स्वत: प्रथम हिंदू व्हा!

स्वत: प्रथम हिंदू व्हा!

माझे मित्र प्रशांत आर्वे यांनी माझ्या हिंदू धर्म आणि वैदिक धर्म स्वतंत्र आहेत या सिद्धांतावर आक्षेप घेत एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी भारतात घडलेल्या अनेक घटनांचा उल्लेख करत माझे मत हे समाजशास्त्रीयदृष्ट्या कसे विघातक ठरू शकते हे दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. तो ‘साहित्य चपराक’च्या जानेवारीच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला. या निमित्ताने सांस्कृतिक चर्चेला महाराष्ट्रात बहर येऊ पाहतो आहे हे निश्‍चितच सुखावह आहे. त्यांच्या आक्षेपांना सविस्तर उत्तर देणे हे महत्त्वाचे आहे कारण हे व असे आक्षेप माझ्यावर घेतले गेले आहेत. या सर्वांनाच एकत्रित उत्तर देण्याचा प्रयत्न मी या प्रत्युत्तरात्मक लेखात करणार आहे. अनेकदा याविषयक माझे सर्व साहित्य न वाचताच माझ्यावर आक्षेप घेतले जातात, त्यामुळे आक्षेपात फोलपणा कसा येतो हेही या निमित्ताने वाचकांच्या समोर येण्यास मदत होईल अशी आशा मला आहे.

लेखाच्या सुरुवातीसच प्रशांत आर्वेंनी पोपच्या 1999 मधील विधानाचा आधार घेत एकविसाव्या शतकात आशिया आणि विशेषत: भारत आमचे लक्ष्य असणार आहेत हे विधान उद्धृत करुन द्रविडस्तानाची पुन्हा नव्याने मागणी, खलिस्तानवाद्यांचा पुन्हा उमटू लागलेला सूर वगैरे गोष्टी पोपच्याच विधानाचे प्रत्यक्ष उमटणारे पडसाद आहेत असे सुचवले आहे. ब्रिगेड आणि मूलनिवासीवाद्यांनी महाराष्ट्राचे भावजीवन गढूळ केले, या घटनाही आकस्मित नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. कोरेगाव भीमा प्रकरणही एका व्यापक कटाचा भाग होता हे सिद्ध झाले आहे असाही त्यांचा दावा आहे. माझे मित्र असल्याने त्यांनी मीही पोपचा हस्तक आहे असे विधान वा आरोप केलेला नसला तरी माझा सिद्धांत पोपला सहायक ठरू शकेल अशी शंका त्यांना असल्याचे जाणवते. त्यांनी तसा सरळ आरोप केला असता तरी बिघडले नसते कारण माझ्यावरचा हाही आरोप नवा नाही.

मी ‘किस्त्रीम’च्या एका दिवाळी अंकात ‘आता एकच शंकराचार्य हवेत!’ असा एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. या लेखात मी सर्व हिंदू समाजाला एका सूत्रात बांधायचे असेल, हिंदूंना वर्ण, जातीभेद नष्ट करुन समतापूर्ण वातावरणात आणत सर्व हिंदू एकसमान ही भूमिका घेत धर्मगुरु या नात्याने वर्तमान सर्व सोळा शंकराचार्यांनी एकत्रित नवा धर्मादेश जारी करावा आणि सर्व धर्माधिकार (वेदोक्तासह) सर्व हिंदू समाजाला आहेत असे घोषित करावे अशी मांडणी केली होती. सर्व शंकराचार्यांना तीन-साडेतीनशे लोकांच्या सह्यांची पत्रेही पाठवली होती. त्याला एकानेही प्रत्युत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही हा भाग अलाहिदा. हा लेख खूप गाजला पण जानेवारी 2008 च्या किर्लोस्कर मासिकाच्या अंकात एक प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आणि ती होती संघाचे विचारवंत श्री. मा. गो. वैद्यांची. त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की मी ‘व्हॅटिकनचा हस्तक’ आहे आणि माझे समग्र प्रतिपादन फिजूल आहे. धर्मात समतेची मागणी फिजूल आहे वा ती करण्याचा मलाच अधिकार नाही असे बजावून सांगत मला व्हॅटिकनचा, म्हणजेच पोपचा हस्तक ठरवणे हा संघाच्या एका जबाबदार माणसाच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे असे म्हणावे लागेल कारण विषमतेच्या वैदिक मूलतत्त्वावर उभ्या असलेल्या आणि हिंदू नाव घेत वैदिक धर्माचेच प्रतिनिधित्व करणार्‍या संघाची समतावादी भूमिका कशी असणार? समरसता नावाखाली चातुर्वर्ण्याचेच गुणगाण गात मनुस्मृती कशी शास्त्रशुद्ध समाजरचना मांडते हे सातत्याने बजावून सांगणार्‍यांकडून समतेची काय अपेक्षा बाळगणार? असो. येथे सांगायचा मुद्दा एवढाच की मला ‘पोपचा हस्तक’ फार पूर्वी ठरवले गेलेले आहे.

किंबहुना, ज्यावेळीस वैदिक धर्मियांना अडचणींचे प्रसंग येतात तेव्हा-तेव्हा ते लोकांचे लक्ष परधर्मीयांकडे वळवत राहतात हे आता नवीन राहिलेले नाही. मुस्लिम आणि नंतर ख्रिस्ती याकडे बोट दाखवणे आणि अडचणीच्या विचारवंत अथवा अभ्यासकांना त्या धर्मियांचे आणि तेही नाही जमले तर कम्युनिस्टांचे हस्तक ठरवणे हा वैदिकवाद्यांचा हातखंडा खेळ आहे. ब्रिगेड आणि बामसेफ यांचा मी कडवा वैचारिक विरोधक आहे (आणि ते आर्वेंनाही मान्य आहे) पण ते परकी शक्तींचे हस्तक आहेत हा आरोप अत्यंत गंभीर असू शकेल याचीही नोंद घ्यायला हवी आणि जर असाच आरोप करायचाच झाला तर संघ (सनातन, विहिंप वगैरे) ज्युंचे (इस्त्राएलचे) किंवा मोसादचे हस्तक आहेत असा आरोप झाला तर संघाची प्रतिक्रिया काय असेल? कारण संघाचे ज्यु प्रेम सर्वविख्यात आहे! तेव्हा असले हेत्वारोप कामाला येत नाहीत. जे चूक असते ते सार्वकालिक चूकच असते, मग ते कोणीही असो.

दुसरा मुद्दा द्रविडस्तानाचा. अलीकडे ही मागणी पुन्हा एकवार डोके वर काढते आहे हे सत्यच आहे पण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रथम या मागणीने डोके वर का काढले होते? आर्य सिद्धांताच्या आहारी जात, इंग्रजांचे पुरातन रक्तबांधव ठरवून घेण्याच्या नादात ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ हे कोणी लिहिले? आर्यांची पाळेमुळे मध्य आशिया ते उत्तर ध्रुवापर्यंत शोधण्याचा अवाढव्य प्रयत्न तेव्हा आणि आजही कोण करत आहेत? आक्रमक आर्यांनी द्रविडांना उत्तरेतून दक्षिणेत हाकलले हा प्रचार कोण करत राहिले? आर्य भाषागट आणि द्रविडभाषा गट ही विभागणी कोण करत राहिले? या सिद्धांतांना पाठबळ पुरवण्यासाठी हजारो लेख आणि शेकडो पुस्तके लिहित कोण पाठबळ देत राहिले? मग तुमचा वंश वेगळा, भाषागट वेगळा आणि आम्ही वेगळे तर मग आमचा स्वतंत्र देश हवा अशी मागणी का होणार नाही? पांचट सिद्धांताच्या आधारावर स्वत:ला श्रेष्ठ म्हणवून घेण्याच्या नादात वैदिक आर्यांनी जो उत्पात मांडला याचे थोडे जरी उत्खनन आर्वेंनी केले असते तर विभाजनवादाचे पाप कोणाचे हा प्रश्‍न आर्वेंना आणि त्यांच्या समआक्षेपकारी मित्रांना पडला नसता आणि याला पोपला जबाबदार धरणे (किंवा एखाद्या मुल्लाला) हा वैचारिक वांझपणा आहे. आज द्रविडस्तानचा विषय वर येतो आहे त्याला भाजप सरकारने संगम काळातील पुरातत्वीय स्थानांच्या उत्खननात आणलेले राजकारण आहे हे आर्वेंनी समजून घ्यावे.

पुन्हा अलीकडे वैदिक आर्य हे मूळचे भारतातीलच (म्हणजे हरियानातील) हे सिद्ध करण्याची टुम आली आहे. श्रीकांत तलगेरी, कल्याणरमन ते डॉ. वसंत शिंदे अशी ही रांग आहे. मूलस्थान आणि तेही केवळ वैदिक आर्यांचे शोधण्याची आजही ही धडपड का? आणि अनार्यांनी आपल्या मूळांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तो अपराध का? वेदरचना करणारा समाज तो आर्य असे समजा गृहित धरले तरी वेदरचना करत यज्ञकेंद्रीत धर्म स्थापना करणारा आणि तो अवलंबणारा समाज म्हणजे एका विशिष्ट धर्माचा समाज असाच त्याचा अर्थ होतो आणि समजा एका भागातून (मग तो उत्तर ध्रुव असो की हरियाना) अन्यत्रही हा धर्म पसरला असेल तर ते काम केवळ धर्मांतरानेच होऊ शकते आणि जे धर्म बदलतात त्यांचा धर्मांतराआधी कोणत्यातरी प्रकारचा धर्म असतोच आणि सर्वच लोक धर्म बदलत नसतात. वैदिक धर्म उत्तरेतील काश्मीरमध्ये दहाव्या शतकापर्यंत पोहोचू शकला नाही आणि जेव्हा गेला तेव्हा मर्यादित लोकात आणि तेही अर्धवट पद्धतीने पसरला. सर्व भारतात हीच स्थिती आहे आणि होती. बव्हंशी लोक आपल्या मूळ धर्मालाच चिकटून राहिले या वास्तवाचे काय करायचे?

प्रश्‍न असा आहे की जर धर्म एकच आहे तर मग सर्व हिंदुंची पाळेमुळे शोधण्याऐवजी वैदिक आर्यांचीच पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न का झाला? ज्या देवी-दैवतांचा वेदांशी संबंध नाही, ब्राह्मण ग्रंथ ते स्मृतींतही उल्लेख नाहीत, योग-पूजादि कर्मकांडांचा उल्लेखही नाही ते वेद हिंदू धर्माचे मूलस्त्रोत कसे असू शकतील हा प्रश्‍न जर पडत नसेल तर मला वाटते आपण गहन अज्ञानात आहात किंवा स्वकल्पित समजुतींमध्ये आकंठ बुडालेले आहात आणि कल्पित समजांना कसलेही औषध किंवा उत्तर असू शकत नाही.

प्रशांत आर्वे यांना वैदिक धर्म आणि हिंदू धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीची गंभीरपणे दखल घ्यायला भाग पाडले आहे. माझ्या समाजमाध्यमातील पानसरे हत्याप्रकरणी मी केलेले समीर गायकवाड या तरुणाबद्दलचे वैदिकवाद्यांनी हिंदुंना हाताशी धरुन घडवून आणलेला कट… अशा आशयाचे वाक्यही उद्धृत केले आहे. मी याबद्दल आर्वेंचे आभारच मानतो.

‘सनातन’ या नावातच वैदिक शब्द लपलेला आहे. सनातन वैदिक धर्म किंवा सनातन धर्म हे समानार्थी शब्द आहेत किंबहुना वैदिक धर्म किंवा वैदिक संस्कृती या नावाने पं. महादेव शास्त्री असोत की तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, अशा शेकडो वैदिक विद्वानांनी निरलसपणे या शब्दाचा प्रयोग केला आहे पण ते स्वत: वैदिक असल्याने त्यांच्या मांडणीवर कोणी आक्षेप घेतल्याचे माझ्या पाहण्यात नाही पण अवैदिक (म्हणजेच हिंदू) असलेल्या सोनवणीने दुसरा अवैदिक (म्हणजेच हिंदू) गायकवाडबद्दल विधान केले तर ते मात्र आक्षेपार्ह ठरते… हा कोणता वैदिक न्याय आहे? सनातन धर्माशी माझा किंवा समीर गायकवाडसारख्या कोणाही हिंदुचा संबंध आलेला नाही पण हे वैदिक एकीकडे स्वत:ला वैदिकही (किंवा सनातनीही) म्हणवणार आणि वर नाक करून हिंदू म्हणवून घेत हिंदुंचा वापर आपले जेही असतील ते हेतू पुरे करायचा प्रयत्न करत असतील तर त्याला विरोध का करु नये? की मीही ‘सनातन की जय हो’ म्हणत झुंडीत सामील होत वैदिकांची अपरंपार प्रशंसा मिळवायची? मला येथे पडलेला प्रश्‍न हा की या सनातनविरुद्ध आपल्या लेखात आर्वेंनी कसलाही आक्षेप का नोंदवला नाही? की ही सोयीस्कर भूमिका आहे?

आर्वे आणि माझे इतर आक्षेपकर्ते मित्र येथे हे विसरत आहेत की ब्राह्मण पुरुषांची कत्तल करुन त्यांच्या स्त्रीयांना उपभोगावे अशा स्वरुपाची विधाने करणार्‍या पुरुषोत्तम खेडेकरांविरुद्ध गुन्हा दाखल करणार्‍या पाच जणात मी एक होतो. जाहीरपणे त्याबद्दल लिहिलेही आहे. शिव्या-धमक्यांतून गेलेलो आहे पण ती बाब समजा बिनमहत्त्वाची आहे. प्रश्‍न असा आहे की हीच न्यायबुद्धी आर्वे किंवा त्यांच्या मित्रांनी कधी दाखवली? येथे मी धर्मभेद केला नाही. अगदी बाबासाहेब पुरंदरेंबाबतही मी न्यायाच्या बाजूने उभा राहिलो… नशीब की आर्वे ते तरी मान्य करतात.

जेव्हा हनुमंत उपरे नामक गृहस्थ ओबीसींच्या बौद्ध धर्मांतराची व्यापक चळवळ चालवत होते तेव्हा मी एकमेव होतो ज्याने सर्व धोके पत्करत त्याला विरोध केला. सामूहिक धर्मांतर होऊ न देण्यात यशस्वीही झालो… तेव्हा हे स्वत:ला हिंदू समजणारे वैदिक आणि त्यांच्या संघासारख्या संघटना कोठे होत्या? ते गप्प बसले कारण धर्मांतर झाले असते तरी ते हिंदुंचे झाले असते, वैदिकांचे नाही… मग हिंदुंनी धर्मांतर केले तरी त्यांचे काय बिघडत होते? उपरेंबाबत जे झाले ते पूर्वीच बाबासाहेबांबद्दल झाले. त्यांनी धर्मांतराची घोषणा करुन, तब्बल वीस वर्ष वाट पाहूनही वैदिक धर्माचार्य अस्पृश्यांना स्पृश्यता द्यायला पुढे आला नाही. संघही बाबासाहेबांच्या बाजूने आला नाही. संघाचा तर्क हा आहे की बौद्ध-जैनादि धर्मही हिंदुच आहेत. ही बनचुकवेगिरी झाली कारण बौद्ध-जैनादि धर्म तसे मानत नाहीत. शिवाय हे धर्म हिंदू किंवा वैदिक धर्मतत्त्वांपेक्षा वेगळी स्वतंत्र तत्त्वे पाळत असतात. असे असूनही तेही हिंदुच म्हणून विरोध केला नाही हे स्पष्टीकरण संघाला तरी कसे पटू शकते हे कळायला वाव नाही. मुळात संघ हिंदुंचा प्रतिनिधी नाही हे वास्तव संघाच्याच धार्मिक विचारप्रणालीतूनच दिसते पण अनेकदा भाबडेपणाच्या आवरणाखाली संघ धादांत असत्य रेटत आला आहे पण बाबासाहेबांचे लाखो अनुयायांसह धर्मांतर झाले. जर हे सर्वच धर्म एक तर मग मुळात धर्मांतर का झाले आणि मुळात त्याची गरज का पडली याचे चिंतन करण्याची गरज संघाला पडली नाही कारण ते नुकसान वैदिकांचे नाही, हिंदुंचे झाले. संख्या वैदिकांची नाही तर हिंदुंची कमी झाली! मग ख्रिस्ती/इस्लाम धर्मांतरांबाबत गळे काढण्याचा नैतिक अधिकार कोणी दिला?

वैदिक धर्मीय आजही वैदिक महत्तेत रममाण आहेत. अजूनही ते वैदिक विमाने उडवण्यात मग्न आहेत. ते चुकूनही तेव्हा हिंदू विमाने, हिंदू संस्कृती, हिंदू कृषी किंवा हिंदू अर्थव्यवस्था असे शब्द वापरत नाहीत. त्यांना हिंदू शब्द आठवतो तेव्हाच जेव्हा हिंदुंना वापरुन घ्यायचे असते आणि याला इतिहास साक्षी आहे. किंबहुना वैदिक आणि हिंदू धर्म आणि संस्कृती हे दोन स्वतंत्र भाग आहेत, ते एकजीव, एकजिनसी कधीच नव्हते, आजही नाहीत याचा हा एक पुरावा आहे. आता त्यांच्या पुढील आक्षेपांकडे वळुयात!

प्रशांतजींचे म्हणणे असे आहे की पुरोगामी सिद्ध करण्याची धडपड करतो आहे, डाव्या-उजव्यात संतुलन साधण्याचा खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो आहे. हा आरोप किंवा समज असू शकतो आणि त्याला काही इलाज नाही कारण मी स्वत:ला काहीही सिद्ध करण्याची आणि तीही धडपड करतो हे म्हणणे हास्यास्पद आहे हे माझे लेखन वाचूनच समजायला हवे. किंबहुना बव्हंशी पुरोगामी (सध्याचे) प्रतिगाम्यांप्रमाणेच माझ्या विरोधात आहेत आणि त्यातील कोणीही माझ्या बाजूचे व्हावेत यासाठी मी कधीही प्रयत्न केलेला नाही आणि मीही त्यांना पुरोगामी मानत नाही कारण माझ्या भविष्यवेधी परिवर्तनशीलता म्हणजे पुरोगामित्व या व्याख्येत ते बसत नाहीत. राहिले डाव्या-उजव्यांचे, माझा या बाबतीत एक लेख ‘चपराक’मध्ये मागेच प्रसिद्ध झाला आहे. तो वाचावा एवढेच मी सांगू शकतो!

आता त्यांचा मुख्य आक्षेप. वैदिक कोण? त्यांच्या मते आजतागायत त्यांना हे स्पष्ट झालेले नाही आणि मी गुळमुळीत उत्तर देतो. आता हा आरोप गुळमुळीत आहे असे सहज म्हणता येईल कारण त्यांच्या ह्या लेखी असलेल्या गुळमुळीत उत्तरातही वैदिक कोण हे त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर आहे. वैदिक धर्मशास्त्रानुसारच ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे त्रैवर्णिक असलेले द्विजवर्णीय हे वैदिक धर्मीय होत. यांना वैदिक अथवा सनातन धर्मीय म्हटले जाते कारण त्यांनाच सनातन वेदांचा, वेदोक्त कर्मकांडांचा, संस्कारांचा जन्मजात अधिकार असतो.जे या वैदिक परिघाबाहेरचे आहेत ते हिंदू धर्मीय. त्यांचे कर्मकांड तंत्राधारित (किंवा पुराणोक्त) असते. हा धर्म पुरातन असून त्याचे अवशेष सिंधू काळापासून सर्वत्र मिळतात. या दोन धर्मात कर्मकांड ते उपासनापद्धती स्वतंत्र आहेत. उतरंडीची समाजरचना आणि स्त्री-पुरुषातील असमानता हा वैदिकधर्मिय समाजशास्त्राचा मुलभूत पाया असून त्याउलट हिंदू धर्मातील समतावादी स्थिती आहे. ती व्यवहारातही होती. हिंदुंनी आपली कर्मकांडे आपल्याच तंत्रोक्त किंवा पुराणोक्त पद्धतीने करावीत असा वैदिकांचा नेहमीच कटाक्ष राहिलेला आहे. वैदिकांच्या दृष्टीने हा शुद्रांचा धर्म आहे आणि तरीही आर्वे दावा करतात की वैदिक संस्कारांचे संचित एवढे मोठे आहे की वैदिक आणि हिंदू असे वेगळे करणे अनेकांना शक्य झालेले नाही.

वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्म किंवा हिंदू धर्म म्हणजेच वैदिक धर्म अशी मांडणी करायची असेल तर सर्वांना समान धर्मतत्व आणि धर्माधिकार असायला हवेत हे ओघाने आलेच! सर्वच धर्मांतील पुरोहित वर्गाला विशेषाधिकार मिळतात हेही खरे आहे पण पुरोहित व्हायचेच असेल तर तसे व्हायला सर्वांना समान संधी असते. त्यामुळे वैदिकांना हिंदू धर्मामध्ये विशेषाधिकार आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध गरळ ओकली जाते हे म्हणणे तथ्यहीन आहे. शिवाय सर्वच वैदिक मंडळी पुरोहित पेशा अंगीकारतात असेही नाही आणि तरीही त्यांचा वैदिक वर्ण आणि वेदोक्ताधिकार अबाधित असतात या वास्तवाकडे आर्वेंनी लक्ष दिलेले दिसत नाही.

माझा रोख वैदिक नावाखाली केवळ ब्राह्मणांकडेच आहे असा आर्वेंचा समज झालेला दिसतो. कलीयुगात क्षत्रिय आणि वैश्य उरलेले नाहीत. (मग भले परशुरामामुळे असोत की नंदांमुळे) या पुराणकथेचा त्यांच्यावर पगडा असू शकतो पण आजही कागदोपत्री का होईना क्षत्रिय आणि वैश्य वर्णावर दावा सांगणारे किंवा खरेच वैदिकाधिकार असलेले उच्चवर्णीय भारतीय समाजात आहेत या वास्तवाचा विसर पडून कसे चालेल? की या वर्णांचे अस्तित्व वैदिक धर्मगुरुंनी (किंवा समाजाने) पुरते अमान्य करुन टाकले आहे? अमान्य केले असेल तर त्यांना त्यांनी धर्मबाह्य केले असेच म्हणावे लागेल. नसेल तर मग खरेच परशुरामाने किंवा नंदाने या वर्णांना समूळ नष्ट केले असे म्हणावे लागेल. आता हे नष्ट करण्यात एकीकडे वैदिक असलेला परशुरामही जबाबदार आहे असे म्हटले जाते आणि दुसरीकडे शूद्र (म्हणजे हिंदू) नंदालाही जबाबदार धरले जाते. आता नेमके काय आहे हे ठरवण्याची जबाबदारी वैदिक धर्मातील शीर्षस्थानी असलेल्या ब्राह्मणांनीच ठरवायचे आहे. माझा तो मुळात धर्मच नसल्याने व त्यासंबंधी मला (किंवा अन्य कोणाही हिंदुला) तो अधिकारही नसल्याने वैदिक कोण हे वैदिकांनीच ठरवायचे आहे. त्यात मी कसा हस्तक्षेप करू शकतो? माझ्याकडून तशी अपेक्षाही कशी केली जाऊ शकते? माझा रोख केवळ ब्राह्मणांवर असता तर मला सुदैवाने तो शब्द टाइप करता येतो, लिहिताही येतो. मग मी वैदिक शब्द वापरायची चलाख खेळी का करेल? वैदिक धर्माच्या व्याख्येत तीन वर्णांचे लोक येतात आणि स्वतंत्रधर्मिय म्हणून मी तिन्ही वर्णांचा एकत्र उल्लेख करणे हेच शास्त्रीय आहे. आता ब्राह्मणांनाच फक्त वैदिक शब्द खटकत असेल तर तो दोष कोणाचा?

आता पुरुषसूक्ताबद्दल. ते अत्यंत कुप्रसिद्ध आहे असा आर्वेंचाही निर्वाळा आहे. ते ऋग्वेदात प्रक्षिप्त आहे असा सर्वच विद्वानांचा निर्वाळा आहे. हे सूक्त वैदिक आर्य भारतात आल्यानंतर रचले गेले अशीही मान्यता आहे कारण या सूक्तात संपूर्ण ऋग्वेदात कोठेही न उल्लेखल्या गेलेल्या शुद्र या समाजाची नोंद आहे. त्यामुळे वैदिक आर्य नव्या लोकांच्या सान्निध्यात आल्यानंतर याची रचना करत ऋग्वेदाला ते जोडले गेले. शूद्र या शब्दाची कोणतीही व्युत्पत्ती मिळून आलेली नाही. ही एक सिंधू नदीच्या परिसरातील एक जमात (टोळी) होती याचे पुरावे मात्र उपलब्ध आहेत. या सूक्तात काही वाईट नसले तरी याच सूक्ताचा आधार घेत वैदिक विषमतावादी धर्मशास्त्रे रचली गेली. हे सूक्त प्रक्षिप्त आहे, कुप्रसिद्ध आहे तर हिंदू देवतांच्या पूजाकर्मात कोणत्याही हिंदू देवतेशी संबंधित नसलेले हे सूक्त जाणीवपूर्वक का म्हटले जाते? अगदी श्रीविठ्ठल ते शांतादुर्गेपर्यंत या सूक्ताचा अनिर्बंध वावर का असावा? हे सूक्त विषमतायुक्त समाजरचनेच्या सिद्धांताच पाया मानले जाते. त्याचा पूजा-अर्चनेशी काही संबंध नाही. मग नेमक्या याच कुप्रसिद्ध सूक्ताची निवड पूजा-अर्चेतही का केली याचा उलगडा होतो. हिंदू देवतांचाही अवमान करण्यासाठी व आपली वैदिक महत्ता जपण्यासाठी या सूक्ताची निवड पूजादि हिंदू कर्मकांडात केली गेली हे उघड आहे! हे धार्मिक पाखंड वैदिकांनी का केले? मला वाटते, प्रशांत आर्वे व अन्य आक्षेपक मित्रांना या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर द्यावे लागेल!

शुद्र आणि आर्य हे वेगळे, स्वतंत्रपणे जन्माला आले असे यजुर्वेदानेही स्पष्ट केले आहे. त्रैवर्णिकांचा बाहेर असलेला समाज (मग ते शक, हुण, कुशाण, औंड्र-पुंड्रादि समाज का असेनात) ते शुद्र होत असे मनुस्मृतीच म्हणते. शुद्र हे आधी एका टोळीचे नाव होते पण नंतर ते त्रैवर्णिक नसलेल्या सर्वांसाठीच वापरण्यात येवू लागले असे राज पृथी व वि. का. राजवाडेही म्हणतात. या नावांची टोळी सिंध प्रांतात अस्तित्वात होती याचे ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत. भारतात सर्वत्र शुद्रच राहत असावेत हा समज वैदिकांचा. त्यांचा धर्म वैदिक असणे शक्यच नव्हते. थोडक्यात वैदिक धर्माच्या कक्षेबाहेरील समाजांना सरसकट शुद्र समजले गेले. अन्य धर्मीयांचा उपहास करण्याची प्रथा सर्वच धर्म पाळतात त्यामुळे वैदिकांनी शुद्रांना तुच्छ व असंस्कृत समजणे अत्यंत स्वाभाविक होते. बौद्धही वैदिकांना किती तुच्छ स्मजत याचे विवरण ह्यु-एन-त्संगाच्या भारत प्रवासवर्णनात आलेले आहेच. हिंदुंनाही ते तुच्छच लेखत! त्यामुळे वैदिकांनी हिंदुंना तुच्छ लेखले यात नवल वाटायचे काहीएक कारण नाही.

पण येथे लक्षात घ्यायची बाब म्हणजे शुद्रांची उत्पत्ती स्वतंत्र आहे, धर्म-देवी-देवता स्वतंत्र आहेत तर मग हे दोन धर्म एक कसे होऊ शकतात? की केवळ आपला आग्रह आहे म्हणून त्यांना एक मानावे? पण धार्मिक जीवन मात्र स्वतंत्रच ठेवावे? असे होऊ शकत नाही. कोणताही समाजशास्त्रज्ञ असले वेडगळ मत फेटाळून लावेल! कारण तसे एककाकारत्व कधीच नव्हते याचा अगदी अलीकडचा, म्हणजे सवाई माधवराव पेशव्याच्या काळातील एक निवाडा प्रसिद्ध आहे. तो मी जसाच्या तसा देतो-

कसबे पेण परगणे साकसे येथील समस्त ब्राह्मण हुजूर येऊन निवेदन केले की, श्रीमंत कैलासवासी नारायणरावसाहेब यांचे कारकिर्दीत परभूंचे कर्माचरणाविशी सरकारांतून ठराव करून दिल्हा, त्याप्रमाणे त्यांणी वर्तावे, ते न करिता आपला धर्म सोडून मनस्वी वर्तणूक करून चोरून ब्रह्मकर्म करितात, येविशी त्यांस ताकीद होऊन बंदोबस्त जाहला पाहिजे म्हणोन; त्याजवरून मनास आणितां पेशजी कैलासवासी तीर्थरूप रावसाहेब यांचे वेळेस चौकशी होऊन परभूंचे वर्तणुकेविशी कलमांचा ठराव जाहला, त्याप्रमाणे त्यांणी सरकारांत कतबा लिहून दिल्हा, त्यांतील कलमे, बीतपशील
* वैदिक मंत्रेकरून कांहीच कर्म करणार नाही.
* वैदिक मंत्र जे येतील त्यांचा उच्चार करणार नाही.
* भाताचे पिंड करणार नाही.
* देवपूजादिक विहित कर्मे पुराणोक्त मंत्रेकरूनच करुं व ब्राह्मणभोजन आपले घरी करणार नाही.
* शालग्राम पूजा करणार नाही.
* ज्या देवास शूद्र जातात त्या देवास आह्मी जाऊ.
* ब्राह्मणांस दंडवत मोठ्याने म्हणत जाऊ व आपले जातींतही दंडवतच म्हणत जाऊ.
* वैदिक ब्राह्मण व आचारी व पाणक्ये व शागीर्द ब्राह्मण व ब्राह्मण बायका चाकरीस ठेवणार नाही व आपले घरीही ठेवणार नाही.
* आमचे जातीमध्ये आपले संतोषे पाट लावतील त्यांस आह्मी अडथळा करणार नाही.
येणेप्रमाणे नव कलमे लिहून दिल्ही असता, परभू आपले घरी चोरून ब्रह्मकर्मे करतात, यामुळे पेणकर ब्राह्मणांचा व त्यांचा कजिया वाढोन परभूंची घरची सर्व कर्मे बंद जाहाली, त्यास येविशीचा हल्लीचा विचार करितां, परभूंचे कर्माचरणाविशी पेशजी चौकशी होऊन कर्मे ठराऊन दिल्ही आहेत त्याप्रमाणे त्यांणी वर्तावे, तें न करितां आपला धर्म सोडून मनस्वी वर्तणूक करितात हे अनुचित, पेशजी कर्मे ठराऊन दिल्ही आहेत तीच योग्य, असे शिष्टसंमतें ठरोन पुणियांत परभूंची घरे असतील त्यांस निक्षून ताकीद करून सदरहू कलमांप्रमाणे वर्तवीत जाणे. यांत जो कोणी अन्यथा वर्तेल त्याचे बरे वजेने पारपत्य करून गुन्हेगारी घेत जाणे म्हणोन चिटणिसी.

सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी (निवडक उतारे ) अंक 3 रा :- संपादक – गणेश चिमणाजी वाड, काशिनाथ बाळकृष्ण मराठे. (प्रकाशक- डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रांसलेशन सोसायटी, पुणे, 1911, पृ. 287-292.)

प्रभु (म्हणजे चांद्रसेनी कायस्थ प्रभुंबाबतचा हा निवाडा आहे. त्यांनी वेदमंत्र (येत असले तरी) म्हणू नयेत, देवपुजादिक विधी पुराणोक्त मंत्रांनीच करु, वैदिक देव (शालीग्राम) पुजू नये, शुद्रांच्याच देवांना पुजावे, पाट लावण्याच्या त्यांच्या प्रथेला ब्राह्मण विरोध करणार नाहीत वगैरे कलमे असलेला हा निवाडा आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त विधी असणारे दोन स्वतंत्र धर्म आहेत व त्याचे उल्लंघन केल्यास त्यात शिक्षेची तरतूद आहे. या मजहरनाम्याच्या 196 नकला करुन संपूर्ण पेशवाईतील महत्त्वाच्या शहरांत वितरीत केल्या गेल्या होत्या. असे असूनही हिंदू व वैदिक धर्म एकच आहेत असे म्हणण्याचे धाडस कसे होऊ शकते हे मला पामराला समजत नाही.

प्रशांत आर्वे यांनी आपल्या लेखात मझ्या नावावर काही विधाने अक्षरश: ठोकून दिली आहेत. उदा. इसपू चौथ्या शतकात वेद निर्माण झाले आणि हा काळ बौद्धोत्तर आहे. मग वेदपूर्व काळात बुद्धाने आर्य-अनार्य या संज्ञा कशा वापरल्या? हा त्यांचा प्रश्न! पण हे असे अनैतिहासिक विधान मीच काय कोणत्याही जागतिक कीर्तीच्या कोणाही संशोधकाने कोठे लिहिले आहे याचा संदर्भ त्यांनीच दिला पाहिजे कारण ते वास्तव नाही आणि मी असे विधान कधीही केलेले नाही. सिंधु नदीच्या पलीकडे सारेच हिंदू राहतात हा समज वैदिकांचाच नाही तर सर्वच पाश्चात्य जगाचा होता. हिंदुस्तान, इंडिका, इंडिया ही नावे त्यातूनच आली. वैदिक लोक इंदू, सिंधू हेच शब्द वापरताना दिसतात पण भारतात वैदिक आले तेव्हा त्यांना शुद्र नावाची जमात भेटली आणि त्यांचे भारताबाबतचे मुळचे आकलन बदलले हे लक्षात घेतले पाहिजे.

राहिले आर्य आक्रमण सिद्धांताबद्दल. हा सिद्धांत बाष्कळ व वंशश्रेष्ठत्वतावाद जपण्यासाठी युरोपियनांनी जन्माला घातला हे खरेच आहे पण म्हणून आर्य भारतातीलच होते हाही सिद्धांत वेडगळपणाचा आहे. आर्य आक्रमण सिद्धांताला आधी बळच पुरवणारे या सिद्धांताचा का विरोध करु लागले हा खरा प्रश्न आहे. त्या मतपरिवर्तनामागे पुरावे व शास्त्रीय हेतू असता तर ते कदाचित स्वीकारार्हही झाले असते पण वैदिक धर्म भारतात जन्माला आला नाही याचे पुरावे खुद्द ऋग्वेदच देत असल्याने ते मत त्याज्ज्य ठरते. हा धर्म भारतात इसपू 1200 ते 1000 च्या दरम्यान विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या अत्यल्प वैदिकांनी आणला. नंतर त्यांनी या धर्माचे 27 प्रचारक नेमून धर्मप्रचार करत काही धर्मांतरे करवून घेतली. याच प्रकारे हा धर्म इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर उत्तरेकडून महाराष्ट्र ते तमिळनाडूपर्यंत पसरवला. त्यामुळे आजचे बव्हंशी वैदिक येथलेच धर्मांतरीत आहेत. मुलनिवासीवाल्यांचा सिद्धांत त्यामुळेच स्वीकारार्ह होत नाही. येथले वैदिक काही युरेशियातून आलेले नाहीत. येथलेच आहेत. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ जी.एस. घुर्येनी येथील धर्मांतरण प्रक्रियेवर मोठा प्रकाश टाकलेला आहेच! या धर्मांतरीत वैदिकांमुळे वैदिक धर्मातही स्थित्यंतरे घडून आली, स्मार्त-श्रौत हे पंथ पडले, पंचगौड आणि पंचद्रविड ही प्रादेशिक विभागणीही झाली. मूळ हिंदू धर्मत्त्वांचे संस्कार व अंश घेत वैदिक धर्मात प्रविष्ट झालेल्या धर्मांतरीतांमुळेच स्मार्त पंथ उदयाला आला. श्रौत मात्र मूळ वैदिक धर्मालाच चिकटून बसले.

मग या धर्मांतरीतांची कुलदैवते तेही येथीलच असल्याने मुळची हिंदुच राहणार हे उघड आहे. आजचे बव्हंशी धर्मांतरीत नवबौद्धही हिंदू कुलदैवते पाळतात. भारतातील धर्मांतरीत मुस्लिमांत अनेक हिंदू प्रथा बदल करुन का होईना टिकवल्या गेल्यात पण मूळ दैवते कायम ठेवताना त्या दैवतांची पूजा करताना त्यात वैदिक अंश घुसवत अधार्मिक कार्य केले गेले हे आर्वे विसरतात. अन्यथा पुरुषसुक्त किंवा हिंदू देवतांशी दुरान्वयानेही संबंध नसलेली मंत्रपुष्पांजली पुजेत का म्हटली गेली असती? त्यामुळे आमचीही कुलदैवते हिंदुंप्रमाणेच शिव-पार्वती, खंडोबा वगैरे आहेत म्हणून आम्हीही हिंदू ही पळवाट झाली. हिंदू पीरालाही जातो म्हणून तो मुसलमान होत नाही तसंच हिंदू दैवतांची पूजा केली त्यामुळे ते हिंदु होत नाहीत. ते हिंदू दैवतांची पूजा वैदिकपण आणि वैदिक माहात्म्य जपत करतात ही खरी समस्या आहे. किंबहुना त्यांचे पुजाविधीबाबतचे कर्मकांड स्वतंत्र आहे. हिंदू धर्माचा मूलस्त्रोत शिव आहे, वेद नव्हेत हे मान्य करण्याची हिंमतच वैदिकांत नाही एवढे वेदमाहात्म्य वैदिकांच्या रक्तात मुरलेले असते. शिव वेदबाह्य आहे हे सारीच वैदिक धर्मशास्त्रे ओरडून बजावत आलेली आहेत. वर्तमानातही संघप्रणित सरकार ज्या पद्धतीने वेदमाहात्म्य (अगदी सायंस कॉंग्रेसमध्येही) गात आहे त्यावरुनच हे लक्षात यावे. त्यामुळे आमचा धर्म वेगळा नाही हे जर वैदिक म्हणत असतील तर त्याकडे केवळ एक ढोंग किंवा भाबडी संकल्पना म्हणूनच पहावे लागते.

माझे मित्र प्रशांत आर्वे आणि अन्य मित्रांना शंका आहे की या सिद्धांताची प्रासंगिकता काय? खरे तर मी मांडतो तो सिद्धांत नसून भारतीय सांस्कृतिक इतिहासाचे अन्वेषन केल्यानंतर दिसणारे दोन स्वतंत्र धर्मप्रवाह हे एक वास्तव आहे. ते नसेल तर ते पुराव्यांनिशी खोडून काढले पाहिजे. केवळ हेत्वारोप करुन किंवा जी विधाने मी केलेलीच नाहीत ती माझ्या तोंडी टाकून उपयोग नाही. मी हे संशोधन कोणावरच्या राग-लोभापोटीही केलेले नाही. त्या संशोधनासाठी व्ह्यटिकन तर खूप दुरची बाब राहिली, कोणा हिंदुनेही कसलीही मदत केली नाही. उलट अडथळेच आणलेले आहेत. मी वैदिक-हिंदू वादामुळे माझे अकारण नुकसान करुन घेतले आहे, असे केले नसते तर मला खूप मान्यता व प्रतिष्ठा मिळाली असती असे सांगणारे तर अनेक आहेत पण संशोधन मुळात मान्यतेसाठी असते की सत्यशोधनासाठी हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर मला खूप आधी गवसले आहे. मी तर कोणत्याही अर्थाने वैदिक नाही. मग मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधनाचा प्रपंच केला आहे आणि हाती लागलेले जेही सत्य आहे ते माझ्या हिंदू बांधवांसमोर ठेवत त्यांना त्यांच्या धर्माचे आत्मभान देत एका भावनिक जोखडातून मुक्तता करण्याचा प्रयत्न आहे आणि तो का करु नये? जर वैदिक जोरोशोरोंमध्ये वैदिक माहात्म्याचा निरंतर जयघोष करत अगदी इतिहासातही ढवळाढवळ करत असतील तर का गप्प बसावे? मी गप्प बसणार्‍यातील तर नक्कीच नाही!

लेखाचा शेवट करताना प्रशांतजींनी काय काय नाकारणार हा भावनिक प्रश्न विचारला आहे. त्यात त्यांनी जे श्लोक उद्घृत केलेत ते वैदिक आहेत हा गैरसमज टाकावा एवढेच मी त्यांना म्हणेल. ‘सर्वेपि सुखिन:’ हे वचन जैन वाड्मयातील आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हा औपनिषदिक विचार हिंदू आहे. ‘कृण्वंतो विश्वमार्यम’ हे वचन निश्चित वैदिक आहे अणि ते सर्व जगाला इस्लाम बनवू या विधानासारखेच आहे. कोणत्याही धर्मात सर्वस्वी काहीही त्याज्ज्य नसते अथवा सर्वच स्वीकारार्हही नसते. हिंदू धर्मही त्याला अपवाद नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. सर्वच धर्मांतील आदर्श तत्त्वे घेत एक विश्वधर्म बनावा आणि सर्व जगाचेच एक राष्ट्र बनवावे हा माझा 1998 पासूनचा सिद्धांत आणि विचारांचा मुख्य गाभा आहे पण त्या आदर्शाकडे वाट चालायची असेल तर विकृत वर्चस्वतावाद त्यागावा लागेल. शबरीमला प्रकरणी स्त्री-प्रवेशाला विरोध करण्याची मानसिकता नेमकी कोणात आहे हे पाहिले की वैदिक विचारधारेचा विरोध का आणि कशासाठी आहे हे लक्षात येईल. अपवाद असतात आणि तेच नियम बनवतात. अपवादांची संख्या वाढली तरच मूळ तत्त्वगाभा ढिसूळ होत नाहीसा होऊ शकतो. मला जर काही नाकारायचे असेल तर वर्चस्ववादी, विषमतामूलक तत्त्वज्ञान. या तत्त्वज्ञाचा मूलस्त्रोत वैदिक असल्याने मी त्याला नाकारणार हे उघड आहे. खरे तर सर्वांनीच नाकारावे असे मला वाटते.

पण तसा कोणताही प्रयत्न न करता नवसिद्धांतच समाजविघातक आहे अशी मांडणी करण्यात वेळ वाया घालवण्याला काय म्हणता येईल? भीती आहे तरी कशाची? सत्याची की कोणी विकृत संशोधनाचा गैरवापर करेल याची? मी हा विचार केलेला नाही असे नाही. मानवतावादी स्वतंत्रतावादाचा सिद्धांत मांडणारा मी स्वप्नातही कोणावरही सामाजिक अथवा धार्मिक अन्याय धर्माच्या नावावर व्हावा अशी कामना करणार नाही.

प्रशांतजी, माझी मांडणी विभाजनवादी नाही. विभाजन होतेच आणि आजही आहे. मी त्या विभाजनाची सैद्धांतिक मीमांसा केली आहे. ही जुन्या बाटलीतील नवी दारु नाही तर जुन्याच बाटलीतील जुनीच दारु आहे… वैदिक धर्म स्वतंत्र नाही अशी मांडणी कोणत्याही धर्मेतिहासाच्या अभ्यासकाने केलेली नाही आणि त्याला अगदी आजचे तलगेरीसहितचे संशोधकही अपवाद नाहीत. फक्त हे एक शूद्र असलेल्या हिंदू सोनवणीने पुन्हा अधिक खोलात जात सांगितल्यामुळे खटकत आहे, एवढेच!

समाज एक व्हायला हवा आणि सर्वांची वाटचाल इहवादी होत, समतेच्या महामार्गावरुन होत या देशाने एक उज्ज्वल शिखर गाठावे. प्रत्येक मनुष्य, स्त्री असो की पुरुष… यशस्वी व्हावा यासाठी त्याला खुले अवकाश मिळेल असे सामाजिक वातावरण निर्माण करावे ही माझ्या लेखनाची प्रासंगिकता आहे. वैदिकांनीही आपल्या असमानतेच्या वैदिक तत्त्वांना तिलांजली देत समताप्रधान हिंदू व्हावे ही माझ्या संशोधनाची प्रासंगिकता आहे. कधी काळी मुळचे हिंदुच असलेल्यांनी वैदिक धर्मात प्रवेश केला. त्यांनी घरवापसी करत हिंदू धर्मात यावे यासाठी हा प्रपंच आहे पण असे न करता पुन्हा पुन्हा वैदिक तत्त्वज्ञान उराशी जपत स्वत:ला हिंदू म्हणवत हिंदुंमध्ये मानसिक गोंधळ निर्माण केला तर त्याला सैद्धांतिक विरोध होणारच! वैदिक एकाच वेळेस दोन धर्माचे असू शकत नाही आणि हिंदुंना तर तीही सवलत नाही हे लक्षात घ्यावे लागेल.

जर खरेच या कार्यात सहभागी व्हायचे तर स्वत: प्रथम हिंदू व्हा असेच आवाहन मी करेन!

-संजय सोनवणी
9860991205


प्रशांत आर्वे यांचा ‘चपराक’मधील ‘सोनवणी सर, उत्तर द्या’ हा आक्षेप घेणारा मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा –

सोनवणी सर, उत्तर द्या!

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “स्वत: प्रथम हिंदू व्हा!”

  1. Govind

    khup chan mat mandle ahe sir tumhi

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा