यशवंतरावांचे साहित्यिक योगदान प्रेरणादायी

‘चपराक’ दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार

‘चपराक’ दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार

गेल्या दशकात ‘चपराक’ दिवाळी महाविशेषांक हा मराठी माणसांच्या घराघरात पोहोचला आहे. जवळपास आठ राज्यातील लेखक या अंकात लेखन सहभाग देतात. साप्ताहिक, मासिक आणि ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यांवर ‘चपराक’चे काम चालते. प्रस्थापित लेखकांबरोबरच नव्या लेखकांनाही संधी दिल्याने खास ‘चपराक’साठी लिहिणार्‍यांची एक स्वतंत्र फळी साहित्यक्षेत्रात निर्माण झाली आहे. येत्या आर्थिक वर्षात आम्ही 365 दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेनेही यापूर्वी त्यांच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘चपराक’ला प्रथम क्रमांक दिला आहे. आता फलटण शाखेनेही प्रथम क्रमांकाने गौरविल्याने आमचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. या स्पर्धेत सहभागी सर्वच दिवाळी अंकांच्या वतीने मसापची फलटण शाखा आणि प्रामुख्याने रविंद्र बेडकिहाळ यांचे आभार मानतो.
– घनश्याम पाटील,
संपादक ‘चपराक’


फलटण, (प्रतिनिधी) :
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणाबरोबरच मराठी साहित्यासाठीसुद्धा विशेष योगदान दिले आहे. मराठी साहित्यिकांच्या संघटनांना, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनाने प्रोत्साहनपर अनुदान देण्याची परंपरासुद्धा चव्हाणसाहेबांनीच सुरु केली. या परंपरेतील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा हा उपक्रम साहित्यिक, संपादक यांना उत्तेजन देणारा आदर्श असा आहे, असे प्रतिपादन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी-बेडके यांनी केले.

महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त येथील कै. नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात श्रीराम एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा, यशवंतराव चव्हाण प्रशाला, सौ. वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सचिन सूर्यवंशी-बेडके बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी-बेडके होते. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ, मसाप फलटण कार्यवाह प्रा. विक्रम आपटे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, नियामक मंडळ सदस्य शिवाजीराव बेडके, प्रा.सी.एल.पवार उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहाराने आदरांजली वाहण्यात आली. मसापतर्फे स्वागतपर भाषणात रविंद्र बेडकिहाळ यांनी यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक कार्याचा आढावा घेवून सांगितले की, चव्हाणसाहेब उत्कृष्ट लेखक, समीक्षक व रसिक वाचक होते. त्यांच्यामुळे मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी विविध संस्थांना अनुदान, प्रोत्साहन मिळाले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवरांना बरोबर घेवून त्यांनी काम केले. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली व मसापतर्फे उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक वितरण हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

अध्यक्षीय भाषणात सुभाषराव सूर्यवंशी-बेडके यांनी यशवंतराव चव्हाणांच्या अनेक आठवणी सांगून आजच्या राजकारणात आज खर्‍याअर्थाने यशवंतरावांच्या विचारांची गरज आहे असे सांगीतले.

महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघ, लोकजागर प्रतिष्ठान, कै. अनंतराव शेंडे फौंडेशन पुरस्कृत मसाप फलटणच्या उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेतील प्रथम क्रमांक घनशाम पाटील (संपादक, चपराक दिवाळी अंक, पुणे) यांना, द्वितीय क्रमांक शिवाजीराव यादव (संपादक, साहित्य संपदा दिवाळी अंक, कोल्हापूर) यांना तर तृतीय क्रमांक सौ. सुनिताराजे पवार (संपादिका, संस्कृती दिवाळी अंक, पुणे) यांना सचिन सूर्यवंशी-बेडके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक, शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेबाबत कार्यवाह प्रा. विक्रम आपटे यांनी माहिती दिली.

उत्कृष्ट दिवाळी अंकाची परंपरा समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या उपक्रमाचा निश्‍चितच फायदा होईल. अशा स्पर्धेतून दिवाळी अंकासाठी कसदार लेखन करण्याची प्रेरणाही साहित्यिकांना मिळेल, अशी कृतज्ञता घनशाम पाटील यांनी पारितोषिक विजेत्यांच्या वतीने सत्कारास उत्तर देताना व्यक्त केली.

याच कार्यक्रमात सचिन सूर्यवंशी-बेडके यांना वाढदिवसानिमित्त बापूसाहेब मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या. प्रा. ए. एम. शेख यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. विक्रम आपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नामदेवराव सूर्यवंशी-बेडके महाविद्यालयाचे प्राचार्य एल. के. बोराटे, यशवंतराव चव्हाण प्रशालेचे प्राचार्य आर. पी. भोसले, वेणूताई कन्या प्रशालेच्या प्राचार्या सौ. अश्‍विनी डोईफोडे यांच्यासह मसाप सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, सेवक उपस्थित होते.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा