकटेश माडगूळकर यांची ‘बनगरवाडी’, गो. नी. तथा अप्पासाहेब दांडेकरांची ‘जैत रे जैत’, अण्णा भाऊ साठे यांची ‘वैजयंता’, शांता गोखलेंची ‘रीटा वेलिणकर’, राजन गवस यांच्या ‘भंडारभोग’ आणि ‘चौंडकं’, आनंद यादव यांची ‘नटरंग’ आणि या सर्वांचा कळस म्हणजे सुहास शिरवळकर यांची ‘दुनियादारी.’
या सगळ्याच्या सगळ्या कादंबर्‍यांचं साहित्यमूल्य मोठं आहे. मराठी माणसाला त्यांनी हसवलं, रडवलं, समृद्ध केलं. त्यावर आलेले चित्रपटही कमालीचे लोकप्रिय ठरले. ते साकारताना काही प्रसंग बदलावे लागले. कादंबरी आणि चित्रपट या दोन्ही निर्मिती माध्यमांचं आपापलं बलस्थान वेगळं आहे. लेखक आणि प्रकाशक हे कादंबरीला न्याय द्यायचा प्रयत्न करत असतात. त्यावर चित्रपट करताना निर्माता आणि दिग्दर्शक यांचे ठोकताळे वेगळेच असतात. त्यांची अनुभवी नजर वाचकांना-रसिकांना ‘दृष्टी’ देणारी असते. म्हणूनच या निर्मिती प्रक्रियेतले, साहित्यकृतींच्या माध्यमांतरातले बारकावे समजून घेणं अगत्याचं ठरतं.

मराठी कादंबरी व मराठी चित्रपटांचा आढावा घेताना मराठी चित्रपटांची वाटचाल, चित्रपटाची भाषा, साहित्यकृतींचं माध्यमांतर, मराठी कादंबरीचं माध्यमांतर, त्याचं सिनेरूप, नाट्यरूप, आकाशवाणी रूप, मालिका रूप यावरील त्यांचं या पुस्तकातलं पहिलं प्रकरण अत्यंत उद्बोधक आहे. अतिशय सुस्पष्टपणे त्यांनी याची मांडणी केलीय. त्यासाठी भरपूर संदर्भसाधनांचा त्यांनी अभ्यास केलाय. त्यांची निरीक्षणं नोंदवताना थोरात यांनी कुठंही आततायीपणा केला नाही. त्यांच्या लेखनात कसला आव नाही. आपल्या जवळच्या मित्राला या दर्जेदार साहित्यकृतींविषयी, त्यावरील निर्मिती आणि माध्यमांतराविषयी समजावून सांगावं इतकी सहजता आहे. त्यामुळंच वाचक हे पुस्तक हातातून खाली ठेवत नाहीत. हे पुस्तक वाचताना अनेकांना कधी काळी वाचलेल्या या साहित्यकृती आठवतात, काहींच्या डोळ्यासमोर या चित्रपटातील काही प्रसंग तरळतात तर काहींना या कादंबर्‍या वाचण्याची, हे चित्रपट पाहण्याची प्रेरणा मिळते. यापेक्षा मोठी साहित्यसेवा कोणती असू शकते बरं? डॉ. राजेंद्र थोरात यांच्या लेखणीचं यश यातच तर सामावलेलं आहे.

साहित्यकृतींचं चित्रपटातलं माध्यमांतर समजून घेताना आपल्याला या साहित्यकृती, हे चित्रपट तर कळतातच पण व्ही. शांताराम यांच्यापासून ते संजय जाधव यांच्यापर्यंतचे निर्माते, दिग्दर्शक कळतात. त्यांच्या भूमिका अधोरेखित होतात. दृष्टी आणि दृष्टिकोन दिसतात. या कथा आणि पटकथा लिहिणारे लेखक समजतात तसेच अभिनयाद्वारे साहित्यकृतींना जिवंत रूप देणारे अभिनेते-अभिनेत्री कळतात. या सर्वांनी यासाठी काय कष्ट घेतले त्याची पुसटशी का होईना जाणीव होते. थोरातांनी साहित्यकृतींचा परिचय करून देण्यासाठी अचूकपणे जे उतारे निवडलेत, ज्या पद्धतीनं त्यांची ओळख करून दिलीय त्या केवळ परिच्छेदावरून ती संबंधित कांदबरी संपूर्णपणे वाचायचं कुतूहल वाचकांच्या मनात निर्माण होतं. आपली जिज्ञासा वाढते. साहित्यकृतीतील मूळ आशयसूत्राला धक्का न लावता दिग्दर्शक त्याला अन्य प्रसंगाची जोड कशी देतात, आपण ज्याला ‘रिड बिटवीन द लाईन्स’ म्हणतो तो अव्यक्त आशय पडद्यावर कसा मांडला जातो हे समजून घ्यायचं असेल तर राजेंद्र थोरात यांनी लिहिलेलं ‘कुंकू ते दुनियादारी’ हे पुस्तक वाचायलाच हवं.

मराठी चित्रपट क्षेत्राचा सुवर्णकाळ, त्याची समृद्ध परंपरा पाहता सर्वच साहित्यकृतींचा आणि त्यावरील माध्यमांतराच्या प्रक्रियेचा आढावा घेणं केवळ अशक्य आहे. त्यासाठी अनेक खंड निर्माण करावे लागतील. मात्र तरीही अशा पद्धतीनं भविष्यात आणखी काम होणं गरजेचं आहे. त्या त्या काळाचा साहित्यिक, सांस्कृतिक पट उलगडून दाखवण्यासाठी हे अत्यावश्यक ठरतं. ‘दुनियादारी’ नंतरही अनेक दखलपात्र चित्रपट आले आहेत, येत आहेत, भविष्यात अजून जोरकसपणे येतील. या सर्वांकडे अभ्यासू नजरेनं पाहण्याची ‘दृष्टी’ डॉ. राजेंद्र थोरात यांनी त्यांच्या ‘कुंकू ते दुनियादारी’ या पुस्तकाद्वारे दिली आहे आणि हेच त्यांचे सामर्थ्य आहे. त्यांच्या लेखनप्रवासाला, संशोधनाला माझ्या शुभेच्छा!
– घनश्याम पाटील
पुणे
7057292092
(दैनिक ‘सुराज्य’, सोलापूर, दि. १८ मार्च २०१८)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “माध्यमांतराचा रंजक धांडोळा”

  1. Sunil Pande

    झकास …डाॕ . राजेंद्र थोरात यांच्या लेखनीला सलाम . पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!

  2. Vinod. S. Panchbhai

    सुंदर लेख…
    छान आढावा घेतला आहे..

  3. suhas v kolekar

    छानच

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा