दुरिताचे तिमिर जाओ…!

दुरिताचे तिमिर जाओ...!

जागतिक स्तरावर एक अस्वस्थता आहे. ट्रम्प प्रशासनातील मंत्री एकामागून एक राजीनामे देत सुटले आहेत. अमेरिकनांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा नाताळ या सणाच्या दिवशी व्हाईट हाऊस सुने-सुने आहे कारण तिथे आर्थिक टाळेबंदी काही दिवस लागू आहे. कर्मचारी वर्गाला सक्तीच्या रजेवर पाठविले गेले. जगाचे शक्तिस्थान असलेली अमेरिका ट्रम्प तात्यांच्या नेतृत्वात विस्कळीत होऊ पाहते आहे तर इराक आणि सिरीआमध्ये 2014 नंतर अचानक जगाच्या नकाशावर आपल्या क्रौर्यासाठी ओळखली जाणारी आयसीस पूर्णपणे संपली असे म्हणता येत नाही.

सौदी अरब आणि अन्य अरब देश अजूनही त्यांना पतपुरवठा करतात हे स्पष्टच आहे. आयसीसच्या उत्पातामध्ये अनेक लोकांना इराक व सिरिया सोडून बाजूच्या युरोपीय देशात आश्रय शोधावा लागतोय. त्यातून जर्मनीसारख्या आश्रितांना सामावून घेणार्‍या देशांना वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतंय. चीनच्या आक्रमक आणि साम्राज्यवादी धोरणात काडीचाही फरक नाही. उलट अमेरिकेच्या कचखाऊ नेतृत्वामुळे चीन येणार्‍या काळात आपले पाय अधिक पसरत जाणार आहे. युरोपीय देश, जर्मनी अपवाद सोडला तर आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

थेरेसा मे यांना शासन आणि प्रशासन चालविणे दिवसागणिक कठीण होत जाणार आहे आणि त्यांना लवकरच पायउतार व्हावे लागेल हे देखील स्पष्ट आहे. एकंदर या जागतिक अस्वस्थतेच्या मुळाशी आर्थिक कारणं आणि त्यातून येणारी असुरक्षिता महत्त्वाची आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर भारत म्हणून विचार केल्यास; भारतात 2019 हे निवडणुकांचे वर्ष आहे आणि कधी नव्हे ती चुरस आणि उन्माद वातावरणात आतापासून दिसू लागलाय. दोन्ही बाजूंनी शस्त्र परजले जात आहेत. सत्ता मिळविण्यासाठी जात, धर्म, पंथ सारे-सारे वेठीस धरले जाणार आहे आणि ते करताना अमुक एखाद्या पक्षाने विधीनिषेध बाळगावा अशी अपेक्षा करणेच मूर्खपणाचे ठरणार आहे. समाजाच्या मनःपटलावर या निवडणुका किती जखमा करून जातात याचा हिशोब कुणालाच नसणार आहे.

या सार्‍यांची चर्चा करण्याचे कारण असे; की इतकी सारी नकारात्मकता समाजात व्याप्त असताना हा समाज निरंतर प्रवास करतोय; एकमेकांना सांभाळून घेतोय. त्याची प्रेरणा काय असावी? कशाच्या बळावर हा समाज, समाज म्हणून जिवंत आहे? या समाजाच्या चीतीचा शोध घेतल्यास स्पष्ट जाणवते की या देशातील सामान्य माणूस आणि त्याची समाज आणि देश म्हणून प्रतिबद्धता, देशातील तथाकथित बुद्धजीवी वर्गाच्या आकलनाच्या पलीकडे आहे. साहित्य अकादमी विजेता तरुण लेखक ऐश्वर्य पाटेकरने या वर्षीच्या थिंक पॉझिटीव या दिवाळी अंकात एक कथा लिहिलीये.

…मला आमच्या इथं गावातील बियावाल्या बाईची गोष्ट आठवते. बियावाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं रहायचं. हा तिचा हात गुण होता की झाडा-कोडावरची माया? माहीत नाही. मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं. ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती पण तिने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही.
बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही. तिला एकदा आई म्हणाली होती,
‘‘आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झालं असतं तर आता नातू -पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!’’

तेव्हा तीचं उत्तर होतं, ‘‘नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती?’’

‘‘कसा जन्म जावा ओ… आत्याबाई तुमचा?’’ तेव्हा ही बियावाली बाई म्हणाली, ‘‘जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं! मला मुलाची आस नव्हती? होती ग… पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली. म्हणाली, आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना… दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला..’’

‘‘अन् तसही, किती लेकरा बाळावाल्या आया-बाया होत्या माझ्या भवतीच्या पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे. माझ्या या लेकराबाळांना पाय नाहीत, हे एका अर्थी बरंच झालं! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत.’’
कुठून येतं हे जगण्याचं बळ? बिया पेरत, या भूमातेची कूस उसवण्याची भन्नाट कल्पना कुठून येते? किती विशालता या लहानशा गोष्टीत दडली आहे! आपण सारे सुखवस्तू; आपल्या आजूबाजूला बघून अस्वस्थ होत राहणार त्याच वेळी सामान्य भासणारी असंख्य माणसे माणसाला माणसाशी, माणसाला निसर्गाशी, माणसाला सद्भावनेशी जोडत राहण्याचा प्रयत्न अगदी शांतपणे करत राहणार. अगदी आम्ही असू सुखाने पथ्थर पायातील या ओळीप्रमाणे आपले आयुष्य झीजवणारी माणसे आपल्याला जगायचे बळ देऊन जातात. ते शांतचित्ताने घडवीत असतात त्यांच्या स्वप्नातील मंदीर. जे आश्रय देणार असतं असंख्य जीवांना!

पन्नास वर्षापूर्वी हेमलकसा आणि भामरागड या भागातील परिस्थिती काय असेल? कुणी तिथे जाऊन काम करू शकेल अशी कल्पना तरी केली असेल का? पण डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि सौ. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या वडिलांच्या प्रेरणेने हेमलकसा गाठलं आणि मग सृजनाचे कारंजे त्यांच्या हातांनी फुलत गेले. त्यांच्या परीसतत्त्वाचा स्पर्श तिथल्या मातीला झाला आणि तिथल्या मातीची कूस उजवली गेली. तेथील आदिवासी समूहाला आधार मिळाला पण यामागे आम्ही काहीतरी फार जगावेगळे करतोय असा दंभ कधीच नव्हता. केवळ होता तो याच मातीतील परंतु परिस्थितीने मागे राहिलेल्या वंचित घटकाला हात देण्याचा… विंदा आपल्याला फार छान सांगून गेले, देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे, घेणार्‍याने घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावे.. आपल्याला हा देणार्‍याचा हात घेता आला पाहिजे. म्हणजेच देणारा हात होता आले पाहिजे. आज प्रकाश आमटे सत्तरीत पोचले पण कामाचा झपाटा आजही होता तसाच आहे. आता अनिकेत आमटे त्यांचे काम पुढे घेऊन जातोय. त्या भागात शिक्षणाची चळवळ तो रुजवू पाहतोय…

याच भागातील आणखी एक उदाहरण म्हणजे देवाजी तोफा. हा माणूस देखील असाच. लेखा मेंधाच्या आदिवासीना त्यांचा स्वर देत सुटलाय. आपली जमीन, जंगल आणि नैसर्गिक संसाधने केवळ सरकारची नसून त्याचे वर्षानुवर्षे जतन करणारे आदिवासी, तेथील ग्रामपंचायत यांचा त्यावर पहिला अधिकार आहे हे ते निक्षून सांगतात. महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती. त्याचे कृतीशील रूप समजून घ्यायचे असेल तर लेखा मेंढा समजून घ्यावे लागेल. आज लेखा मेंढा ही श्रीमंत ग्रामपंचायत आहे. त्यांनी सरकारशी संघर्ष करून आपले हक्क मिळविले आणि ग्रामस्वराज प्रत्यक्ष साकारले. हा माणूस देखील अशिक्षित! त्याच आदिवासी भागात राहणारा पण ध्येयवेडा. या देशाचे वाट्टोळे याच देशातील बुद्धीजीवी करीत असताना देवाजीसारखी साधी माणसे हिमालयासारखे काम करून समाजासमोर आदर्श निर्माण करीत सुटले आहे.

आमच्या चंद्रपुरातील आणखी एक वेडा माणूस म्हणजे बंडू धोत्रे.

कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सामान्य पण या माणसाने वेगळाच ध्यास घेतलाय. पोपटराव पवार, अण्णा हजारे यांनी त्यांची गावे समृद्ध करून सोडली हे आपण ऐकत असतोच पण शहर आदर्श आणि समृद्ध केल्याचे आपल्या ऐकिवात नसते. बंडू धोत्रे नावाचा अवलिया त्याच्या इको प्रो या तरुणांच्या संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारसा स्वच्छता आणि संवर्धन अशा दोन्ही आघाड्यांवर भरीव काम करतोय. महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांची काय अवस्था आहे हे आपल्याला ठाऊक आहेच… त्याची जबाबदारी केवळ शासनावर सोडून बंडू धोत्रे थांबत नाही तर त्याची स्वतः जबाबदारी घेत त्यांनी शहरातील गोंड कालीन किल्ला स्वच्छता अभियान हाती घेतले आहे… गेले चक्क सहाशे दिवस बंडू आणि त्यांचे सहकारी अविरत निःस्वार्थ बुद्धीने शहराच्या स्वच्छतेत गुंतलेले आहेत… कुठून येत असेल ही ऊर्जा?

आपल्याला दशरथ मांझी नावाचा माणूस आठवत असेल. तसे नाव लक्षात राहण्याचे कारण नाही. एक सामान्य मजूर माणूस. बिहारच्या गेह्लोर गावातला. त्याच्या गावाच्या समोर एक भला मोठा पहाड उभा होता आणि याच पहाडामुळे आजूबाजूच्या सत्तर गावच्या लोकांना दवाखाने, शाळा आणि शहरात जायला सत्तर किमीचा रस्ता तुडवावा लागायचा. तो भला मोठा पहाड दशरथला वाकुल्या दाखवायचा. झाले! एकदिवस दशरथने छन्नी-हातोडा घेतला आणि तो अख्खा पहाड खोडून काढण्याच्या कामी त्याने स्वतःला झोकून दिले. किती दिवस? एक-दोन नव्हे तर तब्बल बावीस वर्षे. काय धाडस! किती चिकाटी! कुणासाठी? केवळ सामान्य माणसांसाठी… आपल्यासारख्या असंख्य माणसांसाठी. मांझीने 360 फूट लांब आणि 30 फूट रुंद रस्ता खोदून काढला. जो आज अनेकांच्या कामी आला आहे. ज्यावेळी दशरथ मांझी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला गेले; तेव्हा त्यांनी स्वतः उभे राहून आपली स्वतःची खुर्ची मांझी यांना बसायला दिली. हा त्या माणसाचा सन्मान होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे कितीही विरोधक असले तरी; संघाने सुरु केलेली सेवाकार्ये आज समाज व्यापू पाहत आहेत. तुम्ही संघाचे विरोधक असा की समर्थक; संघ यापलीकडे समाजासाठी जे प्रकल्प राबवतोय त्याला जगात तोड नाही. आज जवळपास लहान-मोठे असे एक लाख सत्तर हजारच्या आसपास नवनिर्माण प्रकल्प संघ राबवतोय. तुम्ही भलेही त्याची दाखल घेऊ नका पण संघाची ही चेहरा नसलेली माणसे हे कार्य निरंतर करीत राहणार आहेत हे निश्चित. आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागाल्यांड या भागात जिथे आपल्याला जाणे देखील अशक्य आहे तिथे संघाचे तरुण प्रचारक कुठलीही प्रसिद्धी नसताना, वेतन नसताना केवळ आपला देश आणि समाज या भावनेतून काम करतात… त्यांची कधीतरी दखल घ्यावी लागेल.. या देशातील तथाकथित बुद्धीजीवी वर्गाने त्यांच्याकडे नेहमीच उपहासाने बघितले असले तरी या तरुण वर्गाने त्याची कधीच पर्वा केली नाही.

अशी असंख्य माणसे आपल्या अवतीभवती जीवाच्या आकांताने मानवी जीवन समृद्ध करण्यात गुंतली आहेत. ज्ञानोबा माऊलींनी ‘दुरितांचे तिमीर जाओ’ अशी आकांशा उराशी धरली. माऊलींच्या या ओळी प्रत्यक्ष जगणारे आपल्यात आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणार्‍या या माणसांना समाजाने बळ देण्याची गरज आहे. समाज तोडण्याच्या या काळात डॉ. आमटे, दशरथ मांझी, मेळघाटातील डॉ. कोल्हे दाम्पत्य या सगळ्यांनी आपले जगणे सुकर केले आहेच परंतु या कोलाहलात तोच एक आशेचा किरण आहे.

प्रशांत आर्वे
चंद्रपूर
चलभाष : 8888624969

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा