ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांची सध्या चर्चेत असणारी कादंबरी म्हणजे ‘डायरी एका चंद्राबाईची.’ मुंबईच्या ‘ग्रंथाली प्रकाशन’ने पुस्तकाचे काम अतिशय देखणे केले आहे तर सतीश भावसार यांनी आशयाला अनुसरून मुखपृष्ठ रेखाटले आहे.
आपल्या समाजव्यवस्थेत वेश्येला खूप खालचे स्थान दिले गेले आहे. चारचौघात व प्रतिष्ठेच्या ठिकाणी न बोलण्याचा हा विषय समजला जातो. वेश्या ही पुरुषांची भोग वस्तू आहे. वासना भागविण्याचे जणू ते यंत्रच आहे… पैसा टाकायचा आणि शरीराची भूक भागवून घ्यायची.. कातडीची आग शांत करायची. एवढाच काय तो समाजाचा वेश्यांकडून वापर होत असतो…
पण काही प्रश्न मात्र आपल्याला जिवंत मनाला पडत नाहीत. ते म्हणजे वेश्या निर्माणच का होतात? त्यांना असला व्यवसाय करायची हौस असते का? त्यांना या गटारीमध्ये कोण आणतं? कशासाठी आणतं? ती वेश्या होण्याआधीचं तिचं आयुष्य काय असेल? तीनं काही स्वप्न पाहिली नसतील का? आणि मग आता त्या स्वप्नांचं काय? कोणी केला असेल तिच्या स्वप्नांचा चक्काचूर? असे प्रश्न या समाजाला कधी पडतच नाहीत. पडतात ते फक्त लेखकांना.. तेच डॉ. द. ता. भोसले यांना पडले आणि त्यांच्या प्रचंड चिंतनातून ही कादंबरी जन्माला आली. ही कादंबरी एका वेश्येच्या जीवनाची करूणकथा घेऊन आपल्यासमोर येते.
या कादंबरीमध्ये सर्व स्त्रिया येतात त्या खूप हतबल आहेत. परिस्थितीने त्यांच्या पदरात मरणकळा टाकल्या आहेत परंतु त्या वेश्या जरी असल्या तरी एक माणूस म्हणून त्या सतत जिवंत असलेल्या आपल्या निदर्शनात येतील. त्या वेश्या असल्या तरी त्यांचं आई होण्याचं स्वप्न त्यांनी चंद्रा लहान होती तेव्हा तिच्यात पूर्ण करून घेतलं.. एकदा का हे काटेरी आयुष्य वाट्याला आलं की त्याला कोणतीच तक्रार न करता त्या आयुष्य जगत राहतात.. मरणाचा विचार त्यांच्या मनात येतो पण त्याला त्या भिरकावून लावतात. हा त्यांच्याकडून शिकण्यासारखा गुण आहे.
डॉ. द. ता. भोसले या पुस्तकाच्या मनोगतात म्हणतात की, ‘ही कादंबरी लिहिताना मी कमालीचा अस्वस्थ होतो.’ याचा अर्थ वेश्येचं खरं जीवन जेव्हा आपल्याला माहीत होईल, तिच्या आयुष्याची परवड जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपणही अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. कोणतीही स्त्री हौस म्हणून वेश्या होत नसते, तर आपल्याच समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवणार्यांनी तिला ही वाट दाखवलेली असते अथवा त्या वाटेवरून तिला ओरबडत नेलेले असते. आपल्याच माणसांनी आपली सोय म्हणून या स्त्रियांच्या स्वप्नाचे खून केलेले असतात आणि हीच माणसे परत या स्त्रियांना तुच्छ समजायला लागतात.. नक्की तुच्छ कोण? असा प्रश्न ही कादंबरी उपस्थित करते.
कादंबरीची भाषा खूप ओघवती आहे. ती कुठेही अवघडल्यासारखी वाटत नाही. ती लवचिक वाटते. भाषेचे वेगवेगळे प्रयोग कादंबरीमध्ये पहावयास मिळतात. हा विषय जुनाच असला किंवा ही परिस्थिती जुनीच असली तरी डॉ. द. ता. भोसले यांनी नाविन्यपूर्ण शैलीत ती वाचकांसमोर ठेवली आहे, त्यामुळे तिला एक महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही कथा फक्त एकट्या चंद्राबाईची कथा नाही तर चार भिंतीच्या आत आपलं आयुष्य जाळून घेणार्या प्रत्येक स्त्रीची ती कथा आहे. चंद्राबाई फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर येते. कित्येक तरी चंद्राबाईंचा आवाज रोज या व्यवस्थेमध्ये गप्प केला जातोय. त्यांच्या ओरडण्याचा आवाज तोंडात बोळे कोंबून बंद केला जातोय. जोपर्यंत बाई तरुण आहे, सुंदर आहे तोपर्यंत ती सगळ्यांची आवडती असते आणि एकदा का वय झालं, चेहर्यावर सुरकुत्या उमटायला लागल्या की ती प्रत्येकाला नकोशी वाटायला लागते. तिच्याकडं गिर्हाईक येत नाही आणि सगळ्या वेश्यांचा शेवट हा खूप वाईट होतो. आपला समाज स्त्रीच्या शरीरावर तर बलात्कार करतोच पण मनावर पण बलात्कार करून तो तीचं जगणं काटेरी करून टाकतो. हे पण कादंबरी नमूद करते.
या कादंबरीत स्त्रीला त्रास देणारी, तिचा संभोग घेणारी शेकडो पात्रे येतात. नव्हे तर आपल्याला शाळेत शिकविणारे आपले गुरुजीच चंद्राचे पहिले गिर्हाईक बनून येतात.. ही किती विचार करायला लावणारी बाब आहे. ज्या माणसांनी समाज घडवायचा असतो, ज्या माणसाला आपण समाजाचा अभियंता म्हणतो तो जर अशा पद्धतीनं वागू लागला तर उद्याचा समाज नक्की कसा असेल ही खूप मोठी चिंतनाची गोष्ट आहे पण कादंबरीतील एक पात्र मात्र आपण कधीच विसरू शकत नाही ते म्हणजे ’बाप!ू’ बापू खरंतर गिर्हाईक म्हणूनच चंद्राकडे येतो आणि आयुष्यभर तो चंद्राची सावली बनून राहतो. तो चंद्राबाईवर जीवापाड प्रेम करतो, निखळ प्रेम करतो. चंद्राबाईच्या आयुष्यात जो काय थोडाफार उजेड होता त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बापू. मराठी साहित्याला डॉ. द. ता. भोसले यांनी दिलेलं आणि सर्वांच्या कायम मनात राहणारं पात्र म्हणजे बापू आहे. चंद्राबाईची आपल्या जिवाभावाच्या माणसाच्या प्रेमाची जी भूक असते ती बापूने शेवटपर्यंत पूर्ण केली आहे.
मराठी साहित्यात वेश्या हा विषय तसा उपेक्षितच राहिलेला भाग आहे. डॉ. द. ता. भोसले यांनी या विषयाला हात घालून, तिचं जगणं मांडून तिलाही सन्मानानं जगण्याची हाक समाजाला दिली आहे. ती हाक प्रत्येकाला ऐकू यावी, तरच चंद्राबाईंनं लिहिलेल्या डायरीचं खर्या अर्थानं सार्थक होईल.
गणेश गायकवाड
पंढरपूर
चलभाष : 8605540063
खूपच छान शब्दांकन आहे हे गणेश गायकवाड. द. ता. भोसले सरांची ही कादंबरी नक्कीच विशेष असणार ह्यात काहीच वाद नाही. माझ्या खूप खुप शुभेछ्या आणि भोसले सरांचे मन:पूर्वक अभिनंदन.